नवीन लेखन...

ठाणबंद वाचक-लेखक आणि साहित्य ऑनलाईन

ठाणबंदीच्या काळात लोकांना स्वतच्या जीवनशैलीतील बदलांना सामोरे जावे लागले. यातील सर्वात लक्षणीय बदलांपैकी एक म्हणजे आपण माध्यमांचा वापर कसा करतो आणि विशेषत आपण कसे वाचतो, याकडे पाहिले पाहिजे.
अनघा दिवाळी अंक 2021’ मध्ये प्रकाशित झालेला संतोष शेणई यांचा हा लेख.


एकीकडे स्मार्टफोन, टॅब्लेट आणि ई-रीडर्स आदी उपकरणे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली आहेत. त्यामुळे अनेकांचा अंदाज असा की छापील पुस्तके लवकरच भूतकाळातील गोष्ट बनतील मात्र अजूनही प्रत्यक्षात लोक त्यांचे इलेक्ट्रॉनिक उपकरण अन्य कामांसाठी वापरतात आणि पुस्तके वाचण्याच्या बाबतीत ते शाई आणि कागदावर जास्त अवलंबून असतात.

जग अतिशय गतिमान होतं. वेग आला की, कोणतीही वस्तू आपल्या आसपासापासून अलग होत जाते. ती एकटी होते आणि आणखी गती पकडू पाहते. माणसाचंही असंच झालं होतं. गतिमान आयुष्यात तो आपल्या आसपासापासून अलग होत एकटा झाला होता. अधिकाधिक आत्ममग्न होत होता. या गतीला कोविड-19 मुळे लादून घ्याव्या लागलेल्या ठाणबंदीत या गतीला खीळ बसली. त्यातील व्यर्थताही ध्यानी येऊ लागली. ठाणबंदीने अचानक मिळालेल्या सुटीमुळे ठाणबंदीच्या पहिल्या सत्रात लोक उत्साही होते. ते घरात बसून चित्रपट पाहात होते. मोबाईलवर गेम खेळत होते. नवनवे पदार्थ करून खात होते. फोटोसेशन केली जात होती. व्हिडिओ तयार केले जात होते. पुस्तकांचे वाचन सोडून अन्य गोष्टी करण्यासाठी हा उत्साह खूप होता. मात्र ठाणबंदीची सत्रे वाढू लागताच, हा अचानकच्या सुट्टीतला उत्साह मावळला आणि मंडळी पुस्तकांकडे वळली. सराईत वाचकांचं वाचन या काळात सुरूच होतं, त्यात खंड पडला नव्हता. पण ज्यांचं वाचन मध्यंतरीच्या काळात थांबलं होतं, ती मंडळी पुन्हा वाचनाकडे वळली. या ठाणबंदीचा परिणाम वाचक, प्रकाशक व लेखक यांच्यावर होत गेला.

ठाणबंदीच्या काळात लोकांना स्वतच्या जीवनशैलीतील बदलांना सामोरे जावे लागले. यातील सर्वात लक्षणीय बदलांपैकी एक म्हणजे आपण माध्यमांचा वापर कसा करतो आणि विशेषत आपण कसे वाचतो, याकडे पाहिले पाहिजे. लोकांचा कल काही विशिष्ट पुस्तकांच्या वाचनामधून ताण कमी करण्याकडे असतो. त्यांना मानसिक आराम मिळवायचा असतो.

ठाणबंदीच्या पहिल्या सत्रात लोकांच्या मनावर ताण नव्हता. कोरोनाची भयावहता मनावर पुरेशी ठसली नव्हती. लवकरच सारे सुरळीत होईल, अशी आशा लोकांना होती. नेता सांगतो म्हणून लोक अंधार करून मेणबत्या जाळत होते. टाळ्या, थाळ्या, घंटा वाजवत होते. ‘गो, कोरोना गो’ हा मनोरंजक मंत्र म्हणत होते. व्यवसाय बंद पडण्याची धास्ती नव्हती की, नोकऱया जाण्याची भीती नव्हती, अशा त्या सत्रात उथळ मनोरंजनावर आपला भर होता. यात पुस्तकाला स्थान नव्हते. ठाणबंदीच्या पहिल्या सत्रात मी माझ्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील दहा शहरांमध्ये एक छोटी पाहणी केली होती, त्यावेळी लक्षात आले, 860 पदवीधरांपैकी केवळ सात जणांनी या काळात नवे पुस्तक वाचले होते. हे चित्र बरेच बोलके आहे.

पहिल्या सत्रात वृत्तपत्रेही बंद होती. नंतर वृत्तपत्रांच्या ऑनलाईन आवृत्या मोफत उपलब्ध होऊ लागल्या. त्याचवेळी जुन्या वाचकप्रिय पुस्तकांच्या पीडीएफ ऑनलाईन मिळू लागल्या. लोक अशा पीडीएफचे संग्रह करू लागले. वृत्तपत्रे ऑनलाईन उपलब्ध होत असली तरी ती घरातील स्त्रियांच्या हाती फारशी गेली नाहीत. एरवी घरात येणारे वृत्तपत्र दुपारच्या वेळी स्त्रियांच्या हाती असते. मात्र मोबाईलवरचे ऑनलाईन वृत्तपत्र तिला मिळत नसे. याचा परिणाम वृत्तपत्रे छापणे सुरू झाल्यावर दिसून आला. स्त्रियांना सहा-आठ महिने वृत्तपत्रे न वाचल्याने काही बिघडले नाही, असे वाटू लागले आणि त्यांच्याकडून मागणी होणे बंद झाले. तर पुरूषांना मोफत ऑनलाईन अंक उपलब्ध असताना विकतचे वृत्तपत्र घरात का आणायचे, असे वाटू लागले. याचा परिणाम म्हणून कोविडपूर्व काळातील खप मिळवणे वृत्तपत्रांना अजून शक्य झालेले नाही.

दिल्लीतील एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या स्त्रियांच्या पाहणीत ठाणबंदीच्या काळात मुलांकडून गोष्टी सांगण्याची मागणी घरात होऊ लागल्याचे आढळले. त्यामुळे अनेक जणी जुनी पुस्तके काढून मुलांना गोष्टी सांगू लागलेल्या दिसल्या. मात्र त्यासाठीही नव्या पुस्तकांचा शोध घेण्याची वृत्ती दिसली नाही. तसेच, मुलांना गोष्टी सांगण्यासाठी वाचन करावे लागत असले, तरी त्यांनी स्वतसाठी वेगळे वाचन केलेले आढळले नाही. याच पाहणीत असेही आढळले की, या स्त्रियांना वाचण्यासाठी एकाग्र होण्यात अडचण आली. त्यामुळे त्यांना वाचावेसे वाटले नाही. म्हणजेच कोरोना कालात वाचनाच्या संख्येत व गुणवत्तेत घसरण झाली.

केरळमधील ‘द बुक्स रिडर्स’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीत वाचकांनी पुस्तक निवडीबाबत वेगळा प्रतिसाद दिला. या पाहणीत भाग घेतलेल्या सत्तर टक्के वाचकांना थ्रिलर किंवा क्राइमस्टोरी वाचायला आवडत असे. मात्र कोरोना काळात ते या पुस्तकांपासून दूर राहिले. कोरोनाचे भयसंकट वाढत चालले असताना ही पाहणी करण्यात आली होती. त्यामुळे या दडपणातून सुटका करणारे हलकेफुलके लेखन या काळात या वाचकांनी निवडलेले दिसले. तसेच केरळमध्ये वाचकांचे प्रमाण एरवीच्या तुलनेत पन्नास टक्क्यांवर आलेलेही आढळले. एव्हाना नोकऱया गमावणे सुरू झाले होते. व्यवसाय सुरू होत नसल्याने हाती पैसे येत नव्हते. आजारी पडल्यास अफाट खर्च होत असल्याचे अनुभव येत होते. त्यामुळे या पाहणीतील 38 टक्के लोकांनी पुस्तके न घेण्याचे कारण नोंदवतांना म्हटले की, त्यांना फक्त पैसे वाचवण्याची इच्छा होती.

निल्सन बुक इंडियाने केलेल्या ग्राहक संशोधन अभ्यासात काही आशादायक उत्तरे मिळाली आहेत. या ऑनलाईन पाहणीत 1084 भारतीयांनी भाग घेतला होता. ठाणबंदीच्या दुसऱया सत्रानंतर या वाचकांनी पुस्तके पुन्हा वाचायला सुरूवात केलेली होती. हे वाचक कोरोनापूर्व काळात दर आठवड्याला सरासरी नऊ तास पुस्तके वाचत होते, लॉकडाऊनमुळे हा वेळ आठवड्यात आणखी सात तासांनी वाढला आहे. यात पाचापैकी दोन केवळ छापील पुस्तकेच वाचतात. एक जण छापील पुस्तकाबरोबरच ई-पुस्तकही वाचतो, तर एक जण छापील पुस्तकाबरोबरच ऑडिओबुक ऐकतो. एकजणच असा आहे की, त्याने छापील पुस्तक वाचणे सोडले आहे. तो ई-पुस्तक किंवा ऑडिओबुकच निवडतो. जे वाचक छापील पुस्तक वाचत नाहीत, ते अन्य पर्यायांकडे कोरोनापूर्व काळातच वळले आहेत. इतरांना ठाणबंदी उठल्यावर छापील पुस्तके उपलब्ध व्हायला हवी आहेत. महिला वाचक छापील पुस्तकांवरच खूष आहेत.

जगभरच्या पाहण्या पाहिल्या तर ठाणबंदीच्या काळात जगात वेगवेगळ्या देशात ई-बुकचे प्रमाण वाढलेले असले, तरी एरवी वाचकांना छापील पुस्तकेच हवी आहेत. अगदी 2020 मधील जगभरातील विक्री पाहिली तर,

– 45 टक्के लोकांनी छापील पुस्तक विकत घेतले, त्या तुलनेत 23 टक्के लोकांनी ई-बुक खरेदी केले. या 23 टक्क्यातील 58 टक्के लोकांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात ई-बुक खरेदी केलेले आहे.

– ई-पुस्तकांमध्ये प्रकाशन उद्योगाला पूरक ठरण्याची क्षमता आहे. मात्र छापील पुस्तकांच्या बदली ती जागा घेऊ शकत नाहीत.

– चीनमध्ये ई-पुस्तके सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

– जर्मन लोकांनी छापील पुस्तके विकत घेण्याला अधिक प्राधान्य दिले.

एकीकडे स्मार्टफोन, टॅब्लेट आणि ई-रीडर्स आदी उपकरणे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली आहेत. त्यामुळे अनेकांचा अंदाज असा की, छापील पुस्तके लवकरच भूतकाळातील गोष्ट बनतील. मात्र अजूनही प्रत्यक्षात लोक त्यांचे इलेक्ट्रॉनिक उपकरण अन्य कामांसाठी वापरतात आणि पुस्तके वाचण्याच्या बाबतीत ते शाई आणि कागदावर जास्त अवलंबून असतात.

स्टॅटिस्टा ॲ‍डव्हर्टायझिंग अँड मीडिया आउटलुकच्या आकडेवारी नुसारही, ई-बुक अजूनही छापलेल्या पुस्तकांपेक्षा खूप मागे आहे. उदाहरणार्थ, युनायटेड स्टेट्समध्ये, जेथे ई-पुस्तके तुलनेने खूप लोकप्रिय आहेत, 23 टक्के लोकसंख्येने गेल्या वर्षी ई-बुक खरेदी केल्याचा अंदाज आहे, तर 45 टक्के लोकांनी छापील पुस्तक विकत घेतले आहे.

गुगल ट्रेंड्स डेटानुसार, कोरोनाच्या ठाणबंदीच्या काळात म्हणजे मे 2020 ते मे 2021 या काळात गुगलवरचा पुस्तकांसंबंधीचा शोध त्या आधीच्या वर्षापेक्षा तुलनेने जास्त होते. दिल्ली, कोलकोता वगळले तर महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यातील वाचकांकडून हा शोध प्रामुख्याने घेतला गेलेला दिसतो. इंग्रजी भाषेतील पुस्तकांसाठी सर्वाधिक शोध होता, त्यानंतर हिंदी पुस्तकांमध्ये. सर्वसाधारणपणे, प्रत्येक भाषेतील पुस्तकांसाठी त्या त्या राज्यांमधून शोध घेतला गेला. कादंबऱयांचा शोध तामिळमध्ये सर्वाधिक घेतला गेला. महाराष्ट्रात इतिहास व संस्कृतीवरील पुस्तकांचा शोध सर्वाधिक घेतला गेला. दिल्ली, कोलकोतामधे मानसिक आरोग्य व स्वमदत यासंबंधीची पुस्तके शोधली गेली. ललित पुस्तकात प्रणय व साहस किंवा रहस्य यावर भर होता, तर ललितेतर पुस्तकात चरित्र, आत्मचरित्र, पौराणिक विषय, व्यवसायासंबंधीची पुस्तके पाहिली गेली. मात्र शोध घेतला गेलेल्या पुस्तकांचे खरेदीत रुपांतर तुलनेने कमी झालेले आढळले.

याचा अर्थ असा की, भारतातील वाचक कोरोनाच्या आपत्तीनंतर जे आर्थिक संकट व मानसिक ताण त्याच्यावर आला आहे, त्यामुळे पुस्तकांपासून थोडा दूर गेल्यासारखा वाटतो आहे. मात्र हे चित्र फार काळ नसेल. जरा त्याच्या खिशाला ऊब मिळाली आणि मानसिक ताण कमी झाला की तो पुन्हा छापील पुस्तकाकडे वळेलच.

वाचनवेड असणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहेच, पण ती उत्पन्नाशीही निगडित आहे. श्रम सांख्यिकी ब्यूरोच्या एका सर्वेक्षणात लक्षात आले की, अतिश्रीमंतांनी पुस्तकांच्या खरेदीवर फारसा खर्च केलेला नाही आणि अगदी गरीबांनीही तो केलेला नाही. पुस्तके खरेदी करणाऱयांमध्ये प्राधान्यत मध्यमवर्ग असतो. त्यातही कनिष्ठ मध्यमवर्गातील पुस्तक खरेदीदारांपेक्षा उच्च मध्यमवर्गातील लोकांनी पुस्तकांवर साडेआठ टक्के जास्त रक्कम खर्च केली आहे. महासाथीच्या आधीची ही पाहणी असली तरी मी मुद्दाम दिली आहे. कारण महासाथीमुळे मध्यमवर्गीयांच्याही उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. एकीकडे सेन्सेक्स आश्चर्यकारकरीत्या विक्रमी शिखर गाठून आहे, तर दुसरीकडे बँकांमधील बचत ठेवींमध्ये तीन टक्के घट झाली आहे. बचत मोडून खर्च भागवण्याची वेळ काही कुटुंबावर आली आहे, असा याचा अर्थ आहे. साहजिकच कुटुंबाचे खर्च लक्षात घेता पुस्तकांवर खर्च करणे मध्यमवर्गाला सध्या परवडत नाही. वाचनाची आवड कायम असूनही महासाथीनंतर पुस्तक विक्रीवर परिणाम होण्याचे हे एक मोठे कारण आहे. कदाचित या कारणामुळेच पीडीएफ स्वरूपातील पुस्तके मोफत डाऊनलोड उपलब्ध आहेत का, याचा शोध ठाणबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात घेतला गेलेला गुगल ट्रेंड डेटावरून दिसते.

महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांच्या आणि सार्वजनिक ग्रंथालयांना पुस्तक खरेदीसाठी अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे या ग्रंथालयांचाही आधार पुस्तक विक्रेत्यांना, प्रकाशकांना उरलेला नाही. गेल्या वर्षी शाळा-महाविद्यालये ऑनलाईन सुरू झाली. शाळा दिवाळीपूर्वी सुरू होतील, पण महाविद्यालये कधी सुरू होणार हे अजून ठरलेले नाही. विद्यार्थी येत नसल्याने छापील पुस्तके, पूरक संदर्भपुस्तके महाविद्यालयांनी गेल्या वर्षभरात खरेदीच केलेले नाहीत. काही डिजिटल नियतकालिकांवर या महाविद्यालयांनी खर्च केलेला असेल.

गेल्या वर्षभरात ऑनलाईन पुस्तक विक्रीचा मार्ग अनेकांनी हाताळला. अमेझॉन, फ्लिपकार्ट, बुकगंगा यांच्या मार्फत ऑनलाईन पुस्तक विक्री झालीही. एकट्या अमेझॉनकडून 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 37 टक्के विक्री वाढली होती. पुस्तकाच्या दुकानातून विक्री होण्याच्या तुलनेत ऑनलाईन विक्रीचे प्रमाण कमी असले तरी चक्र सुरू राहण्यासाठी हा मार्ग उपयोगी पडला. दिल्ली, चेन्नई, कोलकोता, केरळ येथील काही पुस्तक विक्रेत्यांनी आधुनिक माध्यमांचा व ऑनलाईन सेवेचा उपयोग करून घेतलेला दिसतो. दिल्लीच्या ‘मिडलँड’ने ‘डन्झो’सोबत, तर केरळमधील ‘डीसी बुक्स’ या दुकानाने ‘स्विगी’ सोबत करार करून वाचकांपर्यंत पुस्तके नेली. दिल्लीच्या खान मार्केटमधील ‘बाहरी सन्स’ या पुस्तक विक्रेत्यांने आणि राजकमल प्रकाशनाने सोशल मीडियावरून ग्राहकांशी संपर्क साधला. ग्राहकांच्या मागणीनंतर कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय संपूर्ण भारतभर पुस्तके वितरीत केली. बंगळुरूमधील चंपाका बुक स्टोअरने त्यांच्या वेबसाइटवरून ग्राहकांना गिफ्ट व्हाउचर विकत घेण्याचे आवाहन केले. दहा टक्के सवलत व वर्षभरात कधीही स्टोअरला भेट देऊन त्या व्हाउचरवर पुस्तके घेण्यास परवानगी देण्यात आली. या धडपडीची दखल घ्यायला हवी.

पुस्तकांची विक्री व्यवस्था थोडी फार सुरू होती. प्रकाशनांची संपादकीय कामेही सुरू होती. मात्र पुस्तक निर्मिती थंडावली होती. कारण पुस्तकांच्या मुद्रणाचा प्रश्न एकीकडे होता, तर दुसरीकडे मार्केटिंगचाही प्रश्न होता. त्यामुळे या काळात नवीन पुस्तके आली नाहीत. ती प्रकाशित होण्याची वाट पाहात प्रकाशकांच्या कार्यालयात तयार होऊन राहिली. मुद्रकांचे काम सुरू झाल्यावर किंवा प्रिंटिंग ऑन डिमांडची सुविधा उपलब्ध झाल्यावर नवीन पुस्तके बाजारात येऊ लागली.

पुस्तके बाजारात येतील, पुस्तकांची दुकानेही आता खुली झाली आहेत, आता पुन्हा एकदा वाचकाला दुकानांकडे वळवायला हवे. ग्रंथालये सुरू झाली, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले की वाचक पुन्हा दुकानांकडे वळू लागतील. पुढच्या सहा महिन्यात पुस्तकपेठ बहरेल असा विश्वास अनेकांना वाटतो आहे.

महासाथीने ठाणबंदी केलेली असताना कवी, लेखक कुठे, काय करीत होते, असा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न रास्त आहे. आपण कवी, लेखकांवर विश्वास ठेवायला हवा. आतापर्यंत जगभरातच जेव्हा एखादी मोठी आपत्ती आली तेव्हा तेव्हा कवी-लेखकांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. याआधी मोठ्या आपत्तीनंतर जगभरात काही कथा, कविता, कादंबऱया लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोरोना महासाथीलाही कवी-लेखक शब्दबद्ध करतीलच. काहीजण फेसबुकद्वारे तत्काळ व्यक्त झालेही.

फेसबुकने ऑगस्ट, 2015मध्ये आपल्या काही हाय प्रोफाइल उपभोक्त्यांसाठी ‘लाइव्ह’ची सुविधा दिली. मार्क झुकेरबर्ग यांच्या या संकल्पनेची चंगळवादी चोचले म्हणून संभावना केली गेली होती. मात्र तरी त्याने प्रत्येकाच्या खिशात टीव्ही कॅमेऱयासारखी वस्तू असावी, हे स्वप्न पाहिले. सुमारे शंभर तंत्रज्ञांनी काही महिने झटून यश मिळवले. एप्रिल 2016 पासून ही सुविधा सर्वांसाठी खुली झाली. जगभरात कोरोना काळात हेच तंत्रज्ञान रचनात्मक पातळीपासून इतर सगळ्याच क्षेत्रात उपयोगी असल्याचे सिद्ध झाले.

ठाणबंदीच्या काळात या ‘लाइव्ह’ घडामोडींनी जगातील सगळ्यांच्याच जगण्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप केलेला होता. या काळात सांस्कृतिक घडामोडी सुरू ठेवण्यासाठी कलाकार, साहित्यिक, रंगकर्मी, लोककलावंत अशा सगळ्या घटकांनी नवीन सृजनासाठी या माध्यमाचा उपयोग केलेला दिसतो. घरात डांबले गेल्यानंतर दुसऱया टप्प्यापासूनच निरसता निर्माण झाली होती. त्यातून सुटका करून घेण्यासाठी हे माध्यम वापरले गेले. एक खरे आहे की, आपल्याकडे हे माध्यम हाताळताना नेहमीप्रमाणे दूरदृष्टीचा अभाव होता. कवींनी या माध्यमातून कविसंमेलने रंगवली. मुख्य प्रवाहाने दुर्लक्षित केलेल्या अनेक लहान लहान गटांनी आपल्या विविधांगी कार्यक्रमांतून चर्चासत्रे घडवून आणली. त्यात अस्ताव्यस्तपण होते, पण ठाणबंदीच्या काळात घरभिंती पलीकडे आभासी डोकावण्याची ती संधी अनेकांनी साधली. त्या एकांतवासात तुटलेपण वाढत जाण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच अनेकांनी रचनात्मक कामात स्वतला गुंतवून घेतले. यात कवी-लेखक आघाडीवर राहिले.

इंडिया विरूद्ध भारत हा वाद येथेही होता. भौगोलिक विषमतेमुळे अनेक खेड्यामध्ये इंटरनेट नाही. त्यामुळे या ग्रामीण भागातील नागरिकांना सांस्कृतिक घडामोडींपासून दूर राहावे लागले ही वस्तुस्थिती आहे. मात्र डिजिटल मंचावर अभिजन व बहुजन हा वाद निर्माण झाला नाही. एरवी सांस्कृतिक मंच अभिजनांच्या ताब्यात असतात. यावेळी मात्र जो वापरू इच्छित असेल त्याचा सांस्कृतिक मंच असे घडले. स्वाभाविकच अभिजनांचे एक हाती असलेले सांस्कृतिक वर्चस्व या मंचावर उरले नाही.

महाराष्ट्रातील ग्रामीण भाग व शहरी भाग यांची तुलना करता, 2019 पूर्वी डिजिटल विषमता ग्रामीण भागात होती. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार ग्रामीण भागात केवळ 3.3 टक्के घरात संगणक आणि 18 टक्के घरात इंटरनेट सुविधा आहेत. शहरात हे प्रमाण अनुक्रमे 27 आणि 52 टक्के असे आहे. पण कोरोनाने ही विषमता कमी करायला भाग पाडले. त्यातून सोशल मीडिआ काही प्रमाणात ‘नाही रे’ समूहाकडे आला. त्यावर नीट व्यक्त होत मोठ्या समूहाला निराशेच्या गर्तेपासून वाचवले. काव्यवाचन, कथाकथन, प्रकाशने, गाण्यांच्या मैफली, परिसंवाद, नृत्यधारा आदि कार्यक्रम डिजिटल मंचावर झाली. छोटी साहित्य संमेलनेही ऑनलाईन झाली. हा प्रामुख्याने समुहासाठी आविष्कार झाला. लेखक-कवी आणखी कशाप्रकारे प्रतिसाद देऊ शकतो?

वास्तविक, आपण जे वाचतो ते आपल्या आजूबाजूला कुठेतरी घडत असते. हे लेखाच्या स्वरूपात, वार्तालेखांच्या स्वरूपात किंवा कथात्मक स्वरूपात देखील असू शकते. पण त्या लिखाणाच्या मुळाशी कुठेतरी आजच्या युगाच्या शोकांतिका, सामान्य लोकांचा आक्रोश, सरकारी अनागोंदी, राजकारणाचे घृणास्पद खेळ आणि खाजगी जीवनातील त्रास असतात. असहायता असते, भीती असते, साथीचे संकट असते आणि रोजच्या अडचणी त्याच्याशी संबंधित असू शकतात. पण तुम्ही ही शोकांतिका दीर्घकाळ वाचू शकता का? आपण याच्याशी संबंधित कविता, विणलेल्या कथा सतत लिहू शकता का? तुम्ही सोशल मीडियावर सतत मृत्यूच्या बातम्या वाचू शकता? अशा प्रकारची सतत माहिती तुमच्यामध्ये भीती आणि जीवनाबद्दल खोल निराशा निर्माण करते. वाचक हा एका अर्थी पलायनवादी असतो. तो जगण्यातील भयापासून, दुःखापासून पळ काढण्यासाठी वाचत असतो. त्यामुळे महासाथीच्या दिवसात तो महासाथीच्याच दुःखाचे वर्णन वाचू शकणार नव्हता.

या काळातही काहींनी लेखन केलेही. मराठीतही काही पुस्तके त्याही काळात प्रसिद्ध केली गेली. तुम्ही पाहिले असेल की, ठाणबंदीच्या दुसऱया व तिसऱया टप्प्यात अनेकांनी स्थलांतरित मजुरांच्या दुःखाचे वर्णन करणाऱया कविता फेसबुकवर टाकल्या होत्या. घरबंदीतील गंमतींचे विनोदात्मक लेखन फेसबुकवर प्रसिद्ध केले होते. ठाणबंदीचा तिसरा टप्पा येईपर्यंत मोदींच्या कोरोनाविषयक निर्णयांचे समर्थन करणारी पुस्तके तयार झाली. ठाणबंदीच्या चौथ्या टप्प्यात काही रिपोर्ताज पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाले. त्यात स्थलांतरित मजुरांचे दुःख होते. ठाणबंदीच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दुष्परिणामांचे विश्लेषण होते. जगभरातील कोरोना आपत्तीचे वर्णन करणारी व चीनकडे गुन्हेगार म्हणून बोट दाखवणारी पुस्तकेही या काळात तयार झाली. या चारही टप्प्यात व अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात काही कथा व काही कादंबऱया निर्माण झाल्या. रिपोर्ताज हे तातडीने लिहिले जाणे समजता येत होते. तो तसाच प्रतिसाद असायला हवा होता. पण कथा-कादंबरीही? अशा लेखनाला परिस्थितीचे सम्यक आकलन, चिंतन आवश्यक असते. ज्या कथा तयार झाल्या त्यांचे विश्लेषण केले तर लक्षात येईल की, कथाबीज लेखकांकडे आधीच होते, कोरोनाच्या पटावर त्या लिहिल्या गेल्या एवढेच. त्यामुळे त्या महासाथीच्या संकटाचे विश्लेषण करणाऱया ठरू शकल्या नाहीत. कादंबऱयांना तर कादंबरीचा घाटच नव्हता. देशोदेशीच्या रिपोर्ताजच्या पार्श्वभूमीवर काहीतरी कहाणी ऐकवण्याचा तो प्रकार होता. पण महासाथीच्या पार्श्वभूमीवर ही पुस्तके तातडीने लिहिली गेली हे मला महत्त्वाचे वाटते. हा प्रतिसाद मोलाचा वाटतो.

अशा परिस्थितीत सर्जनशील व्यक्तीने काय करायला हवे? संवेदनशील मनाच्या लेखक, कवी किंवा पत्रकाराने काय करायला हवे? त्यावेळची परिस्थिती आठवा. जग निरुपाय झाल्यासारखे निरुपयोगी होऊन बसले आहे, सर्वकाही निरर्थक असावे असे येथील लोकांना वाटते आहे, हा काळ असा की लिहिणे आणि वाचणे सर्व व्यर्थ आहे, आपण लिहिल्यानंतर त्याचे काय करू, आपण कोणासाठी लिहू, कोण अभ्यास करेल? या महासाथीच्या तडाख्यात सापडलेल्या जीवनाचा अर्थ काय आहे? अशी निराशा आणि अशी विचारसरणी दिवसेंदिवस वाढत होती, यात शंका नाही, पण असा विचार करणे योग्य असते का? जगाला आशेचा दीप दाखवणाऱया सर्जनशील व्यक्तीने तरी याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यायला हवे. या आधीच्या आपत्तींनंतरही चिंतनाच्या पातळीवर खूप महत्त्वाच्या कथा-कादंबऱया रचल्या गेल्या होत्या. या महासाथीवरही लेखक अजून चिंतन करील. काहींनी तत्काळ प्रतिसाद दिला, इतर चिंतन करून ते मांडतील.

या आधीचा एक प्रसंग आठवा. जेव्हा भोपाळ वायू दुर्घटना घडली आणि हजारो लोक त्याला बळी पडले, त्यानंतर काही दिवसांनी भोपाळलाच दरवर्षीसारखा भारत भवनात काव्य महोत्सव आयोजिण्यात आला होता. त्यावेळी दुर्घटनेनंतर असा काव्यमहोत्सव आयोजित करणे कितपत आवश्यक आहे, असे विचारण्यात आले होते. काव्य महोत्सवाचे आयोजक आणि कवी-प्रशासक अशोक बाजपेयी यांचे तेव्हांचे विधान आठवा – ‘मरणाऱयांसोबत कोणीही मरत नाही’ हे विधान होते.
अशोक वाजपेयी यांच्यावर त्यावेळी खूप टीका करण्यात आली. एक लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या मोठ्या आपत्तीत इतरांच्या सुरात सूर न मिसळता बोलाल, काही काम कराल तर तुम्ही टीकेचे बळीही व्हाल. काही गट तुमच्या विरोधातही उभे ठाकतील. अशोक वाजपेयी यांच्या विधानाचा अर्थ असा होता की, शोकांतिका घडतात, समाजात अपघात घडतात, पण साहित्य किंवा सर्जनशीलता अबाधित राहते.

नक्कीच, त्या घटना किंवा शोकांतिका तुमच्या कलेत, तुमच्या लेखनातून व्यक्त होऊ शकतात. एक सर्जनशील आणि संवेदनशील व्यक्ती गप्प नाही राहू शकत. एक खरे की, भोपाळ वायू शोकांतिका आणि कोरोनासारख्या जागतिक महासाथीमध्ये फरक आहे. भोपाळ वायू दुर्घटना ही बहुराष्ट्रीय कंपन्यांचा निष्काळजीपणा आणि अमानवी वृत्तीचा परिणाम होता. त्याचे परिणाम त्या ठिकाणच्या लोकांना वर्षानुवर्षे सहन करावे लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो अपघात एका विशिष्ट क्षेत्रापुरता सीमित होता. काही हजार माणसांपुरता मर्यादित होता. कोरोना महासाथ ही आतापर्यंतच्या सर्व साथींमध्ये इतकी मोठी शोकांतिका आहे की त्याच्या शारीरिक परिणामांबरोबरच मानसिक परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अशी भीती आणि अशी अनिश्चितता ज्याने तुम्हाला गाभ्यातून हलवले आहे. प्रत्येकाला स्वतची काळजी करायला भाग पाडले आहे.

कुटुंब, मित्र, परिचित, नातेवाईक किंवा कोणीही आता आपले नाही. प्रत्येकजण काळजीत आहे, पण त्या सर्वांना खूप सक्ती आहे. साहजिकच प्रत्येकाला आपले आयुष्य आवडते आणि आता शब्दांचा अर्थही पोकळ झाला आहे. काळ बदलला आहे. पूर्वी सोशल मीडिया नव्हता, इतक्या टीव्ही वाहिन्या नव्हत्या, त्यामुळे जास्त दहशत आणि अफवा नव्हत्या. बातम्यांचे आणि माहितीचे इतके मोठे जाळे नव्हते. आता तुमच्याकडे मागच्या मिनिटापर्यंतची खरी किंवा खोटी बातमी आहे. सरकारी अनियमितता आहेत. व्यवस्थेची लाचारी, असहायता आणि निराशेने भरलेले एक अतिशय धोकादायक जग समोर आहे. अशावेळी लेखक-कवीने हातावर हात ठेवून बसावे का? नाही, साहित्यिक गप्प बसला नाही. याआधी नमूद केल्याप्रमाणे, कोरोना काळात बरेच साहित्य तयार झाले. शेकडो कविता आणि कथा लिहिल्या गेल्या. ऑनलाईन चर्चा झाली आणि कोरोना प्रत्येकाच्या केंद्रस्थानी होता. कोरोना कालावधीवर पुस्तके लिहिली गेली, मजुरांचे स्थलांतर हा देखील एक विषय होता. लेखक-साहित्यिक स्वतला व्यक्त करत राहिला. आपत्तीमध्ये संधी शोधत राहिला. पण आता तो थकला आहे. त्याला असेही वाटते की, एकच गोष्ट किती वेळा आणि का लिहिली पाहिजे. वाचक देखील कंटाळला आहे आणि काहीतरी वेगळे हवे आहे. असे काहीतरी लिहिणे जे जीवनाशी संवाद साधते, जे तुम्हाला निराशेच्या या खड्ड्यातून कुठेतरी बाहेर काढेल.

कठीण काळात आव्हानेही अधिक असतात. कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर तर जवळजवळ प्रत्येक कुटुंबाभोवती अनेक दुःखद घटना आहेत. अनेक प्रियजनांना गमावल्याच्या वेदनादेखील आहेत. पण आपल्याला या संकटावर मात करायची आहे. आपली आंतरिक शक्ती जागृत करायची आहे. आपल्या सुंदर जगाच्या भावना जागृत करायच्या आहेत. मुख्य म्हणजे असे समजू नका की आता तेथे काहीही नाही. आजही प्रेम आहे, सौंदर्य आहे, निसर्ग आहे, भावना आहेत, संपूर्ण पृथ्वी आहे आणि सर्वकाही पूर्वीसारखे आहे. तुम्हाला फक्त या निराशेतून पुन्हा बाहेर पडावे लागेल. काही चांगली रचना तयार करण्यासाठी, काही चांगली चित्रे बनवण्यासाठी, चांगल्या आणि आशावादी कविता आणि कथा लिहायला, चांगले संगीत ऐकायला बाहेर पडावे लागेल.

घटना घडत राहतात, बातम्यांचे जग आपल्या वेगाने पुढे जात राहते, सोशल मीडिया चांगल्या आणि वाईट माहितीने भरलेला असतो. अनेक प्रियजनांना, अनेक ओळखींना सोडून जाण्याची प्रक्रिया निसंशयपणे मनाला मोठ्या प्रमाणात दुखवते, पण आम्ही-तुम्ही असहाय्य आहोत. व्यवस्था, सरकार आणि परिस्थितीला शिव्याशाप देऊ शकतो आणि दुसरे काही करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, एका चांगल्या उद्याची कल्पना जिवंत ठेवणे हा साहित्यिकाचा धर्म आहे. आपल्याला या निराशेतून बाहेर पडावे लागेल आणि आशेने भरलेले सुंदर जग निर्माण करावे लागेल.

त्यासाठी आधी या शोकांतिकेबद्दल रडणे थांबवावे लागेल. सावधगिरी आणि सुरक्षिततेच्या दरम्यान, आपल्याला एक सकारात्मक संगीत, उर्जा भरलेली कविता आणि आशेने भरलेली कथा तयार करावी लागेल. आपण प्रयत्न केला पाहिजे की आपणही या परिस्थितीतून बाहेर पडू आणि आपले सहकारी, आपले वाचक आणि श्रोते यांनाही बाहेर काढू. महासाथ आली आहे आणि ती जाईल, पण जग सुंदर आहे आणि नेहमीच राहील.

— संतोष शेणई.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..