![p-81542-tevha-te-aaj](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2021/08/p-81542-tevha-te-aaj.jpg)
पन्नास वर्षे कालनदीतून वाहून गेली आणि ती सगळी चिमुरडी(?) मुले, आता साठी उलटलेली आजोबा मंडळी झाल्यावर पहिल्यांदाच औपचारिकरीत्या दोन दिवसांसाठी भेटली.
” भूले हुए नामोंसे कोई तो बुलाए ” म्हणणाऱ्या गुलज़ार ला सगळ्यांनी खोटे पाडले. कारण कोणाचेच खरे/टोपण नांव /चिडवायचे नांव कोणीच विसरले नव्हते आणि त्यांचा यथेच्छ वापर झाला.
काही स्थानिक मंडळी दैनंदिन संपर्कात असल्याने त्यांना या क्षणांची तितकीशी मातब्बरी नव्हती. आणि हे स्वाभाविक आहे. पण १९७५ नंतर पहिल्यांदाच एखाद्या मित्राला भेटणे, त्याला ओळखू न शकणे असल्या अनुभवांचे स्वागत कसे करावे हेही बऱ्याच जणांच्या सुरुवातीला पचनी पडले नाही. सगळ्यांच्या मस्तकावर काळाने आपला पांढरा हात फिरवला होता आणि काही तर “उजडा चमन ” झालेले !
इतका लंबाचौडा कालखंड असल्याने प्रत्येकाचा प्रवास, पडझडी, चढउतार आणि कर्तृत्वाची शिखरे जाणून घ्यायला सगळेच उत्सुक होते. एकाच बाकावर बसून वर्षे काढलेली मंडळी न परतण्याच्या वाटचालीत कोठल्या कोठे पोहोचली होती.
सगळ्यांचे अभिमानक्षण टाळ्या वाजवून साजरे करण्यात आले. प्रत्येकाची वेगळी स्वप्ने होती आणि ती आटोक्यात आली होती. सध्याची महामारी थोडी विसंबल्यावर हे भेटणे अधिक मोकळे करणारे होते. खपल्या तात्पुरत्या उचकटवून आतील जखमा मित्रांसमवेत बिनदिक्कत शेअर करणे हे एकाच वेळी आनंदित करणारे तर होतेच पण क्वचित डोळे ओलावणारेही होते. काहींचे घाट चढण्यासाठी नक्कीच दुस्तर होते. एकमेकांना न आठवणाऱ्या घटना इतरांनी कथन केल्यानंतरच त्या आठवल्यावर जाणवलेले स्मरणरंजन अनोखे होते आणि अरे हा प्रसंग माझ्या कुपीतून कसा निसटला याची खंतही होती.
वयाच्या या टप्प्यावरील अपरिहार्य व्याधी, त्यांचे अनुभव, वेगवेगळ्या पॅथींच्या सूचना हेही सुरु होते. ज्योतिषावरून राजकारणावर गाडी घसरली. अधून-मधून कोरोना गप्पांमध्ये डोकावत होता. ” अंगूर की बेटी का इन्सल्ट नहीं करते ” असे म्हणत तिची इज्जत सावरणे चार-पाच तास इमाने-इतबारे सुरु होते. ” चकणा ” जास्त झाल्याने काहींनी लवकर उपाशी(?) झोपणे पसंत केले तर काहींनी शाकाहार+ मांसाहारावर ताव मारला. वयपरत्वे, प्रवासाची दमणूक म्हणून काहींनी लवकर निद्रेच्या स्वाधीन होणे स्वीकारले, तर काही जण “अंतरीच्या गूढ गर्भी ” शिरून आपापसात गप्पा मारत बसले. शाळा,शिक्षक,व्यवस्थापन यांच्यावरील मतप्रदर्शन सविस्तर झाले आणि वर्गमित्रांची झालेली वजाबाकी आठवून झाली.
कोणी काठावर राहून गंमत उपभोगली तर काहींनी नाकातोंडात पाणी जाईपर्यंत सूर मारले.
सकाळी उठून प्रभातफेरी, नवीन भेटीच्या आणाभाका झाल्या, फोटो झालेत. येऊ न शकलेल्या मित्रांचे सांत्वन करून झाले आणि वाहने पुन्हा आपापल्या दिशेने निघाली. सुबक विचारपूर्वक संयोजन आणि कोठेही चूक काढायला जागा नसावी याचा विचार संयोजकांनी केला होता.
माझ्या गाठोडीत सोलापूरचे (हरिभाई ) तीन , सांगलीचे (वालचंद) पाच पण बालवाडीपासूनच्या शाळूसोबत्यांबरोबरचा हा पहिलाच अनुभव होता.
पोतडी या व्हरायटीने तुडुंब भरली. आता कदाचित निघाल्याच तर कार्बन कॉप्या निघतील.
![](https://scontent.fpnq4-1.fna.fbcdn.net/v/t1.6435-9/s600x600/231539584_4258851184192384_5757447406373632820_n.jpg?_nc_cat=111&ccb=1-4&_nc_sid=730e14&_nc_ohc=j7aGOGsihn0AX8N37AO&_nc_ht=scontent.fpnq4-1.fna&oh=262a8aa50cca5a6abf592ea6b2fa1d92&oe=6138D4AC)
–डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply