कोकणात मंदिरांबरोबरच विविध देवतांच्या सुट्या मूर्ती बघण्यासारख्या आहेत. कदाचित त्यांची इथे पूर्वी मंदिरे असावीत. पण आज ती कुठे दिसत नाहीत. आज मात्र या मूर्ती खास कोकणी पद्धतीच्या साध्यासुध्या कौलारू देवळात ठेवलेल्या दिसतात.
कोकण हा जसा निसर्गाने नटलेला प्रदेश आहे, तसाच तो असंख्य चालीरीती, रूढी-परंपरा आणि विविध मूर्ती आणि मंदिरांनी सजलेला प्रदेशही आहे. कोकणातली बरीच मंदिरे अगदी साधीसुधी कौलारू असली तरी त्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या कथा खूपच रोमांचक असतात. कोकणात खरंतर मंदिरांपेक्षा अनेकविध वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती जास्त दिसतात. ही शिल्पसमृद्धी खरंतर कोकणचं वैभव म्हणावं लागेल. विविध राजवटींनी या प्रांतावर राज्य केले. त्यातल्या शिलाहार, कल्याणी चालुक्य या राजवटींच्या काळातील स्थापत्य आणि विविध मूर्ती कोकणात आजही बघायला मिळतात.
त्यामुळे कोकणातले स्थापत्य वैभव किंवा मूर्तिवैभव बघताना त्यातल्या अगदी महत्त्वाच्या आणि अर्थातच खूपशा आगळ्यावेगळ्या ठिकाणांची माहिती करून घेणं योग्य होईल. या सर्व गोष्टींमध्ये सर्वात अग्रेसर म्हणावे लागेल ते अंबरनाथ इथले शिवमंदिर. मंदिर स्थापत्यातील भूमिज शैलीच्या मंदिरांमधले सर्वात आद्य मंदिर म्हणजे अंबरनाथ इथले शिवमंदिर होय. या मंदिरावर असलेल्या शिलालेखातच याचा उल्लेख आलेला आहे. इ.स. 1060 साली शिलाहार राजा मुम्मुणी याने हे मंदिर बांधले असा तो उल्लेख होय. हा शिलालेख मिळेपर्यंत मध्यप्रदेशातील भोजपूर इथले मंदिर या शैलीतील सर्वात प्राचीन मंदिर गणले जात होते. मात्र या शिलालेखाचे वाचन झाल्यावर तो मान कोकणाला मिळाला. पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर असंख्य शिल्पांनी नटलेले आहे. शिव देवता, आणि त्याच्या विविध कथांचे शिल्पांकन या मंदिरावर बघायला मिळते. अंबरनाथ इथले शिवमंदिर, त्यावर असलेली विविध शिल्पे, त्याच्याशी निगडित असलेला संप्रदाय यावर खूप सखोल अभ्यास डॉ. कुमुद कानिटकर या थोर विदुषीने केलेला आहे. त्यांच्या इतके अभ्यासपूर्ण लिखाण या मंदिरावर अजून कुणीही केलेले नाही. मंदिराच्या द्वारशाखासुद्धा खूप सुरेख सजवलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपातील खांबांवरसुद्धा मोठी शिल्पकला केलेली दिसते. अंबरनाथच्या मंदिराइतकंच सुंदर मंदिर आहे कर्णेश्वराचं. हे मंदिर वसलं आहे संगमेश्वरच्या कसब्यात. मंदिर अगदी प्राचीन. इसवी सनाच्या बाराव्या शतकातलं. चालुक्यांचा राजा कर्ण याने बांधलेलं. या मंदिरावर बाहेरच्या बाजूने शिल्पकाम नाही. मात्र या मंदिराचा अर्धमंडप म्हणजे पोर्च आणि त्याच्या द्वारशाखा फारच सुंदर आहेत. अर्धमंडपाच्या छतावर आठ दिशांचे स्वामी म्हणजेच अष्टदिक्पाल त्यांच्या वाहनांसकट कोरले आहेत. ललाटावर शेषशायी विष्णू आहे. आणि त्याच्या वरच्या पट्टीवर विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. शिव मंदिराच्या ललाटावर विष्णू आणि दशावतार म्हणजे जरा वेगळंच नाही का. या दशावतारांमध्येसुद्धा एक गंमत केलीये. इथे आठवा अवतार कृष्णाच्या ऐवजी ‘बलराम’ दाखवलेला आहे. मंदिराला सभामंडप असून त्यात रंगशिळा दिसते. आज त्याच रंगशिळेवर नंदीची मूर्ती ठेवली आहे. मंडपाचे जे खांब आहेत त्यावर आडव्या दगडी तुळया आहेत. जिथे त्या तुळया खांबांना छेडतात तिथे नेहमी यक्षांच्या प्रतिमा कोरलेल्या असतात. त्यांना कीचक असे म्हणतात. इथे यक्षांच्या जागी गणपती, नरसिंह आणि सरस्वती कोरलेली दिसते. हे अगदी आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. इतर कुठल्याही मंदिरात हे बघायला मिळत नाही. या मंदिराचे हे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. याचसोबत मंदिरात एका कोनाड्यात ब्रह्मदेव तर दुसऱ्या कोनाड्यात आसन स्थितीतला अनंतविष्णू बघायला मिळतो. मंदिर प्राकार खूप विस्तीर्ण असून त्यात एका कोपऱ्यात सूर्याचे देऊळ आहे. संगमेश्वर माहात्म्य या ग्रंथात या मंदिराविषयी बरीच माहिती मिळते. त्यात या मंदिराच्या देखभालीसाठी विविध गावे दान दिल्याचे उल्लेख आहेत.
कोकणात मंदिरांबरोबरच विविध देवतांच्या सुट्या मूर्ती बघण्यासारख्या आहेत. कदाचित त्यांची इथे पूर्वी मंदिरे असावीत. पण आज ती कुठे दिसत नाहीत. आज मात्र या मूर्ती खास कोकणी पद्धतीच्या साध्यासुध्या कौलारू देवळात ठेवलेल्या दिसतात. खारेपाटण इथे असलेली सूर्याची मूर्ती अशीच एक नितांतसुंदर मूर्ती आहे. ही शिलाहारकालीन मूर्ती देखणी तर आहेच पण त्याचबरोबर या मूर्तीच्या अंगावर विविध दागिने कोरलेले आहेत. दोन हातात कमळे धारण केलेला सूर्य फारच देखणा दिसतो. कोकणात सूर्याची काही विशेष मंदिरे आढळून येतात. त्यातले परुळे इथे असलेले आदित्य नारायणाचे मंदिर खूपच जुने. मात्र आता त्याचा जीर्णोद्धार झाल्याने ते अगदी नव्या स्वरुपात उभे आहे. मात्र आडिवरे या गावाजवळ असलेले कशेळी इथले सूर्यमंदिर, त्या मंदिरातली सूर्याची मूर्ती आणि त्याबद्दलची सुंदर कथा आवर्जून लक्ष द्यावी अशी आहे. गुजराथ इथल्या प्रभासपट्टण इथे परकीय आक्रमण आले म्हणून तिथल्या पुजाऱ्यांनी काही मूर्ती बोटीत घालून बाहेर पाठवल्या. त्यातलीच ही एक मूर्ती. बोटीतून ही मूर्ती पाण्यात पडली आणि एका गुहेत विसावली. कनका नावाच्या कुणा सूर्यभक्त असलेल्या स्त्रीच्या स्वप्नात दृष्टांत झाला आणि ही मूर्ती बाहेर काढून इथल्या देवळात वसवली. तेव्हापासून हा देव झाला ‘कनकादित्य’. जुने सुंदर खास कोकणी देऊळ. प्रशस्त असा सभामंडप आणि ऐन गाभाऱ्यात उभा असलेला हा सूर्यदेव. आवर्जून भेट द्यावे असे हे ठिकाण.
सूर्यमूर्तींसारख्याच विष्णूच्या विविध मूर्ती कोकणात आढळतात. अगदी श्रीवर्धन पासून ते दापोलीजवळ सडवे, शेडवई, कोळीसरे सारख्या ठिकाणी एकाहून एक सुंदर विष्णू मूर्ती उभ्या आहेत. याच पंक्तीत बसणारी एक सर्वांगसुंदर विष्णू मूर्ती वसली आहे चिपळूणजवळच्या बिवली गावात. पेशवाईतील कर्तबगार न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या नंतर नीळकंठशास्त्री थत्ते हे मराठी राज्याचे न्यायमूर्ती झाले. हे नीलकंठशास्त्री याच बिवली गावचे होत. त्यांना एक विष्णुमूर्ती मिळाली ती त्यांनी या मंदिरात आणून वसवली. देवाच्या डाव्या पायाजवळ श्रीदेवी असून उजव्या पायाशी नमस्कार मुद्रेत गरुड बसलेला आहे. देवाच्या अंगावरचे दागिने फारच सुंदर असून देवाची बोटे सुबक आहेत. दहाच्या दहा बोटात अंगठ्या घातलेल्या दिसतात. डोक्यावर करंड मुकुट असून त्रिवलयांकित गळा शोभून दिसतो. गळ्यात असलेल्या तीन माळांपैकी एका माळेतील पदकात आंबा कोरलेला आहे.
चिपळूण म्हटल्यावर हमखास बघण्यासारख्या दोन मूर्ती म्हणजे विंध्यवासिनी मंदिरात असलेली महिषासुरमर्दिनी आणि तिच्याच शेजारी असलेली कार्तिकेयाची मूर्ती. या दोन्ही मूर्ती अफलातून आहेत. अगदी सकाळी पूजेच्या वेळी गेल्यास या मूर्ती व्यवस्थित बघता येतात. अतिशय देखण्या मूर्ती आहेत या. अंदाजे 11-12 व्या शतकातील या मूर्ती. कार्तिकेयाची मूर्ती तर दिवसभर झाकून ठेवलेली असते. आपल्याकडे असलेल्या काहीशा चुकीच्या समजामुळे कार्तिकेयाचे दर्शन स्त्रियांना वर्ज्य ठरवले आहे. पण त्यामुळे इतक्या सुंदर आणि देखण्या वारशाचे दर्शन मात्र दुर्मिळ झाले आहे. मला तर वाटते की कोकणात आढळणाऱ्या कुठल्याही मूर्तीपेक्षा ही कार्तिकेयाची मूर्ती फारच अप्रतिम आहे. कल्याणी चालुक्यांच्या काळात घडवलेल्या या दोन्ही मूर्ती म्हणजे खरेतर कोकणाचे वैभव म्हणावे लागेल. मात्र हा ठेवा दिवसभर झाकून ठेवलेला असतो.
पावस जवळ असलेल्या गोळप गावात ब्रह्मा-विष्णू-आणि महेशाची मूर्ती ही कोकणातली एकमेवाद्वितीय मूर्ती असावी. अंदाजे इसवी सनाच्या चौदाव्या शतकातल्या या प्रत्येक मूर्तीवर बारीक बारीक काम केलेले दिसते. शिल्पसमृद्ध अशी ही मूर्ती म्हणजे या गावाचे वैभव म्हणावे लागेल. विविध देवदेवतांच्या मूर्तींचे वर्णन करताना मावळंगे या गावी असलेल्या नरसिंहाच्या मूर्तीचे वर्णन तर करावेच लागेल. आणि त्याचे दर्शनही मुद्दाम जाऊन घ्यावे लागेल. रियासतकार सरदेसाई आणि लोकसभेचे पहिले अध्यक्ष असलेल्या दादासाहेब मावळणकरांचे हे गाव. गावात प्राचीन नरसिंह मंदिर असून सरदेसाई घराण्याने त्याची उत्तम व्यवस्था ठेवलेली आहे. तुरळ गावावरून मावळंगे गावी जाता येते. या नरसिंहासारख्याच परशुरामाच्या वेगळ्या मूर्तीसुद्धा कोकणात वसलेल्या आहेत. त्यात लक्षवेधी मूर्ती म्हणजे देवाचे गोठणे इथे असलेली भार्गवरामाची मूर्ती आणि इथले मंदिर. छत्रपती शाहू, पेशवे आणि कान्होजी आंग्रे यांचे गुरु असलेल्या ब्रह्मेंद्रस्वामींनी इथे ही मूर्ती आणून वसवली. हात जोडून उभे असलेल्या परशुरामाची एकमेव मूर्ती इथे आहे. हा मंदिर परिसर, आणि इथली मूर्ती हे या गावाचे आकर्षण म्हणावे लागेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोटकामते गावातल्या भगवती देवीचे मंदिरसुद्धा असेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथली देवीची मूर्ती तर देखणी आहेच मात्र या देवळात कान्होजी आंग्रे यांचा शिलालेख कोरलेला आहे. कान्होजी आंग्रे यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोठे दान दिले होते याचा उल्लेख इथे केलेला आहे. हे सगळे गाव देवी भगवतीच्या नावाने आंदण दिलेले असल्यामुळे या गावात सात बारा उताऱ्यावर जमिनीचा मालक म्हणून देवीचेच नाव सगळीकडे येते.
अनेक गूढ, रमणीय आणि वैशिष्ट्यपूर्ण बाबींनी कोकण प्रांत बहरलेला आहे. वर उल्लेख केलेली मंदिरे आणि मूर्ती ह्या निव्वळ प्रातिनिधिक वाटाव्यात इतकी विपुल वारसा श्रीमंती कोकणात वसलेली आहे. जवळजवळ इथल्या प्रत्येक गावात काहीना काही नैसर्गिक वैभव, स्थापत्य वैभव किंवा एखादी लोककथा ऐकायला मिळते. कोकणात शिल्पसमृद्ध मंदिरे जरी अगदी कमी असली तरी एकाहून एक देखण्या शिल्पांची रेलचेल दिसून येते. त्यासाठी मुद्दाम वाट वाकडी करून हिंडायला हवे. नेहमीची गर्दीची ठिकाणे टाळून जरा आडबाजूला गेले तर मोठे वैभव सर्वत्र बघायला मिळते. हे शिल्पसमृद्ध कोकण व्यवस्थित वेळ काढू बघावे आणि आपली भटकंती समृद्ध व्हावी या दीपावलीच्या शुभेच्छा!!
—आशुतोष बापट
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply