नवीन लेखन...

ठाण्यात भरलेली साहित्यसंमेलने

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला पद्माकर शिरवाडकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 


संयुक्त महाराष्ट्रातील पहिले मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान ठाणे शहराला मिळाला. दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि ७ व ८ मे १९६० या दिवशी ४२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे शहरात भरले. यापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर १९३२ साली, भारतरत्न पां. वा. काणे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण प्रांतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात भरले होते.

या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले ‘बदलापूर-माझा गाव’ चे लेखक ना. गो. चापेकर हे १९६० साली ठाण्याला भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या ४२व्या अधिवेशनाचे उद्घाटक होते. ही दोन्ही संमेलने ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पुढाकाराने भरविली गेली होती. दि. ५ व ६ डिसेंबर १९३६ रोजी मुंबई व उपनगर मराठी साहित्य संमेलनाचे तिसरे अधिवेशन विख्यात साहित्यिक मामा वरेरकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात भरले होते. हे अधिवेशन भरविण्यातही मराठी ग्रंथ संग्रहालयाचाच पुढाकार होता, मात्र मुंबई मराठी साहित्य संघाचाही या अधिवेशनाच्या आयोजनात वाटा होता हे नमूद करावयास हवे.

नव-महाराष्ट्र राज्यात भरल्या गेलेल्या पहिल्या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते व्हावे असा आग्रह स्वागत समितीच्या काही सभासदांनी धरला, परंतु या सूचनेस काही सभासदांचा विरोधही होता. वर्तमानपत्रात याचे वृत्तान्त आले- शेवटी यशवंतरावांऐवजी उद्घाटक म्हणून ना. गो. चापेकर यांची निवड झाली.

मराठी साहित्यात महाराष्ट्र सारस्वत हा संशोधनपर ग्रंथ लिहून ख्यातकीर्त झालेले ठाणे शहराचे सुपुत्र कै. वि. ल. भावे यांच्या स्मरणार्थ साहित्य संमेलन नगरास ‘महाराष्ट्र सारस्वतकार कै. वि. ल. भावे नगर’ असे नाव देण्यात आले. तोरणा किल्ल्याच्या दरवाजाची आठवण करून देणारी सजावट प्रमुख प्रवेशद्वारावर करण्यात आली. या प्रवेश दरवाजास कल्याणचे विख्यात लेखक ‘भारताचार्य चिंतामणराव वैद्य प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात आले, तर बाकीच्या तीन दरवाजांस महर्षी अण्णासाहेब कर्वे, राम गणेश गडकरी आणि होरारत्न शं. बा. दीक्षित अशी नावे देण्यात आली. मुख्य प्रवेशद्वाराजवळ संयुक्त महाराष्ट्रनिर्मितीच्या उठावात ज्यांचे बलिदान झाले, त्यांची स्मृती म्हणून स्तंभ उभारण्यात आला होता.

हे अधिवेशन महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर एकाच आठवड्यानंतर भरत होते त्यामुळे संमेलनाध्यक्ष प्रा. रा. श्री. जोग यांच्या, भाषणात संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांचा उल्लेख झाला. ते म्हणाले, ‘आज संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला खरा, परंतु तो अखिल महाराष्ट्र नाही याची बोच शिल्लक राहलेली आहेच. तो केव्हा होईल तेव्हा होवो., हृदयाने अपराजित राहून प्राप्तं प्राप्तं उपासितं ही जी शिकवण आपणास पूर्वी मिळाली आहे, तिचा अवलंब करून जे मिळाले आहे ते घेऊन, जे मिळवायचे राहिले आहे त्याकरिता प्रयत्न करीत राहणे आवश्यक आहे.’

महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेला मानाचे स्थान प्राप्त झाले पाहिजे या मुद्यांवर भर देताना प्रा. जोग म्हणाले, ‘आपला पत्रव्यवहार, आर्थिक व्यवहार, प्रवास, प्रशासकीय कारभार, न्यायदान इत्यादी दैनिक जीवनाच्या कित्येक अंगांतील आचार आपणास केवळ मराठीच्या साहाय्याने पार पाडता येत नाहीत. मला फक्त मराठी येते, इंग्रजी किंवा हिंदी येत नाही याची ओशाळगत किंवा चोरटेपणा मला वाटता कामा नये, हेच माझे मागणे आहे. इतरांची गैरसोय होऊ नये, म्हणून काहीही करण्यास हरकत नाही, पण माझ्या राज्यात माझीही गैरसोय होऊ नये ही अपेक्षा करण्यात काय चूक आहे? साहेबांच्या राज्यात इंग्रजी ऑनर्स घेऊन पदवी मिळविलेल्या पदवीधरास सचिवालयात अधिक महत्त्व मिळते असे ऐकिवात आले. हे खरे असेल तर आपल्या राज्यात मराठीचा विशेष अभ्यास केलेल्यास प्राधान्य मिळावयास हवे.’ जोग यांनी आपल्या भाषणात ललित वाङ्मय शुद्धलेखनाचा वाद इ. बाबींचाही उल्लेख केला. या संमेलनात ‘महाराष्ट्राचे स्वागत व स्वगत’ आणि ‘महाराष्ट्राचे साहित्यास आव्हान व आवाहन’ या दोन विषयांवर परिसंवाद झाले. काव्यगायन, ग्रंथप्रदर्शन या कार्यक्रमांचाही समावेश होता.

या संमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान जरी यशवंतराव चव्हाण यांना मिळाला नाही तरी या संमेलनास आपला संदेश पाठवून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या संदेशात ते म्हणाले, ‘यंदाचे साहित्य संमेलन हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ताबडतोब भरत असल्याने त्याचे महत्त्व विशेष आहे. आपली मायबोली जी मराठी भाषा, तिला राजभाषेचा दर्जा नसल्याबद्दल थोर साहित्यिक कै.माधवराव पटवर्धन यांनी काहीसे विषादपूर्ण उद्गार काढले होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर मराठी भाषेला हा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी योग्य ती पावले टाकण्यात येत आहेत, हे नमूद करण्यास मला आनंद होत आहे. महाराष्ट्र राज्याची मागणी प्रथम साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून करण्यात आली व नंतर तिला जनतेच्या मागणीचे स्वरूप आले. आपले कित्येक वर्षांचे स्वप्न अशा रीतीने साकार झालेले पाहून मराठी लोकांची मने आनंदाने व अभिमानाने फुलून आल्यास नवल नाही. महाराष्ट्राच्या मागणीस साहित्यिकांनी चालना दिली, त्याप्रमाणेच महाराष्ट्र एकरूप व एकात्म बनविण्याच्या कार्याच्या आघाडीवरही त्यांनी राहिले पाहिजे. शासनापेक्षाही साहित्यिक हे कार्य परिणामकारकरीत्या करू शकतील. कारण समाजाचे बौद्धिक नेतृत्व साहित्यिकच करीत असतात, असे मी मानतो.’

१९६० साली संमत झालेल्या ठरावातील महत्त्वाचे दोन ठराव असे-कोकणी ही मराठी भाषेचीच एक सुंदर व मधुर बोली आहे. त्या बोलीचे सौंदर्य आणि माधुर्य जोपासले जावे हे योग्य असले, तरी कोकणी ही स्वतंत्र भाषा म्हणून शिरगणतीच्या हिशेबास मराठीपासून तोडून दाखविणे मराठी भाषकांत फूट पाडण्यासारखे होईल-वगैरे. दुसरा ठराव म्हणजे, लोकप्रियतेच्या मोहाने उत्तानता, अश्लीलता इत्यादी मार्गाने वाङ्मयाला वैचारिक वळण देण्याचा अलीकडे चाललेला वाढता प्रयत्न मराठीच्या निकोप वाढीला विघातक होईल अशी या संमेलनाला भीती वाटते म्हणून महाराष्ट्र राज्यस्थापनेने मराठी भाषा सिंहासनाधिष्ठित होत असताना आणि अशिक्षित समाजात शिक्षणाचा झपाट्याने प्रसार होत असतानाच वाचकांची सदभिरुची वाढविण्याची साहित्यिकांवर विशेषच जबाबदारी पडते, असे या संमेलनाचे मत आहे.

१९६० साली झालेल्या ४२ व्या साहित्य संमेलनास अनेक प्रथितयश साहित्यिक उपस्थित होते. त्यामध्ये प्रा. श्री. के. क्षीरसागर, म.म. दत्तो वामन पोतदार, प्रा. अनंत काणेकर, राजकवी यशवंत, डॉ. शं. दा. पेंडसे, चिं. ग. कर्वे, प्रा. कृ. पां. कुळकर्णी, न. वि. गाडगीळ, डॉ. मा. गो. देशमुख, बा. रं. सुंठणकर, प्रा. वा. ल. कुलकर्णी, वा. रा. ढवळे, प्रा. माधव मनोहर, धों.वि.देशपांडे,इ.

या संमेलनाच्या समितीचे अध्यक्ष होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अॅड्. वामनराव ओक. आर्य क्रीडा मंडळाच्या विस्तीर्ण प्रांगणात झालेल्या या संमेलनाची निमंत्रणे जगातल्या पाच खंडांत स्वागताध्यक्षांच्या सहीने गेली होती. या संमेलनातून खर्च वजा जाता रु. ३३०६/- शिल्लक राहिले होते. ठाणे नगरपालिकेने या संमेलनास ३०० रुपयांची देणगी दिली होती तर महाराष्ट्र शासनाने ५०० रुपये अनुदान दिले होते.

दि.१ जानेवारी ते ३ जानेवारी १९८८ रोजी ६१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे येथे झाले. हा खरे म्हणजे योगायोगाचा भाग होता. सप्टेंबरअखेरीस तत्कालीन महापौर श्री. वसंतराव डावखरे यांनी पत्रकार श्री. किसन बले यांच्यामार्फत एक पत्र महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्हा शाखेचे त्यावेळचे अध्यक्ष कै. चिंतामण शंकर जोशी यांच्याकडे पाठविले. त्यात त्यांनी अ. भा. मराठी साहित्य संमेलन ठाण्यात घ्यावे व ते यशस्वी करण्यासाठी मी व माझे नगरसेवक सर्वतोपरी सहकार्य देऊ असे म्हटले होते. पत्र मिळताच तातडीने श्री.चिं. शं. जोशी यांनी म.सा.प. ठाणे कार्यकारी मंडळाची सभा बोलविली. या सभेत संभाव्य संमेलनासंबंधी सर्वांगीण विचारविनिमय केल्यावर, महापौर श्री. डावखरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना संमेलनासाठी लागणाऱ्या कामाच्या व खर्चाच्या व्यापाची कल्पना देण्यात आली. त्याच दिवशी श्री. चिं. शं. जोशी, अध्यक्ष श्री. पद्माकर शिरवाडकर, कार्यवाह श्री. किसन बले, श्री. डावखरे यांचे प्रतिनिधी या तिघांनी मुंबईस जाऊन (त्यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे कार्यालय मुंबई मराठी साहित्य संघाकडे होते) महाराष्ट्र साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे येथे घेऊ इच्छिते, असे पत्र महामंडळापुढे विचारार्थ ठेवले. ठाणे शाखेने फेब्रुवारी १९८० मध्येच महाराष्ट्र स्तरावरील यशस्वीरीत्या पार पाडलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या पाचव्या विभागीय साहित्य संमेलनाचा अनुभव लक्षात घेऊन (या दीड दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते नाटककार श्री. विद्याधर गोखले, उद्घाटक होते पत्रकार | साहित्यिक श्री. माधव गडकरी व स्वागताध्यक्ष होते तत्कालीन महापौर श्री. सतीश प्रधान) व महानगरपालिका देणार असलेले सहकार्य ध्यानी घेऊन ६१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे येथे घेण्यास महामंडळाने संमती दिली.

वस्तुतः हे संमेलन प्रवरानगर येथे होणार होते,पण त्यांना हवे असलेले अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांचा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांनी संमेलन घेण्यास असमर्थता प्रकट केली. संमेलनाच्या आयोजनास फक्त दोन महिने अवधी होता. त्यामुळे स्वागत समिती सभासद नोंदणीस त्वरित सुरुवात झाली. ३० ऑक्टोबर १९८७ रोजी बोलविलेल्या पहिल्या स्वागत समितीच्या सभेत स्वागताध्यक्षपदी तत्कालीन महापौर मा. श्री. वसंतराव डावखरे यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळ निवडण्यात आले, समित्या तयार करण्यात आल्या, त्यांच्या कामाचे स्वरूप व त्यांचे प्रमुख ठरविण्यात आले. संमेलनाध्यक्ष म्हणून अगोदरच सुप्रसिद्ध नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांची प्रवरानगर येथे होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. संमेलनाचे उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध गुजराती साहित्यिक श्री, गुलाबदास ब्रोकर यांनी बोलविण्याचे ठरले. त्यावेळचे कार्यकारी मंडळ होते-कार्याध्यश्र श्री. चिंतामण जोशी, कार्योपाध्यक्ष श्री. पी. सावळाराम, कार्यवाह सर्वश्री पद्माकर शिरवाडकर, अरुण मैड,पां.के.दातार व प्रकाश गीध, खजिनदार होते श्री. श्रीहरी भिडे. कविवर्य म. पां. भावे कार्यालय प्रमुख होते. संमेलनास फक्त दोनच महिन्यांचा अवधी उरला होता. त्यामुळे सर्वच समित्या उत्साहाने कामास लागल्या. वृत्तपत्रातून, नभोवाणी, व दूरदर्शन माध्यमातून संमेलनाला विस्तृत प्रसिद्धी देण्यात आली. या संबंधात आकाशवाणीवर चिं. शं. जोशी यांची मुलाखत घेण्यात आली. तसेच महापौर श्री. वसंतराव डावखरे व कार्याध्यक्ष जोशी यांची मुलाखत दूरदर्शनवर दाखविण्यात आली. सर्वश्री कविवर्य म. पां. भावे, रमण माळवदे, रवींद्र पिंगे व प्रा. केशव मेश्राम अशा चौघांचा संमेलनासंबंधी एक चर्चात्मक कार्यक्रमही मुंबई आकाशवाणी केंद्राने घडवून आणला. संमेलनासंबंधी माहितीपत्रके छापून ती गावोगावी पाठविण्यात आली. महामंडळ व म. सा. प. पुणे यांच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य वेळोवेळी घेण्यात आले.

शुक्रवार दि. १ जानेवारी १९८८ रोजी सकाळी सुरवातीस नियोजित संमेलनाध्यक्ष मा. प्रा. वसंतराव कानेटकर यांनी मासुंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून वंदन केले त्यानंतर अध्यक्षांची शहरातून बैलगाडीतून – बाहेरून खास बैलगाड्या आणण्याची व्यवस्था श्री. डावखरे यांनी केली होती शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा दादोजी कोंडदेव साहित्य नगरापर्यंत गेल्यानंतर प्रा. वसंत कानेटकर यांनी महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे व प्रा. म. वि. फाटक या दोन्ही प्रवेशद्वारांचे फीत कापून उद्घाटन केले व दादोजी कोंडदेव साहित्य नगरात प्रवेश केला. पुस्तक-विक्री गाळ्यांचेही उद्घाटन केले. सायंकाळी ४.३० वा. संमेलन सुरू झाले. या सोहळ्याचे निवेदन सौ. वासंती वर्तक व सौ. अंजली पाठारे यांनी केले. संमेलनाची सुरुवात शैलेश भागवत यांच्या सनई वादनाने झाली. त्यानंतर अनिरुद्ध जोशी, शरद जांभेकर व उत्तरा केळकर यांनी, कविवर्य प्रा. वसंत बापटलिखित महाराष्ट्रगीत व शारदा स्तवन सादर केले. मा. वसंत डावखरे यांच्या स्वागतपर भाषणानंतर सुप्रसिद्ध गुजराती साहित्यिक श्री. गुलाबदास ब्रोकर यांनी दीप प्रज्वलित करून संमेलनाचे उद्घाटन केले व त्यानिमित्ताने आपले विचार प्रकट केले. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. श्री. पु. भागवत यांचेही यावेळी भाषण झाले. पूर्वाध्यक्ष श्री. विश्राम बेडेकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. कानेटकर यांना अध्यक्षपदाची सूत्रे देऊन समयोचित भाषण केले. यावेळी पूर्वाध्यक्ष डॉ. वि. भि. कोलते, प्रा. वामनराव चोरघडे उपस्थित होते.

मा. वसंतराव डावखरे यांनी आपल्या स्वागताध्यक्षीय भाषणात ऐतिहासिक ठाण्याच्या विविध अंगांचा आढावा घेतला. शेवटी ते म्हणाले, “मी एक वारकऱ्याचा मुलगा आहे आणि वारकऱ्याची आवड कुठली ‘तर माझिया जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी’ तुमच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांची गुढी घेऊन मी या दिंडीत चालतो आहे. आज प्रत्यक्ष साहित्यपंढरी या एकेकाळच्या इ. स. ९९७ मध्ये कोकणची राजधानी असलेल्या श्रीस्थानक म्हणजे ठाणे शहरात अवतरली आहे. मी तृप्त आहे. एका वसंताचे स्वागत दुसरा वसंत करतो मग आनंदाला काय तोटा? नाटकातील ऋतुराज राजकारणातील वसंताला संगे घेऊन साहित्य मंडपात येतो आहे ही मोठी अपूर्व घटना आहे. हे दयावंत होऊन इथे आले आम्ही कृतज्ञ आहोत.”

संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत कानेटकर यांचेही भाषण उत्तम झाले होते. त्यांनी आपल्या भाषणात संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीसंबंधी बोलताना सांगितले, ‘अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा जर मराठी रसिकांनी साहित्यकाराला दिलेला एक सर्वोच्च बहुमान असेल – आणि तो आहेच- म्हणूनही या पदावर सर्वश्रेष्ठ साहित्यकाराची ‘निवड’च झाली पाहिजे. मी असे म्हणतो आहे कारण लोकशाहीचे गोडवे कितीही गायले तरी निवडणुकीच्या दाराने गुणवान माणूसच निवडून येईल याची आज तरी शाश्वती नाही. लटपट्यांच्या खटपटीलाच यश येण्याच्या या काळात खरी गुणवान माणसे निवडणुकीला उभी राहण्याच्या फंदात पडणारही नाहीत. म्हणून जिथे सत्तेचा वा संपत्तीचा प्रश्नच नाही अशा साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमाचा वैचारिक नेतृत्व करणारा अध्यक्ष निवडून नव्हे, तर निवड होऊनच अध्यक्षपदी विराजमान होणे जरूर आहे.’ संमेलनाची आवश्यकता विशद करताना ते म्हणाले, ‘न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी स्थापन केलेल्या साहित्य संमेलन आणि सामाजिक परिषद तसेच लोकमान्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सव आणि शिवाजी उत्सव या संस्था म्हणजे सर्वांगांनी मृतप्राय झालेल्या समाजाला जागृती आणण्यासाठी या मातीतून निर्माण झालेल्या चळवळी आहेत. पहिले साहित्य संमेलन १८७८ साली पुण्यात भरले, त्यांनीच नऊ वर्षांनंतर १८८७ साली मद्रास काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषद स्थापन करावी हा निव्वळ योगायोग नव्हता. साहित्य संमेलन आणि सामाजिक परिषद या दोन संस्था म्हणजे सख्ख्या बहिणी आहेत. शिक्षणाचे माध्यम आणि मराठी भाषेचे भवितव्य या विषयावरही त्यांनी आपले परखड विचार व्यक्त केले. मातृभाषेचे वाघिणीचे दूध पिऊन भाषाशक्ती बलदंड करण्याच्या वयात मुलांना इंग्लिश वाघिणीच्या तोंडात देण्याने त्यांच्या ग्रहणशक्तीचा कणाच मोडला जातो, हे आमच्या पालकांना कधी कळणार आहे? इंग्लिश उत्तम येण्यासाठी तरी मातृभाषा म्हणून मराठी उत्तम आली पाहिजे हा शिक्षणशास्त्राचा सिद्धान्त आहे. अन्यथा बुद्धिमान मुलांतून दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाचे नागरिक मात्र निर्माण होत राहतील.

पुढील दोन दिवसांत म्हणजे २ जानेवारी आणि ३ जानेवारी १९८८च्या दरम्यान परिसंवाद, मुलाखत, पाच कविसंमेलने, नामवंतांचे कथाकथन, शिवाय करमणुकीचे कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले होते. परिसंवाद होते. प्रा. वसंतराव कानेटकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘नाटक, वाङ्मयप्रकार की स्वतंत्र कला प्रकार’ यात सर्वश्री प्रा. राम शेवाळकर, प्रा. माधव मनोहर, प्रा. लक्ष्मण देशपांडे व विख्यात समीक्षक-लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी भाग घेतला. डॉ. व. दि. कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी साहित्याने उपेक्षिलेले जीवनानुभव’ परिसंवाद झाला. यात सर्वश्री ग. वा. बेहरे, डॉ. म. वि. गोखले, प्रा. अरुण कांबळे, श्री. कुमार केतकर व प्रा. डॉ. गं. ना. जोगळेकर यांनी भाग घेतला. कै. प्रा. डॉ. भीमराव कुळकर्णी यांच्या स्मरणार्थ मुंबई मराठी साहित्य संघ पुरस्कृत ‘आस्वादक समीक्षा’ या विषयावरही एक परिसंवाद झाला. यावेळी प्रा. गो. म. कुलकर्णी हे अध्यक्षस्थानी होते. आणि डॉ. अनुराधा पोतदार, डॉ. प्रल्हाद वडेर, डॉ. द. पं. जोशी, डॉ. सुधीर रसाळ यांचा त्यात सहभाग होता. परिसंवादाचा चौथा विषय होता ‘गझलचे मराठी कवितेवरील आक्रमण.’ यावेळी अध्यक्ष होते प्रा. शंकर वैद्य आणि यात श्री. सेतुमाधवराव पगडी, प्रा. अक्षयकुमार काळे आणि संगीतकार श्री. श्रीकांत ठाकरे यांचा सहभाग होता. ‘कलावंतांची आत्मचरित्रे’ या परिसंवादात प्रा. राम कापसे हे अध्यक्ष होते तर श्री. माधव गडकरी, प्रा.डॉ. वीणा देव, डॉ. अनंत देशमुख आणि श्री. बाळ सामंत यांचा सहभाग होता. विख्यात लेखक श्री. शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘मराठी कथेचे भवितव्य’ या परिसंवादात डॉ. भालचंद्र फडके, डॉ. गो. मा. पवार, डॉ. आशा सावदेकर आणि श्री. राजेंद्र बनहट्टी यांनी भाग घेतला होता. शेवटचा परिसंवाद म्हणजे ‘लोकसाहित्याची परंपरा आणि आजचे स्वरूप.’ डॉ. प्रभाकर मांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात डॉ. तारा भवाळकर, श्री. अशोकजी परांजपे आणि श्री. प्रकाश खांडगे हे सहभागी झाले होते. यावरून संमेलनात चर्चिले गेलेले विषय व सहभागी वक्ते किती ताकदीचे होते हे लक्षात येते.

दुसरे महत्त्वाचे कार्यक्रम म्हणजे श्री. श्री. ना. पेंडसे यांची प्रकट मुलाखत आणि कथाकथन. मुलाखत घेतली होती काँटिनेंटल प्रकाशनचे श्री. अनंतराव कुलकर्णी, ज्येष्ठ कादंबरीकार श्री. ना. सं. इनामदार व प्रा. माधवी चाफेकर यांनी तर प्रा. द. मा. मिरासदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथनात सर्वश्री शंकर पाटील, वि. आ. बुवा, व. पु. काळे व श्रीमती प्रतिमा इंगोले यांनी भाग घेतला होता.

कविसंमेलनातही बड्या कवींचा सहभाग होता. पी. सावळाराम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात दया पवार, वसंत सावंत, नारायण पेडणेकर, म. पां. भावे, किशोर पाठक, केशव मेश्राम, अरुणा ढेरे इत्यादी होते. तर प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात दामोदर मोरे, वंदना विटणकर, अशोक नायगावकर, प्रवीण दवणे, डॉ. र. म. शेजवलकर, रॉक कार्व्हालो, रजनी परुळेकर, सतीश काळसेकर, गुरुनाथ सामंत, अरुण म्हात्रे इत्यादींचा समावेश होता. अन्य कविसंमेलनातही चांगले कवी सहभागी झाले होते. नवोदित कवींन- विशेषतः मागासवर्गीय कवींना- योग्य तो न्याय कविसंमेलनात मिळाला नाही म्हणून ‘चक्रायु’ संस्थेच्या श्री. रवींद्र बागडे व तिच्या सदस्यांनी कार्याध्यक्ष श्री.चिं.शं.जोशी यांना घेराव घातला होता. म्हणून २५ मार्च १९८८ रोजी ६ वे कविसंमेलन आयोजित केले होते. त्यात सुमारे २५ मागासवर्गीय कवींनी भाग घेतला होता.

संमेलनातील कार्यक्रमांचे आयोजन दादोजी कोंडदेव साहित्य नगर, गडकरी रंगायतन व बेडेकर विद्यामंदिर येथे केले होते. संमेलनाचे कार्यालय मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या गच्चीवर होते. संमेलनात १२ ठराव पास करण्यात आले. स्थानिक कलाकारांच्या विविध कार्यक्रमांखेरीज गडकरी रंगायतनात ‘ही प्रीत राजहंसी’, ‘सूर्यास्त’, ‘लोककथा ७८’ ही नाटके सशुल्क आयोजित केली होती, मात्र या नाटकांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

बाहेरगावाहून आलेल्या सदस्यांची व्यवस्था ब्राह्मण सभा, ब्राह्मण सेवा संघ, दमाणी इस्टेट जवळील कल्पतरू इमारत व रंगायतन जवळील महिला मंडळ सभागृहात करण्यात आली होती. स्वागत समितीचे सभासदत्व ८०९ रसिकांनी स्वीकारले होते तर प्रतिनिधींची नोंद एकूण ४००३ होती.

१९८८ साली झालेल्या संमेलनाच्या आर्थिक उलाढालीसंबंधी येथे नोंद घेणे आवश्यक व प्रेरक वाटावे. एकूण जमा होती रु.६,३३,७६१/- यात ठाणे महानगरपालिका अनुदान ८.२ लक्ष व महाराष्ट्र शासन अनुदान एक लक्ष रुपयांचा समावेश आहे. विविध प्रकारचे खर्च वजा जाता संमेलन समितीकडे सुमारे तीन लक्ष रुपये शिल्लक राहिले. अर्थातच ही शिल्लक रक्कम महाराष्ट्र साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखा या आयोजक संस्थेकडे वर्ग करण्यात आली. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे २२ सप्टेंबर १९८८ रोजी आयोजित स्वागत समितीच्या जाहीर सभेत सनदी लेखापाल श्री. पी. डी. मराठे द्वारा तपासलेले हिशेब संमेलनाच्या वृत्तान्ताबरोबर देण्यात आले. यावरून ६१ वे संमेलन ठाणेकरांनी किती यशस्वी केले हे दिसून येतेच.

ठाण्यात साहित्यिक चळवळ, मेळावे, जिल्हास्तरीय संमेलने विविध संस्थांद्वारे सतत होतच असतात. यात महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठी ग्रंथ संग्रहालय व अन्य संस्थांचा सहभाग असतो. जानेवारी २००५ मध्ये झालेल्या महाराष्ट्र स्तरावरील कोकण मराठी साहित्य परिषदेद्वारा आयोजित नवव्या संमेलनाचा उल्लेख करायला हवा. या संमेलनाचे अध्यक्ष होते सुप्रसिद्ध पत्रकार माधव गडकरी व स्वागताध्यक्ष होते मा. श्री. सतीश प्रधान. दिमाखदार असे हे संमेलन एक छोटेखानी साहित्य संमेलनच होते.

अशी ही ठाण्यातील साहित्यसंमेलने.

– पद्माकर शिरवाडकर

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला पद्माकर शिरवाडकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..