ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला पत्रकार कै. श्री. वा. नेर्लेकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.
ठाणे जिल्ह्याची पत्रकारिता ही तब्बल दिडशे वर्षांची जुनी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ठाणे जिल्ह्याचे पहिले ज्ञात मराठी साप्ताहिक म्हणून ‘अरुणोदय’ वृत्तपत्राचा उल्लेख करावा लागेल. स्वातंत्र्य मिळण्याच्या ८१ वर्ष आधी आणि मुंबईत मराठी वृत्तपत्रांची सुरुवात झाल्यानंतर जवळपास ३४ वर्षांनी ठाणे शहरात पहिले वृत्तपत्र सुरू झाले. काशिनाथ विष्णू फडके यांनी हे पत्र सुरू केले. २२ जुलै १८६६ रोजी पहिला अंक प्रसिद्ध झाला. ठाणे जिल्ह्यातून आज केवळ मराठीच नव्हे तर, इतर भाषांतूनही प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पण त्या काळात निघालेले पहिले साप्ताहिक म्हणून या घटनेला असाधारण महत्त्व आहे. त्यानंतर सूर्योदय, हिंदुपंच, गणपती प्रसादोदय, विदूषक, प्रतियोगी, कुलाबा समाचारची ठाणे पुरवणी अशी अनेक वृत्तपत्रे निघाली. कुलाबा समाचार अपवाद सोडल्यास प्रसिद्ध झालेल्या अन्य वृत्तपत्रांच्या निर्मितीमध्ये तसेच ते चालवण्यात फडके कुटुंबीयांचा मोठा सहभाग होता असे म्हणावे लागेल. शुद्धलेखनासाठी अहर्निश झटणारे मराठी लेखनकोशकार अरुण फडके यांचे ते सर्वजण आप्त होत. प्रामुख्याने बातम्यांपेक्षा लेखांवर भर, राष्ट्रीय प्रश्नांचे विवेचन, स्वातंत्र्यजागृती, राजकीय मतप्रणालीची प्रसिद्धी आणि सामाजिक कार्याचे कौतुव, यासंबंधीच्या मजकुराला त्याकाळी वृत्तपत्रांतून जागा मिळत असे. स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रकारिता व्यवसायाचा इतिहासात ठाणे शहाराचा क्रमांक महाराष्ट्राचा तुलनेत कितवा; हा खरे तर अभ्यासाचा विषय आहे. पण येथील वृत्तपत्रांची त्या काळातील कामगिरी दुर्लक्षून चालणार नाही, असे मात्र निश्चित म्हणता येईल.
अरुणोदय पत्राचा बोलबाला त्या काळी परिघाबाहेरही झाला होता. स्वतःचे बातमीदार नेमण्याचा उपक्रमही या पत्राने केला होता. नव्या वर्षाच्या पहिल्या अंकात संपलेल्या वर्षातील लेखांची अक्षरानुसार सूची (निर्देशिका-इंडेक्स) देण्याचा उपक्रम तर अभिनव म्हणावा लागेल. उपहास, उपरोध, विनोदी चित्रे आदी अंगाने चालविल्या जाणाऱ्या ‘हिंदुपंच’ वृत्तपत्राचा प्रयत्नही ऐतिहासिक म्हणता येईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या संपादकत्वा-खाली निघणाऱ्या साप्ताहिकाचे नाव, व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून आज सर्वतोमुखी आहे. मात्र १३८ वर्षांपूर्वी असा प्रयत्न ठाणे शहरातून हिंदुपंचाने केला याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल.
स्वांतत्र्योत्तर कालखंडाचा विचार केल्यास गेल्या ६३वर्षामध्ये पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमे यांच्या व्यवसायाने केलेली प्रगती स्वाभाविक आणि आश्चर्यजनक म्हणावी लागेल.
स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले साप्ताहिक म्हणून ‘लोकमित्र’ या पत्राचे नाव घ्यावे लागेल. द.म. सुतार हे त्याचे संपादक होते. त्यानंतर स. पां.जोशी यांनी काढलेले ‘सन्मित्र’ वृत्तपत्र म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या ६१ वर्षांच्या वाटचालीचा जिताजागता साक्षीदार म्हणावा लागेल. ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण इतिहास लिहावयाचा झाला तर सन्मित्राच्या जुन्या फायलींना डावलून पुढे जाता येणार नाही. आज नावारूपाला आलेले अनेक लेखक कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते यांनी आपल्या लेखनाचे ‘ग म भ न’ चे धडे सन्मित्रमधून गिरवल्याचे दिसून येईल. ठाणे जिल्हा मुद्रक संघ, ठाणे जिल्हा पत्रकार संघ आदी पत्रकारितेच्या व्यवसायाशी निगडित सर्व वाटचालींशी स. पां. जोशी यांचा संपादक व साक्षात या नात्याने संबंध आलेला होता. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक जडणघडणीशी संबंध असणारे, स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले वृत्तपत्र म्हणून सन्मित्रचा उल्लेख करावा लागेल. स.पां. जोशी यांचा हा वारसा त्यांचे चिरंजीव विजय जोशी व स्नुषा तनुजा जोशी निगुतीने चालवीत आहेत.
माधवराव गडकरी यांनी ‘निर्धार’ नावाचे साप्ताहिक ठाण्यात काही काळ चालविले होते. १९७५मध्ये ऐन आणीबाणीपर्वात नरेन्द्र बल्लाळ यांनी सुरू केलेले ‘ठाणे वैभव’ दैनिक, आज ठाण्याच्या सार्वजनिक जीवनावर वेगळा ठसा उमटवीत प्रगतीची झेप घेत आहे. जिल्हा दैनिक सुरू करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स या अग्रगण्य वृत्तपत्रातील नोकरी सोडून नवीन वाट धरली. त्यांचे चिरंजीव मिलिंद बल्लाळ व नातू निखिल बल्लाळ हे नव्या संकल्पना, उपक्रमशीलता, मेहनत, व्यावासायिक शिस्त आणि एकविसाव्या शतकातील नव्या युगाचा मंत्र या पंचसूत्रीच्या बळावर त्यांचा वारसा पुढे चालवीत आहेत. गेल्या तीन दशकांत ठाणे जिल्हा हा अवाढव्य वाढला असून लोकसंख्येचा दृष्टीस तो देशातील महाजिल्हा ठरला आहे. २०११च्या जनगणनेच्या अहवालानुसार जिल्ह्याची संख्या सव्वा कोटीच्या जवळपास पोहोचेल असा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची वाचनाची गरज पूर्ण करण्यासाठी, जिल्ह्यातून अधिकाधिक वृत्तपत्रे निघाली नसली तरच नवल! सागर, कोकण सकाळ, जनादेश, जनमुद्रा, दिनमान, वृत्तानंद, जनमत अशी कितीतरी नवीन वृत्तपत्रे या काळात निघाली. नवे विचार, नवीन उपक्रम, नवीन शैली, आक्रमकता आणि गुणवत्ता यांच्या माध्यमाद्वारे काहीतरी वेगळे देण्याचा आणि प्रगती करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणची प्रस्थापित दैनिके शहरात पहाटेच उपलब्ध होतात. जवळपास सर्व वृत्तपत्रांच्या ठाणे जिल्ह्याचा स्वतंत्र रंगीत पुरवण्यासाठी प्रसिद्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पत्रकारितेचा व्यवसाय झाकोळला गेला आहे. जीवघेण्या स्पर्धेला तोंड देत या वृत्तपत्रांचा प्रवास सुरू आहे.
ठाण्याच्या पत्रकारितेचा इतिहासात स.पां. जोशी, गडकरी, द.म. सुतार, भय्यासाहेब सहस्रबुद्धे, कृ. वि. पेठे, श्री,. वा. नेर्लेकर, आप्पा चंदन, श्याम घाटगे, नरेद्र बल्लाळ, नंदकुमार रेगे, अरविंद भानुशाली, सुधीर कोहाळे, सलमान माहिमी, सोपान बोंगाणे या पहिल्या व दुसऱ्या फळीतील शिलेदारांचे योगदान मोठे आहे. टेलिफोन, फॅक्स, कम्प्युटर, इंटरनेट अशा अनेक सोईसुविधांच्या अभावाला तोंड देत, त्यांनी जपलेल्या पत्रकारितेच्या धर्माला दाद द्यावीच लागेल.
विसाव्या शतकाच्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमे सुरू झाली. रामचंद्र तिखे यांच्या संपादकत्वाखाली निघणारे ठाणे वार्ता हे जिल्ह्यातील सर्वात पहिले व्हिडिओ केबल दैनिक म्हणता येईल. दृश्य माध्यमे खूप लोकप्रिय असल्याचे राजकीय नेते, सामाजिक संस्था, शासकीय अधिकारी, विविध संघटना, राजकीय पक्ष, शाळा-महाविद्यालये, साहित्यिक उपक्रम व सामाजिक कार्यकर्ते यांना एक चांगले व्यासपीठ आज उपलब्ध झाले आहे. कॅमेरामन, वृत्तनिवेदक, निवेदिका, डिटीपी ऑपरेटर्स एडिटिंग तज्ज्ञ आदी अनेकांना त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.
ठाणे जिल्ह्याची सर्वांगीण वाढ लक्षात घेता, वृत्तपत्रे व पत्रकार यांच्या संख्येत वाढ होणे स्वाभाविक आहे. वाचन, मेहनत, अभ्यास आणि शोध यामध्ये अधिक लक्ष घालून पत्रकारांनी जिल्ह्याची पत्रकारिता अधिक समृद्ध कशी होईल, हे पाहण्याची आवश्यकता आहे.
— श्री. वा. नेर्लेकर
#Journalism in Thane District
Leave a Reply