नवीन लेखन...

दूरदर्शन

सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत बदल हा अटळ असतो. कोणतीही गोष्ट दीर्घकाळ टिकून रहात नाही हे कटू असले तरी सत्य आहे. माणसांच्या बाबतीतही ही गोष्ट तंतोतंत लागू होते. कोणतीही गोष्ट माणसाला दीर्घ काळ रिझवू शकत नाही.

रेडियोने चाळीतल्या लोकांचे मनोरंजन करण्याचे काम अनेक वर्ष इमाने इतबारे केले होते. बदलत्या काळाप्रमाणे सत्तरच्या दशकात चाळीतल्या लोकांच्या मनोरंजनार्थ दूरदर्शनही बाह्या सरसावून पुढे आले. रेडियोला कान चिकटवून बसणारी जनता पुढच्या काही वर्षात टेलिव्हिजनलाही चिकटली.

मुंबईत टेलिव्हिजन आल्यापासून तो जनसामान्यांच्या घरात स्थान मिळवेपर्यंत पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे सुरुवातीच्या काळात चाळकऱ्यांसाठी दूरदर्शन नावाप्रमाणे दुरूनच दर्शन होते. या दूरदर्शनच्या दर्शनार्थ चाळीत अनेक किस्से घडून गेले होते. या दूरदर्शनच्या आणि दूरदर्शनवरून प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या व इतरही अनेक विस्मरणात गेलेल्या काही आठवणींना थोडक्यात उजाळा देण्याचा आज आपण प्रयत्न करू या. कदाचित विस्मृतीत गेलेल्या अजून काही आठवणी नव्याने गवसतील.

टेलिव्हिजनचा शोध जरी १९३० च्या सुमारास लागला होता तरी भारतात टेलिव्हिजन यायला १९५९ साल उजाडावे लागले. दिल्लीत भरलेल्या जागतिक तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनीत एका युरोपियन कंपनीने सर्वप्रथम भारताला टेलिव्हिजन दाखवला. प्रदर्शनानंतर तो टीव्ही संच आपल्याला भेट म्हणून दिला. सरकारने या टीव्ही संचाची उपयुक्तता जाणून ज्ञानवर्धन करणारे कार्यक्रम करण्यासाठी याचा वापर करण्याचे निश्चित केले आणि पंधरा सप्टेंबर १९५९ ला ऑल इंडिया रेडियोने पहिला कार्यक्रम प्रसारीत केला. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल अशी एक घटना त्यावेळेस घडली होती. समस्त महाराष्ट्राचे लाडके लेखक श्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना दुरदर्शनचे पहिले संचालक म्हणून नियुक्त केले होते. त्यांच्याच कल्पक डोक्यातून आलेल्या कल्पनेने टेलिव्हिजनला दूरदर्शन हे नाव प्राप्त झाले.

प्रसारणाच्या ट्रायल रनचा पहिला कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर दिल्ली आणि दिल्लीच्या परिसरात हे कार्यक्रम प्रसारीत होऊ लागले. आठवड्यातून दोन दिवस फक्त अर्धा तास असे पहिले प्रसारण सुरू झाले. ज्ञानवर्धनासाठी लोकांना टीव्ही उपयुक्त आहे असे लक्षात येताच १९६५ साली हिंदीतले पहिले बातमीपत्र टीव्हीवरून प्रसारीत झाले. पहिली तेरा वर्षे दिल्लीत राहिल्यानंतर देशातले दुसरे दूरदर्शन केंद्र मुंबईत स्थापन झाले, आणि नंतर हळूहळू देशभर त्याचा प्रसार झाला. १९७६ पर्यंत आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्हीचे सादरीकरण ऑल इंडिया रेडियो मार्फत होत होते. रेडियो आणि टीव्ही ही दोन भिन्न माध्यमे आहेत हे लक्षात घेऊन १९७६ मध्ये ऑल इंडिया रेडियोपासून दूरदर्शन वेगळे करण्यात आले. सुरुवातीला भारतात सगळीकडेच प्रसारण कृष्ण-धवल (Black & White) होते. १९८२ मध्ये भारतात भरवलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे भारतीयांना रंगीत टेलिव्हिजनची भेट मिळाली. एशियाड सुरू होण्यापूर्वी काही दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट १९८२ ला भारतात रंगीत प्रसारण सुरू झाले.

१९८२ पर्यंत प्रादेशिक केंद्रांवरून केवळ प्रादेशिक कार्यक्रमच प्रसारित होत होते. ज्या राज्यात दूरदर्शन केंद्र सुरू झाली होती त्या राज्यभाषेतले कार्यक्रम दुरदर्शनवरून प्रसारित केले जात होते. दूरदर्शन रंगीत झाल्यानंतर मात्र दिल्लीकरांनी राष्ट्रीय प्रसारण सुरू केले आणि त्यात दिल्ली वरून प्रसारित होणाऱ्या बातम्या प्रसारित करायला सुरुवात केली. त्यानंतर अल्पावधीतच म्हणजे १९८४ साली दिल्लीवरून राष्ट्रीय प्रसारण दाखवणारा dd2 हा स्वतंत्र चॅनेल सुरू झाला. हो, आलय माझ्या लक्षात, नमनाला घड्यापेक्षा जास्तच तेल झाले आहे. पण दूरदर्शनच्या इतिहासातल्या अत्यंत आवश्यक गोष्टींना उजाळा गरजेचे आहे म्हणून नमनासाठी अत्यंत आवश्यक तेवढेच तेल जाळले आहे.

असो, १९७२ साली मुंबईत टेलिव्हिजनने प्रवेश केला. मुंबईच्या चाळीत त्याला पोहोचायला थोडा उशीरच झाला. त्याला कारणे जरी अनेक होती तरी त्यातले मुख्य कारण म्हणजे, ज्या घरात येणाऱ्या मुंगीलाही शिरायला जागाच शिल्लक नव्हती तिथे या नवीन पाहुण्याला बसवायचा कसा आणि कुठे. त्यानंतर त्यांच्याबरोबर येणारे सोपास्कार करायचे कोणी आणि कसे? आणि या पाहुण्याला आणण्याचा आर्थिक प्रश्न तर त्याहून गंभीर होता. सदा सर्वदा उघडया असणाऱ्या चाळीच्या दरवाजातून ज्यांच्या घरी टीव्ही आला आहे त्यांच्या घरी हक्काने शिरणे हा चाळकऱ्यांचा हक्कच होता. त्यामुळे मुंबईत टीव्ही स्थिरावेपर्यंत अत्यंत मोजकेच चाळकरू त्याच्या वाट्याला गेले. ऐंशीच्या दशकात प्रत्येक शाळेत मराठीच्या परीक्षेत दहा मार्कांसाठी हमखास लिहायला लागणारा निबंध ‘दूरदर्शन शाप की वरदान’ हा प्रश्न ज्यांनी घरी टीव्ही आणला होता अशा लोकांकडे बघून सेट केला असावा असे म्हणायला भरपूर वाव आहे.

EC, क्राऊन, बुश अशा मोजक्याच कंपन्यांचे कृष्णधवल टीव्ही तेव्हा बाजारात उपलब्ध होते. या टीव्हीला बंद करायला स्वत:चे दार होते. याच्या सोबत अँटेना नावाची अत्यंत आवश्यक अशी शेपूट जोडली होती. या शेपटाशिवाय टीव्हीवर फक्त मुंग्याशिवाय काहीही दिसत नसे. नवीन पटवलेल्या प्रेयसीचे जसे अनेक लाड पुरवायला लागतात तसे घरात लावायच्या अँटेनाने चित्र स्पष्ट दिसण्यासाठी अनेक लाड करावे लागत. अनेकदा अनेक कोनातून फिरवल्यानंतर कधीतरी चित्र स्पष्ट दिसे. आणि काहीही कारण नसताना प्रेयसीचा मूड बदलतो त्याप्रमाणे या अँटेनाचाही मूड बदलत असे. मनवण्यासाठी एक वेळ प्रेयसीलाही कमी वेळ लागतो, पण या अँटेनाला अॅडजस्ट करून चांगले चित्र टीव्हीवर आणणे फार कठीण काम होते. म्हणून या प्रेयसीचा नाद सोडून अनेकांनी दुरवरून हाताळता येईल अशी गच्चीवर लावणारी बाहेरची अँटेना लावून घेतली होती. थोडस बाहेरच्या बाईसारखे हे प्रकरण होते तरी घरात शिरलेल्या प्रेयसीपेक्षा ते सुसह्य होते असे म्हटले तरी चालेल. घरची असो वा बाहेरची, स्त्रीची मनधरणी केल्याशिवाय सुटका नाही हा अनुभव तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या स्मिताने दिसून येतो आहे.

घरातल्या प्रेयसीला एकट्याच्या बळावर मनवता येत होते, पण ही बाहेरची स्त्री मनवणे हे एकट्याला झेपणारे काम नव्हते. तिला मनवण्यासाठी कमीत कमी चार जणांची साखळी तयार करावी लागत होती. टीव्हीसमोरचा पहिला माणूस, व्हरांड्यातल्या दुसऱ्या माणसाला, व्हरांड्यातला दुसरा माणूस गच्चीवरच्या तिसऱ्या माणसाला आणि तो शेवटी अँटेना फिरवणाऱ्या चौथ्या माणसाला सूचना देऊन टीव्हीवरच्या मुंग्या हाकलीत असे आणि माणसांचे काळे झालेले तोंड पहाण्यालायक करीत असे. महतप्रयासाने अनेकवेळा प्रेमाने विचारपूस केल्यानंतर ही प्रेयसी सुंदर रूप दाखवत असे. आणि टीव्हीचा मालक सुटकेचा निश्वास सोडत असे.

सुरुवातीला दुरदर्शनचे प्रसारण फक्त संध्याकाळी सहा ते दहा होते. प्रसारण जरी कृष्णधवल होते तरी त्यावर समस्त चाळकरी मंडळी तुटून पडत होती. एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रम टीव्हीवर सादर होत असत. लहान मुलांसाठी किलबिल, संता कुकडी, मोठ्यासाठी गजरा, ज्ञानदीप, खेळाची माहिती करून देणारा स्पोर्ट्स राऊंड अप, व्हाटस द गुड वर्ड, गुजराथी बंधूसाठी आवो मारी साथे, घेर बेठा, शेतकरी बांधवांसाठी आमची माती आमची माणसे, कामगारांसाठी कामगार विश्व, लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारा आरोग्यम धनसंपदा असे अनेक कार्यक्रम आठवडाभर सादर होत असत.

आजकालच्या कमरेखालच्या विनोदाला अजिबात थारा नसलेला गजरा म्हणजे खरोखरच मोगऱ्याचा गजरा हाती दिल्या सारखा होता. बबन प्रभू, आत्माराम भेंडे, दिलीप प्रभावळकर यांनी या कार्यक्रमाला वेगळ्याच ऊंचीवर नेवून ठेवले होते. हे सगळेच कार्यक्रम बघायची लोकांना हौस होती त्यामुळे टीव्ही असलेल्या घराला रोजच जत्रेचे स्वरूप येत असे. ‘स्टेडियम दर्शकोंसे खचाखच भरा है’ अशी अवस्था अनेकदा येत होती. घरातल्या माणसांना आपल्याच घरात शिरण्यासाठी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या हातापाया पडावे लागत होते. या प्रकारानंतर मालकांना अनेकदा टीव्ही विकण्याची मनापासून इच्छा होत असे. पण ‘परवडत नाय तर घेऊचा कित्याक?’ हा खोचक प्रश्न विचारून चाळकरू जगणे हराम करतील याची त्यांना पक्की खात्री होती म्हणून हा विचार त्यांना मनातच ठेवावा लागे.

नरेंद्र कदम

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..