नवीन लेखन...

तेथे “कर” माझे जुळती

क्रिकेटवरच्या लेखात कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या “दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती” ह्या काव्यपंक्ती पाहून आपल्याला नवल वाटले असेल, तर सांगू इच्छितो की येथे आपण अश्या काही प्रथितयश भारतीय क्रिकेटपटूंना “कर” आदरपूर्वक जोडणार आहोत, ज्यांच्या आडनावाच्या अखेरीस ‘कर’ हा प्रत्यय आहे. हे ते ‘कर’धारी मराठी क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे किंवा अपवादात्मक स्थितित इतर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात काही जण तर केवळ प्रतिनिधित्व करून थांबले नाहीत तर क्रिकेट मैदानावरील आपल्या दैदीप्यमान कामगिरीने महाराष्ट्राची, मराठी जनांची आणि भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. ह्या यादीत अनेक उत्तमोत्तम खेळाडूंचा भरणा आहे. आधी आपण हे ‘कर’ खेळाडू बघू या आणि मग त्यातून योग्य असा संघ निवडू. येथे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या क्रिकेटपटूंचाच विचार केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल १८ ‘कर’ खेळाडूंनी क्रिकेटमध्ये आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. इथे आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणतो, तेव्हा फक्त एका ‘लिसा स्थळेकर’ हिने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. ‘कर’ खेळाडूंचा विचार करता ही यादी खालीलप्रमाणे –

सुनील गावसकर,
सचिन तेंडुलकर,
दिलीप वेंगसरकर,
अजित वाडेकर,
विजय मांजरेकर,
संजय मांजरेकर,
हेमंत कानिटकर,
हृषीकेश कानिटकर,
रोहन गावसकर,
अजित आगरकर,
लिसा स्थळेकर,
एकनाथ सोलकर,
रामनाथ पारकर,
खंडू रांगणेकर,
दत्ताराम हिंदळेकर,
चंदू पाटणकर,
दत्तू फडकर,
मनोहर हर्डिकर,

तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला १८ ‘कर’वीर मिळाले आहेत. यातून आपल्याला एक ११ जणांचा सर्वोत्कृष्ट संघ निवडायचा आहे. ह्यातील काही खेळाडूंची निवड निर्विवादपणे होईल. आपण साधारण समतोल साधून ११ जणांचा संघ निवडण्याचा प्रयत्न करू. मी निवडलेला संघ पुढीलप्रमाणे आहे. अर्थातच प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार, विचारांप्रमाणे आपापला संघ निवडू शकतोच.

१. सुनील गावसकर

२. दिलीप वेंगसरकर

३. अजित वाडेकर (कप्तान)

४. सचिन तेंडुलकर

५. विजय मांजरेकर

६. हृषीकेश कानिटकर

७. लिसा स्थळेकर

८. एकनाथ सोलकर

९. दत्तू फडकर

१०. अजित आगरकर

११. दत्ता हिंदळेकर (यष्टीरक्षक)

ह्या संघात सलामीची जोडी म्हणजे गावसकर आणि वेंगसरकर असेल. सुनील गावसकर हे जागतिक दर्जाचे सलामीचे फलंदाज आहेत ह्याबद्दल काही वाद नाही. त्यांच्या जोडीला दिलीप वेंगसरकर असतील. वेंगसरकारांनी देखील काही सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी आघाडीचा फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी वाडेकर आणि चौथ्या क्रमांकासाठी तेंडुलकर ह्याबद्दल कोणीच आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. तसेच एक उत्कृष्ट कप्तान म्हणून नावलौकिक मिळवलेल्या वाडेकरांची ह्या संघात देखील कप्तान म्हणून नेमणूक करता येईल.

संघात पिता पुत्राच्या तीन जोड्या आहेत – गावसकर, मांजरेकर आणि कानिटकर. खरे तर हे सगळे ह्या ‘कर’ संघात येऊ शकतात, पण एका घरातून एकाच व्यक्तीला संघात घ्यावे असा एक (कुटील) विचार आल्यामुळे सहापैकी फक्त तिघांचाच ह्या संघात समावेश करण्यात येत आहे. (संजय मांजरेकर आणि हेमंत कानिटकर ह्यांची माफी मागून). पाचव्या क्रमांकावर विजय मांजरेकर आणि सहाव्या क्रमांकावर हृषीकेश कानिटकर ह्यांची निवड होत आहे. वर निवडलेले सहाही चांगले फलंदाज आहेत आणि कोणत्याही संघाविरुद्ध ते नक्कीच चांगली कामगिरी करू शकतात. ह्या नंतर ४ अष्टपैलू खेळाडूंचा मी संघात समावेश करेन. लिसा स्थळेकर, अजित आगरकर, एकनाथ सोलकर आणि दत्तू फडकर ह्या चारही अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या समावेशामुळे संघ नक्कीच मजबूत होणार आहे. आणि संघातील शेवटची जागा अर्थातच यष्टिरक्षकाची असेल, जिथे दत्ता हिंदळेकर ह्यांची निवड होऊ शकते.

ह्या संघात ३ वेगवान गोलंदाज, २ फिरकी गोलंदाज आणि सचिन सारखा एक ‘वेगळा’ गोलंदाज आहे (जो लेगस्पिन, ऑफस्पिन किंवा प्रसंगी मध्यमगती गोलंदाजी देखील करू शकतो.) कदाचित ह्या  संघात एक अतिशय वेगवान गोलंदाजांची उणीव भासू शकते. त्यामुळे उदयास येणाऱ्या राजवर्धन हंगर्गेकर ह्याने लवकर भारतीय संघात पदार्पण करावे ही मनापासून इच्छा.

सुनिल गावसकर

आपला सलामीचा ‘कर’वीर म्हणजे सर्वकालीन जागतिक महान सलामीवीर मुंबईच्या चिखलवाडीत जन्मलेला “सुनिल मनोहर गावसकर”. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे त्याकाळातील तीन गोष्टिना पर्याय नसे – आयुर्विमा, लता मंगेशकर आणि सुनिल गावसकर. विक्रमादित्य सुनिल ने भारतीय क्रिकेट संघाला स्थैर्य दिले, अनेक सामने वाचवले, काही सामने जिंकून दिले, धावांचे डोंगर रचले, शतकांची आणि विक्रमांची सवय लावली, आणि भारतीय क्रिकेटरसिकांना अतीव समाधान देताना भव्य स्वप्ने पहाण्याची सवय लावली. पहिल्याच कसोटी मालिकेत ७७४ धावा करणे, शतकांचा “डॉन” ब्रॅडमन चा रेकॉर्ड तोडणे, १०००० धावांचे एव्हरेस्ट प्रथम सर करणे, एकाच कसोटीत द्विशतक व शतक ठोकणे, सलग ४ कसोटीत शतक ठोकणे, १९८३ च्या वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेत केलेल्या १२१ व ९० धावांच्या झंझावाती खेळया, १९८७ च्या विश्वचषकात अंगात १०२ ताप असताना केलेले ८५ चेंडूतील वादळी शतक अशी त्याच्या अनेक विक्रमांची आकडेवारी कट्टर क्रिकेटप्रेमी व सुनिलप्रेमींना वेगळी सांगायची गरज नाही. अनेक सामन्यांत भारताचे कणखर यशस्वी नेतृत्व, १९८४ ला शारजात आशिया चषक व १९८५ ला ऑस्ट्रेलियात मिनी-विश्वचषक जिंकणे, १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असणे, अशी अनेक शिखरे त्याने गाठली. असा हा सुनिल आपल्या मनात कायम घर करून असेल ते वेस्ट इंडिजसह इतर देशांच्या आग्यावेताळ वेगवान गोलंदाजांना कधी अभेद्य बचावाने तर कधी बेडर आक्रमकतेने विनाहेल्मेट खणखणीत उत्तर देणारा, नेत्रदीपक स्ट्रेट ड्राइव्ह मारणारा, भारतीय क्रिकेटप्रेमीना धावा, शतके व विक्रम यांची चटक लावणारा, मिश्किल, हजरजबाबी, उच्चशिक्षित मराठी गृहस्थ म्हणून.

दिलीप वेंगसरकर

१९७५ च्या नागपूर येथील शेष भारत विरुद्धच्या इराणी चषक सामन्यात मुंबई कडून खेळताना हिंदू कॉलनीच्या १९ वर्षांच्या “दिलीप बळवंत वेंगसरकर” याने बेदी, प्रसन्ना या जगातील आघाडीच्या फिरकी गोलंदाजांना उत्तुंग षटकार ठोकताना वारंवार मैदानाबाहेर बाहेर फेकून दिले. कर्नल सी.के.नायडू यांच्याप्रमाणेच उत्तुंग षटकार ठोकतो म्हणून त्यालाही ‘कर्नल’ ही उपाधी कायमची चिकटली आणि त्यापाठोपाठ भारतीय संघात समावेशही झाला. १९८० च्या दशकात भारतीय संघाचा आधारस्तंभ झालेल्या दिलीपने ११६ कसोटी आणि १२९ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले शिवाय १० कसोटी आणि १८ एकदिवसीय सामन्यांत भारताचे नेतृत्वही केले. १९८७ ते १९८९ दरम्यान २१ महीने तो फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी होता. १९७९, १९८२ आणि १९८६ अश्या सलग तीन इंग्लंड दौऱ्यात लॉर्डस मैदानावर तीन शतके झळकावण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. १९९१ च्या रणजी चषकाच्या अंतिम फेरीत वानखेडे स्टेडियमवर हरयाणा विरुद्ध एकाकी नाबाद शतकी झुंज देऊनही २ धावांनी पराभूत झाल्यावर अश्रुपात करत पण प्रेक्षकांची मानवंदना घेत परतणारा हा लढाऊ कर्नल आजही अनेक क्रीडारसिकांच्या स्मरणात आहे.

अजित वाडेकर

१ एप्रिल १९४१ ला मुंबईत जन्मलेल्या “अजित लक्ष्मण वाडेकर” यांना भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक विशेष स्थान आहे. १९५८ ला मुंबईसाठी रणजी पदार्पण करणाऱ्या अजितना १९६६ मध्ये मुंबईतच वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. अतिशय आकर्षक, मनमोहक डावखुरे फलंदाज असलेल्या वाडेकरनी ३७ कसोटीत एका शतकासह २११३ धावा केल्या, तर मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट गाजवताना २३७ सामन्यात ४७.०३ च्या सरासरीने १५३८० धावा कुटल्या. त्यात त्यांची सर्वोच्च 323 धावांची त्रिशतकी खेळी होती. मुंबई क्रिकेटच्या सुवर्णकाळाचे ते एक प्रमुख शिलेदार होते. चपळ क्षेत्ररक्षक विशेषत: उत्कृष्ट स्लिप फील्डऱ असणाऱ्या अजितनी कसोटीत ४६ चमकदार झेल घेतले आहेत. पण वाडेकर एक सुंदर फलंदाज ह्यापेक्षा लक्ष्यात रहातात ते कल्पक, यशस्वी कर्णधार म्हणून.

१९७१ ला विजय मर्चंट यांच्या निवडसमितीने टायगर पतौडीला वगळून अकस्मातपणे वाडेकर यांच्या गळ्यात नेतृत्वाची माळ टाकली. वाडेकर यांच्या संघानेही वेस्ट इंडिज व इंग्लंड यांना त्यांच्याच देशात प्रथमच मात देत इतिहास घडवला. नंतर इंग्लंडला भारतातील मालिकेतही पराभूत केले. पण १९७४ च्या इंग्लंड दौऱ्यात फासे पालटले आणि भारतीय संघाला ०-३ असा तीन कसोटींच्या मालिकेत दारुण पराभव स्विकारावा लागला. यानंतर वाडेकर यांचे कप्तानपद अपमानास्पदरित्या काढून घेण्यात आले आणि त्यामुळे वाडेकरांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पुढे स्टेट बँक ऑफ इंडिया मधून ते उच्च पदावरून निवृत्त झाले.

सचिन तेंडुलकर

वांद्रयातील साहित्य सहवास मधील एका ललित लेखक आणि कवीचा मुलगा असणारा “सचिन रमेश तेंडुलकर” याने १९८८ पासून पुढे २५ वर्षे क्रिकेटच्या मैदानावर आपल्या बॅटने असे काही सहजसुंदर, आकर्षक, लालित्यपूर्ण लेख आणि कविता लिहिल्या की त्याने क्रिकेटरसिक मंत्रमुग्ध होऊन राहिले. सुनीलने आपल्या विक्रमाने हिमालयाला गवसणी घातली असेल तर सचिनने आपल्या अद्भुत पराक्रमाने इतरांसाठी एक नवीन हिमालय तयार केला. ज्या १६ व्या वर्षात इतर गुणवान क्रिकेटपटू मुले शालेय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत असतात त्या वयात सचिनने तगड्या पाकिस्तान संघासमोर यशस्वी पदार्पण केले, आणि जेव्हा ४० व्या वर्षी इतर यशस्वी क्रिकेटपटू निवृत्ती नंतर समालोचन, लेखन, प्रशिक्षण, प्रशासन या गोष्टीत व्यस्त असतात तेव्हा सचिन आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्वीच्याच जोमाने धावांचा पाऊस पाडत होता. याचे मुख्य कारण म्हणजे देवदत्त अचाट गुणवत्तेला त्याने दिलेली अफाट परिश्रमांची जोड. त्याने केलेले अनेक विक्रम कदाचित कधीही मोडले जाणार नाहीत, पण त्याचे खरे महानपण कशात असेल तर मला वाटते की – इतके यश, पैसा, प्रसिद्धी मिळूनही पाय कायम जमिनीवर ठेऊन नेहमी विनम्र व् संयमी असणे, संस्कार व संस्कृती यांची जाण ठेवणे, इत्यादी मूलभूत सदगुणांच्या सदैव आचरणात आहे. त्याच्या ह्या गुणांमुळेच अनेक क्रिकेट न कळणाऱ्या गृहीणींनाही आपला मुलगा सचिन सारखा बनावा असे वाटत असे. त्याचे सर्व विक्रम आणि आकडेवारी अनेक क्रिकेटप्रेमींना तोंडपाठ असतील पण त्याच्या या गुणांना क्रिकेटप्रेमी व इतरही युवकांनी आदर्श ठेऊन आत्मसात करणे अधिक महत्त्वाचे आहे असे वाटते. त्याच्या दिग्विजयी पराक्रमामुळे मास्टर ब्लास्टर, भारतरत्न, खेलरत्न, क्रिकेटचा देव वगैरे विशेषणे आणि पदव्या त्याच्याकडे चालत आल्या. पण सचिनच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या अगणित खेळयांनी आम्हा क्रिकेटरसिकांना जो “अनंत हस्ते कमलावराने देता, किती घेशील दो कराने” या प्रकारचा अमर्याद शब्दातीत आनंद दिला आणि त्याबदल्यात सचिनला करोडो लोकांकडून जे प्रेम, आशिर्वाद, अभिष्टचिंतन यांचे संचित मिळाले, त्याचे मोल त्यालाही अधिक असेल याची खात्री वाटते.

विजय मांजरेकर

भारताच्या ३ महान “विजय” पैकी एक असलेले “विजय लक्ष्मण मांजरेकर” हे परदेशात वेस्ट इंडिज व इंग्लंड यांच्या दर्जेदार वेगवान गोलंदाजांविरुद्ध केलेल्या काही महत्त्वाच्या खेळयांमुळे अनेक जाणकारांच्या कौतुकाचे पात्र ठरले. भारतात फिरकीला अनुकूल खेळपटट्यांवरही ते दादागिरीने फलंदाजी करत. १९५१ ते १९६५ या काळात ५५ कसोटीत ७ शतकांच्या मदतीने ३९.१२ च्या सरासरीने केलेल्या ३२०८ धावा त्यांच्या गुणवत्तेला न्याय देत नसल्या तरी अनेक क्रिकेटतज्ञ त्यांना मजबूत बचाव, तंत्रशुद्धता आणि चौफेर फटकेबाजीची क्षमता यामुळे महान फलंदाज मानीत. विजय गरज पडली तर व्यवस्थित यष्टिरक्षणही करू शकत. न्यूझीलंड विरुद्ध मद्रास येथे शेवटच्या कसोटीत शतक ठोकून ते निवृत्त झाले. सर्वाधिक धावा व शतकांचा भारतीय विक्रम काही वर्षे त्यांच्या नावे होता. मुंबईत १९३१ मध्ये जन्मलेल्या विजय यांनी बहुतेक काळ मुंबईसाठी रणजी क्रिकेट खेळले असले तरी महाराष्ट्र, बंगाल, राजस्थान, आंध्र व उत्तर प्रदेश यांसाठीही ते रणजी स्पर्धा खेळले. १९४९ ते १९७३ इतक्या प्रदीर्घ काळात १९८ प्रथमश्रेणी सामन्यात त्यांनी ४९.९२ च्या सरासरीने १२८३२ धावा केल्या ज्यात २८३ ही सर्वोच्च धावसंख्या होती.

 

हृषिकेश कानिटकर 

भारताचे माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांच्या “हृषिकेश कानिटकर” ह्या मुलानेही भारतासाठी २ कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामने खेळले. हृषिकेश डाव्या हाताने मधल्या फळीत फलंदाजी करे व उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी टाके. ऑस्ट्रेलियाच्या १९९९-२००० च्या दौऱ्यावर त्याला २ कसोटी खेळण्याची संधी मिळाली पण तो अपयशी ठरला. १९९७ ते २००० या काळात ३४ एकदिवसीय सामने खेळताना तो १ अर्धशतक फटकावू शकला आणि १७ बळी मिळवले. जानेवारी १९९८ मध्ये ढाका येथे इंडिपेंडन्स चषकाच्या अंतिम फेरीत भारताला पाकिस्तान विरुद्ध ३०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठताना २ चेंडूत ३ धावा हव्या होत्या आणि तेव्हा हृषिकेशने सकलेन मुश्ताकला चौकार ठोकून भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला आणि तो अचानक भारतात हिरो झाला. मला वाटते त्याच्यासाठीही हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण असावा. १९९४ ते २०१३ असा प्रदीर्घ काळ महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश याकडून प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळताना त्याने ५२.२६ च्या सरासरीने १०४०० धावा काढल्या ज्यात ३३ शतके होती आणि २९० ही सर्वोच्च धावसंख्या होती. त्याचबरोबरीने ४७.९१ च्या सरासरीने ७४ बळीही मिळवले. २०१०-११ च्या रणजी मोसमात राजस्थानचे नेतृत्व करताना त्याने राजस्थानसाठी रणजी करंडक जिंकला.

लिसा स्थळेकर

“लिसा स्थळेकरहे नाव ह्या यादीत वाचून काही जणांना आश्चर्य वाटेल परंतु ही प्रसिद्ध अष्टपैलू ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू मूळ महाराष्ट्रियन व भारतीयच आहे. 13 ऑगस्ट 1979 ला तिचा पुणे येथे जन्म झाला तेव्हा तिचे नाव ‘लैला’ होते. पुढे अमेरिकास्थित हरेन स्थळेकर व त्यांच्या ब्रिटिश पत्नीने पुण्यातील ‘श्रीवत्स’ या अनाथालयातून तिला दत्तक घेतले व तिचे नामकरण ‘लिसा’ करून पुढे ते ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. वडिलांनीच क्रिकेटची गोडी लावलेली लिसा पुढे न्यू साऊथ वेल्स कडून उजव्या हाताने फलंदाजी करणारी तसेच ऑफ स्पिन गोलंदाजी टाकणारी अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्धीस आली. ऑस्ट्रेलियासाठी तिचे वन-डे पदार्पण २००१ मध्ये, कसोटीत २००३ मध्ये तर टी-ट्वेंटी मध्ये २००५ साली झाले. २०१३ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तिने निवृत्ती घेतली तोपर्यंत तिने ८ कसोटी, १२५ वन-डे आणि ५४ टी-ट्वेंटी सामने खेळले. कसोटी व वन-डे दोन्हीत शतके करणाऱ्या लिसाने दोन्हीत डावात ५ बळी मिळवण्याचा पराक्रमही केला आहे. लिसा चार वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाची सदस्य होती. अश्या ह्या लिसाच्या समावेशामुळे आपला हा संघ अधिक सर्वसमावेशक होऊन त्याला एक नाजूक परिमाण लाभते.

एकनाथ सोलकर

मुंबईच्या हिंदू जिमखान्यावर माळी असणाऱ्या व्यक्तीच्या “एकनाथ धोंडू सोलकर” ह्या गुणी मुलाने तिथे येणाऱ्या क्रिकेटपटूंना खेळाचा सराव देता देता जिद्द, मेहनती वृत्ती व अंगभूत क्रीडागुण यांच्या जोरावर भारतीय संघात मजल मारली. भारतासाठी २७ कसोटी आणि ७ एकदिवसीय सामने खेळणारा एकनाथ डाव्या हाताने फलंदाजी करे आणि गरज पडेल तशी डाव्या हाताने मध्यमगती किंवा फिरकी गोलंदाजी टाके. तो भारताचा आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट क्लोज-इन फील्डर म्हणून आजही ओळखला जातो. त्याने २७ कसोटीत ५३ झेल घेतले असून त्याचे हे १.९६(५३/२७) झेल/सामने यांचे विक्रमी गुणोत्तर आजही कोणी क्षेत्ररक्षक साध्य करू शकलेला नाही. चंद्रा, बेदी, प्रसन्ना, वेंकट ह्या फिरकी चौकडीने भारताला अनेक सामने जिंकून दिले आणि त्यात एकनाथच्या चपळ क्षेत्ररक्षणाचा, घेतलेल्या अफलातून झेलांचा सिंहाचा वाटा होता. धाडसी एकनाथने  विनाहेल्मेट फॉरवर्ड-शॉर्ट-लेग ला उभे राहून जबरदस्त क्षेत्ररक्षण करत अविश्वसनीय झेल घेतले आहेत.

१९६९ साली न्यूझीलंड विरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या सोलकरने १९७७ ला इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला. या कालावधीत त्याने १०६८ धावा काढल्या आणि १८ बळी घेतले. आपले एकमेव कसोटी शतक १९७५ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध मायदेशात झळकावले. १९७१ साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड मधील भारताच्या पहिल्याच मालिका विजयात सोलकरचा मोलाचा वाटा होता. तो आपले क्रिकेट बिनधास्त, मोकळेपणाने कुणाचेही दडपण न घेता खेळत असे त्यामुळेच साक्षात गॅरी सोबर्स व जेफ बॉयकॉट यांनाही स्लेजिंग करायला त्याने मागेपुढे बघितले नाही. १९६५ ते १९८१ दरम्यान प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळताना त्याने ६८५१ धावा केल्या आणि २७६ बळी मिळवले. असे म्हणतात की भारताच्या स्वातंत्र्यदिनानंतर जन्मलेला भारतासाठी कसोटी खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू होता.

→ दत्तू फडकर

कपिलदेव च्या आगमनापूर्वी मध्यमगती गोलंदाजी करणारा भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणजे दत्तू फडकर. “दत्ताराम गजानन फडकर” नावाचा कोल्हापूरात डिसेंबर १९२५ मध्ये जन्मलेला उंच दणकट बांध्याचा हा रांगडा गडी कपिल प्रमाणेच मधल्या फळीत येवून टोलेबाजी करे व चांगल्या गतीने गोलंदाजी करताना दोन्ही बाजूंना चेंडू स्विन्ग करे. १९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांना प्रथम संधी मिळाली, आणि आपल्या गोलंदाजी पेक्षा लिंडवॉल, मिलर सारख्या गोलंदाजांसामोर केलेल्या धाडसी, सातत्यपूर्ण फलंदाजीने त्यांनी सर्वांना प्रभावित केले. ३१ कसोटीत त्यांनी २ शतकांसह ३२.३४ च्या सरासरीने १२२९ धावा केल्या तसेच ३६.८५ च्या सरासरीने ६२ बळी घेतले. १९४२ ते १९६० दरम्यान प्रामुख्याने मुंबईकडून प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळताना त्यांनी ८ शतकांसह ५३७७ धावा काढल्या आणि २२.०४ च्या सरासरीने तब्बल ४६६ बळी घेतले.

अजित आगरकर

मुंबईची क्रिकेटपंढरी शिवाजी पार्क येथे जन्मलेला “अजित भालचंद्र आगरकर” भारतासाठी १९९८ ते २००७ दरम्यान २६ कसोटी आणि १९१ एकदिवसीय सामने खेळला. फार वेगवान धाव नसलेल्या मध्यम उंचीच्या आजितचे चेंडू टप्पा पडल्यावर मात्र झपकन वेगाने जात व फलंदाजांची धांदल उडे. २६ कसोटीत ५८ बळी घेणाऱ्या अजितने २००४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेड कसोटीत ८ बळी घेऊन भारताला यादगार विजय मिळवून दिला, तसेच २००२ च्या इंग्लंड विरुद्ध लॉर्डस कसोटीत अप्रतिम बहारदार शतक ठोकले. कसोटीपेक्षा वन-डे सामन्यांत अजित अधिक यशस्वी ठरला. १९१ वन-डे सामन्यात त्याने २८८ बळी मिळवले आहेत जे आजही भारतासाठी तिसऱ्या क्रमांकाचे आहेत, तसेच ३ अर्धशतकांसह १२६९ वेगवान धावा फटकावल्या आहेत. भारतासाठी वेगवान एकदिवसीय अर्धशतक आणि जलद ५० बळी घेणे हे विक्रमही त्याच्या नावावर आहेत. २०१२-१३ चा रणजी विजेत्या मुंबई संघाचा संघनायक म्हणूनही अजितची नोंद घ्यावी लागेल.

→ दत्ताराम हिंदळेकर

मुंबईत ०१ जानेवारी १९०९ ला जन्मलेले “दत्ताराम धर्माजी हिंदळेकर” हे भारताच्या सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षकांपैकी एक मानले जातात. १९३६ साली इंग्लंडविरुद्ध लॉर्डस येथे पदार्पण केलेल्या दत्ता यांना पुढचा कसोटी सामना खेळण्यासाठी १० वर्षे वाट बघावी लागली. १९४६ च्या इंग्लंड दौऱ्यात त्यांना ३ कसोटी सामने खेळायला मिळाले. असे एकूण चारच कसोटी ते खेळले मात्र १९३४ ते १९४७ दरम्यान ९६ प्रथम दर्जाचे सामने खेळून त्यांनी एका शतकासह २४३९ धावा केल्या तसेच १२८ झेल घेऊन ५९ यष्टीचीत केले. अर्थात दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे १९३९ ते १९४५ दरम्यान त्यांची उमेदीची ६ वर्षे वाया गेली. १९३६ च्या पदार्पणाच्या कसोटीत सलामीला गेलेल्या दत्तानी १९४६ च्या मँचेस्टर कसोटीत दुखापतीमुळे शेवटच्या क्रमांकावर जाऊन रंगा सोहोनी बरोबर १५ मिनिटे लढत देऊन भारतासाठी सामना वाचवला होता. विजय मांजरेकरांचे ज्येष्ठ नातलग असलेल्या दत्ता यांना आर्थिक विवंचनेमुळे आजारपणात वेळेवर उपचार न मिळाल्याने १९४९ मध्ये वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी जीव गमवावा लागला.

*********

आत्ता अंतिम ११ मध्ये समावेष न होऊ शकलेल्या खेळाडुंबद्दल थोडेसे :-

→ संजय मांजरेकर

वडिलांप्रमाणेच “संजय विजय मांजरेकर” सुद्धा आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकला नाही. १९८७ मध्ये गावसकर यांच्या निवृत्ती नंतरचा भारताचा पहिला कसोटी सामना हा पदार्पणाचा सामना असणारा संजय हा गावसकर नंतरचा पुढचा विक्रमवीर असेल ही अनेक भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा पुढे फोल ठरली. १९८५ पासून त्याची स्थानिक क्रिकेटमधली धावांची रतीब टाकणारी अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी तसेच १९८९ सालातली वेस्ट इंडिज व पाकिस्तान मध्ये त्यांच्याच देशात जाऊन त्यांच्या महान वेगवान गोलंदाजांच्या चौकडी विरुद्ध ८ कसोटीत ३ शतके व ३ अर्धशतकांच्या सहाय्याने ६४ च्या सरासरीने केलेल्या ७६९ धावा यामुळे संजयबद्दल भारतीय क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या, पण त्याने स्वत:चा व चाहत्यांचाही अपेक्षाभंग केला. संजयने ३७ कसोटीत ३८.६७ च्या सरासरीने फक्त २०४३ धावा केल्या तर ७४ एकदिवसीय सामन्यांत १९९४ धावा. साधारणत: संथ फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या संजयने १९९१ साली दक्षिण आफ्रिके विरुद्ध वन-डे सामन्यात झंझावाती शतक मात्र ठोकले. प्रथम श्रेणी मध्ये ५५.११ च्या सरासरीने १०२५२ धावा करताना विक्रमी ३७७ ची खेळी त्याने १९९१ च्या रणजी उपांत्य सामन्यात मुंबई येथे हैद्राबाद विरुद्ध केली.

हेमंत कानिटकर

अमरावतीत डिसेंबर १९४२ मध्ये जन्मलेले “हेमंत शामसुंदर कानिटकर” महाराष्ट्राकडून खेळताना नियमित यष्टीरक्षक म्हणून खेळत असले तरी भारताकडून दोन कसोटी खेळताना ते निव्वळ फलंदाज म्हणून खेळले. १९७४ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांना बंगलोर व दिल्ली येथे संधी मिळाली. पहिल्या डावात ६५ धावांची खेळी केल्यावर पुढच्या तीन डावांत अपयशी ठरल्याने ते कायमसाठी संघाबाहेर फेकले गेले. १९६३ ते १९७८ या काळात अनेकदा ते महाराष्ट्राच्या संघाचे फलंदाजीचा कणा बनले. ८७ सामन्यात १३ शतकांसह त्यांनी ५००६ धावा केल्या तसेच यष्टीमागे ९० बळी टिपले. २५० ही सर्वोच्च धावसंख्या त्यांनी १९७०-७१ मध्ये राजस्थान विरुद्ध नोंदवली.

→ रामनाथ पारकर

३१-१०-१९४६ ला मुंबईत जन्मलेला “रामनाथ धोंडू पारकर” धडाकेबाज सलामीचा फलंदाज आणि कव्हर क्षेत्रातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. १९७१ च्या हंगामात अनेक मुंबईकर खेळाडू देशासाठी क्रिकेट खेळत असल्याने दुबळ्या झालेल्या मुंबईच्या संघाला रामनाथने अनेकदा आपल्या फलंदाजीने दमदार सुरवात करून देत सावरले व रणजी करंडक आपल्याकडेच राखण्यात मोलाचा वाटा उचलला. यामुळे नावारूपाला आलेल्या रामनाथला इंग्लंडविरुद्ध १९७२ साली दोन कसोटीत सुनीलचा साथीदार म्हणून संधी मिळाली पण त्यात अपयशी ठरल्याने पुन्हा तो कधी कसोटी खेळू शकला नाही. मात्र १९६४ ते १९८१ या काळात मुंबई साठी त्याने ८५ प्रथम दर्जाचे सामने खेळताना अनेकदा सुनिल किंवा इतरांबरोबरही सलामीसाठी दमदार कामगिरी बजावली. ३१ डिसेंबर १९९५ ला एका अपघातामुळे ४३ महीने कोमात राहिल्यावर ऑगस्ट १९९९ ला त्याचे दुर्दैवी निधन झाले.

→ खंडू रांगणेकर

”खंडेराव मोरेश्वर रांगणेकर” असे भारदस्त नाव धारण करणाऱ्या ह्या अष्टपैलू खेळाडूने भारतासाठी तीन कसोटी सामने खेळले. २७ जून १९१७ ला मुंबईत जन्मलेल्या खंडूनी मुंबई, महाराष्ट्र आणि होळकर संघांसाठी रणजी क्रिकेट खेळले. ते डाव्या हाताने फलंदाजी करत व उजव्या हाताने कामचलाऊ मध्यमगती गोलंदाजी टाकत. १९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यांना ३ कसोटी खेळण्याची संधी मिळाली पण ते साफ अपयशी ठरले. मात्र १९३९ ते १९६४ अशा २५ वर्षांच्या काळात ते ८५ प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्यांनी ४१.८३ च्या सरासरीने १५ शतके ठोकत ४६०२ धावा काढल्या तसेच ४० च्या सरासरीने २१ बळी घेतले.

आपल्या पूर्ण आयुष्यात त्यांनी आपल्या अष्टपैलुत्वाची झलक दाखवली. मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेज मधून BA ची पदवी मिळवलेले खंडू राष्ट्रीय स्तरावरचे उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडूही होते. १९३९ ते १९४५ च्या दरम्यान त्यांनी बॅडमिंटन च्या एकेरी व दुहेरीत अनेक पदके मिळवली. मुंबई क्रिकेटचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, तसेच BCCI चे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी बरेच वर्षे काम बघितले. १९६० च्या दशकात ते काही वर्षे ठाणे महापालिकेचे अध्यक्ष होते. भारतीय कस्टमस मध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली तसेच कापड उद्योगाशी संबंधित व्यवसायही ते करत असत.

चंदू पाटणकर

पेण येथे २४ नोव्हेंबर १९३० ला जन्मलेल्या “चंद्रकांत त्रिंबक पाटणकर” यांनी एका कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यष्टीरक्षक असलेल्या चंदू यांना १९५६ साली न्यूझीलंड विरुद्ध एकाच कसोटीत संधी मिळाली. त्यातही ३ झेल आणि १ यष्टीचीत करून त्यांनी आपली चुणूक दाखवली. स्थानिक प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चंदूना नरेन ताम्हाणे व नाना जोशी यांच्यासारख्या प्रस्थापित यष्टीरक्षकांमुळे राष्ट्रीय स्तराप्रमाणे स्थानिक पातळीवरही फार संधी मिळत नसे. चंदूनी १९४९ ते १९६८ दरम्यान भारतात यष्टीरक्षक म्हणून प्रथम दर्जाचे २६ क्रिकेट सामने खेळले.

→ मनोहर हर्डिकर

गुजरातमधील वडोदरा येथील ०८ फेब्रुवारी १९३६ चा जन्म असलेल्या “मनोहर शंकर हर्डिकर” या अष्टपैलू क्रिकेटपटूने आपले सारे प्रथम श्रेणी क्रिकेट मुंबई साठी खेळले. सुरुवातीला मध्यमगती गोलंदाजी टाकणारे हर्डिकर नंतर ऑफ स्पिन गोलंदाजी टाकत. १९५५ च्या पदार्पणाच्या रणजी मोसमात अंतिम फेरीत त्यांनी बंगालविरुद्ध ३९ धावा देवून ८ बळी घेतले आणि मुंबईला रणजी करंडक मिळवून दिला. १९५८ साली मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियम वर वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी कसोटी पदार्पण केले आणि आपल्या तिसऱ्याच चेंडूवर रोहन कन्हायला पायचीत बाद करत आपला पहिला व एकमेव कसोटी बळी मिळवला. त्याच कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद ३२ धावांची लढाऊ खेळी करत भारतासाठी सामना अनिर्णित राखला. मात्र कानपूर येथील दुसऱ्या कसोटीत त्यांच्या डोक्याला चेंडू लागला आणि त्यांच्या आत्मविश्वासाला तडा गेला व परत ते कसोटी क्रिकेट खेळले नाहीत. मात्र १९५४ ते १९६८ च्या दरम्यान ७४ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना ८ शतकांच्या सहाय्याने ३२.८१ च्या सरासरीने २५९२ धावा काढल्या तसेच ३१.६६ सरासरीने ७४ बळी घेतले. १९६७ व १९६८ या आपल्या अखेरच्या दोन रणजी हंगामात त्यांनी मुंबईचे नेतृत्व करताना मुंबईसाठी रणजी करंडक जिंकला.

रोहन गावसकर

विक्रमादित्य सुनिल गावसकर यांचा २० फेब्रुवारी १९७६ ला जन्मलेला सुपुत्र रोहन मधल्या फळीतील आकर्षक डावखुरा फलंदाज आणि उपयुक्त डावखुरा फिरकी गोलंदाज होता. मुंबईकडून संधी मिळणे कठीण झाल्याने १९९६ पासून तो बंगालकडून रणजी व प्रथमश्रेणी क्रिकेट खेळू लागला. २००४ मध्ये त्याला भारताकडून ११ एकदिवसीय सामने खेळायची संधी मिळाली. त्यात त्याला १ अर्धशतक व १ बळी असे मर्यादित यश लाभले. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मात्र त्याने ४४.१९ च्या सरासरीने ६९३८ धावा केल्या असून ३८ बळीही मिळवले आहेत. निवृत्तीनंतर रोहन समालोचक आणि क्रीडामाध्यम-संवादक म्हणून चांगली कामगिरी बजावत आहे.

*************************************

तर मंडळी आवडला ना हा अस्सल मराठमोळा ‘कर’वीरांचा संघ? माझी खात्री आहे की ह्या दिग्गजांपासून प्रेरणा घेतलेले अनेक मराठीजन ‘करां’मध्ये बॅटरूपी समशेर आणि चेंडूरूपी तोफगोळा घेऊन यापुढेही भारतीय क्रिकेटमध्ये भीमपराक्रम गाजवताना दिसतील.

– गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर. 

( पूर्वप्रसिद्धी :- ‘Cricकथा दिवाळी अंक २०२२ [या लेखाची संक्षिप्त व संपादित आवृत्ती] )

Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 8 Articles
माजी बँकर, मुक्त लेखक. विविध संकेतस्थळे, दिवाळी अंकांतून क्रिकेटविषयक, बँकिंगसंबंधी व व्यक्तिचित्रणात्मक लेखन. विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद. या शब्दकोड्यांना विशेषत: अनेक दिवाळी अंकांमधून प्रसिद्धी. मराठी साहित्य, खेळ (क्रिकेट), भारतीय इतिहास यांमध्ये विशेष रुची.
Contact: Twitter

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..