माणसाच्या जीवनात स्त्रीचा सहवास सुरु होतो, तो आईपासून. त्यानंतर मावशी, आत्या, काकू, आजी, पणजी, भाची, पुतणी, मुलगी, सून, नात या नात्यांची भर पडत जाते.
जीवनातील प्रत्येक वळणावर स्त्री कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून त्याला आयुष्यभर भेटतच रहाते. काहीजणी, काही क्षणांसाठी भेटतात तर काही शेवटपर्यंत साथ देतात. मात्र प्रत्येकीची नोंद ही त्यांच्या मनाच्या ‘हार्ड डिस्क’मध्ये झालेली असते. जी कधीही ‘करप्ट’ होत नाही.
शाळेत गेल्यावर भेटलेल्या, पहिलीच्या बाईंना आमची पिढी कदापि विसरणं शक्य नाही. मग माध्यमिक शाळेत, विषयाला असणाऱ्या सरांपेक्षा, बाईंचीच नावं अधिक लक्षात रहातात.
काॅलेजमध्येही तसंच असतं. एकवेळ सरांच्या तासाला दांडी मारलेली असेल, मात्र बाईंच्या तासाला न चुकता ‘हजर’!!
व्यवसायात पडल्यावर, स्त्रियांचा संपर्क येत राहिला. कधी नाटक, चित्रपटाची निर्माती म्हणून तर कधी दिग्दर्शिका किंवा कलाकार म्हणून. कधी स्मिता तळवलकर भेटल्या. कधी सई परांजपे तर कधी मधु कांबीकर! कधी जयश्री गडकर तर कधी सुहास जोशी! कलाकारांच्या अशा दोन पिढ्या माझ्या संपर्कात होत्या.
काही लेखिकांचं लेखन झपाटल्यासारखं मी वाचून काढलं. ‘श्यामची आई’ चित्रपट पहाताना, मन कासाविस झालं.
जाहिरातींची कामं करताना, अनेक भगिनींनी सहकार्य दिलं. कधी केलेल्या विनंतीचा अव्हेर केला नाही की मदत करताना हात आखडता घेतला नाही.
पुस्तकांची मुखपृष्ठं करताना, अनेक लेखिका, प्रकाशिका भेटल्या. त्यांच्याकडूनही ज्ञानात व अनुभवात भरच पडली. प्रत्येक भेटणाऱ्या स्त्रीची कथा आणि व्यथा, कळत नकळत समजत गेली.
कोरोनाच्या लाॅकडाऊनने, माझ्या हातातील चित्रकार मागे पडून, लेखक पुढे आला. रोज जीवनातील आठवणी, लिहित राहिलो. भेटलेली माणसं रेखाटत राहिलो. फेसबुकवर लेख वाचून अनेक रसिकांनी फोन करुन, प्रतिक्रिया देऊन लेखनाची प्रेरणा दिली.
कित्येकांनी या लेखांचं पुस्तक व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. अशाच रसिकांमधून नम्रता नावाच्या मुलीनं, एका स्पर्धेत मी लिहिलेली कथा वाचून पारितोषिक प्राप्त केलं. तिनेच पुढाकार घेऊन, माझ्या निवडक आठ कथांचं ‘आॅडिओ बुक’ केलं.
मग अशा सर्व महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देणं, हे माझं आद्य कर्तव्यच आहे!!!
जागतिक महिला दिन २०२२.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
८-३-२२.
Leave a Reply