शनिवार सकाळ 14 ऑगस्ट 2004.. आज कुठलाही फोन वाजला नाही आणि मी आरामात 9-9.30ला उठले. सगळं आवरून आमच्या मुदपाकखान्यात गेले. म्हणजे रूम नंबर 312. नीलेशची रूम. ती रूम बऱ्यापैकी मोठी असल्यामुळे आमचा चहा, नाश्ता, जेवण सगळं तिथेच बनायचं. अर्थात आम्ही सगळे मिळून काम करायचो.
तिथे परत माझ्या तलवारीला डावा कौल मिळाला. अर्थात माझीही उत्सुकता जरा कमी झाली होती. इतर इतक्या अचंबित करणाऱ्या गोष्टी बघितल्या होत्या. त्यामुळे ओके, जमलं तर बघुयात तलवार अशा मनःस्थितीत मी येवून पोचले होते. ती उत्कंठा, ती उत्सुकता जरा कमी झाली होती.
खर तर मलाच आश्चर्य वाटले होते, इथे येण्याआधी मी किती डेस्परेट होते भवानी तलवार बघण्यासाठी आणि आता ते डेस्परेशन राहिल नव्हत. कदाचित बाहेरील झगमगाटाची पुटं माझ्यातल्या देशप्रेमाच्या चिंगारीवर चढली होती, असे मनात येणारे विचार बाजूला सारून संभाषणात भाग घेतला.आता विम्बल्डनला जायचे ठरले. तेही बघायला मी तितकीच उत्सुक होते.माझ्या ‘चार मस्ट सी’ स्थळांच्या यादीत हे ही नाव होते. कोण कोण येणार ह्याची उजळणी झाली. मी आणि उमेश तर सगळीकडे कॉमन होतो.
आज परेश, संतोष, गोपी, बालाजी, निलेश आणि कार्तिक येणार होते आमच्याबरोबर. विम्बल्डनला एक साऊथ इंडियन देऊळ आहे. त्यामुळे गोपी, कार्तिक आणि बालाजी येणार होते. परेश आणि बालाजी Sudbury Town आणि संतोष आणि गोपी Harrow हून बरोबर 11 वाजता RCA ला पोहचले. लगेच आम्ही tube station कडे कूच केले.
Paddington हून डिस्ट्रिक्ट लाईनने आम्ही विम्बल्डन स्टेशनला उतरलो. एक वाजता देऊळ बंद झालं तर! म्हणून आधी देवळात जायचा निर्णय घेतला.स्टेशनपासून देवूळ चालत जवळच आहे अस कोणी तरी म्हणाले.आम्ही नेहमीसारखच स्वच्छ रस्त्याने चालत होतो.आजूबाजूला छान चॉकलेटी रंगातील बैठी घरे. भोवताली टुमदार बाग.असा नजारा बघत आम्ही चालत होतो.बराच वेळ झाला देवळाचा पत्ताच नाही. अरे, इकडेच एक वाजेल आता! विचारा तरी कोणाला असा तक्रारीचा मी सुर लावला. सगळ्यात मोठ्ठा जोक झाल्यासारखे सगळे हसायला लागले. रस्त्यावर कोणी असायला तर हवे ना विचारायला. माझ्या टीपिकल देसी वृत्तीच किंवा सवयीचं मला पण जाम हसू आले.
अखेर शेवटी 4-5 गाड्या एका गल्लीत शिरताना दिसल्या आणि काचेआड काही इंडियन चेहरे दिसले. त्यावरून देऊळ जवळपासच कुठे तरी असणार ह्या आशेवर आम्ही त्या गाड्यांच्या दिशेने अजून काही मिनिटे गेलो. आणि समोर एक चर्च सारखे कन्स्ट्रक्शन असणारे काही तरी दिसले. देऊळ म्हणजे गाभारा, बाहेर चौकोनी मंडप, वरती कळस अशा कल्पनेला तडा देवून समोर चर्चच्या रुपात ते उभे होते. लंडन मधलं हे आंग्लाळलेल देवळाचे स्वरूप मनाला थोडे उदास करून गेले.
देवळाचा परिसर अत्यंत स्वच्छ होता. आम्ही चपला काढून आत गेलो तर आत आरती चालू होती. गाभाऱ्यात आरतीचा धूर,धुपाचा वास आणि पंचारतीनी उजळून निघालेला गाभारा. हे दृश्य बघून मगाशी आलेली उदासी कुठच्या कुठे पळून गेली. थोड पुढे जावून देवाचे दर्शन घेतले आणि मूर्तीवरील नजर हटेना! काळया तुकतुकीत पाषाणातून साऊथ इंडियन पद्धतीची उभी गणेशाची मूर्ती आणि त्यावर पडलेला पंचारतीचा प्रकाश. त्यामुळे मुळातल्या तेजस्वी मूर्ती वर एक वेगळीच झळाळी आणि प्रसन्नता जाणवत होती. मनोभावे नमस्कार केला. खूप प्रसन्न वाटले. प्रसाद घेवून 10-15 मिनिटे तिथेच बसलो. मग मी अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र म्हंटले. लंडनमध्ये मी हे म्हणेन असा मला स्वप्नात पण वाटले नव्हते.
खूप शांत आणि प्रसन्न चित्ताने आम्ही तिथून बाहेर आलो. यथावकाश एके ठिकाणी थांबून जेवण घेतले आणि सेंटर कोर्टच्या दिशेने कूच केले.
आमची वारी निघाली टेनिसच्या काशीला! आता उत्सुकता वाढत चालली होती. खूप उत्साहात चालायला सुरवात केली. कधी एकदा ग्रास कोर्टच दर्शन घेतोय अस झालं होतं. असे किती वेळ आम्ही चाललो कोणास ठाऊक! लांबलचक रस्ता, आजूबाजूला फक्त आणि फक्त गर्द हिरवी झाडे आणि वर ढगांमध्ये लपलेला सूर्य आणि त्याने झालेले शांत आणि कुंद वातावरण! सुरवातीला तर चालायला मजा वाटत होती. पण बराच वेळ झाला तरी सेंटर कोर्टचा मागमूस नाही कुठे!
आम्ही हैराण! पण तसेच पुढे चालत होतो. आता हळू हळू रस्त्याच्या दोन्ही बाजूला किंमती कार्स पार्क केलेल्या दिसायला लागल्या. उंचे लोग! उंची पसंद! म्हणजे आम्ही आमच्या मंजिलच्या जवळ पोहचत आहोत ह्याची खात्री पटली. तरीही अजून 15 एक मिनिटे आम्ही चालतच होतो. पण आता वेगवेगळ्या ब्रँडेड कार्स बघत पुढे जात होतो.काय एक एक गाडी होती. अहाहा! डोळ्यांच पारणं फिटलं.
अशातच आम्ही सेंटर कोर्ट भागात आलो. तिथे बरीच लहान-मोठी कोर्ट्स होती. आम्ही सेंटर कोर्ट च्या दिशेने पुढे निघालो. दोन सेंटर कोर्टस होती. पहिल्या सेंटर कोर्ट मध्ये प्रवेश करून व्ह्यूवर स्टँड मध्ये आलो. उभे राहून समोर कोर्टवर आपले टेनिसचे कौशल्य दाखवणारे तमाम टेनिस सम्राट आणि सम्राज्ञीचे स्मरण झाले.
माझं टेनिस वरचं प्रेम स्टेफी ग्राफ आणि बोरिस बेकरच्या काळात वाढलं असलं तरी, मला टेनिस खेळाची ओळख करुन देणारे टेनिस सम्राट जॉन मॅकनरो, बियोन बोर्ग, मार्टिना, ख्रिस एव्हर्ट लॉईड, स्टीफन एडबर्ग, गोरान इवनिसेविक, ग्रॅबिएला सबातिनी, अरांता सॅंचेझ, मोनिका सेलेस, जिमी कॉनर्स, पीट संप्रास, विल्यम्स भगिनी , रॉजर फेडरर, आंद्रे अगासी ह्या सर्वांचे स्मरण झाल्याशिवाय राहिले नाही.
आणि कित्येक महिने सतत नंबर 1 रँकिंगला राहूनही विम्बल्डन एकदाही न जिंकलेला इव्हान लेंडल! त्याला कशी विसरणार? सर्वांना मनातल्या मनात मानवंदना देऊन डोळेभरून कोर्टचे दर्शन घेतले.
तिथे कोर्टवर पाय ठेवण्याचा योग आला नाही. ते कोर्ट आणि जुन्या टेनिस प्लेअर्सच्या आठवणी मनात साठवून आम्ही परत फिरलो.
— यशश्री पाटील.
Leave a Reply