नवीन लेखन...

ठाण्यातील नाट्यसंस्था – कलायतन

‘राम गणेश गडकरी रंगायतन’ सारखे भव्य आणि सुसज्ज नाट्यगृह, तसेच त्यानंतर विस्तारलेल्या ठाण्यासाठी बांधलेले ‘डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह’ या दोन नाट्यमंदिराचे दागिने अभिमानाने मिरवणाऱ्या आपल्या ठाणे शहराला तितकीच अभिमानास्पद, गौरवशाली नाट्यपरंपरा लाभली आहे. ठाण्याची ही रंगपरंपरा पाहिल्यावर लक्षात येतं की, ठाण्याच्या मातीतच नाटकाची बिजे रुजली आहेत आणि ठाण्याच्या पाण्यात गाणे मिसळलेले आहे. त्यामुळे या शहरात नाट्य-संगीत-नृत्य-चित्र-साहित्य या कलांचा वेलू अखंड बहरत राहिला आहे. ठाणे शहरामध्ये आजपर्यंत होऊन गेलेल्या आणि आजही कार्यरत असलेल्या नाट्यसंस्थांचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.


ठाणे शहराच्या इतिहासात डोकावल्यावर समजतं की, या शहरात पहिली नाट्यसंस्था (त्या काळच्या प्रघाताप्रमाणे नाटक मंडळी) स्थापन झाली ती सन 1881 साली. साताऱ्याचे कृष्ण बजाजी जोशी यांची ‘शाहू नगरवासी नाटक मंडळी’ ही संस्था बंद पडली होती. त्यांनी ती पुन्हा सुरू करण्याचे ठरवले. तेव्हा हे जोशी ठाण्याला राहायला आले होते. त्यांनी ठाण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्रीकौपिनेश्वर मंदिरासमोरच्या एका घरात ब्रह्मचाऱ्याच्या हातून ‘श्रीशाहू नगरवासी नाटक मंडळी’ चा नारळ फोडून घेतला. ही कंपनी नव्याने सुरू करताना त्यांना नटसम्राट गणपतराव जोशी (शिरवाडकरांनी आपल्या ‘नटसम्राट’ नाटकातील गणपतराव बेलवलकर ही व्यक्तीरेखा यांच्यावर बेतली आहे.) आणि बाळासाहेब जोग या जोडीची साथ मिळाली. पुरुष व्यक्तिरेखांमध्ये गणपतराव आणि स्त्री भूमिकेत बाळासाहेब ही जोडी नाट्यरसिकांनी ‘गणू – बाळा’ ची जोडी म्हणून डोक्यावर घेतली होती. पुढे गणपतराव नेहमी अगदी कौतुकाने सांगत असत की ‘आपल्या कलेचं आद्यस्थान ठाणे आहे’. मात्र त्या नंतरच्या काळात ठाण्यात फक्त नाटकाचे प्रयोग करणारी नाट्यसंस्था स्थापन व्हायला, स्वातंत्र्याचा सूर्य उजाडावा लागला. मधल्या काळात हनुमान व्यायामशाळा, आर्य क्रीडा मंडळ, आनंद भारती समाज, ब्राह्मण सभा, मावळी मंडळ अशा अनेक संस्था नाट्यप्रयोग सादर करत होत्या. मात्र ठाण्यात नाट्यसंस्था निर्माण होऊ लागल्या त्या 1950 नंतरच.


कलायतन

1952 साली आर्य क्रीडा मंडळ या संस्थेची वास्तू गावदेवी मैदानात उभी राहिली. त्यानंतर मंडळाच्या अनेक उपक्रमांबरोबरच नाट्यचळवळही सुरू झाली.

संस्थेचे संस्थापक श्री. हरिभाऊ वीरकर यांच्याच मार्गदर्शनाखाली ‘कलायतन’ ही नाट्यसंस्था स्थापन झाली.
श्रीधर रणदिवे, मनोहर कारखानीस, सुरेंद्र ताम्हाणे, श्याम वैद्य, प्रल्हाद वैद्य, लता सावंत, मीना प्रधान, रेखा प्रधान, शरयू चव्हाण या व अशा अनेक नवोदित कलाकारांना रंगमंच उपलब्ध झाला. या सर्वांचा म्होरक्या बनला ‘चंदा रणदिवे’. त्यांनी एकांकिकेची चळवळ महाराष्ट्रात प्रथमच ठाणे येथे सुरू केली. या नाट्यप्रकाराला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ‘एकांकिका’ या नाट्यप्रकाराची मुहूर्तमेढ ठाण्यात खऱ्या अर्थाने रोवली गेली.

या संस्थेने शासनाच्या नाट्यस्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविली. यशवंत रांजणकर यांच्या ‘जिद्द’ या नाटकाला दिग्दर्शनाचे पारितोषिक, तर अभिनयाचे प्रथम पारितोषिक चंदा रणदिवे यांना मिळाले. त्यानंतर प्र. के. अत्रे यांच्या ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकात मनोहर कारखानीस, उषा गुप्ते यांना उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसे मिळाली. ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘कवडीचुंबक’ या व इतर अनेक नाटकांचे प्रयोग सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सादर केले गेले. अशा रितीने या संस्थेने 50 वर्षांपूर्वीच ठाण्यात नाट्यचळवळ यशस्वीरित्या रुजविली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..