नवीन लेखन...

ठाकूर मॅडम

बाबांची वर्धा पोलीस स्टेशन वरून मनमाड पोलीस स्टेशनला बदली झाल्यावर आम्ही कल्याणजवळच्या आमच्या गावातून मनमाडला राहायला गेलो. बाबा पोलीस अधिकारी असूनसुद्धा मला पहिलीला गावातल्याच मराठी आणि त्यातल्या त्यात झेड पी च्या शाळेत घातले होते. मनमाडला बदली झाल्यावर तिथे ख्रिस्ती संचालक मंडळ असलेल्या पण मराठी शाळेतच घातले गेले गावांत झेड पी च्या तिसरी नंतर मनमाड ला मनोरमा सदन शाळेत चौथीला टाकले होते. मनमाड मधून बाबांची मालेगावला वर्षभरातच बदली झाली मग पाचवीला कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयात माझी शाळा सुरु झाली. मालेगावहुन सुद्धा बाबांची वर्षभरात बदली होऊन रायगड जिल्ह्यात बदली झाली पोस्टिंग मिळाली नसल्याने त्यांना अलिबागला कंट्रोल रूम मध्ये तात्पुरती नेमणूक दिली होती . तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावीला बाबांना रायगड जिल्ह्यात पोस्टिंग मिळाल्यावर आणखी नवीनच तिसरी शाळा बघावी लागणार होती.
शाळा सुरु झाल्या होत्या आणि आम्ही मालेगाव सोडून बिऱ्हाड घेऊन पुन्हा आमच्या गावांत परतलो होतो. नेमक्या शाळा सुरु झाल्या आणि बाबांना रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेल्या निसर्गरम्य आणि सुंदर अशा श्रीवर्धन पोलीस स्टेशन मध्ये इन्चार्ज म्हणून पोस्टिंग मिळाली. बाबांची पोस्टिंग झाल्याने ते ड्युटीवर हजर झाले होते. पण श्रीवर्धन मध्ये पोलीस क्वार्टर चांगली नसल्याने बाबा भाड्याचे चांगले घर शोधत होते.
माझी मावशी अलिबागला असल्याने मला आणि भावाला अलिबागला मावशीच्या घरी जोपर्यंत बाबांना श्रीवर्धन मध्ये मनासारखं घर मिळत नाही तोपर्यंत शाळेत जाण्यासाठी राहायला पाठवले.

मावशीचे मिस्टर को ए सो च्या थळ येथील शाळेत मुख्याध्यापक तर मावशी को ए सो च्या जनरल अरुणकुमार वैद्य शाळेत शिक्षिका होती. त्यांचे मूळ गांव अलिबाग तालुक्यातील कोपर असल्याने मावशी अलिबागला माजी आमदार मधुकरशेठ ठाकूर यांच्या चाळीमध्ये भाड्याने राहत होती. दोन मावस बहिणी आणि एक मावस भाऊ यांच्यात मी आणि माझ्या भावाची भर पडली. मावशीने तिच्या जनरल अरुणकुमार वैद्य शाळेतील मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन मला सहावीच्या वर्गात बसवले. वर्गात बसवताना हा आपल्या शाळेत काही दिवस पाहुणा आहे अशी बाकीच्या मुलांना ओळख करून दिली. प्रत्येक जण वर्गात आलेल्या नवीन पाहुण्याकडे वळून वळून बघत होता. मावशीच्या शाळेत पुढील पंधरा दिवस प्रत्येक लेक्चरला शिक्षकांसह सगळेच जण माझ्याकडे कुतूहलाने बघत असत. मावशी अधून मधून येऊन माझी चौकशी करत असे. चौथी आणि पाचवीला नवीन शाळा नवीन वातावरणा सह नवीन राहणीमान आणि संस्कृती नंतर शाळेत मित्र बनायचे आणि बाबांच्या बदलीमुळे मित्रांसह सगळं मागे सुटायचं. अलिबागला पंधरा दिवसात पुन्हा सगळं नव्याने अनुभवून विसरायचे होते कारण पुन्हा एकदा श्रीवर्धनची नवीन शाळा बघायची होती.

मावशीच्या शाळेत मावशीला सगळे विद्यार्थी दचकून असायचे. मावशी नववी आणि दहावीला मराठी शिकवायची. पंधरा दिवसात मावशीच्या शाळेतील वर्गामध्ये डोक्यात काही गेले नसेल पण पंधरा दिवस मावशीच्या घरी मावस भावंड आणि शिक्षिका असणारी मावशी घरात कशी काम वाटून घेतात आणि आपापल्या शाळा आणि घर सांभाळताना कशी तारेवरची कसरत करतात ते अनुभवलं कारण मावशी, तिचे मिस्टर, दोन्हीही मावस बहिणी आणि एक भाऊ सगळ्यांच्या शाळांची वेळ वेगवेगळी. बाबांनी श्रीवर्धनला मुस्लिम मोहल्ल्यात एका मुस्लिम व्यक्तीचे दुमजली घर भाड्याने घेतले आणि आम्हाला

तिकडे बोलावून घेतले.मावशीने पंधरा दिवस न्हाऊ घातले खाऊ घातले आणि श्रीवर्धनला निघताना पोटाशी धरून पाठीवर थाप मारून भरलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. मावशी अजूनही कधीही आणि कुठेही भेटली तरीही जवळ बोलावून तशीच पाठ थोपटते. आजही जे कोणाला सांगता येत नाही ते तिच्याजवळ व्यक्त होता येते ते याचमुळे. माझे मामा आणि आई तिला माई नावाने हाक मारतात पण आमच्या नानी मावशीला माया बोलायच्या मावशीने तिन्ही भाऊ आणि माझ्या आईला नानींच्या शब्दाप्रमाणे अशी माया लावली की त्यांच्यातील प्रेम बघून कोणाही भावा बहिणीला हेवा वाटावा.
श्रीवर्धनला बाबांना सात महिने होतात न होतात तोच त्यांचे प्रमोशन झाले पी एस आय चे पी आय झाले आणि नवी मुंबईत कोकण भुवनला सी आय डी मध्ये दाखल झाले. माझे सहावीचे शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत आई आणि आम्ही दोघे भाऊ असे तिघेच श्रीवर्धनला काही महिने राहिलो. तिथून पुन्हा सातवीत जाताना शाळा बदलणार होती. पण सातवी ते दहावी चार वर्ष बाबा सी आय डी मध्ये असल्याने नेरूळ ला गव्हर्नमेंट क्वार्टर मिळाल्याने सेंट झेवियर्स च्या मराठी माध्यमात एकच शाळा मिळाली.

दहावीला असताना परीक्षेच्या तयारीसाठी मावशीने अलिबागला बोलावून घेतले. मावशी दहावीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासत असे त्यामुळे दहावीला मराठी व्याकरण आणि पेपर कसा लिहायचा इथपर्यंत सगळं समजावलं. मावशीच्या मिस्टरांना आम्ही मामा किंवा इतर नातेवाईक भाऊ किंवा दादा बोलण्या ऐवजी फक्त पप्पा या नावाने हाक मारतो. पप्पा त्यांच्या शाळेत मुख्याध्यापक असूनही नववी दहावीच्या सगळ्या वर्गात इंग्रजी शिकवायचे मग त्यांनी इंग्रजीची तयारी करवून घेतली.

अलिबागला को ए सो ची मुलांसाठी जनरल अरुणकुमार वैद्य तर मुलींसाठी जा. र. ह. कन्याशाळा आहे. मावशीची अलिबागच्या कन्याशाळेत मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला. मी आणि प्रिया अलिबागला गेल्यावर मावशीला भेटायला शाळेत गेल्यावर गेटवर अडवले असताना मी ठाकूर मॅडम यांना भेटायला आलो आहे असं सांगताना खूप अभिमान वाटला. मावशीने मोठ्या कौतुकाने तिच्या स्टाफला माझा भाचा जहाजावर इंजिनियर आहे मोट्टा हाफिसर आहे अशा शब्दात कौतुक केले. प्रियाने मावशीला तिच्या शाळेत त्यावेळी शिकणाऱ्या सा रे ग म प लिटिल चॅम्प फेम मुग्धा वैश्यमपायन हिला बघायचेय असं सांगितले. नेमकी मधली सुट्टी झाली असल्याने मावशीने मुग्धाची आणि प्रियाची ओळख करून दिली.
कन्याशाळेतून मावशीची पुन्हा जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कुल मध्ये मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. कोकण एजुकेशन सोसायटी सारख्या मोठ्या शिक्षण संस्थेतील जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सर्वात महत्वाच्या जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कुल मध्ये मावशीची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाल्याने रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात ठाकूर मॅडम हे नाव सर्वपरिचित झाले. अलिबाग मधील कन्याशाळा आणि जनरल अरुणकुमार वैद्य या दोन्हीही शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करणारी माझी मावशी पहिली आणि एकमेव महिला असावी.

मावशीकडे गेल्यावर अगोदर ती डब्यातून काढून लाडू वगैरे खायला देणार. मावशीच्या गावात कोपरला त्यांचे कुरण आहे तिथल्या आंब्यांना एवढा गोडवा आहे की मावशी आपुलकीने आणि मायेने ते आंबे खायला देते म्हणून एवढे गोड लागतात ते कळत नाही. मावशीने दिलेले आंबे जोपर्यंत खायला मिळत नाहीत तोपर्यंत आंब्यांचा सिझन आला असं वाटतच नाही. मावशीने बनवलेल्या अलिबागच्या ताज्या मासळीच्या झणझणीत कालवणाची आणि ताटात थेट तव्यावरून येणाऱ्या खरपूस भाजलेल्या गरमागरम तांदळाच्या भाकरींची सर कुठल्याच जेवणाला येणार नाही.

मावशीत असलेले नेतृत्वगुणांमुळे ती मोठमोठ्या शाळांचा व्याप सांभाळू शकली, तिचे सडेतोड आणि तेवढेच मुद्देसूद संभाषण ऐकलं की समोरचा व्यक्ती निरुत्तर आणि हतबल होतो. विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते व कोकण एजुकेशन सोसायटीचे चे अध्यक्ष adv दत्ता पाटील यांनी मावशीची नेमणूक करताना माझ्या खारेपाटातील मुलीला जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कुल ची जवाबदारी सोपवताना अतिशय आनंद आणि अभिमान होतो आहे अशा शब्दात गौरविले होते.

माझ्या ति. नानांनी तिचे नाव प्रेरणा ठेवले होते. सुखासह दुःखाला सुद्धा तेवढ्याच धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा मला माझ्या मावशीकडूनच मिळते.
अलिबागच्या कितीतरी पिढ्या मावशीच्या वर्गात शिकल्या आणि घडवल्या गेल्या आहेत. माझी मावशी सौ. निला नारायण ठाकूर माझ्या मनाप्रमाणे त्या सर्व पिढ्यांच्या मनात ठाकूर मॅडम म्हणून स्वतःचे वेगळे स्थान नककीच निर्माण करून असेल.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..