नवीन लेखन...

थंडी ही गुलाबी….

हिवाळा हा सर्वांचा आवडता ऋतू आहे. महाराष्ट्रातील हिवाळा हा उत्तर भारतातील थंडी पेक्षा खूपच सुसह्य व गुलाबी म्हणण्या इतपत आनंददायी असतो. या दिवसात ना पावसाची पिरपिर ना उन्हाच्या झळा. थंडीमुळे जठराग्नी प्रज्वलित असतो त्यामुळे खूप भूक लागते. त्यामुळे जर तुमचा आहार प्रथिन, स्निग्ध व मेदयुक्त असेल तर तुमचे कमी असलेले वजन व प्रतिकारशक्तीची वर्षभरा करता बेगमी करता येते. या काळात स्निग्ध पदार्थांशी बिनधास्त दोस्ती करता येते. त्याबरोबर तुम्ही त्यास व्यायामाची जोड दिली तर सोन्यावर सुहागा.

सद्द्य परिस्थितीत आरोग्याच्या रक्षणार्थ हेतू आयुर्वेद शास्त्राच्या आचरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आयुर्वेद हे एकमेव असे शास्त्र व शस्त्र आहे ज्यामध्ये रोगाच्या चिकित्सेबरोबर निरोगी आयुष्य कसे जगावे याचे यथार्थ ज्ञान दिले आहे

शेवटी ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायानुसार बाह्य जगतात जे जे बदल होत असतात त्यानुसार आपल्या शरीरातही सतत बदल होत असतात. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रात आरोग्य रक्षणासाठी ऋतुचर्या सांगितली आहे.

‘सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धिकारणम्” या आयुर्वेदाच्या प्रमुख सिद्धान्ताचा विचार करूनच ऋतुचर्येचा आणि व आहाराचा विचार केला आहे.

आता हे खानपाना (आहार) द्वारा आपल्याला प्राप्त कसे करता येईल ते पाहू.

हिवाळ्यात देहाला अतिरिक्त उष्मांकाची गरज असते ही गरज लक्षात ठेवून आहाराचे नियोजन करायला हवे, त्यातून मिळणारी अतिरिक्त उष्माकांची गरजही पूर्ण होते, आणि अतिरिक्त पोषणमूल्येही मिळतात. रोजच्या वापरातील हे अन्नघटकाचे प्रमाण या ऋतूमध्ये वाढवायला हवे. हिवाळ्यात प्यायचे पाणी गरम वा कोमट असणे उत्तम होय. जेवताना गरम पाणी पिण्याने अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. तसेच एरवीसुद्धा गरम पाणी पिण्याने ऊब मिळण्यास मदत मिळते. दूध, लोणी, ताक, तूप हे रोजच्या खाण्यात असावेत, असे पदार्थ हिवाळ्यातही खाण्यास उत्तम असतात.

या दिवसांममध्ये शरीराला उष्माक मिळण्यासाठी काही ठराविक अन्नघटकांची गरज असते. हे अन्नपदार्थ या ऋतूमध्ये जाणीवपूर्वक बनवायला हवेत. आहारामध्ये मसाल्याच्या पदार्थांचा वापर वाढवायला हवा. मसाल्याचे पदार्थ उत्तम असतात. हळद, आले, हिंग, लसूण, मोहरी, मिरची, कोथिंबीर, मेथ्या, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मसाल्याचे पदार्थ हिवाळ्यात वापरणे उत्तम असते.
नेहमीच्या धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी यांचे सेवन करता येतेच; मात्र, हिवाळ्यात साध्या भाताऐवजी मसालेभात, फोडणीची खिचडी यांचे प्रमाण वाढवता येते. गव्हाच्या पिठात तिखट, मीठ, हळद वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून ठेपले बनवता येतात. ज्वारी-बाजरीची मिश्र भाकरी रुचकर लागते व अधिक चांगल्या प्रकारे पचते.

ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप खाणे, जेवणात तिळाची चटणी, लसणाची चटणी, ओली हळद-आंबेहळद यांच्यापासून बनविलेले लोणचे यांचा समावेश असणे, तिळाची चिक्की खाणे, सकाळी सुंठ-गूळ-तुपाची गोळी खाणे, रोज डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू वा अळिवाचा लाडू खाणे, जेवणानंतर ओवा-तीळ-बाळंतशोपा वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाणे, जेवणानंतर त्रयोदशगुणी विडा खाणे वगैरे साध्या उपायांनीही हिवाळ्यात उष्मांक मिळण्यास खूप चांगली मदत मिळते.

हिवाळ्यामध्ये पचनशक्ती उत्तम असताना हे पदार्थ खाताही येतात. प्रकृतीचा विचार करून यांचे प्रमाण ठरवावे लागते.

हिवाळ्यात काय खावे?

तसेच अक्रोड, खारीक, बेदाणे, खोबरे, गूळ शेंगदाणे अशा प्रथिनांचे सेवन आपल्या प्रकृतीनुसार हिवाळ्यात वाढवावे. मांसाहारात अंडे चिकन यांचेही प्रमाण वाढवू शकतात. या ऋतुत हिरव्या पालेभाज्या गाजर आवळा इ. आहार शास्त्राला धरून आहे.
हिवाळ्यात कोणते अन्न चांगले आहे?

तुमच्या शरीरासाठी सर्वात जास्त उष्णता देणाऱ्या भाज्या म्हणजे गाजर, बटाटा, कांदे, लसूण, मुळा, रताळे, रताळे, बीट्स, सलगम इत्यादी भाज्या आणि पालक, मेथी, सरसों, मुळी, पुदीना यासारख्या हिवाळ्यातील हिरव्या भाज्या.
हिवाळ्यात आहारात कोणते बदल केले जातात?

हिवाळ्याच्या मोसमात, आपले शरीर उबदार आणि पोषण दोन्ही प्रदान करणारे समृद्ध अन्न शोधते. ही गरज पूर्ण करण्यासाठी उबदार आणी ताजे जेवण आवश्यक असते. उबदार पदार्थांमध्ये सुकामेवा (खजूर), आणि तेलबिया (तीळ) यांचा समावेश होतो.

हिवाळ्यात कोणती फळे टाळावीत?

हिवाळ्यात, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, पीच आणि ब्लूबेरी यांसारखी फळे टाळण्याचा प्रयत्न करा कारण ती हंगामी नसतात आणि कदाचित तुमच्या स्वयंपाकघरातील टेबलावर पोहोचण्यापूर्वी दीर्घ कालावधीसाठी जतन केलेली असतात.

हिवाळ्यात आजारांपासून दूर रहायचे असेल तर ‘या’ सुपरफूड्सचा आहारात करा समावेश

हिवाळ्याच्या दिवसात आपली तब्येत खराब होण्याचा धोका सर्वाधिक असतो. पण आहार योग्य असेल तर चिंता करण्याची गरज नाही.
थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. हवामानात होणाऱ्या बदलांसोबतच आपल्या आहारातही बदल होत असतात. हिवाळ्यात अशा काही पदार्थाचा आहारात समावेश केला जातो, जे खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊब मिळते. एखादी छोटीशी चूकही झाली तर सर्दी, खोकला, ताप यासारखे अनेक आजार होऊ शकतात. पण जर आपला आहार चांगला व योग्य असेल तर या आजारांना घाबरण्याची काही गरज नाही. हिवाळ्याच्या दिवसांत पोषक तत्व असलेला आहार घेण्याची शिफारस केली जाते. एकच प्रकारचा आहारविहार सर्व ऋतूंमध्ये लागू पडत नाही म्हणून बदल आवश्यकच असतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हिवाळ्याच्या दिवसात आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत.

त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

हिरव्या पालेभाज्या:

हिवाळ्याच्या दिवसात हिरव्या भाज्या विशेषत: पालेभाज्यांचे उत्पादन भरपूर होते. अशा वेळी आहारात पालक, मेथी, मोहरी, पुदिना आणि विशेषतः हिरवा लसूण यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमुळे शरीराची उष्णता लगेच वाढते, जी थंडीच्या दिवसांसाठी अतिशय योग्य आहे. हिवाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या या लोकप्रिय भाज्या आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

देशी तूप

घरी कढवलेले किंवा बाहेरून आणलेले शुद्ध देशी तूप आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. अन्न तुपात शिजवावे किंवा भात, वरण, पोळीवर विशेषतः गूळपोळीवर तूप लावून त्याचे सेवन करावे. तूप हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि चांगल्या फॅट्सचा (मेदाचा) एक अमूल्य स्रोत आहे. हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची पातळी सुधारण्यासाठी तूप हा एक सोपा मार्ग आहे.

हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या या निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. गाजर हेही त्यापैकीच एक आहे.

सुका मेवा:
आहारात काजूचा समावेश करा काजूमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक (जस्त) अशी अनेक खनिजे असतात. हिवाळ्याच्या दिवसांत शेंगदाणे, बदाम, काजू, पिस्ता आणि खजूर यांचे सेवन करणेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हिरव्या पालेभाज्या व सुका मेवा हा मधुमेही लोकांना उपयुक्त आहे कारण याचा ग्लायसिमीक इंडेक्स हा जवळपास शून्य असतो. त्यामुळे रक्तशर्करा वाढण्याचा धोका नसतो.

आहारामध्ये अख्खे कडधान्य, दलिया इत्यादी पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. हे पदार्थ आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक असतात.

हिवाळा आणि आरोग्य:
हिवाळ्यात सर्व सामान्य नागरिकांनी घ्यावयाची काळजी:

या हिवाळ्याच्या सुरवातीच्या काळातच आरोग्यास फार जपावे लागते. पूर्वीच्या ऋतुमानातील वातावरणाचे शरीरास थोडीफार सवय झालेली असते. अशावेळी वातावरणात होणार्या बदलाचा परिणाम शरीरावर फार चटकन होत असतो. याचवेळी आहार- विहारावर फारच नियंत्रण ठेवावे लागते. असे असले तरी त्यामुळे आहार-विहारातील बदल हा अचानक कधीच करू नये. जर क्रमाक्रमाने हा बदल घडवून आणला तरच आरोग्य टिकून राहते. अन्यथा त्यामुळे विविध रोग होण्याचीच अधिक शक्यता असते.

दरम्यान, हिवाळ्यात त्वचेशी संबंधित विकार मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी तेल किंवा बॉडी लोशनचा उपयोग करावा. हिवाळ्यात ऊन कमी असते. त्यामुळे उन्हात बसायला हवे. त्याने हाडांना पोषण मिळते. थंड पाण्यात काम करणे टाळा. पायात कायम घरात वापरायच्या चपला घाला. शक्यतो आठवड्यातून एकदा तेलाने मसाज करावा.

हिवाळ्यात सर्दी, पडसे, खोकला असे छोटे सांसर्गिक रोग होतात. मात्र हिवाळ्यात आपले आरोग्य बिघडण्याचाही धोका असतो. लहान मुलांना हिवाळ्यात सर्दीचा त्रास हमखास होतो. त्यावर महत्वाचा उपचार म्हणजे बाळाच्या छातीवर दिवसातून दोन तीनदा वेखंड चूर्ण चोळावे. योग्य ती काळजी घेतली तर वरील विकार बळावत नाहीत. मिठाच्या गुळण्या, काढा व वाफ या उपायांनी याला पळवून लावता येते. शक्यतो ऍलोपॅथिक औषधे जसे की जीवरक्षक (एन्टीबीओटीक्स ), सिरप घेणे टाळावे.

हिवाळ्यात वरिष्ठ नागरिकांनी घ्यावयाची काळजी:

चहा आणि कॉफीचे मर्यादित सेवन करावं. हर्बल टीमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइडची पातळी देखील कमी होण्यास मदत मिळते. पण कोणत्या हर्बल टीचा आहारात समावेश करावा, याबाबत आपल्या आहारतज्ज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
चालण्याच्या व्यायामामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि यामुळे रक्तप्रवाह देखील वाढतो. तसंच हिवाळ्यात रक्तातील शर्करा आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहणं आवश्यक आहे. या ऋतूमध्ये आहारात कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे. अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करणं हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते.

वयस्कर नागरिकांनी नेहमी प्रमाणे पहाटे फिरावयास न जाता ऊन वर आले की जावे. दमा, हृदयविकार, रक्तदाब व संधिवात असणाऱ्या वरिष्ठ नागरिकांनी तर फार सजग राहावयास पाहिजे. असे म्हणतात की ह्या दिवसात दमा दमेकऱ्यांना दम घेऊ देत नाही व संधिवात रुग्णांना आराम पडू देण्याची संधी देत नाही. हिवाळ्यात संधिवात व हाडांचे विकार खूप त्रास देतात. त्यासाठी वैद्य लोक आजारानुसार वेगवेगळ्या प्रकारांनी सिद्ध केलेल्या तेलांची शिफारीश करतात. त्याचा अवश्य वापर करावा. रात्री झोपण्यापूवी दोन्ही पाय गरम पाण्यात ठेवावे व नंतर तिळाच्या तेलाने मालिश करून झोपावे.

हिवाळ्यात वारा नसल्यामुले धुलीकण व परागकण यांचे चलन वलन होत नाही. त्यामुळे श्वासोच्छ्वासाच्या क्रिये मुळे हे कण फुफुसात जाऊन ॲलर्जी होते. त्यामुळे लहान मुलांना व वयस्कर लोकांना श्वसनाचे ऊद्भवतात. त्यासाठी त्यांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे.
या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करावी. मात्र, अतिगरम पाणी टाळावे.

थंडीत तापमान खूप खाली असल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात त्यामुळे रक्त दाब वाढतो व पर्यायाने हृदयावर ताण येतो. यासाठी या सर्व वरिष्ठ नागरिकांनी आपले शरीर कायम उष्ण राहील यासाठी गरम पाणी, स्वेटर, मफलर कानटोपी इत्यादींचा वापर केला पाहिजे.

तळपायाच्या भेगा:

हिवाळ्यात अनेकांच्या हातापायांच्या तळव्यांना भेगा पडतात. काही वेळेस या भेगा एवढं उग्ररुप धारण करतात की भेगांतून रक्तही येतं आणि वेदना असह्य होतात. थंडीमध्ये शरिरात रुक्षता म्हणजेच कोरडेपणा येतो आणि हातापायाच्या तळव्यांवरील त्वचा फाटते. हातापायांच्या तळव्यांना भेगा पडण्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारात साजूक तुपाचा समावेश करावा. तसेच आमसुलाचे तेल किंवा कोकमचे मेण लावावे. आहारात दूध, तुपासारखे स्निग्ध पदार्थ वाढवावेत रात्री झोपताना भेगांना साजूक तूप लावावे. चंदन, लाख, ज्येष्ठमध त्याचप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध औषधी तेल भेगांवर लावावीत. ज्येष्ठमध साजूक तुपात टाकून प्यायल्याने ही भेगांचा त्रास कमी होण्यास मदत होते.

अशा तऱ्हेने काळजी घेतल्यास हिवाळ्याचा तुम्हास पुरेपूर आनंद घेता येईल.

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
०१/०१/२०२४

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 81 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on थंडी ही गुलाबी….

  1. Nice informative article written in simple language so that
    everyone can understand and follow the food tips to remain healthy & fit. ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..