नवीन लेखन...

गच्ची

“दिसतंय का ? ssss.. आलं का sss ????” “नाही ssss.. अजून फिरव थोडा.. हां .. हां ss .. बास बा ssss स !!!….” हे असे मोठमोठ्याने ओरडलेले संवाद ; रामायण महाभारताच्या काळात ऐकू यायचे .. म्हणजे खऱ्याखूऱ्या नाही बरं का !! टीव्हीवर दाखवायचे ना .. त्या काळात !! .. तेव्हा जेमतेम २ चॅनल दिसणाऱ्या टीव्हीच्या अँटीनाला तिकडे गच्चीत “काकस्पर्श” झाला की इकडे खाली टीव्हीवरच्या चित्राला “मुक्ती” मिळलीच म्हणून समजायचं….नुसत्या “मुंग्या” आणि खररर्रर्रर्र … मग एक उमदा गडी काठी घेऊन अँटीना फिरवायला गच्चीत आणि दूसरा भिडू खाली टीव्हीसमोर .. आख्या बिल्डिंगला कळायचं की यांच्या टीव्हीवर मुंग्या आल्यात ते !!!.. आजच्या पिढीला हे सगळं नवीन असलं तरी आमच्या पिढीतल्या प्रत्येकाने एकदा तरी हे उपद्‍व्याप केलेच असणार .. चाळ असो , छोटी इमारत किंवा उच्चभ्रू कॉम्प्लेक्स ; गच्ची म्हंटलं की झटकन हीच आठवण डोळ्यासमोर येते …

गच्चीवर जाणं प्रत्येकाच्याच आवडीचं असलं तरी त्याचं अप्रूप मात्र तळ-मजल्यापासून जसं वर-वर उंच जावं तसं कमी होत जातं .. तळातल्या लोकांचं गच्चीत कधीतरीच जाणं होतं म्हणून त्यांना जास्त ओढा असतो आणि वरच्या मजल्यावरच्यांसाठी तर गच्ची म्हणजे अगदी “उठण्या-बसण्यातली “.. तळमजल्यावरचे लोक्स त्यांना मिळालेल्या “so called “ अंगणात जे जे काही करतात .. उदाहरणार्थ – वाळवणं घालणे , गाद्या धोपटून उन्हात ठेवणे , स्वतःचे आणि (असल्यास) पाळीव प्राण्यांचे पाय मोकळे करण्यासाठी फेऱ्या मारणे , एकांतात फोनवर बोलणे , अडगळीचं सामान ठेवणे इत्यादी .. असे सगळे प्रकार वरच्या मजल्यावरचे लोक्स गच्चीत जाऊन करतात ..

सोसायटीच्या मिटिंग्स , साफसफाई , कागदपत्र ठेवणे , वॉटर प्रूफिंग अशा औपचारिक आणि तितक्याच रुक्ष कामाव्यातीरिक्त संभासदांच्या घरची लग्नकार्य , त्यासाठीचे मांडव , छोटेखानी वाढदिवस , सोसायटीचं वार्षिक गेट-टुगेदर , त्यातले वेगवेगळे गेम्स , गमतीजमती, धमाल असलेले असे अविस्मरणीय कार्यक्रम देखील बरेचदा या “गच्चीत” होतात .. घरं छोटी असयाची म्हणून किंवा एकमेकांशी चर्चा करून व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी म्हणून मित्रमंडळी बोलावून ; सतरंज्या आणि पाण्याची बाटली वगैरे घेऊन असे “अभ्यासाचे सोहळे” सुद्धा “गच्चीत” व्हायचे …. एकाच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या प्रेमी जीवांना “कही पे निगाहे -कही पे निशाना” , मग “ईशारो ईशारो मे” म्हणत सुरू झालेला आपल्या प्रेमकहाणीचा प्रवास कोणालाही फार संशय न येता नंतर “मेहंदी लगाके रखना” ते थेट “नवराई माझी लाडाची” पर्यंत येईस्तोवर या गच्चीचा फार मोठा आधार असायचा. जर प्रेम दुसरीकडे कुठे रहात असेल तर घरी कोणाला थांगपत्ता लागू न देता तासनतास एकांतात फोनवर बोलण्यासाठी हक्काची गच्चीच कामी यायची .

पूर्वी कॅमेऱ्यात रोल असायचे .. ३६-३८ फोटो यायचे .. आणि ते पूर्ण झाल्याशिवाय तो रोल “धुवायला” टाकता यायचा नाही .. त्यामुळे बरेचदा “बारशाच्या” वेळेस काढलेले फोटो “जावळ” झाल्यावर वगैरे हाती यायचे बघायला !!.. कधी कुठल्या सहलीला जाऊन आल्यावर तेव्हाचे फोटो मात्र लगेच बघण्याची उत्सुकता असयाची पण नेमके ४-५ फोटो त्या रोल मध्ये शिल्लक असायचे .. मग काय ?? .. “चला गच्चीत” !!.. जरा बरे कपडे घालून.. भावंडं किंवा मित्र परिवाराला घेऊन .. पाण्याच्या टाकीजवळ , कठड्यावर , पाईपाला धरून वगैरे वेगवेगळ्या पोझेसची हौस भागवत कसेतरी ते उरलेले फोटो एकदाचे संपवायचे .. ……आज ते तसे काढेलेले फोटो बघून खूपच हसायला येतं ….. याशिवाय पतंग उडवणे ( त्यातला अर्धा वेळ उडवण्यापेक्षा शिकण्यात जायचा ) , चंद्र-सूर्य-तारे-ग्रहण असे खगोलशास्त्राचे धडे घेण्यासाठी गच्चीवर जाणं ठरलेलं !!.. . कधीतरी पहिल्या पावसात किंवा पावसाळ्यात किमान एकदा तरी भिजायला गच्चीवर !!.. कधी मोकळ्या हवेत म्हणून किंवा थंडगार वाऱ्याची झुळूक अनुभवायला गच्चीत !!.. कधी काही कारणाने मन खिन्न झालं की एकांतात शांतपणे बसून विचार करायला गच्ची !!. शाळेतल्या गॅदरिंग मधल्या नाचाची प्रॅक्टिस किंवा नाटकाच्या तालमीसाठी सगळा लवाजमा घेऊन गाठायची.. “गच्ची” !! .. पायांच्या दाणदाण आवाजानी त्रास होतो म्हणून शेवटच्या मजल्यावर राहणाऱ्यांचा ओरडा खाऊनसुद्धा मे महिन्याच्या सुट्टीत खेळायला किंवा संध्याकाळी कल्ला करायला गच्चीत जायचंच !! .. असे अनेक प्रसंग सांगता येतील .

असंच काही वर्षांपूर्वी मी आमच्या आधी राहायचो त्या बिल्डिंगमध्ये गेलो होतो .. ते घर सोडल्यानंतर एखाद-दोन वर्षानी असेल .. सहज म्हणून गच्चीत गेलो . पूर्वी रोल संपवण्यासाठी काढलेल्या फोटोच्या जागा आत्ताच्या “सेल्फी पॉइंट” सारख्या वाटू लागल्या .. इतक्यात लक्ष एकदम तिथे एका आडोश्याला असलेल्या भिंतीवर गेलं .. खडूने काढलेला पण शेपूट नसलेला हत्ती दिसला . त्याच्या शेपटाच्या जागी सोडून हत्तीभोवती आजूबाजूला इतरत्र बऱ्याच ठिकाणी खडूने काढून अर्धवट पुसलेल्या अशा अनेक शेपट्या .. आम्ही घर बदलायच्या काहीच दिवस आधी झालेल्या वार्षिक गेट-टुगेदरमध्ये “”डोळ्याला पट्टी बांधून हत्तीला शेपूट काढण्याच्या”” खेळतल्या आठवणीचे अवशेष होते ते .. ती भिंत काहीशी आत असल्यामुळे आणि त्यानंतर तिथे काहीच कार्यक्रम न झाल्याने मला हे क्षण पुन्हा एकदा जगता आले होते .. तेव्हा तर छान वाटलंच होतं पण इतक्या वर्षानी हा प्रसंग आठवून आजही nostalgic व्हायला होतं.

पूर्वी कायम “मुक्त असणारी गच्ची” आणि सतत उघडे असणारे गच्चीचे दरवाजे आता मात्र “बंद” किंवा “अटी-शर्ती लागू” या सदरात मोडू लागले .. सध्याच्या काळात इमारतीत वाढलेली लोकांची संख्या ,काही संभाव्य धोके आणि ते लक्षात घेत गैरप्रकार टाळण्यासाठी केलेली नियमावली या सगळ्याच्या कचाट्यात सापडून ; परवानग्या आणि कुलपात अडकून बसली ही बिचारी “गच्ची” .. आताशा अशा अनेक भिंतींवरचे आठवणीतले “”हत्तीही गेले”” असतील आणि “”शेपूटही उरलं नसेल”” कदाचित .. पण तरीही आजही प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या “आठवणीत गच्ची” आणि “गच्चीतल्या आठवणी” नक्कीच आहेत.. .. ज्या मात्र कधीच पुसल्या जाणार नाहीत ..

© क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..