पहिल्याच प्रवासात प्रवाशांनी ‘तेजस एक्स्प्रेस’ची अक्षरश: दैना करून टाकली.
काही व्यक्तींना नशिबाने अनेक चांगल्या गोष्टी मिळतात. मात्र, त्याच व्यक्ती आपल्या करंटेपणाने आणि वाईट सवयींमुळे या सगळ्यावर पाणी फेरतात, याचे मासलेवाईक उदाहरण सध्या ‘तेजस एक्स्प्रेस’च्या निमित्ताने अनुभवायला मिळाले आहे. गोव्याहून आपला पहिलाच प्रवास करून मुंबईत परतलेल्या या गाडीची अवस्था बघून रेल्वे अधिकाऱ्यांना धक्काच बसला. पहिल्याच प्रवासात प्रवाशांनी ‘तेजस एक्स्प्रेस’ची अक्षरश: दैना करून टाकली आहे. ‘तेजस एक्स्प्रेस’ मुंबईत परतली तेव्हा गाडीच्या डब्यांमध्ये लावण्यात आलेल्या अनेक एलईडी टीव्हींची प्रवाशांनी तोडफोड केल्याचे समोर आले. तसेच मनोरंजनासाठी देण्यात आलेले हेडफोन्सही प्रवाशांनी लंपास केले आहेत. याशिवाय, गाडीतील स्वच्छतागृह आणि इतर परिसरात पसरलेला कचरा पाहून अस्वच्छता हा भारतीय प्रवाशांच्या पाचवीला पुजलेला अवगुण आहे की काय, असेही जाणवले.
तेजस एक्स्प्रेस मंगळवारी दुपारी २.३० वाजता करमाळीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. त्यानंतर साडेआठ तासांमध्ये गाडी सीएसटी स्थानकावर दाखल झाली होती. मात्र, या पहिल्याच प्रवासात गाडीत होणारी चोरी आणि तोडफोड पाहून रेल्वे अधिकाऱ्यांसमोर नवीनच समस्या उभी राहिली आहे. या गाडीच्या ‘इकॉनॉमी क्लास’मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा संपूर्ण वृत्तांत कथन केला आहे. अनेक प्रवासी सीटसमोर लावण्यात आलेले एलईडी टीव्ही उचकटून काढण्याचा प्रयत्न करत होते. काहीजणांनी तर एलसीडी टीव्ही काढून बॅगेत भरले होते. मात्र, रेल्वे अधिकारी याठिकाणी वेळीच आल्यामुळे या प्रवाशांचा नाईलाज झाला. याशिवाय, गाडीत असणाऱ्या बायो आणि व्हॅक्युम स्वच्छतागृहांमध्ये प्रवाशांनी मोठ्य़ाप्रमाणवर घाण केल्याचे दिसून आले. स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर अनेक प्रवासी फ्लश करत नव्हते. तसेच अनेक स्वच्छतागृहांमध्ये विष्ठा आणि कचरा जमिनीवर पसरला होता. त्यामुळे आता एकूणच प्रवाशांच्या मानसिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
— सुनील बिडकर
Leave a Reply