अमेरिकेतील आहारतज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक कोलेस्टरॉलची मर्यादा पुन्हा नव्यानं ठरवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन पोस्टसह अन्य नामांकित वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अमेरिकन आहारतज्ज्ञांनी ४० वर्षांपूर्वी कोलेस्टरॉलच्या चांगल्या-वाईट व्याख्या ज्या ठरवल्या होत्या त्याचाही पुनर्विचार केला जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी पोषक आहारतज्ज्ञांच्या एका समितीने ‘न्यूट्रिशन आॅफ कर्न्सन’ अर्थात काळजीयुक्त पोषणाची चर्चा गुड आणि बॅड कोलेस्टरॉलच्या संदर्भात केली होती. आणि हा सारा विषय अमेरिकेत सामाजिक स्वास्थ्याच्या चिंतेचा विषय म्हणून गांभीर्यानं चर्चेत आला होता. आता मात्र एक नवी समिती म्हणतेय की धडधाकट प्रौढ व्यक्तींमध्ये कोलेस्टरॉल हा काही चिंतेचा विषय ठरत नाही, त्याचा थेट संबंध लगेच हृदयविकाराशी जोडू नये..ही बातमी अमेरिकेतली असली, तरी या गुड आणि बॅड कोलेस्टरॉलच्या व्याख्यांचा जगभरातल्या माणसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. तेल-तूप खाण्याच्या सवयींवर आणि आहाराच्या पद्धतींवर तर आपल्याकडेही कोलेस्टरॉलची तलवार टांगलेली दिसतेच..या साऱ्याचा कसा विचार करायचा?
या संदर्भातलीच ही एक विशेष चर्चा..
कोलेस्टरॉल या शब्दाची केवढी धास्ती अनेकांच्या मनात. तेल-तूप खाताना सतत त्या धास्तीचीच तलवार डोक्यावर. आपल्या आहाराचा विचार असा पाश्चिमात्य पद्धतीनं का करता? त्यांचे चष्मे का वापरता? ते चष्मे बदलले की इकडे लोकांच्या मनातली धास्ती, भीती, भय सारंच बदलतं. आहाराशी खेळ होतो तो वेगळाच.
आयुर्वेद सांगतो, आपण जिथे राहतो त्या प्रदेशातील धान्य, तेल, फळ इ. नियमित वापरावे. हा युनिव्हर्सल नियम अवलंबावा. आपला पारंपरिक आहार शक्यतो बदलू नये. उत्तर प्रदेशचे भैया कोणते तेल वापरतात? मोहरी / सरसू / राई. कारण त्या थंड हवेला मोहरीसारखे उष्ण तेल आवश्यक आहे. पण मुंबईत राहून मोहरीचे तेल खाल्ले तर पित्त वाढणार. मी मनसे सांगतोय. यात मनसेचा संबंध नाही.
कोकणातल्या जवळजवळ प्रत्येक तिसऱ्या घरात गावठी घरच्या नारळाचे तेल असतेच. एवढी खोबरेलाची मुबलकता आहे. परंपरेने जेवणामध्ये खोबरेल तेल वापरले जात होते. मग रोग का वाढले?
उत्तम वंगण, उत्तम एनर्जी सोर्स, उत्तम उपलब्धता, उत्तम निर्मितीमूल्य, एवढी संपत्ती असूनही उपभोगशून्यस्वामी कसा बनला? कोणी एवढं विरक्त बनवलं त्याला?
उत्तर काय असेल?
आजची औषधनिर्माण व्यवस्था. द्राक्ष -ऊस-साखर यांच्या उत्पादकांप्रमाणे खोबरेल तेलाला कोणी गॉडफादर नाही. प्रत्येकाच्या घरात तयार होणारे खोबरेल जर त्यांनी जेवणामध्ये वापरायचे ठरवले तर इतर तेलांची विक्र ी खूप प्रमाणात घटेल! म्हणजेच तेलसम्राटांच्या लॉबीला धक्का! त्यामुळे सुरू झाली जीवघेणी स्पर्धा! हो, जीवघेणीच. कारण, आरोग्याच्या मुळावरच घाव होता हा! पद्धतशीरपणे खोबरेल तेलाला हृदयरोग आणि कोलेस्टरॉलच्या दहशतीत मारले जातेय. आणि भोग भोगतोय तो सामान्य माणूस!
जे आरोग्य पूर्वी होतं ते सगळं बंद करून पाश्चात्त्य तज्ज्ञांच्या विचारांना भुलून (घाबरून) स्वत्व गमावलं की काय होतं, ते आता अनुभवता येतंय.
काहीजण सन्माननीय अपवाद आहेत. काही बालरोगतज्ज्ञदेखील आता अगदी जन्मलेल्या बाळांना खोबरेल तेलाचे काही थेंब किंवा गावठी गायीचे तूप भरवायला सांगत आहेत. आईच्या दुधात असलेले सोडियम मोनोक्लोनीक अॅसिड हे प्रथीन खोबरेल तेलातही असतं म्हणे! ही जमेची बाजू आहे.
पाश्चात्त्य कुकरी शोमध्ये सॅलेड्स, भाज्या इ.वर वरून आॅलिव्ह आॅइल घेताना आपण बघतो. म्हणून आपण आॅलिव्ह आॅइल घ्यायचं नाही. कारण आॅलिव्ह आपल्याकडे पिकत नाहीत. अशावेळी आपल्या भागात पिकणारे तेल उपयोगी ठरते. त्यातही खोबरेल तेल. पण हे तेल कच्चे वापरायचे. ही आपली पद्धत आहे. (आपली-तुपली/पाश्चात्त्य-पौर्वात्य हा भेद का? असा व्रात्यपणा मी का करतोय? ‘स्वत्वाची’ जाणीव होण्यासाठी!)
पण आपण तसं करत नाही. भलतंच करतोय. मग आता काय करायचं? गाडी रिव्हर्स घ्यायची? चुकीच्या रस्त्याने जर गाडी गेली असेल, पुढे वळायला जागाच नसेल तर गाडी मागे घेण्याला पर्याय नसतो.
आरोग्याची गाडी चुकीच्या रस्त्याने चालली आहे. अगदी १८० अंशात!
चपलेचा अंगठा तुटला तर चप्पलच बदलून टाका, तसंच गुडघ्यासारखा एखादा अवयव काम करेनासा झाला तर तो दुरुस्त करण्याऐवजी सरळ बदलूनच टाका असं सांगणारी आजची ‘वैद्यकीय’ यंत्रणा. अशा यंत्रणेकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार? आणि गाडी मागे घ्यायला कमीपणा कसला? या मागे जाण्यातच खरंतर पुढे जाणं दडलेलं आहे.
म्हणून तेलांचा विचार करतानाही तेच. जेवणात पूर्वीसारखे कच्चे गावठी खोबरेल तेल वापरायला सुरुवात करूया. आणि निरोगी राहूया.
आज डॉक्टर मंडळी कोलेस्टरॉलच्या भीतीने जेवणातील तेल कमी किंवा बंदच करायला सांगतात. वाताच्या चिकित्सेतील सर्वात महत्त्वाचे औषध जर तेल म्हणजे स्नेह आहे आणि तोच जर ‘जेवणातून’ काढून टाकला तर वाताचा कोरडेपणा, रूक्षपणा कधीच कमी होणार नाही. कोरडेपणा, रूक्षपणा, वेदना कमी होण्यासाठी ‘जेवणात स्नेह’ हा हवाच! ‘स्नेह’ जेवणात आणि जीवनातसुद्धा !
कोणी कोणते तेल वापरावे ?
आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील वातावरण, जमीन, पाणी इ. आपल्या प्रकृतीला अनुकूल असते. त्या जमिनीमध्ये जे पिकते, उगवते तेच वापरावे.
जसे कोकणात खोबरेल, शेंगतेल, तीळतेल श्रेष्ठ आहे. कोकणात करडईचे, स्थानिक तेल खावं. जे पिकत नाही ते खाऊ नये.
तेल शक्यतो कच्चेच वापरावे किंवा फार गरम करू नये (जसे चायनीज बनवताना वाफा येईपर्र्यंत तेल तापवतात. हा दोष आहे.) आपण गरम गरम भाकरीवर, चटणीमध्ये कालवून वा तेल-मीठ-मसाला-भात कालवून घेताना कच्चेच तेल वापरावे. पापड भाजून वरून तेल, मसाला, कांदा, टोमॅटो घालून खाल्ला तरी चालेल.
तूप
तूप चवीला गोड नसेल, पण गुणांनी गोड. आणि जे गुणांनी गोड असते ते शुगर वाढवेलच असे नाही.
तूप हे एकमेव द्रव्य असे आहे जे भूक शिल्लक ठेवून पोषण करते. नाहीतर बाकीचे गोड पदार्थ खाल्ले की भूक कमी होत जाते. तसं तुपाचं होत नाही.
‘खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी’, ‘तूप खाल्ल्याशिवाय रूप दिसत नाही’ अशा म्हणीदेखील व्यवहारात रूढ आहेत. चांदोमामा चांदोमामा भागलास का, तूप रोटी खाऊन जा.. आठवतंय ना हे बडबडगीत….
जर तूप वाढले गेले नाही तर चांदोमामासुद्धा जेवत नाही, उपाशीच राहतो. हे शब्दांचे अर्थ समजण्याअगोदर शिकवले जातेय. (पण लिंबोणी, करवंदी, वाडा, चिरेबंदी, तूप, माशी याचे अर्थ कुठे माहीत असतात आता पोरांना?)
आई-आजी सांगत असे, भाकरी कोरडी खाऊ नये, पोटात दुखतं. लोणी, तूप, तेल काहीतरी लावून खावी ! आधी प्रॅक्टीकल मग थिएरी, हीच भारतीय परंपरा.
एवढे महत्त्व आपल्या भारतीय परंपरांमध्ये सांगितले गेले असूनदेखील अज्ञानामुळे, अनाभ्यासामुळे, शास्त्र माहीत नसल्यामुळे तुपासारख्या अमृतापासून आपण वंचित राहतोय. समर्थ याला करंटेपणा म्हणतात. आहे पण उपभोगायचे नाही. (लॉटरी लागलीय, पण तिकीट हरवून टाकायचे.) कोणाच्या तरी शब्दावर विश्वास ठेवत, तुपासारख्या अमृताला लाथाडून टाकायचे हा करंटेपणाच नव्हे काय?
घृत म्हणजेच तूप. तूप म्हणजे गायीचेच.
आणि गाय म्हणजे देशी, गावठी, भारतीय बनावटीचीच ! या भारतीय स्वदेशी वंशाच्या ए 2 दुधाची माहिती सध्या व्हॉट्सअॅपच्या अनेक गटातून फिरते आहे. तर त्यापुढचा टप्पा तूप. तुपाचे गुण काय वर्णावे?
भल्याभल्यांना माहीतच नाही, साजूक तूप म्हणजे काय !
पाच वेळा अग्निसंस्कारित असते हे नाजूक साजूक तूप.
१. दोहन संस्कार – दूध हातानी पिळून काढले जाते. (यंत्राने नाही. यंत्राने काढलेल्या निरशा दुधाचे तपमान बदलते.)
२. मंदाग्नीवर तापवणे – दूध जेवढे सावकाश आणि मंद अग्नीवर तापवले जाते, तेवढी साय जास्त जाड येते.
३. किण्वन – गोड दुधाचे रूपांतर आंबट दह्यात करणारी प्रक्रि या.
४. मंथन संस्कार – दह्याचे लाकडी रवीने, हाताने घुसळून लोणी आणि ताक वेगळे तयार करणारा संस्कार.
५. पुन:अग्नी – मंदाग्नीवर लोणी कढवून साजूक तूप करणे.
अशा पाच अग्निदिव्यातून शुद्ध होऊन बाहेर पडलेल्या साजूक तुपाचे परीक्षण केलेलेच नसावे. अन्य पाश्चात्त्य पद्धतीच्या अतिशीत संस्कारातून तयार झालेल्या बटरने कोलेस्टरॉल का वाढू नये? तेच मिक्सरवर केलेले ताक आणि हाताने दही घुसळून केलेले ताक यांच्या गुणातील फरक किती सांगावेत?
मी स्वत: एक प्रयोग केलाय. एकाच दिवशी, एकाच वेळी, एकच तपमान असलेल्या दुधाला विरजण लावून दुसऱ्या दिवशी अर्धे दही मिक्सरमध्ये घुसळले. उरलेले दही हातानी रवीच्या साहाय्याने घुसळले. मिक्सरमधील दही एकाच दिशेत, एकाच गतीत फिरले. फक्त चार मिनिटात लोणी ताकावर पसरले. आणि रवीने किमान सतरा ते अठरा मिनिटं घुसळावे लागले. दोन्ही तळहात घासले गेल्याने लालबुंद झाले. आणि लोण्याचा गोळा ताकावर डोलायला लागला. दोन्ही ठिकाणी तयार झालेले लोणी स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यातच बुडवून ठेवले. तासाभराने या लोण्यांचे तूप कढवले. मिक्सर वापरून तयार केलेले तूप झाले बुळबुळीत आणि टिकले फक्त तीन महिने, तर स्वकष्टाने, घाम गाळून, माझे रक्त घुसळवून तयार केलेल्या लोण्याचे तूप तीन वर्षं टिकले. (नंतर खाऊन संपवले.)
कणीदार, रवाळ, करड्या रंगाची साय असलेले आणि वास तर अजूनही माझ्या नाकात दरवळतो आहे. असे नाजूकपणे केलेले साजूक तूप शंभर वर्षे टिकते, त्याला पुराण घृत म्हणतात. तेच एक हजार वर्षं ठेवले तर प्रपुराण घृत म्हणतात. याचे गुणधर्म वेगवेगळे वर्णन केलेले आहेत.
स्वत:ला शंभर वर्षे आयुष्य असणारे तूप खाणे बंद करा असे सांगत, एक दिवसाचे आयुष्य असणारी पालेभाजी खायचा आग्रह धरणाऱ्या डॉक्टरांवर आमचा जास्त विश्वास!
कलियुग. आणि दुसरं काय?
वापरलेल्या तेलाचे काय करायचे?
सतत एकाच तेलात तळल्याने, वारंवार गरम केल्याने तेल औषधी गुणांनी संपते. पण युक्तीने वापरल्यास औषधी बनू शकते. हेच कढईतील जळके तेल बाहेरून मालीश करण्यासाठी छान काम करते. माझ्या रुग्णांना कमीत कमी पैशात हे तेल कसे उपलब्ध होते? यासाठी हॉटेलमधील / वडापाव स्टॉलवरील तेल (किंवा घरातील सुद्धा) त्यात थोडा कापूर घालून वापरायला सांगतो.
काय आहेत फायदे?
मीठ, मोहरी, कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरे, आले, हळद, कढीपत्ता इ. औषधी द्रव्यांनी संस्कारित आणि सतत लोखंडी कढईत उकळत असलेले लोहसिद्ध तेल (खरपाकी स्नेह) असते. छान गुण दिसतो त्याचा. आणि इतरांनाही जरा चांगल्या नवीन तेलातील भजी, वडे मिळतात हा अतिरिक्त फायदा.
खोबरेल तेल
खोबरेल तेल म्हणजे कोकणातलं अमृत. गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे या भौगोलिक परिसराला कोकण म्हणूया. येथील एक महत्त्वाचे पीक म्हणजे नारळ. नारळ वापरल्याशिवाय कोकणी जेवण नव्हे, तर अन्य कोणतीच गोष्ट पूर्ण होणारच नाही. येथील ती परंपराच आहे. मग जेवणात असो किंवा देवाला मानाच्या ठेवायच्या नारळापासून, देवाला प्रसाद, पाहुण्यांची लग्न आदिची आमंत्रणे, ओटी भरणे, लग्नातले अहेर, मानपानापासून अगदी करणी, ओवाळणी, दृष्ट काढणे इ. अनेक कामांसाठी नारळ हा हवाच.
अमृतफळ अशासाठी म्हणतोय, या कल्पवृक्षात अलौकिक औषधी गुण दडलेले आहेत. केस चांगली वाढ होण्यासाठी, गळणारे केस कमी होण्यासाठी, कोंडा, खरबा इ. कमी होण्यासाठी नित्यनियमाने केसांच्या मुळांना खोबरेल तेलाएवढे चांगले औषध शोधूनही सापडणार नाही. त्यात कापूर पावडर टाकून केसांच्या मुळांना लावले की उवा, लिखांचा नायनाट होतो. शांत झोप येण्यासाठी डोके, तळपाय, डोळे यांना लावावे आणि कानात खोबरेल घालावे. अंघोळीपूर्वी पूर्ण अंगाला तेलाचे अभ्यंग करावे म्हणजे अंघोळीच्या थंड पाण्याने होणारा वातप्रकोप होत नाही.
हिवाळा, पावसाळ्यात जरा कोमट करून लावावे. उन्हाळ्यात तसेच वापरले तरी चालते. हल्लीच्या मराठी सिरियलमधूनदेखील डोक्याला मायेने खोबरेल तेल लावण्याचे प्रसंग मुद्दाम दाखवले जाताहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट.
तात्पर्य, रोज रात्री डोक्यावर खोबरेल तेल घालावेच. याला शिरोअभ्यंग म्हणतात.
रोज तेलाचे मालीश करावे असं म्हटलं तर जसं हाताला अत्तर लावतात तेवढंच तेल पूर्ण अंगाला पुरवून पुरवून लावणारी मंडळी आम्ही पाहतो. असे कंजुषी तेल वापरून बलाढ्य वात कमी होण्याची अपेक्षा कशी करता?
दरवाजाच्या बिजागरातून घर्षणाचा आवाज येत असेल तर तेलाचे काही थेंब सोडले तर आवाज थांबतो. आपले सांधेदेखील या बिजागरांप्रमाणेच काम करतात. त्यांना पण तेल हवे असते. शिवणाच्या मशीनलादेखील त्यातील अवयवांची झीज होऊ नये यासाठी आत तेल सोडण्यासाठी विशिष्ट ठिकाणी छिद्रे ठेवलेली असतात. अशी छिद्रे शरीरालादेखील आहेत. तोंड, कान, नाक, त्वचा, गुदद्वार, मूत्रमार्ग, प्रजनन पथ इ. यातून तेल आत सोडावे. म्हणजे या यंत्राची कार्यक्षमता वाढते. लोखंड गंजू नये म्हणून ‘आॅइलपेंट’ लावतातच ना ! मग शरीर गंजू नये म्हणून तेल लावायला हवेच. इंजिनमधले आॅइल संपू नये म्हणून डोळ्यात तेल घालून पाहिले जाते. डोळ्यात तेल घालून पहारा देणे हा वाक्प्रचार आहे हा! यासाठीच अंगाला रोज तेल लावायचा सल्ला खरे आयुर्वेदतज्ज्ञ देतात. अंगाला रोज किमान सात चमचे तेल जिरवावे.
दोन हात दोन चमचे!!! दोन पाय दोन चमचे
पोट छाती एक चमचा !!! पाठ कंबर एक चमचा
डोके आणि कान एक चमचा. याहून अधिक चालेल. पण कमी नको.
नित्यनियमाने केलेले अभ्यंग म्हणजेच तेल मालीश किती गुणकारी आहे ! भरपूर काम केल्यानंतर आलेला थकवा नाहीसा करणे, अंगावर म्हातारपण दिसू लागणे म्हणजेच त्वचेला सुरकुत्या पडणे, डोळ्यासाठी आरोग्यदायी, डोळे, शरीर तजेलदार दिसणे, शरीरसंघटन मजबूत होणे, चांगली शांत झोप येणे, त्वचेला लकाकी चकाकी दिसणे, जिमसारखं फक्त बाहेरून सिक्सपॅक न होता आतून निरोगी होणे, यासाठी एकच उपाय अभ्यंग आणि अभ्यंगच.
आज जर्मनी, रशिया इ. बाहेरील अनेक देशांत भारतीय वैद्यक परंपरेतील तेल लावण्यावर संशोधन करावेसे वाटत आहे, ते त्यांच्या पद्धतीने संशोधन करताहेतदेखील!
पण आमचे वैद्यक तज्ञ्ज्ञ म्हणतात, ‘छे हो, असं तेल लावून काय होणारे ? बाहेरून तेल लावणे म्हणजे वेस्ट आॅफ टाइम, वेस्ट आॅफ मनी आहे.’
राहून राहून एक आश्चर्य मात्र वाटते की, जर त्वचेला बाहेरून लावून आतमध्ये काही शोषलेच जात नसेल तर आज नव्याने उपलब्ध केलेली वेगवेगळी जेल, आॅईन्टमेंट, क्र ीम्स कशी काम करतात?
म्हणजे ‘ते’ तज्ज्ञ जे सांगतात ते सर्वच्या सर्व बरोबर आणि आयुर्वेदाच्या परंपरेतील वैद्य हजारो वर्षांपासून जे सांगतात ते म्हणजे कालबाह्य काय?
नारळ
कोकणात प्रत्येक जेवणात नारळ असतोच. कोकणातले आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तांदुळ! जिथे जिथे तांदुळ वापरला जातो तिथे तिथे नारळही वापरला जातो. आता हेच बघा ना! तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक आत सारण नारळाचे! घावने केले कि ओल्या नारळाची चटणी आणि नारळाचा रस! आंबोळ्या केल्या की ऊसळीचे वाटण नारळाशिवाय पूर्ण होणारच नाही. शेवया केल्या की नारळाचा रस हवाच!
तांदळाची गरम गरम भाकरी आणि सुक्या नारळाची चिंच गुळ घातलेली लसणाची चटणी. क्या बात है!
तांदळापासून बनवलेल्या पोह्यांवरसुध्दा नारळ. दडपेपोहे नारळाशिवाय कधी होतील का? आणि रात्रीचा शिळा भात, त्यावर घातलेले कच्चे खोबरेल, त्यात भर म्हणून वर नुकत्याच फोडलेल्या ओल्या नारळाचे खोवलेले खोबरे आणि मीठ मसाला व्वाह!
या चवीपुढे बिर्याणी गेली उडत.
तांदळाच्या पीठाच्या कढीपत्ता आणि लसूण घालून केलेली ऊकड. ती एका बोटाने खायची आणि या उकडीवर कच्चे खोबरेल कधी घेऊन बघितलंय? पाची बोटांनी खावीशी वाटते!
ओटी भरताना देखील नारळ आणि तांदुळ जणु काही एकत्रच खेळत असतात.
एवढे सख्य आजपर्यंत अन्य कोणत्याही पदार्थांमधे दिसलेले नाही. पोटात गेल्यावर एकमेकांना पचवून टाकतात ना! म्हणून एवढे सख्य !!!
असे अनेक पदार्थ ग्रंथात वर्णन केले आहेत, ज्यांना आजच्या भाषेत एकमेकांचे एण्टीडोट म्हटले तरी चालेल. जसे गरम गरम भातावर डाळीचे वरण, या वरणावर साजूक तूप- त्यावर ताजे कापलेले लिंबू, त्यावर चिमूटभर भुरभुरवलेले मीठ हे पदार्थ एकमेकांचे पचन करण्यास मदत करणारे आहेत.
— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
सखी पुरवणी दै. लोकमत दि. 1 मे 2017 मधे आलेला लेख.
Leave a Reply