नवीन लेखन...

अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ४

Thanksgiving Sale in America - Part 4

दुसर्‍या दिवशी पहाटे चारला उठून प्रातर्विधी उरकून साडेचारपर्यंत घरातून निघायचे होते. लढाईची स्ट्रॅटेजी ठरवता ठरवताच साडेबारा वाजले होते त्यामुळे सगळे जण गजराची वाट पहात पहात झोपी गेलो. पहाटे गजर झाल्यावर एकच धांदल उडाली. सगळेजण लगबगीने तयार होऊ लागले. नोव्हेंबरचा महिना असल्यामुळे कडाक्याची थंडी पडली होती. सगळ्यांनी स्वत:ला गरम कपडयांत लपेटून टाकलं होतं. गुर्जरांचं घर पहिल्या मजल्यावर होतं. आम्ही खाली येऊन अंधारात गाडया सुरू करून सर्वांची वाट बघत होतो. मंडळी तयार होऊन निघू लागली तरी देशमुखांच्या कन्येचे लिपस्टीक आणि मस्कारा लावणे चालूच होते. “अग बाई, तुला कोणी बघायला येत नाहीये, चल नीघ आता एकदाची.” देशमुख बाईंचा आवाज खालपर्यंत ऐकू आला.

अनुपमाच्या गाडीच्या पाठोपाठ, मी आणि माधवराव आमच्या गाडीतून निघालो. पंधरा मिनीटांतच आम्ही शॉपिंग एरियात येऊन पोहोचलो. तिने गाडीतूनच खूण करून दाखवल्यावर, आम्हाला ज्या दुकानात जायचे होते ते आम्हाला दिसले आणि आम्ही त्या दुकानाच्या पार्कींग लॉट मधे गाडी वळवली. बाकीची मंडळी अनुपमाच्या गाडीतून पुढच्या दुकानांच्या दिशेने गेली. आम्ही बरोबर पहाटे पाच वाजता दुकानाशी पोहोचलो होतो. दोन मोठया दरवाज्यांपाशी पंधरा वीस माणसं आधीपासूनच रांगा लावून उभी होती. मी आणि माधवराव एकेका रांगेत उभे राहिलो. बघता बघता रांगा वाढायला लागल्या. त्या सबंध रस्त्यावर अनेक मोठमोठी दुकाने होती आणि प्रत्येक दुकानापुढचा प्रशस्त पार्किंग लॉट बघता बघता गाडयांनी भरून जायला लागला. दिव्यांच्या पिवळसर प्रकाशात, गरम कपडयात स्वत:ला गुरफटून घेतलेली माणसे कुडकुडत इकडून तिकडे फिरत होती. बहुतेक जण दोन, तीनच्या ग्रूपमधे होते. खिदळणं, सिगरेटी ओढणं आणि कॉफी पिणं सुरू होतं.

आजूबाजूला सेलफोन्स सारखे वाजत होते आणि थोडयाच वेळात माझ्या लक्षात आलं की लोक एकमेकांशी वेगवेगळ्या रांगांमधे उभे राहून संवाद साधत आहेत. आम्ही रात्री स्वत:ला मोठे strategy experts समजत होतो. पण हे लोक तर सेलफोनवरून एकमेकांशी बोलून ताज्या घडामोडींचा अंदाज घेत होते. आमच्याकडे काही त्यावेळेला सेलफोन नव्हते. त्यामुळे लढाईला तोंड लागण्या आधीच मुख्य फौजेपासून संपर्क तुटलेल्या तुकडीसारखी आमची अवस्था झाली होती.

मी आपला थंडीत कुडकुडत, चरफडत, अंधारात घडयाळाकडे बघत, दुकान उघडण्याची वाट बघत होतो. कानटोपी, हातमोजे आणि बेंगरूळपणे घातलेला मोठठाच्या मोठठा ओव्हरकोट यामुळे देशमुखांचे “सुंदर ते ध्यान”, त्या अपुर्‍या प्रकाशातही चटकन नजरेत भरत होते. बराचवेळ त्यांची काहीच हालचाल न झाल्यामुळे, ते बहुदा उभ्या उभ्याच झोपले असतील, अशी मी स्वत:ची समजूत करून घेतली. रांगेमधे एक तर बायका आणि मुली जास्त होत्या आणि त्यांच्या अखंड बडबडीने, सिगरेटच्या धुराने आणि बबलगमच्या ‘चकचक’ आवाजाने मी वैतागून गेलो होतो. पावणेसहा पर्यंत आमच्यामागे इतकी गर्दी झाली होती की सारा पार्किंग लॉट भरून माणसं फूटपाथवर उभी होती. मी मनातल्या मनात स्वत:च्या चातुर्याबद्दल आणि रांगेत एवढा पुढचा नंबर पटकावल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटत होतो.

जसजसे घडयाळाचे काटे सहा कडे सरकायला लागले तसतशी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. दुकानातील सेल्समन आणि सेल्सगर्लस् लगबगीने आत बाहेर करून लोकांची आतुरता आणखी ताणत होते. अखेर ६ वाजता दुकानांची दारं उघडली आणि काय होतंय ते कळायच्या आतच, मी पुढे ढकलला जाऊन दुकानात पोहोचलो. मी तिथे काही क्षण भांबावल्यासारखा उभा होतो आणि जर तुम्हाला दुकानात शिरल्यावर नक्की काय करायचे हे ठाऊक नसेल, तर तुमच्या रांगेतल्या नंबराला काहीही अर्थ नसतो हे मला तात्काळ समजले. एखादं धरण फुटून पाण्याचा लोंढा प्रचंड वेगाने सुसाट निघावा, तसा एक लोकांचा लोंढा दुकानाच्या दारातून, जीवाचा आटापिटा करत आत शिरत होता. माझ्या मागून येऊन लोकांनी इकडे तिकडे न बघता सरळ shopping carts कडे धाव घेतली.

– डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..