नवीन लेखन...

टेलिफोन

दोन दशकांपूर्वी….  ट्रिंग – ट्रिंग ! टेलिफोनची रिंग वाजत होती. ती रिंग ऐकून रिसिव्हर उचलायला कोणीही पुढे सरसावत नव्हते. जो – तो एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होता कारण जो कोणी टेलिफोनच रिसिव्हर उचलणार होता, त्याला ज्या कोणा शेजाऱ्याचा फोन आला असेल त्याच्या घरी बोलवायला जाणे भाग पडणार होते.

चार – पाच वेळा बेल वाजल्यावर शेवटी नाईलाजाने मी रिसिव्हर उचलला पलीकडून एक तरुणी मधुर स्वरात म्हणाली, ” मी मनिषा बोलतेय ! जरा कविताला बोलवता का ? कविताच नाव ऐकताच मी ताबडतोब हो ! म्हणालो. कारण कविता कविता होती. जिच्यावर कविता करण्यात मी माझी कित्येक वर्षे वाया घालवली होती. मी कविताच्या घरी धावत जाऊन तिला तिचा फोन आल्याचे सांगितले. जवळ जवळ पंधरा मिनिटे फोनवरून मनसोक्त गप्पा मारून झाल्यावर कविताने रिसिव्हर खाली ठेवला आणि जाताना थँक्स म्हणून माझ्या हातावर एक रुपया ठेवला . त्यावेळी मला रस्त्यावरील त्या भिकाऱ्याची आठवण आली. ज्याला तो काही बोलण्यापूर्वीच मी एक रुपया भिक्षा म्हणून देतो. पण त्याचप्रमाणे आज पहिल्यांदाच माझ्यावरही भिक्षा घेण्याची वेळ आली. माझ्या घरातील इतर मंडळी हा अनुभव रोजच घेतात. त्या दिवशी दिवसभरात जवळ जवळ वीस पंचवीस फोन आले. त्या सर्वांना बोलावून बोलावून वीस एक रुपयाचा गल्ला मी जमा केला खरा ! पण रात्री झोपताना पायाला तेल लावून झोपावं लागलं. तेंव्हा कोठे मला जाणीव झाली एखाद्या चाळीत राहणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने आपल्या घरी फोन घेणं म्हणजे किती मोठं मनःस्ताप असतो याची.

हाच टेलिफोन जेंव्हा पहिल्यांदा आमच्या घरात आला तेंव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. चाळीच्या नियमाप्रमाणे आम्ही चाळीत सर्वाना पेढेही वाटले होते. सुरुवातीला जेव्हा टेलिफोनची रिंग वाजायची तेव्हा रिसिव्हर उचलायला सारे तुटून पडायचो. कधी रिंग वाजतेय याची आतुरतेने वाट पाहायचो. आमच्या चाळीत राहणारे जवळ जवळ सर्वजण आमचे जवळचे किंवा लांबचे नातेवाईक होते. त्यामुळे त्यांनी आमच्या घरी फोन आल्याचा आनंद त्यांच्याच घरी फोन आल्यासारखा साजरा केला. विनाकारण घरी न येणारे आमचे नातेवाईक एक एक करून घरी येऊन फुकटची चहा ढोसून जाताना आमच्या टेलिफोनचा नंबर घेऊन जाऊ लागले. हा ! हा ! म्हणता आमच्या चाळीतील तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांचाही आमच्या टेलिफोनचा नंबर तोंडपाठ झाला. आमच्या टेलिफोनचा नंबर इतक्या लवकर ऑल इंडिया फेमस झाला की आमच्या टेलिफोनचा नंबर आम्हाला स्वतःहून कोणाला सांगण्याची गरजच भासत नव्हती.

सुरुवातीला शेजारधर्म म्हणून आम्ही शेजारच्या कोणाचाही फोन आला की धावत जाऊन बोलावून आणायचो पण पुढे पुढे हा शेजारधर्म आम्हाला महाग पडू लागला. कारण नंतर एका एका शेजाऱ्याचे दिवसाला चार-चार फोन यायला लागले. दिवसभर घरात एकटी असणारी आमची आई त्यांना बोलावून बोलावून हैराण होऊ लागली. त्यावर उपाय म्हणून आम्ही ज्या कोणा शेजाऱ्याचा फोन येईल त्याच्याकडून एक रुपया घेण्याचा निर्णय घेतला आणि तो आमलात आणला. जो नियम आजपर्यत अव्याहतपणे सुरू आहे. डोक्याला ताप ठरणारा हा टेलिफोन घेण्याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. पण आमचा गणेश ! म्हणजे माझा लहान भाऊ एल. आय. सी. एजेंट झाल्यामुळे नाईलाजाने आम्हाला तो घ्यावा लागला. आमच्या घरात गणेशपेक्षाही जास्त कोणाला जर आमच्या या फोनचा उपयोग होत असेल तर तो आमच्या सोनलला ! म्हणजे माझ्या लहान बहिणीला , सोनलच्या जवळ जवळ सर्व मैत्रिणींकडे फोन होता. आमच्या घरी फोन येताच तिने तिच्या सर्व मैत्रिणींना फोन करून आमच्या फोनचा नंबर दिला. त्यांनतर जवळ जवळ आठवडाभर त्यांच्यासोबत फोनवर मनसोक्त गप्पा मारल्या. आता टेलिफोनवर गप्पा मारणे तर दूरच त्याला हात लावतानाही हजार वेळा विचार करते. कारण तिच्या मनात एक वेगळीच भिती निर्माण झाली आहे. चुकून जर एखाद्या वेळी टेलिफोनच बिल जास्त आलं तर त्याच बिल तिच्या नावे फाटायचे. आमच्या जवळचे नातेवाईक आमच्या घरी फोन आल्यापासून सार्वजनिक फोनचा रस्ताच विसरले आहेत कारण सार्वजनिक टेलिफोनसारखी आमच्या फोन ला तीन मिनिट झाल्यावर वाजणारी रिंग नव्हती त्यामुळे आमच्या फोनवरून मनसोक्त गप्पा मारता यायच्या आणि जाताना एक रुपया हातावर ठेवता यायचा . प्रत्येक एक रुपयामागे आपले चार रुपये नुकसान होतेय हे लक्षात आल्यावर मी टेलिफोनला लॉक लावण्याचा कठोर निर्णय घेतला. आणि जवळचाच चांगला मुहूर्त बघून मी तो आमलात आणला.

आमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या एका शेजाऱ्याने त्याच्या बायकोला आमच्या फोनवर फोन केला. मी त्याच्या बायकोला जाऊन बोलावून आणलं. यापूर्वी फोनवर कधीही न बोललेली बाई टेलिफोनचा रिसिव्हर हातात धरतात थरथर कापू लागली जणू तिला मलेरियाचा ताप भरलेला असावा. आमच्याच शेजारची दुसरी एक स्त्री टेलिफोनचा रिसिव्हर कानापासून तीन चार इंच लांब धरायची. बऱ्याच वेळा पाहिल्यावर एकदा मी रागाने म्हणलोच हा टेलिफोन आहे रेडिओ नाही ! लांबून ऐकायला !! एक दिवस गणेशच्या एका गुजराथी मैत्रिणीने फोन केला तो फोन नेमका सोनलने उचलला. पलीकडून ती गुजराथी मुलगी म्हणली, हँलो ! मैं ! गणेशजीकी फ्रेंड सिद्धी बोल रही हूं , गणेशजी घरमे हैं ? सोनल थोडी विनोदी स्वभावाची होती. ती चटकन म्हणाली, जी नहीं ! गणेशजी तो मंदिरमे है रिद्धी के साथ ! मी एक दिवस सोनलसोबत नाटक पाहायला गेलो होतो. नेमका तेंव्हाच माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचा फोन आला तेंव्हा दुसरं कोणी नसल्यामुळे तो फोन आमच्या आईने रिसिव्ह केला. पलीकडून माझी ती मैत्रीण म्हणाली, हॅलो ! मी विजयची मैत्रीण नीलम बोलतेय ! विजय आहे का घरात ? त्यावर आमची आई चटकन म्हणाली , तो सोनलसोबत नाटकाला गेलाय ! आईचे हे शब्द ऐकताच तिने रिसिव्हर ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी मी तिला फोन केल्यावर ती म्हणाली, मी कधी म्हणाले माझ्यासोबत गणपतीच्या देवळात चल तर तुला वेळ नसतो. मुलींसोबत नाटके पाहायला बरोबर वेळ मिळतो तुला ! ही सोनल कोण आहे ? मी बहीण ! म्हणताच तिने सॉरी म्हणत फोन ठेऊन दिला.

एक दिवस अचानक आमचा फोन बंद झाला. मी मनाशी ठरवलं आता चार पाच दिवस फोन चालू करायचाच नाही. तेवढा चार पाच दिवस सर्वाना आराम ! संध्याकाळी कामावरून घरी येताच टेलिफोनची रिंग वाजली कारण आमच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी फोन बंद असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे चार पाच दिवस आरामाचं स्वप्न धुळीला मिळालं. शेवटी वैतागून मी एक दिवस गणेशला म्हणालो, ” आता आपण हा टेलिफोन काढून मोबाईल घेऊ या ! पण त्याला आमच्या घरातील इतर मंडळीने विरोध केला कारण आमच्या घरातील टेलिफोन आता आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता. घराची प्रतिष्ठा सांभाळणं हे माझंही कर्तव्य मानून शेवटी मी ही हार मानली. आता टेलिफोनचा हा ताप सहन करण्याखेरीज दुसरा पर्याय नसल्यामुळे रोज सकाळी देवाची पूजा करताना मी देवाला साकडं घालायचो. देवा ! परमेश्वरा !! लवकरात लवकर आमच्या चाळीतील प्रत्येकाच्या घरी टेलिफोन येऊ दे ! आणि आमच्या डोक्यावरील हा ताप कायमचा दूर होऊ दे !…

लेखक – निलेश दत्ताराम बामणे
202, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए ,बी – विंग, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ) , मुंबई – ४०० ०६५.
मो. 8692923310 / 8169282058

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..