” एक दूजें के लिये ” ने १९८१ साली धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या प्रत्येक आघाडीवर ( अभिनय, गीत, संगीत, पार्श्वगायन, गोव्याची नयनरम्य पार्श्वभूमी ) हा चित्रपट देखणेबल होता. “बॉबी” नंतर ची ही तुफान गाजलेली प्रेमकथा (शेवट सुखांत नसला तरीही). कमल आणि रती ही नवोदित फ्रेश जोडी देणारा हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी मन तृप्त होत नाही.
१९८३ साली विवाहानंतर सपत्नीक गोव्याला गेलो असता प्रत्येक वास्तूचे वर्णन करताना लोकल गाईड सतत ” एक दूजें ” चा संदर्भ देत राहायचा. विरहाच्या पार्श्वभूमीवरील चिरवेदनेला अधोरेखित करणारा ” शिवरंजनी ” यांत होता- ” तेरे मेरे बीचमे ” ! लता आणि एस पी बालसुब्रम्हण्यम च्या आवाजातील ! क्रमानुसार लताचे दर्दभरे आधी आहे चित्रपटात आणि मध्यंतरानंतर एस पी चे ! त्याचा हा पहिलाच हिंदी चित्रपट ! त्याने जो आवाज लावलाय या गाण्यात तो पिळवटून टाकणारा आहे. लताच्या दोन पावले पुढे जाणारा ! पुरुषी आवाजात असा खोलवर दर्द ” मुकेश” नंतर मी प्रथमच ऐकला. सारं चित्रपटगृह स्तब्ध करणारा त्याचा आवाज !
या गाण्यासाठी त्याला नॅशनल अवार्डने सन्मानित करण्यात आले, फिल्म फेअर साठीही त्याचे नॉमिनेशन झाले होते. पण पारितोषिकांच्या पलीकडे आवाजाची देणगी मिळालेला हा गायक!
१९९५ साली के एस बी त असताना मी चेन्नई ला गेलो होतो. माझा तेथील सहकारी एस पी चा वेडा फॅन होता. गम्मत म्हणजे मी पुण्याला येणार त्याच्या दुसऱ्या दिवशी एस पी चा चेन्नईला कॉन्सर्ट होता आणि माझा सहकारी मला जाणं लांबविण्यासाठी खूप आग्रह करीत होता. परतीची तिकीटे काढली असल्याने मी आणि माझ्या बरोबरच्या दोघांना परतणे भाग होते. मी वादा केला- ” पुन्हा केव्हातरी मी एस पी ला जरूर लाईव्ह ऐकेन. ”
१९९५ पासून आजतागायत तो योग आलेला नाहीए.
आज पेपरमध्ये वाचलं – ” एस पी ची प्रकृती खूप खालावली आहे, त्याला लाईफ सपोर्ट वर ठेवलंय. ”
त्याच्यासाठी, त्याच्या असंख्य फॅन्स प्रमाणे सकाळपासून माझे हात जोडलेले आहेत. दोन महिन्यांहून अधिक कालावधी हॉस्पिटलमध्ये, वय विरोधात (७४) तरीही मला केव्हातरी ” प्रत्यक्ष भेटून ” त्याला एवढंच सांगायचंय –
” तेरे मेरे बीचमे
कैसा हैं ये बंधन – जाना /पहचानासा
तूने नहीं जाना
पर मैंने हैं जाना ! ”
माझ्या प्रार्थना शक्यतो ऐकायच्या नाहीत असा माझ्यात आणि देवात आजपर्यंतचा अलिखित करार आहे.
बघू या – यावेळी त्यांत काही बदल होतो कां ?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply