
वळवाचे पाऊस सुरू झाले,पहिल्या पेरण्या झाल्या की वारक-यांना वेध लागतात पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीचे. मनामनात गजर सुरू होतो “ विठ्ठल विठ्ठल , जय जय पांडुरंग हरी…” वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे. मी अगदी लहानपणापासून ज्ञानोबांच्या पालखीचे दर्शन, वारीला जाण्याची गडबड बघत व अनुभवत आलेली आहे. पण ते सर्व पुण्यासारख्या शहरी वातावरणात आलेल्या वारीची. प्रत्यक्ष वारक-यांशी बोलणे किंवा त्यांची पंढरपूरपर्यंत चालत जाण्याचे श्रम करण्यामागची भावना जाणून घेणे कधी जमलेच नव्हते. गतवर्षी योगायोगाने तुकारामांची पालखी जेव्हां बारामतीत पोहोचते तेव्हां आम्ही तिथेच होतो. त्यामुळे आसपासच्या छोट्या गावातून येणारे वारकरी जवळून पहाण्याचा योग आला.
सकाळपासूनच वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून छोट्या मोठ्या दिंड्या यायला सुरूवात झाली होती. आम्ही जिथे उतरलो होतो तो रस्ता भर वस्तीतला, गजबजलेला होताच. पण या दिंडीतल्या वारक-यांच्यामुळे आज वेगळाच वाटत होता. उंच काठीवर डौलात फडकत असलेल्या भगव्या पताका एका खांद्यावर मिरवत, दुस-या खांद्याला अडकवलेली पिशवी सावरत, डोक्याला मुंडासे, लांब बाह्यांचा पांढरा सदरा,पांढरे धोतर व पायात चपला अश्या वेशातले वारकरी तोंडाने विठ्ठलाचा गजर करत रस्त्याने लगबग करत चालले होते. त्यांच्या मागोमाग गोल किंवा नऊवारी साडीतल्या नथी घातलेल्या बायका भराभर नामस्मरण करत चालल्या होत्या.काही बायकांच्या काखेत स्वच्छ चकचकीत पाण्याच्या तांब्यापितळेच्या कळशा तर काहींच्या डोक्यावर छान रंगवलेले तुळशी वृंदावन होते. त्यातली तुळस त्यांच्या चालण्याच्या ठेक्याबरोबर डुलत होती.बहुतेक जणांच्या गळ्यात लांबलचक दोरीला बांधलेले टाळ होते.कुणाकुणाच्या खांद्यावर वीणा तर कुणाच्या हाती चिपळ्याही होत्या.एका ठेक्यात येणारा टाळांचा आवाज आसमंत भरून टाकत होता.
दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक येत होते, तुकारामांची पालखी ज्या भल्यामोठ्या मैदानात उतरते त्याच्या जास्तीत जास्त जवळ आपापली पडशी/पिशवी ठेऊन जागा मिळवून विसावत होते.संध्याकाळच्या सुमारास रस्ता परत एकदम गजबजला. विठ्ठलाचा गजर दुमदुमू लागला, त्याच्या जोडीला “ ज्ञानोबा माऊली तुकराम ” हाही गजर सुरू झाला.या सर्वांच्यावर आवाज काढत टाळ दुमदुमू लागले. रस्त्यात एकच लगबग सुरू झाली. प्रत्येक वारक-याची धावपळ पालखीला सामोरे जाण्यासाठी सुरू झाली. अशातच तुकाराम महाराजांची पालखी गावच्या वेशीवर पोहोचल्याची बातमी आली आणि वारक-यांची उत्सुकता व आनंद त्यांच्या चेह-यावर ओसंडून जायला लागला. हातातल्या टाळांचा आवाज वाढला, तोंडाने होणारा विठ्ठलाचा गजर गगनाला भिडला.वेशीवर योग्य आगत स्वागत होताच पालखी मंडपाच्या दिशेने येऊ लागली. तुतारीचा आवाज पालखी जवळ आल्याची कल्पना देत होता.भालदार चोपदार आपापल्या पारंपारिक वेशभूषेत पालखीवर चवरी ढाळत होते, उत्तम सजवलेला घोडा गर्दीच्या मधोमध शांतपणे पण डौलात चालला होता. ना त्याला माणसांच्या गर्दीची भीती वाटत होती,ना माणसांना तो उधळेल याची ! टाळांच्या, तुतारीच्या, कर्ण्यावरून होणा-या मोठ्या आवाजातल्या सूचनांचा कोणताही विपरित परिणाम त्याच्यावर होत नव्हता. एका ठेक्यात दुडक्या चालीतले, इकडेतिकडे पहात जसे काही तुकाराम महाराज त्याच्यावर स्वार आहेत, त्यांना सांभाळणे आपले कर्तव्य आहे अशा अविर्भावातले घोड्याचे चालणे लक्ष वेधून घेत होते. पालखीला लोटांगण घालणारे, पालखीतल्या पादुकांना हात लाऊन नमस्कार करणारे, पालखी ओढणा-या बैलांच्या पायावर पाणी घालणारे यांची एकच गर्दी झाली. जो तो भक्तीभावात मग्न होता. दोन तगड्या बैलांच्या गाडीवर तुकाराम महाराजांचा फोटो व पादुका असणारी पालखी विसावलेली होती. पालखी उत्तम रंगकाम केलेली फुलांनी सजवलेली होती. दुरूनही पादुकांचे दर्शन घेता येत होते. वारकरी आनंदाने नुसते नाचत होते. मुखाने अखंड विठ्ठलाचे नामस्मरण, तुकारामांचा जयजयकार चालू होता. स्त्रिया,पुरूष,गरीब,श्रीमंत,आबाल वृद्ध यांची सरमिसळ झाली होती. प्रत्येकजण भक्तिरसात मग्न होता.पालखी मंडपात मुक्कामाला पोहोचली आणि रस्त्यात थोडीफार शांतता पसरली.
रात्री आम्ही मंडपात पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गेलो,तर तिथले वातावरण वेगळेच होते.मंडपात कीर्तन चालू होते. तबलजी व हार्मोनियम वादक यांच्या मध्ये कपाळावर बुक्का,डोक्यावर पागोटे, पांढरा सदरा, पांढरे धोतर, कमरेला कसलेले लाल मोठ्या काठाचे उपरणे,हातात चिपळ्या, गळ्यात हार अशा पोशाखातले मध्यम वयाचे कीर्तनकार डोळे मिटून कीर्तनाला उभे होते. त्यांच्या मागे २०-२२ टाळकरी दिवसभराच्या चालण्याचे श्रम विसरून हातात टाळ घेऊन गोलाकार उभे होते.कीर्तनकारांनी “पांडुरंग हरी” चा जयजयकार करताच मंडपात एकच शांतता पसरली व कीर्तन रंगू लागले.रात्र चढायला लागली तसा उत्साह वाढायला लागला.कीर्तनकारांच्या इशा-यानुसार मागचा वारक-यांचा गोलाकार एका तालात डोलायला, नाचायला लागला.कीर्तन रंगू लागले,पादुकांच्या दर्शनासाठी म्हणून गेलेले आम्ही सुद्धा बघता बघता त्यात तल्लीन झालो.
सकाळी जाग आली ती रस्त्यावरच्या गडबडीने. छोटे टेंपो घेऊन माणसे आली होती त्या माणसांनी टेंपोतून येताना मोठमोठ्या पातेल्यातून पोहे, खिचडी, पराठे असे पदार्थ आणले होते. वारक-यांना बोलावून प्रत्येकाच्या हातात यातील काही ना काहीतरी दिले जात होते. पंढरीला जाणा-या सर्वांसाठी हे अन्नदान चालू होते. आपण जाऊ शकत नाही तर निदान जे जाताहेत त्यांच्या रूपाने विठ्ठलाला आपल्यातर्फे नैवेद्य पोहोचावा ही या मागची भावना ! वारकरी याचा आस्वाद घेऊन तृप्त होत होते. आता त्यांची पुढच्या प्रवासाला जाण्याची लगबग चालू झाली होती.पालखी तयार झाली होती. पालखीचा अश्व, भालदार चोपदार सज्ज होते. तुतारीचा इशारा होताच परत भजनाचा दमदार आवाज आसमंत भरून टाकू लागला, टाळ वाजू लागले, नगारे घुमू लागले. आम्हीही पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरलो. हे सर्व जवळून बघता आले याची धन्यता वाटत होती.हळू हळू पालखी, तिच्या बरोबरचा लवाजमा पुढे पुढे सरकायला लागला. रस्त्यावरची गर्दी पांगू लागली.आता तुरळक तुरळक वारकरी मागे उरले. त्यातच एक म्हातारा वारकरी काठी टेकत टेकत हळू हळू चालत होता. त्याला तेवढ्या श्रमानेही तहान लागली असावी. त्याला पाणी देण्यासाठी मी त्याच्याजवळ गेले. अणि इतके दिवसात न मिळालेली एका सामान्य वारक-याशी बोलण्याची संधी मला मिळाली.
“बाबा, तुम्ही कुठून आलात?”
“माउली,आमचं गाव इथून धा मैल तरी दूर असलं!”बाबा घाम पुसत म्हणाले.
“काल गावापासून चालतच आलात की काय?”
“तर वो! फाटं फाटं निघालो. मला चालाया येळ लागतोय. म्हनूनशान समदी गाववाली निघायच्या आत म्या रस्ता धरला. काल पालखी अदुगर पोचलो.”
“मग इथूनच परतणार काय? चालायला त्रास होतोय म्हणून विचारलं.”
“त्यात काय, माऊली,पाय हाएत तर त्ये दुकणारच की वो ! असं त्याचं कवतूक करून चालतय व्हय! जास्त तरास वाटल तर कलाकभर बसायच आनी फुढ जायाचं!”
“म्हणजे बाबा, पंढरी पर्यंत जाणार म्हणाकी तुम्ही !त्याच्या पुढं दर्शनासाठी भल्यामोठ्या रांगेत उभ रहायच,त्या गर्दीत दर्शन घ्यायच आणि परत फिरायच. एवढ सगळ झेपेल का तुम्हाला?”
“इटुराया घेईल की काळजी माजी. म्या कशाला इचार करू? पंढरी पत्तुर जायाच ,कळसाला हात जोडायचे ,रातभर कीर्तन भजन ऎकायच आन परत माघारी फिरायच.दरसाल जातोय म्या. एकडाव बी चुकलो न्हाई.”
“बाबा, इतक्या दूर जाता तर दर्शन तरी नीटपणे घेता येते का?”
“माऊली, इटुरायाच्या द्येवळात मुंगीलाबी जागा नसतीया. तिथं कशाला जायाचं?”
“म्हणजे दर्शन न घेताच तुम्ही परत फिरणार?”माझ्या पांढरपेशी मनाला इतक्या दिवसांची पायपीट ,श्रम करून देवदर्शन न घेताच परतण काही केल्या पटत नव्हत.
म्हातारा मिशीतल्या मिशीत हसला. म्हणाला “माउली, तू बी एक माउली हायेस,तुजी लेकरं जवा गावावरून येतात तवा तू काय घरात बसून असतेस का? दारात येत न्हाईस? तसाच माजा इटोबापन.आमी त्येची लेकरं त्यो माउली. आमास्नी येताना बगून त्यो काय द्येवळात दडी मारून बसल व्हय? अग, आमी जवा वाखरीला ४ मैलावर येतो ना तवाच त्यो द्येवळाच्या कळसावर चढतो आन आमची वाट बघतो बघ. त्यो आमाला लांबूनच वळकतो. म्हनून्शान त्येला तिथूनच कळसावर बसलेला बगतो, हात जोडतो आनी परतीची वाट धरतॊ.”
म्हाता-याचे बोलणे ऐकताना मी त्याच्या शब्दातील भक्तीभावाने इतकी भारवून गेले की त्याच्या पुढे मी नतमस्तक झाले. आपोआप माझे हात जुळले, डोळे पाण्याने डबडबले, त्याच्या सामान्य रूपात मला दिव्यत्वाची प्रचीती आली, त्याच्या रूपाने मला पांडुरंगच भेटल्याची जाणीव झाली व मनात शब्द उमटले “दिव्यत्वाची जेथ प्रचिती ,तेथे कर माझे जुळती.”
“पांडुरंग हरी”.
— अनामिका बोरकर
ए १८, वुडलॅंड्स, गांधी भवन मार्ग,
कोथरुड, पुणे ४११ ०३८.
९८१९८ ६९०९०