अमेरिकेमधे लोकांना सेल (Sale) चे भयंकर वेड आहे. इथे कायम कसला ना कसला सेल चालू असतो. न्यू इयर, व्हॅलेंटाईन, इस्टर, मदर्स डे, फादर्स डे, प्रेसीडेंट्स डे, मेमोरियल डे, लेबर डे, हॅलोवीन, हे ठरावीक निमित्ताने होणारे सेल झाले. त्याशिवाय प्रत्येक सीझन सुरू होण्याआधी, (स्प्रींग, समर, फॉल, विंटर) त्या त्या सीझनचा सेल असतो. झालंच तर सीझन संपत आला की पुढच्या सीझनचे कपडे, वस्तू झाडून झटकून दुकानात लावण्यापूर्वी, आधीच्या सीझनचा माल ‘end of season’ सेलमधे काढून टाकायचा असतो. इथे बरे लोकांना प्रत्येक सीझनला वेगळे वेगळे कपडॆ लागतात. हिवाळ्यात उणे २० आणि उन्हाळ्यात ८५-९० फॅरनहीट असं टोकाचं तापमान असल्यावर, ऋतुमानाप्रमाणे कपडे घालणं हे गरजेचंच असतं. बायकांच्या कपड्यांचे प्रत्येक सीझनमधे रंग वेगळे. आणि परत प्रत्येक वर्षी नवीन नवीन फॅशन्स येणार. मागच्या वर्षीच्या जुनाट फॅशन किंवा सीझनला न शोभणार्या रंग संगतीचे कपडे वापरले तर नाकं मुरडली जातात. पूर्वीच्या काळी आपल्याकडे जसं पुरुषांना दोन पाटलोणी आणि चार शर्ट असले आणि बायकांना चार लुगडी असली की दोन वर्ष बघायला नको, तसा प्रकार इथे नाही. शिवाय आपल्याकडे कसले आले आहेत सीझन! आठ महिने घामाने भिजायचं आणि चार महिने पावसात भिजायचं… त्यासाठी वेगळे वेगळे कपडे काय करायचेत ?
ठरावीक निमित्ताने होणार्या सेलमधे देखील, थॅंक्सगिव्हींग पासून ते ख्रिसमसपर्यंत तर काही बघायलाच नको. हा सबंध महिना, दीड महिना ‘हॉलिडे सीझन’ म्हणूनच मानला जात असल्यामुळे, सगळीकडे सेलच सेल चालू असतात. या सार्यातून काही दिवस मोकळे मिळालेच तर अगदी काहीच नाही तर ‘वीकएण्ड सेल’ असतोच. बहुदा मोठमोठया स्टोअर्समधे दोन आठवडे कुठल्याही सेल शिवाय गेले तर सेल्स मॅनेजरला नोटीस मिळत असावी.
या सेल्समधे सगळ्यात मोठा सेल असतो तो थॅंक्सगिव्हींगच्या दुसर्या दिवशीचा. थॅंक्सगिव्हींग हा म्हणजे पूर्णपणे अमेरिकन सण आहे. हा नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी असतो. याच्या मागची थोडी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. १५८४ साली, इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने, वॉल्टर रॅले यांना नवीन जगात वसाहती वसवण्याची परवानगी दिली. आताच्या नॉर्थ कॅरोलायना राज्याच्या जवळ, एका बेटावर, १५८५ आणि १५८७ साली, दोन वेळा वसाहती वसवण्याचा वॉल्टर रॅले यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर १६०७ साली, सध्याच्या व्हर्जिनीया राज्याच्या किनार्यावर, जेम्सटाऊन या नावाची वसाहत सुरू झाली. या सुरवातीच्या सर्व वसाहतीतल्या लोकांना, खाद्यपदार्थ व इतर सामुग्रीसाठी, मुख्यत्वे इंग्लंडहून कधीच्याकाळी येणार्या बोटींवर अवलंबून रहावे लागायचे. जेम्सटाऊन वसाहतीची देखील आधीच्या वसाहतींप्रमाणेच वाताहत झाली असती, पण स्थानिक अमेरिकनांकडून तंबाखूच्या पिकाची माहिती झाल्यावर, जेम्सटाऊनच्या लोकांनी तंबाखूचे उत्पादन करून युरोपात त्याची निर्यात सुरू केली. तोपर्यंत तंबाखूच्या बाबतीत युरोपियन्स पूर्णपणे अनभिज्ञ होते. त्यांना या तंबाखूची एकदा चटक लागल्यावर, अधिकाधिक लोकांची, या नवीन जगात जाण्यासाठी रीघ लागू लागली.
यानंतर अमेरिकेत येऊन स्थायिक व्हायचा प्रयत्न करणारे लोक म्हणजे पिलग्रीम्स. इंग्लंडमधे, या पिलग्रीम्सचा, त्यांच्या धार्मिक विचारांमुळे छळ होत होता. धर्मस्वातंत्र्याच्या शोधार्थ ते अमेरिकेत आले आणि त्यांच्या सुदैवाने, त्यांची गाठ पडलेले स्थानिक रेड इंडियन्स (आधीच्या वसाहतीतल्या लोकांशी संपर्क आल्यामुळे) चक्क इंग्रजी बोलणारे होते. या इंग्रजी बोलणार्या स्थानिक रेड इंडियन्सपैकीच एकाने या नवीन वसाहतीतल्या लोकांना मक्याची लागवड करण्याचा कानमंत्र दिला. त्याच्याच सहाय्याने या वसाहतीतल्या लोकांना स्थानिक वातावरणातल्या क्लृप्त्या, मासे पकडण्याच्या जागा वगैरे समजल्या. पहिले वर्ष निर्वेध पार पडलं. पहिलं पीक आलं आणि एकंदरीत या सर्व यशस्वी वाटचालीबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी (थॅंक्सगिव्हींग), वसाहतीतील लोक आणि स्थानिक रेड इंडियन लोक यांनी एकत्र येऊन मोठी मेजवानी केली.
तेंव्हापासून ही थॅंक्सगिव्हींगची प्रथा अमेरिकेत चालू आहे. थॅंक्सगिव्हींगच्या दिवशी सुट्टी असते आणि दुसर्या दिवशी मोठा सेल असतो. याला Black Friday असंही म्हणतात, कारण तोपर्यंत बहुतेक दुकानांचा व्यवहार तोटयातच (red) चाललेला असतो. परंतु थॅंक्सगिव्हींगच्या नंतरच्या शुक्रवारच्या एका दिवसातल्या सेलमधेच, सार्यांचा व्यवहार तोटयातून (red) नफ्यात (black) येतो, असा या सेलचा लौकिक! या दिवशी बहुतेक मोठी स्टोअर्स सकाळी सहा वाजताच उघडतात, आणि त्या सुरवातीच्या काही तासांमध्येच, वर्षातले सर्वात मोठे शॉपींग केले जाते. आम्ही इथे आल्यावर पहिल्या वर्षी (२००१) आम्हाला या सेलची काहीच कल्पना नव्हती. सेलच्या दुसर्या दिवशी, इतरांच्या बोलण्यांतून असा काही प्रकार असतो असे आम्हाला समजले. म्हणून दुसर्या वर्षी, थॅंक्सगिव्हींगच्या दोन तीन महिने आधीपासूनच आम्ही या सेलकडे डोळे लावून बसलो होतो.
– डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply