नवीन लेखन...

ठाणे जिल्ह्यातील जागृत गणेश

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला विद्याधर ठाणेकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 


चेंदणी कोळीवाडा

चेंदणी कोळीवाडा हा ठाण्यातील मूळ वस्ती असलेला भाग. १८५३ साली भारतातील पहिली रेल्वे ठाण्यापर्यंत धावली आणि त्या लोखंडी सडकेने भागाचे पूर्व-पश्चिम असे दोन भाग केले. पूर्वेकडील भागात नातू-परांजपे नावाने आज ओळखल्या जाणाऱ्या वसाहतीत उजव्या सोंडेंच्या श्री सिद्धीविनायकाचे मंदिर आहे.खास राजस्थानातून घडवून आणलेली एक पाय दुमडून बसलेली ही संगमरवरी गणेशमूर्ती फार सुंदर आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धी आहे, ठाण्याची खाडी व मुंब्राच्या डोंगर अशी नैसर्गिक पार्श्वभूमी त्याला लाभली आहे. समाजात सामंजस्य व एकोपा राहावा या भावनेतून परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन १९९२ साली विघ्नहर्त्याच्या या मंदिराची स्थापना केली. भाविकांचे ते श्रद्धास्थान बनले आहे.

ब्रिटिशकालीन मीठबंदर म्हणून ओळखला जाणारा खाडीकिनारा रमणीय आहे. तोफांच्या अस्तित्वाने ऐतिहासिक बंदर असल्याची खूण पटते. मनोहारी निसर्गसौंदर्य आणि विविध जातींचे स्थलांतरित पक्षी आगळे नेत्रसुख देतात. जवळचे कोळी समाजाचे विठ्ठल-रुक्मिणीचे पुरातन मंदिरही आहे. त्या मंदिरालाही आपला इतिहास आहे.

ठाणे पूर्वेला मुख्य रस्त्याने डाव्या बाजूने अष्टविनायक चौकाशी आल्यावर डावीकडेच ही नातू-परांजपे वसाहत लागते. मंदिराच्या जवळपास राहण्याची सोय नाही, मात्र रेल्वे स्टेशनलगत निवासभोजनाची सोय होऊ शकते.

जांभळी नाका, ठाणे

ठाणेकरांचे श्रद्धेय ठिकाण म्हणजे जांभळी नाका सिद्धिविनायक मंदिर. हे मंदिर तीनशे-चारशे वर्षे पुरातन असावे. आत्यंतिक श्रद्धा असलेल्या या मंदिराला काही वर्षांपूर्वी ठाकूरद्वार विठ्ठल मंदिर म्हणून संबोधले जाई. विश्वस्तांनी १९८५ साली नवरूपात बांधलेले हे मंदिर पूर्वी कौलारू व साधे होते.

या मंदिरात जेवढ्या वाड्या भरल्या जातात तेवढ्या अन्य कुठे भरल्या जात नसतील हे त्याचे आगळे वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या मध्यभागी स्वयंभू श्री सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. आशापुरादेवी, हनुमान, लक्ष्मीनारायण, विठ्ठल आणि गजाननाची एक लहान मूर्ती इथे असल्याने भाविकांना विविध देवतांचे दर्शन घडते. ठाण्यातील प्रसिद्ध तलावपाळी मंदिराच्या पाठच्या बाजूलाच असल्याने, ठाण्याचे भूषण असलेले हे ठिकाण अवश्य भेट द्यावी असे आहे.

ठाण्यातील जी.सी.पंडित यांच्या पूर्वजांना साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वप्नात दृष्टांत देऊन ‘मला वर काढ’ असे सांगितले. त्यानुसार मांदारच्या झाडाखालची जमीन उकरली असता श्री गणेशाची सुंदर मूर्ती मिळाली. ती स्वयंभू असल्याने तिला पूर्वी ‘मांदार सिद्धिविनायक’ म्हणत.

चरई

लक्ष्मीबाई पोतदार या दानशूर स्त्रीने १९३६ साली मंदिर बांधले. नळीची कौले, आच्छादलेले उतरते छप्पर व शेणाने सारवलेली जमीन असे या मंदिराचे मूळ स्वरूप. याच वास्तूच्या प्रवेशद्वारापाशी डावीकडे बाळगणपतीचे सुंदर मंदिर बांधले. बाळगणपतीची ही दक्षिणाभिमुख मूर्ती संगमरवरी असून आसनस्थ आहे. इथे माघी गणेश जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. दिवाळीत पाडव्याच्या दिवशी मंदिराच्या प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत पणत्या लावून केलेला दीपोत्सव विलोभनीय असतो. अपत्य नसल्याने लक्ष्मीबाईंनी १९६९साली ट्रस्ट स्थापन केला. या ट्रस्टमार्फत मंदिराची व्यवस्था पाहिली जाते. नव्या सुशोभिकरणाने मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे. ठाणे शहरातील दाट वस्तीच्या एदलजी मार्ग, चरई भागात हे बाळगणपतीचे सुंदर मंदिर आहे. जवळपास निवासव्यवस्था नसली तरी खाण्यापिण्यासाठी उपाहारगृहे आहेत.

कचराळीतलाव, पाचपाखाडी

ठाणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसमोर, कचराळी तलावाशेजारी श्री गौरीशंकर सिद्धीविनायकाचे जे मंदिर आहे ते पूर्वी महापालिकेच्या कार्यालयाजवळ होते. या कार्यालयासाठीचे खोदकाम सुरू असताना गणेशमूर्ती सापडली. स्थानिकांनी एका चिंचेच्या झाडाखाली तिची प्रतिष्ठापना केली. छोटेसे मंदिर बांधले. मात्र हा भाग सखल असल्याने पावसाळ्यात मंदिरात पाणी शिरे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी तिथेच मोठे मंदिर बांधण्याचा संकल्प केला. मात्र १९७७ साली सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्याचा कोणी राजकीय लाभ घेऊ नये म्हणून, नागरिकांनी स्वखर्चाने मंदिराचे सुरू केलेले बांधकाम तोडले गेले. या तोडफोडीत मूर्ती भंग पावल्याने नागरिकांमध्ये उद्रेक झाला. पुढे रस्तारुंदीकरण, सुशोभिकरणाच्या नावाखाली हे मंदिर समोरच्या कचराळी तलावाशेजारी स्थलांतरित केले गेले. २० ऑक्टोबर १९९७ रोजी इथे संगमरवरी गणेशमूर्तीची स्थापना केली. नागरिकांनी स्वखर्चाने मंदिरात जाण्यासाठी रस्ता बांधला.

मंदिरातील ही मोठी मूर्ती उजव्या सोंडेची आहे. या मुख्य मूर्तीशेजारी खोदकामात सापडलेली छोटी गणेशमूर्ती मांडली आहे. वर्गणी न घेता, मंदिराच्या उत्पन्नातून इथे माघी गणेशोत्सव साजरा होतो.

ठाणे रेल्वे स्थानकापासून दीड किलोमीटरवर हे मंदिर आहे. राहण्याची व्यवस्था नाही. मात्र उपाहारगृहे आहेत.

उपवन, वर्तकनगर ठाणे

ठाणे रेल्वेस्थानकापासून सुमारे चार कि.मी.असलेल्या वर्तकनगर येथील उपवन विभागात, येऊर डोंगराच्या पायथ्याशी एक मोठा तलाव आहे. या तलावाचे सुशोभिकरण करण्यासाठी उत्खनन सुरू केले असता ठाण्याच्या वैभवसंपन्न सांस्कृतिक ठेवीच्या खुणा सापडल्या. त्यात पडक्या मंदिराचे कोरीव अवशेष सापडले. त्यापाठोपाठ, दगडात कोरलेल्या एका सुंदर गणेशमूर्तीचे दर्शन झाले! ती मूर्ती मग तलावाशेजारच्या झाडाच्या पारावर दर्शनासाठी ठेवण्यात आली. याच जागी पुढे रेमण्ड वूलन मिलचे संचालक गोपाळकृष्ण सिंघानिया यांनी मंदिर बांधले.

मंदिराला साजेशी एक संगमरवरी मूर्ती एका भक्ताने विराजमान केली. त्यामुळे तलावात सापडलेली व नवी संगमरवरी अशा दोन मूर्ती मंदिरात आहेत. २६ फेब्रुवारी १९७४ या दिवशी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. विस्तीर्ण तलाव आणि हिरव्यागार वृक्षांच्या सान्निध्यात असंख्य प्रेमी युगुले फिरण्यासाठी इथे येतात. मंदिराला भेट देतात आणि प्रेमाच्या आणाभाका घेताना दिसतात. त्यामुळे श्रीभक्त कल्याण गणपती हे खरे नाव असूनही या गणपतीस ‘प्रेमिकांचा श्री गणपती’ असे नाव रूढ झाले आहे. 

अणजूर, ता.भिवंडी.जि. ठाणे

सध्या अंजूर नावाने ओळखल्या जाणारे अणजूर हे एक पुरातन गाव. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात ते आहे. याच गावात नाईक यांच्या पुरातन वाडेवजा माडीत गंगाजी महाराज (दुसरे) यांनी आपल्या पूजेतील सिद्धिविनायकाची स्थापना इथल्या या मंदिरात केली.

निसर्गाने उधळण केलेल्या हिरव्यागार वनश्रीत लपलेल्या या अणजूर गावी तीनशे वर्षांपूर्वी चुन्या-दगडांनी बांधलेली ही नाईकांची माडी आहे. त्यात एका मोठ्या खोलीतील लाकडी मखरात, पितळी देव्हाऱ्यात ही प्रसादमूर्ती आसनस्थ आहे. उजव्या सोंडेंची ही मूर्ती फार सुंदर व प्रसन्न दिसते. गेली तीन शतके अधूनमधून शेंदूरलेपन होत राहिल्याने मूर्तीचे आकारमान थोडे वाढले होते. त्यामुळे दरवर्षी हा गणपती वाढत असल्याची समजूत भाविकांमध्ये आहे. १९७७ साली मूर्तीवरील हे बाह्य शेंदूरआवरण दुभंगले आणि आज दिसते ती सुंदर, रेखीव मूर्ती दृष्टीस पडली. त्यामुळे धार्मिक विधिवत मूर्तीवर शेंदराचे पातळ आवरण चढवून तिची पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली गेली.

माघी चतुर्थीस इथे मोठा उत्सव असतो. ठाणे, भिवंडी, व कल्याण इथून अणजूरसाठी बससेवा उपलब्ध आहे.

पडघे,ता.भिवंडी, जि. ठाणे

मुंबई – नाशिक महामार्गावरील भिवंडी शहरापासून पुढे आले, की पडघे हे छोटेसे गाव लागते. गावात एकच मुख्य बाजारपेठेचा रस्ता असून, या बाजारपेठेतच श्रीगणेशाचे छोटेसे, जुने कौलारू मंदिर आहे. डाव्या सोंडेची मूर्ती पाषाणाची असून शेंदूरचर्चित आहे. दीडशे वर्षे पुरातन असलेल्या या मंदिराचा रामजी ठक्कर यांनी जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत आधारासाठी सहा लाकडी खांब आहेत. हे मंदिर या गावाचे आकर्षण असून गावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिरासमोरील बागेच्यापुढे श्री संतोषीमातेचे मंदिर आहे. गावात श्री दत्ताचे प्राचीन मंदिरही आहे.

किल्ले माहुली, ता.शहापूर

शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माहुली गडाच्या पायथ्याशी हे पेशवेकालीन महागणपती मंदिर आहे. गावावरील अरिष्ट टाळण्यासाठी या विघ्नहर्त्याची स्थापना पेशव्यांनी केली. दरोडेखोर, लुटारूंच्या टोळ्या, रोगांच्या साथीचे निवारण व्हावे आणि मंगलदायी जीवनासाठी या गणेशाची पूजाअर्चा होई. गडाच्या उत्तरेला ब्राह्मणवस्ती असल्याने गणपतीमंदिर उत्तराभिमुख आहे. शिवाय, शिवप्रभूची साक्ष देणाऱ्या अभेद्य माहुली गडावर जाणाऱ्या रस्त्याचा आरंभ इथूनच होतो, म्हणूनही मंदिर उत्तराभिमुख आहे.

शेंदूरचर्चित शुभ्र गारेच्या डोळ्यांचा हा गणपती साक्षीदार आहे, माहुलीच्या इतिहासाचा आणि पेशवेकालीन ऐश्वर्याचा. शिवरायांच्या जन्मापूर्वी जिजाबाईंना रातोरात इथून शिवनेरी गडावर न्यावे लागले. अन्यथा शिवरायांचे जन्मस्थान होण्याचे भाग्य माहुली गडाला लाभले असते.

पशु-पक्षी, वृक्षवेलींनी नटलेल्या निसर्गरम्य सान्निध्यात या महागणपतीचे दर्शन मनाला प्रसन्नता देते, प्रफुल्लित करते. पेशवेकालीन ऐश्वर्याच्या भग्नावस्थेत उरलेल्या आठवणी, डोंगरपायथ्याशी असलेले मारुती मंदिर, श्री शंकराचे व श्री माहुलीदेवाचे ऐतिहासिक मंदिर यांत हे महागणपती मंदिर उठून दिसते. मुंबई-कसारा मार्गावर आसनगावपासून ६ कि.मी. अंतरावर हे पवित्र स्थळ आहे. मूळचे कौलारू मंदिर मोडकळीस आले तेव्हा मंदिर समितीने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आजचे काँक्रिटचे नवे रूप उभे राहिले. अर्थात्, मूर्तीची प्राचीनता व तिची आसनस्थ दिशा अबाधित आहे. चौथरा संगमरवरी आहे. मूर्तीच्या पाठीमागे संगमरवरी प्रभावळ आहे. मंदिराच्या पुढ्यात शंकराची पिंडी आहे.

गडाच्या माथ्यावर दोन गुहा आहेत. तेथून तानसा तलावाचे विहंगम दृश्य दिसते. नवरा,नवरी व भटजी असे सुळके दिसतात. गिर्यारोहकांचे ते आकर्षण आहे. आजही चतुर्थीच्या दिवशी ग्रामस्थांची भजने आणि पूजाअर्चा यामुळे मंदिरपरिसराला मांगल्याचा गंध चढतो. मंदिराचे खरे सौंदर्य उमलते ते ऐन भाद्रपदात. पावसाळ्यातील निसर्गाचे रूप आणि मंदिरातील घंटानाद नीरव शांततेवर पावित्र्याचा शिडकावा करतो. येथूनच जवळ जैन समाजाचे मानस मंदिर आहे.

डहाणूशहर, जि. ठाणे 

वैशिष्ट्यपूर्ण अष्टभुजा गणपतीसाठी डहाणू शहरातील ओम दत्त गणेश मंदिर प्रसिद्ध पावले आहे. अशा प्रकारचे हिंदुस्थानातील हे तिसरे मंदिर असावे. या मंदिराचा इतिहासही रोचक आहे.

डहाणू शहरात श्री गणेशाचे स्वतंत्र मंदिर असावे या भावनेतून तेथील फाटक कुटुंबीयांनी ते बांधण्याचे ठरवले व एक कलात्मक गणेशमंदिर उभे राहिले. मंदिराचे काम सुरू केले, त्यावेळी अनेक विषारी नाग त्या जागी निघत. साहजिकच कामगार घाबरत, मग फाटक कुटुंबीयांनी यथोचित संकल्प सोडल्यावर नाग निघणे बंद झाले. त्यामुळे श्री गणेशाचे मंदिर बांधल्यावर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस नागमूर्तीची स्थापना केली आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वारी दीपमाळ आहे. सभामंडपातील दहा स्तंभांवर गणेशाच्या जीवनातील घटना चित्रित केल्या आहेत. श्री गणेशाची मूर्ती अंदाजे पाच फूटी असून तिच्या दोन हातात नागदेवता, उजव्या हातात तुटलेला दंत व दुसऱ्या हातात माळा आहेत. डाव्या बाजूच्या एका हाती परशू तर दुसऱ्या हाती लाडू आहे. डोक्यावर सुंदर मुकुट, लोभस व प्रसन्न मुद्रा, तेजस्वी डोळे हे रूप पाहून भक्त्त हरखून जातात.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर, मुंबईपासून साधारण दिडशे किलोमीटर कासे नाक्यावर डहाणूसाठी डावीकडे वाट आहे. पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानकाकडून रिक्षा वा बसने जाता येते. जवळच नरपड आणि बोर्डीच्या समुद्रकिनारा असलेले, निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव आहे. साई मंदिर व गजानन मंदिर ही अवश्य भेट देण्यासारखी अन्य दोन मंदिरे इथे आहेत.

संस्कार केंद्र, देवबांध, मोखाडा जि. ठाणे. 

देवबांध-मोखाडा परिसरातील आदिवासींसाठी एखादे देवालय असावे या विचारातून वसंतराव दीक्षित यांनी श्री गणेशाची मूर्ती भेट देण्याची तयारी दर्शविली. रा. स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोरोपंत पिंगळे यांच्या संघाच्या माध्यमातून गणेशमंदिर उभारण्याचा संकल्प केला. यातूनच श्री. सुंदरनारायण गणेशमंदिर संस्कार केंद्र मूर्तरूपात आले. देवबांध येथे सुंदर वास्तू बांधून १२ फेब्रुवारी १९८६ रोजी, गणेशजयंतीच्या दिवशी तिथे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंचधातूंची ही गणेशमूर्ती बसलेली असून चतुर्भुज आहे. सुपासारखे मोठे कान असलेल्या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आहे. तर पोटावर विळखा घातलेला सर्प आहे. 

टिटवाळा, जि. ठाणे 

ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील टिटवाळा या पुण्यक्षेत्री असलेले श्री महागणपतीचे मंदिर अष्टविनायकांइतकेच प्रख्यात आहे. गणेशभक्तांचा लाडका असलेला श्री महागणपती, लग्नाच्या इच्छा पूर्ण करणारा तसेच विवाहगाठ बांधणारा म्हणून ‘विवाह विनायक’ या नावानेही प्रसिद्ध आहे.

शकुंतलेच्या जीवनात दुष्यंताच्या मीलनासाठी अनेक विघ्ने आली आणि तिचा धीर खचू लागला. तिची ही अवस्था पाहून कण्वमुनींनी तिला ‘विघ्ननिवारक करुणासागर श्री महागणपतीची पूजा कर, तोच तुला या संकटातून मुक्त करील’ असे सांगितले, त्यानुसार शकुंतलेने श्री. महागणपतीची मनोभावे पूजाअर्चा केली. ती विघ्नहर्त्या गणरायाने ऐकली आणि तिची सर्व संकटे दूर होऊन तिचे हरवलेले सौख्य आणि सौभाग्य तिला परत मिळाले. या कथेमुळे तरुण-तरुणींमध्ये या महागणपतीबद्दल मनात अपार श्रद्धा आहे. प्राचीन ऋषीमुनींच्या हस्ते विधियुक्त पूजन झाल्याने ही मूर्ती जागृत आहे अशी सर्वत्र भावना आहे.

पुढच्या अनेक शतकांच्या काळात अनेक स्थित्यंतरे घडली. भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. यवनी आक्रमणांच्या काळात या मूर्तीला जवळच्या विस्तीर्ण तलावात लपवून ठेवले गेले. पुढे, पेशव्यांच्या कारकिर्दीत जवळच्या वस्तीला व शेतीला उपयोग होईल म्हणून कारभारी रामचंद्र मेहेंदळे यांस पाण्याचा उपसा करण्यास सांगितले. त्याच सुमारास श्रीमंत माधवराव पेशवे यांचे कुलदैवत श्री गजानन यांच्या स्वप्नात आले. त्याप्रमाणे त्यांना तलावात लपवलेली ही मूर्ती सापडली मग तलावाच्या काठी मंदिर बांधले आणि या प्राचीन मूर्तीची पुन्हा विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. असे पौराणिक,ऐतिहासिक वैभव लाभलेले श्री महागणपतीचे लोभस, राजस रूप त्याच तलावाकाठी आजही विलसत आहे. तोच श्री महागणपती तेथे पिढ्यानपिढ्यांच्या मनोकामना पूर्ण करत आहे.

सुरेख दगडी महिरपीमध्ये पाषाणाची ही स्वयंभू मूर्ती आहे. शेंदूरचर्चित, प्रसन्न अशी ही मूर्ती चतुर्भुज आहे. विशाल उदर, भव्य गंडस्थल असे तिचे रूप मनोहारी आहे. आसनाच्या पायावर यक्ष- किन्नर व देवदेवतांचे कोरीव शिल्पकाम आहे. बाजूला रिद्धीसिद्धी या देवता आणि लक्ष व लाभ ही त्यांची बालके यांच्या सुंदर कोरीव मूर्ती आहेत. या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे आठशे-नऊशे वर्षांपासून एकाच ठिकाणी स्थानापन्न असलेली ही दुर्मीळ मूर्ती आहे.

श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. एका बाजूस शिवलिंग, माता पार्वती व गणपतीची छोटी मूर्ती आहे. सभामंडपात श्रीशिवछत्रपती व श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची दुर्मीळ छायाचित्रे आहेत. या गणपतीच्या नंदादीपासाठी श्री शिवछत्रपतींनी वर्षासन दिले असून आजही शासनाकडून अनुदान मिळते.

दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा व गणेशोत्सवात मंदिराच्या आवारातील दीपमाळेवर दीपोत्सव केला जातो. माघ चतुर्थीस गणेश जन्मोत्सव साजरा होतो.

श्री महागणपतीच्या दर्शनाला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई -कसारा मार्गावरील टिटवाळा स्थानकावर उतरून, पूर्वेस दोन कि.मी. पर्यंत बस, रिक्षा अथवा पायीदेखील जाता येते. स्वतःचे वाहन असणाऱ्यांना कल्याण-मुरबाड रस्त्यावरून टिटवाळ्याला जाणाऱ्या फाटकाने तेथे पोचता येते.

-विद्याधर ठाणेकर

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला विद्याधर ठाणेकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..