ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला सदाशिव टेटविलकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.
आशिया खंडातील आधुनिक शहर म्हणून आज ठाण्याचे नाव सर्वतोमुखी झाले आहे, ठाणे हे मूळचे आदिवासींचे गाव होते. माजिवड्याची ‘चांगाई’, कोलशेतची ‘वाघजाई’, कोळीवाड्याची “एकविरा मुंबादेवी’, कोकणीपाड्याची ‘पालायदेवी’, वाघबीळची ‘महाई’ ओवळ्याची ‘चामुंडा’ तसेच कासारवडवली, बाळकुम, खोपट आदी भागातील बहुतेक ग्रामदेवता या आदिवासींच्या पूजनीय देवता आहेत, यात भायंदरपाड्याचा आदिवासींचा काष्ठ शिल्पातील ‘पोषमात्रा’ हा पुरातन देवही आहे.
आजचे ठाणे म्हणजे प्राचीन काळात ओळखले जाणारे ‘स्थानकीय पत्तन’ होय. पत्तन म्हणजे बंदर. ठाण्याच्या पूर्वेकडून समुद्राला मिळणाऱ्या दक्षिणोत्तर खाडीने वादळीवाऱ्यांपासून व समुद्री चाच्यांपासून प्रवासी व व्यापारी जहाजे सुरक्षित राहतील असा निसर्गतःच तिठा किंवा स्थान, ठाण्याजवळ केल्यामुळे; ठाण्याच्या खाडीकिनारी चेंदणी, महागिरी, घोडबंदर ही प्राचीन बंदरे उदयास आली. सहाव्या शतकात ठाणे बंदर अतिशय भरभराटीला आले होते. परिणामी ठाणे बंदराच्या समृद्धीची कीर्ती ऐकून इ.स. ६३७ साली अरब चाच्यांनी ठाणेबंदर व गाव लुटल्याची नोंद मिळते.
शिलाहार व बिंब राजवटीत ठाण्यात साठ मंदिरे व साठ तलाव बांधण्यात आले होते. पण पोर्तुगीजांनी ही सर्व मंदिरे जमीनदोस्त केली. आज इमारतीचा पाया खोदताना या मंदिरांचे अवशेष, कोरीव स्तंभ, वा मूर्तीच्या स्वरूपात पहावयास मिळतात. तलाव साफ करतानाही काही अप्रतिम मूर्ती मिळाल्या आहेत. त्या बह्मा, विष्णू, गणपती, महिषासुरमर्दिनी, लक्ष्मी आदी देवदेवता नर्तकी, अप्सरा इ. आहेत. आजही ठाण्यात मूर्ती सापडतात. नुकतीच गोल्डन पार्कजवळ, त्रिमुखी सदाशिवाची प्राचीन मूर्ती सापडली. ठाण्याच्या महापौरांनी तिची स्थापना कापूरबावडीच्या कलादालनात केली आहे. ठाण्याच्या प्राचीन व मध्ययुगीन, इतिहासाचा हा अनमोल ठेवा आहे. जशी मंदिरे-लेणी तसे ठाणे परिसरातील गड-किल्ले. हे किल्ले मराठ्यांच्या पराक्रमाचे, क्रांतिकारकांच्या बलिदानाचे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक बनून ठाणेकरांची मान अभिमानाने उंचावते आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत ठाणे किल्ला, हिराकोट, पारसिक किल्ला, नागलाकोट, गायमुखची गढी, घोडबंदर हे किल्ले येतात. यांपैकी ठाण्याचा भुईकोट व घोडबंदरचा किल्ला महत्त्वाचे आहेत. ठाण्यातील हे सर्व किल्ले पोर्तुगीजांनी बांधले होते. पण रणधुरंधर चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखालील सरदार, अंजूरचे गंगाजी नाईक, व त्यांचे चार बंधू, खंडोजी माणकर, बिवलकर, आदी सरदार व मराठी सैन्याने भीम-पराक्रम गाजवून हे किल्ले जिंकून घेऊन पोर्तुगीजांची दोनशे वर्षांची राजवट संपुष्टात आणली.
ठाणे किल्ला:
रणधुरंधर चिमाजी अप्पांच्या वसई माहिमेत विजयाची नांदी ठरणारा ठाण्याचा किल्ला म्हणजे आजचे ठाणे कारागृह. या किल्ल्याचे रूपांतर कारागृहात केले ते इंग्रजांनी, मात्र ठाण्याचा हा किल्ला बांधला पोर्तुगीजांनी.
या किल्ल्याकडे सच्चा ठाणेकर स्वातंत्र्यदेवतेचे स्मारक मंदिर म्हणून पाहतो. इ.स. १८६ साली इथला पहिला राजबंदी होता, त्र्यंबकजी डेंगळे, पुढे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी, ठाण्याचे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे, जॅक्सनचा खून करून हौताम्य पत्करलेले तरुण क्रांतिकारक हु. अनंत लक्ष्मण कान्हेरे, हु. कृष्णाजी गोपाळ कर्वे, हु. विनायक नारायण देशपांडे. स्वातंत्र्यसैनिक नानासाहेब दामले, माधवराव काळदाते. लखूनाना पुरोहित, यशवंत ठाणेकर, पारसिक बोगदा बॉम्ब खटल्यातील, मारुती कुमार, रमेश चिटणीस, मोरेश्वर नाचणे. स्वातंत्र्यलढ्यात महिलाही मागे नव्हत्या. सौ. यशोदाबाई कोतवाल, यमुताई साने, सिंधु ताम्हाणे, कुमुद गुप्ते, कावेरीताई पाटील, ताराबाई रणदिवे अशा शेकडो महिला ठाणे किल्ल्यात बंदिवान होत्या. त्याग आणि बलिदानाने पवित्र झालेला ठाणे किल्ला, आज मात्र ब्रिटिशांनी बनविलेल्या कारागृहात स्वतःच बंदिवान झाला आहे. ठाणे किल्ला हे नाव पुसले जाऊन गुन्हेगारांचा तुरुंग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे, हे आपले दुर्दैवच म्हटले पाहिजे.
घोडबंदरचा किल्ला:
ठाण्याच्या उत्तरेला १५ कि. मी. अंतरावर खाडीकिनारी पोर्तुगीजांनी इ. स. १५३५च्या सुमारास घोडबंदरचा किल्ला बांधला. संरक्षणदृष्ट्या अति महत्त्वाचा असा हा किल्ला असून, किल्ल्यावरून भाईंदर, वसई, धारावी, उत्तन व कामणदुर्ग या विस्तीर्ण प्रदेशाचे दर्शन घडते. किल्ल्याची बांधणी युरोपियन पद्धतीची असून त्यात प्रशस्त सभागृह, कचेऱ्या, दारुगोळ्याचे कोठार, व उंच टेहळणी बुरुज आहे. इ.स. १६७२ साली शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर स्वारी केली होती. पुढे एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल केला. इ.स. १७७४ मध्ये इंग्रजांनी पुन्हा घोडबंदर किल्ला मराठ्याकडून जिंकून घेतला, तो भारत स्वतंत्र होईपर्यंत त्यांच्याच ताब्यात होता. घोडबंदर तसे प्राचीन गाव. घोडबंदरची प्राचीन तटबंदी येथे पाहावयास मिळते. मध्ययुगात येथून अरबस्थान एडन, पेमेन, इत्यादी देशातून उत्तम प्रतीच्या घोड्यांची आयात होत असे घोडबंदरातून मोठ्या प्रमाणावर परदेशाशी व्यापार चालत असे. अतिशय सुंदर, रमणीय परिसर. दुर्गप्रेमी व पर्यटकांना आकर्षित करून घेतो.
हिराकोट:
मराठ्यांचे साष्टीचे सुभेदार रामजी बिवलकर यांनी हिराकोट १७३७ साली बांधला. हा ठाणे रेल्वे स्टेशन पासून अवघ्या ५-६ मिनिटांच्या अंतरावर असून सध्या त्यात मामलेदार कचेरी, टाउन पोलिस जुनी नगरपालिका, सरकारी दफ्तरखाना व इतर कचेऱ्या आहेत. ही ऐतिहासिक वास्तू सुभेदार बिवलकरांनी आपल्या प्रशासकीय कामकाजासाठी बनविली होती. इंग्रजांनी याचा वापर काही काळ तुरुंग म्हणून केला. महागिरी व चेंदणी बंदरात येणाऱ्या जहाजांवर नजर ठेवण्याचे काम हिराकोट चोख बजावीत असे. ठाणे हे सर्वधर्मसमभावाचे उत्तम प्रतीक आहे. गड किल्ल्यांइतकेच इथल्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू, शीख, जैनधर्मीयांच्या पुरातन वास्तू ठाण्याच्या इतिहासावर प्रकाश झोत टाकतात. ठाण्यातील महागिरी येथील जामा मशीद ३५० वर्षे पुरातन आहे. येथे दर शुक्रवारी सांघिक प्रार्थना होते. मशिदीसमोर खाजा मुसा चिस्ती यांचा दर्गा आहे. कबरीवर आकाशाचे छत असावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्यामुळे त्यांच्या कबरीवर छत नाही. हजरत हकिमबीन अब्दुल आस, सय्यद आबीर आणि वाजिदी अल हुसेनी यांच्या कबरी आहेत.
पारसी अग्यारी:
ही टेंभीनाक्यावर असून ठाण्याच्या जडण घडणीत पारशी समाजाचा मोलाचा सहभाग आहे. त्यांच्यातील दानशूर व्यक्तींनी बी.जे. हायस्कूल, वाडिया दवाखाना, सेंट्रल मैदान, पॅव्हिलियन टाउन हॉल इत्यादी लोकोपयोगी इमारती बांधल्या. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजानी शेठ कावसजी रुस्तुमजी पटेल यांना, साष्टी (ठाणे) तालुक्यावर त्यांचा प्रतिनिधी म्हणून नेमले. त्यामुळे बराच मोठा पारशी समुदाय ठाण्यात येऊन स्थिरावला. कावसजी रुस्तुमजी पटेल यांनी पारसी समाजाच्या धार्मिक विधींसाठी १७८० साली टेंभी नाक्यावर पारसी अग्यारी बांधली. तसेच दरे महलचे रूपांतर १८२९ मध्ये ‘आदरात’ मध्ये त्यांनी केले. तर मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ किंवा ‘दोखमा’ चे बांधकाम १८४३ मध्ये त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आले.
बेने इस्रायल:
ठाण्यात पुरातन काळापासून बेने इस्रायल यांची वस्ती आहे. या समाजाने सार्वजनिक, सांस्कृतिक व विशेषतः संगीतक्षेत्रात मोठी कामगिरी बजावली आहे. १८७९ मध्ये सिव्हिल हॉस्पिटलसमोर आंबेडकर, चौका शेजारी त्यांनी सिनेगॉग किंवा प्रार्थना मंदिर बांधले. आता त्याच जागेवर नवी उंच इमारत बांधली असून ती ‘शाआर हाश्शामाइस’ किंवा ‘गेट ऑफ हेवन’ प्रार्थनालय म्हणून ओळखली जाते.
सेंट जॉन चर्च:
इ. स. १६६३ साली पोर्तुगीजांनी ठाण्यात प्रथम मासुंदा तलावाकाठी सेंट जॉन बॉप्टिस्ट चर्चचे बांधकाम केले. ख्रिस्ती धर्मात दोन पंथ आहेत कॅथलिक व प्रोटेस्टंट. सेंट जॉन चर्चमध्ये मुख्यतः कॅथलिक पंथाचे लोक येतात.
सेंट जेम्सचर्च:
इंग्रज राज्यकर्ते प्रोटेस्टंट पंथाचे होते. इ.स. १८२५ मध्ये त्यांच्या पद्धतीच्या प्रार्थनेसाठी त्यांनी सेंट जेम्स चर्च बांधले. या चर्चची बांधणी गॉथीक व ग्रेशियन शैलीतील आहे. हे चर्च बिशप हेम्बर या इंग्रज सद्गृहस्थाने बांधले असून चर्चच्या आवारात न्यायाधीश स्टीफन बॅबिग्टन व अनेक इंग्रज अधिकाऱ्यांची थडगी आहेत.
कौपिनेश्वर मंदिर:
हे ठाण्यातील सर्वात प्राचीन मंदिर आहे. याची रचना शिलाहार काळात करण्यात आली. कौपिनिश्वर मंदिरामागे मासवदा (मासुंदा) तलाव असून त्याचे चिरेबंदी बांधकाम करण्यात आले होते. त्याच्या उत्तर व दक्षिण भागात घाट व सुंदर मंदिरे बांधण्यात आली होती. पोर्तुगीजांनी मंदिरांचा पार विध्वंस करून टाकला, मराठ्यांचे राज्य आल्यावर इ.स.१७६० च्या सुमारास रामाजी महादेव बिवलकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. अलीकडे १९९६ मध्ये मंदिराच्या सभामंडपाचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिर प्रवेश करताच नंदीकेश्वराची भव्य मूर्ती दिसते. ही मूर्ती ८’ x ६ क्षेत्रफळ असलेल्या व ३ इंच उंच चौथऱ्यावर स्थापन केली आहे. मूर्ती अखंड दगडाची असून तिची उंची सुमारे ३ फूट आहे. नंदीपासून महादेवाची पिंडी ७० फूट अंतरावरील गर्भगृहात आहे. कौपिनेश्वर मंदिरातील हे शिवलिंग महाराष्ट्रात सर्वात मोठे समजले जाते. शिवलिंगाची उंची ४ फूट ६ इंच व गोलाकार घेर १२ फूट आहे. मंदिराच्या आवारात गणपती, मारुती, श्रीराम, कालिकामाता, श्रीदत्त, शितलादेवी, उत्तरेश्वर व पंचमहामुखी शिवाबरोबर काळभैरव, महाकालेश्वर आदी मंदिरे आहेत. त्याशिवाय कामधेनू, गरुड, विठ्ठल रखुमाई यांच्याही मूर्ती आहेत.
कौपिनेश्वर मंदिराच्या भोवताली अनेक मंदिरे इतिहासाची साक्ष देत उभी आहेत; त्यात जांभळी नाक्यावरील श्री सिद्धीविनायक मंदिर असून त्याच्या पूर्वेला पेढ्या मारुती खारकर आळीचे रक्षण करीत उभा आहे. येथून थोड्या अंतरावर सन्मित्र प्रेसच्या बाजूला श्रीरामाचे जुने मंदिर आहे. कौपिनेश्वर मंदिराच्या पूर्वेला बाजारपेठेत पुरातन मंदिरात समावेश होणारे विठ्ठल मंदिर, इ.स. १८१७-१८ साली बहिणाबाई गोविंद यांनी बांधले. या मंदिरात श्रीरामेश्वर लिंग, विठ्ठल-रखुमाई आणि गणपतीची स्थापना केली आहे. स्टेशनजवळील चेंदणी कोळीवाड्यातील दत्त मंदिर हे सुद्धा जुने जागृत देवस्थान आहे. हे मंदिर श्री आनंद भारती यांनी १८८० साली बांधले. ठाण्यातील आणखी एक पुरातन मंदिर म्हणजे विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर. हे दमाणी इस्टेटसमोर असून नारायण विठ्ठल यादव यांनी आपल्या वडिलांच्या स्मतिनिमित्त १९१२ साली बांधले. इ.स. १८७९ च्या राजपत्रानुसार ठाण्यातील नऊ प्राचीन मंदिरांत कौपिनेश्वर मंदिरासह शक्तिदेवता घंटाळीदेवीच्या मंदिराचाही त्यात उल्लेख आहे. पेशव्यांकडून या मंदिराला दरवर्षी चार रुपये वर्षासन मिळत असल्याचा उल्लेख सापडतो.
जुने ठाणे म्हणजे तलाव मंदिरांचे ठाणे म्हणून प्रसिद्ध होते. सिद्धेश्वर तलावाच्या काठी श्रीराम मंदिर आहे. तलावाचा गाळ उपसताना ९-१० व्या शतकातील ब्रह्मदेवाची सुंदर मूर्ती सापडली. ही मूर्ती सहा फूट उंच असून तिचे चारी हात कोपरापासून भंग झाले आहेत. असे जरी असले तरी सुंदर अंगकांती, नाजूक कलाकुसरीचे अलंकार, मस्तकावर किरीट, गळ्यात यज्ञोपवीत, दंडावर बाजूबंद, कमरेला भरघोस मेखला बांधलेली आहे. ब्रह्मा हा प्रौढ, भरघोस दाढी असलेला, धीरगंभीर पण प्रसन्न मुद्रेत उभा आहे. त्याच्या पायांशी दोन्हीबाजूंना गायत्री व सरस्वती हंसावर उभ्या आहेत. सध्या ही मूर्ती उघड्या आभाळाखाली उभी आहे. तलावाकाठी असलेले कोलबाडमधील शंकराचे मंदिरही पुरातन आहे. मंदिरात जागमातादेवीची मूर्ती असल्यामुळे जागमाता मंदिर असे म्हटले जाते. कोलबाड-उथळसर भागात एकूण सात तलाव होते. त्यापैकी आंबे, घोसाळे आणि ब्रह्माळे तलाव इथल्या जागृत नागरिकांमुळे अद्याप टिकून आहेत. या तलाव परिसरातच उथळेश्वर मंदिर, आग्रारोडला गोकुळनगरजवळ जरीमरी मंदिर असून मंदिरामागचा तलाव झोपडपट्टीच्या विळख्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जेलच्या तलावाकाठी किल्ला-मारुती मंदिर आहे. ही मारुतीची मूर्ती चिमाजीआप्पाने दक्षिण-पश्चिमेच्या बुरुजाजवळ स्थापन करून त्या बुरुजाचे नाव हनुमंत बुरूज असे ठेवले होते. इंग्रजांच्या काळात मारुतीची मूर्ती किल्ल्याबाहेर ठेवण्यात आली. नंतर आता आहे तेथे मंदिर बांधण्यात येऊन मंदिराची व्यवस्था कौपिनेश्वर मंदिर कमिटी ट्रस्ट पाहते. वागळे इस्टेटची रायलादेवी,उपवनचा गणपती ही दोन्ही मंदिरे तलावाकाठीच आहेत. ठाणे महानगर पालिका झाल्यावर पूर्वेला मुंब्रा, शीळफाटा, खिडकाळी व उत्तरेला ओवळा, गायमुखपर्यंतची गावे ठाणे महानगरपालिकेत समाविष्ट झाली. ओवळ्याच्या मोगरपाडा तलावात अनेक मूर्ती सापडल्या. त्यात श्रीधराची एक पूर्ण व गुडघ्यापासून तुटलेली विष्णूची एक देखणी मूर्ती असून. श्रीधराची पूर्णमूर्ती गायब झाली आहे तर भंगमूर्ती तलावाकाठी झाडाला टेकून ठेवली आहे. सारवडवली येथील तलावाकाठी असलेल्या मंदिरात शेषशायी विष्णूची भव्य मूर्ती आहे. तलावाकाठच्या मंदिरात शिरोमणी शोभावा असे खिडकाळीचे खिडकाळेश्वर महादेवाचे शिलहारकालीन मंदिर, तिथल्या वनसृष्टी आणि चिऱ्यांनी बांधलेल्या सुंदर तलावांनी सर्वांचे लक्ष वेधून घेते.
एकेकाळी साठ तलाव व तितकीच मंदिरे ठाण्यात होती. आज घडीला ठाण्यात ३५ तलाव आहेत. नगरपालिकेने तलावांचे सुशोभीकरण सुरू केले आहे. नागरिकांना विरंगुळ्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी सुंदर बगीचे तलावाभोवती करण्यात येत आहे.
ठाण्यातील तलाव हे ठाणेकरांच्या जीवनातील अविभाज्य अंग आहे. ठाण्याचे हृदय समजला जाणाऱ्या मासवदा उर्फ मासुंदा तलाव याला तलावपाली किंवा ठाण्याची चौपाटी म्हणतात. या तलावाच्या कट्ट्यावर प्रेमिकांच्या गुजगोष्टीपासून जाहीर सभा संमेलनांपर्यंत, स्फुट काव्य-कथा ते कांदबरी-नाटकापर्यंत आणि रिकामपणच्या वेळात कट्ट्यावरील गप्पांपासून मौलिक गंभीर चर्चासत्रांपर्यंत होणाऱ्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचा मूक साक्षीदार असलेल्या मासुंदा तलावाला,ठाणेकरांनी आपल्या हृदयात अनन्यसाधारण अशी महत्त्वाची जागा दिली आहे. इ.स. १८६३ साली नगरपालिकेची स्थापना झाल्यावर, त्याच वर्षी तलावाचा गाळ कचरा काढण्यासाठी येणारा खर्च जगजीवन जव्हेरीदास या ठाणेकराने दिला, तेव्हापासून मासुंदा तलाव तीनदा साफ करण्यात आला १९५५-५६ व १९९२-९३ साली ठाणेकरांनी श्रमदानाने तलाव साफ केला आहे. विषेषतः १९५५ ला एक तृतीयांश तलाव बुजवून शिवाजी पथ रस्ता करण्यासाठी, घरटी एक माणूस तरी या श्रमदानात उतरला होता. सार्वजनिक हितासाठी नागरिकांची एकत्र येण्याची ही भव्य परंपरा फक्त ठाण्यातच पहावयास मिळते. दुर्ग-मंदिर-तलावांचे गाव ही इतिहास प्रसिद्ध ठाण्याची ओळख ठाणेकर जपताहेत, हा संदेश पुरेसा आहे.
-सदाशिव टेटविलकर
Leave a Reply