1970 च्या सुमारास राज्य नाट्यस्पर्धेभोवती साऱया हौशी रंगकर्मींच्या आशा केंद्रित झाल्या असताना ठाण्यातल्या काही चळवळ्या युवकांनी कलेची सरगम छेडत ‘कलासरगम’ची स्थापना केली. राज्य नाट्यस्पर्धेत नवनवे प्रयोग करत, आधी प्रायोगिक व नंतरच्या काळात समांतर म्हटली जाणारी चळवळ त्यांनी ठाण्यात रुजवली.
नरेंद्रकुमार सोहोनी या ठाण्यातल्या पहिल्या नाट्यशास्त्र पदवीधराने पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या ‘कलासरगम’ने नाट्य-सादरीकरणाबरोबरच नाट्यतंत्र, संहिता निवड, प्रोसेनियमच्या बाहेरचे नाटक आदी विषयांबाबत जाणीवपूर्वक केलेल्या प्रयोगाला रसिकांनी आणि जाणकारांनी दाद दिली. अनेक चांगल्या परकीय नाटकांना रंगभूमीवर आणण्याचे धाडस करतानाच ‘कलासरगम’ने अस्सल मराठी बाजाची नाटकेही केली.
श्याम फडके लिखित ‘खोटे बाई आता जा’ आणि ‘काका किशाचा’, नाट्यशाळेतल्या अभ्यासावर आधारित ‘प्रवास पर्वताकडे’ (दिग्दर्शक कुमार सोहोनी), ‘अंधारयात्रा’ (दिग्दर्शक अशोक साठे), ‘क्षणतरंग’ (दिग्दर्शक विलास कणेकर), बहुपात्री ‘असंच एक गाव’, विजय तेंडुलकरांचे ‘विठ्ठला’, वसंत आबाजी डहाके यांचे ‘नारायणराव पेशवे अथवा कुणाचाही खून – संदर्भ भाऊबंदकी’, परदेशी नाट्यकृतीवर आधारित ‘अश्वमुद्रा’, ‘असायलम’, ‘कॅलिग्युला’ (दिग्दर्शक प्रा. विजय जोशी), ‘ॲमॅड्युअस’, ‘अनंगदेही’ (दिग्दर्शक दिलीप पातकर), विडंबननाट्य ‘आमच्या येथे श्रीकृपेकरुन’, विक्रम भागवत लिखित ‘घनदाट’ (दिग्दर्शक नरेंद्र बेडेकर), ‘जी. एं’ च्या कथेवरील ‘राधी’ (दिग्दर्शक विनायक दिवेकर) ही नामावली पाहिली तर कलासरगमची विविधता आणि प्रगल्भता लक्षात येते.
‘अश्वमुद्रा’साठी सायकलच्या रिम्सचा वापर करून उभारलेले नेपथ्य, ‘नारायणराव पेशवे’ साठी स्कॅफोल्डिंगच्या साहाय्याने उभारलेले नेपथ्य, ‘ॲमॅड्युअस’ यांमध्ये उभे केलेले रोमन, युरोपिअन वातावरण, ‘क्षणतरंग’मध्ये मंचावर केलेले जलाशय, कारंजे यांमुळे कलासरगमच्या नाटकाची सुरुवात नेपथ्याला टाळी मिळवूनच होई. त्यावेळी राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नेपथ्याला पारितोषिक नसे. पण ते पारितोषिक सुरू केल्यानंतर त्यावर कलासरगमने अनेकदा हक्क प्रस्थापित केला.
कलासरगमच्या नाटकांमधून भारती जोशी, साधना सोहोनी, उज्ज्वला टकले, उज्ज्वला वैद्य, क्षिप्रा क्षीरसागर या अभिनेत्रींनी आणि विजय जोशी, दिलीप पातकर, नरेंद्र बेडेकर या अभिनेत्यांनी अभिनयाची रौप्यपदके मिळवली. कलासरगमच्या वाटचालीत वसंत बापटसर, श्रीहरी जोशी, कवी अशोक बागवे, कवी निरंजन उजगरे, रंगभूषाकार राजाभाऊ गद्रे, सदानंद जोशी, मानसोपचारतज्ञ डॉ. महाजन, विक्रम भागवत, डॉ. र. म. शेजवलकर यांसारख्या अनेकांचा सहभाग लक्षणीय ठरला.
सुभाष काळे, संजय केळकर, मिलिंद चित्रे, राजीव फळटणकर, अनंत गोखले, सुहास डोंगरे, जगदीश बर्वे, योगेश पाटील, विलास जोशी, सुधा टिपरे, रंजना भडसावळे, अंजली पटवर्धन, सीमा कोल्हटकर, किशोर गुर्जर, सुषमा मालेगांवकर, सुभाष मालेगांवकर, उदय रिसबूड, वासंती वर्तक आदी कलाकारांनी विविध नाटकांत, एकांकिकेतून अभिनय केला आहे. अभिनयाबरोबरच विविध स्पर्धांचे आयोजन, नियोजन आणि आर्थिक बाजू समर्थपणे सांभाळत आहेत विजय चावरे.
त्याचबरोबर जनकवी पी. सावळाराम यांच्या गीतांचा कार्यक्रम ‘अक्षय गाणी’, या कार्यक्रमाचे सुमारे 250 प्रयोग केले तर वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई यांच्या गाण्यांचा ‘वसंत बहार’ हा कार्यक्रमही नियोजित करून त्याचेही प्रयोग केले.
कलासगरमचे एक कलाकार श्री. दिलीप पातकर यांचे दुःखद निधन 2004 मध्ये झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ कलासरगमतर्फे प्रत्येक वर्षी स्पर्धा भरविण्यात येतात. आमदार श्री. संजय केळकर यांच्यातर्फे भरविण्यात येणाऱया आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतही ‘कलासरगम’ आपला सहभाग स्पर्धेच्या आयोजनात दाखविते.
तेजस डोंगरे, अन्विता फळटणकर, गंधार बेडेकर ही पुढची पिढी कॉलेज एकांकिका स्पर्धा गाजवून व्यावसायिक नाटके, दूरदर्शन मालिका, चित्रपट निर्मिती क्षेत्रात आपले स्थान भक्कम करीत आहे. करिश्मा आठवले गाण्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे. कलासरगमची नाट्यपरंपरा आजही सुरू आहे.
साभार: ठाणे रंगयात्रा २०१६ मासिक.
Leave a Reply