शंकर कृष्ण ताथा नाना जोशींनी 1965 साली ‘नाट्याभिमानी’ची स्थापना केली. त्यांचे सुपुत्र शशी जोशी यांनी इतर नाट्यप्रेमी मित्रांसह संस्थेला आकार दिला आणि ठाण्याच्या नाट्यवर्तुळात ‘नाट्याभिमानी’चे स्वतंत्र स्थान निर्माण केले. सुरुवातीला ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘काका किशाचा’, ‘मुंबईची माणसे’ अशा लोकप्रिय नाटकांचे प्रयोग केल्यानंतर 16 जानेवारी 1965 रोजी डॉ. मधुसूदन शंकर जोशी लिखित आणि श्री. दत्तोपंत काणे दिग्दर्शित ‘हरवले ते गवसले का?’ ही पहिली नवीन नाट्यकृती सादर केली. 1971 साली शशी जोशी लिखित ‘त्रिकोणी प्रेमाची पॉलिसी’ या नाटकाच्या निमित्ताने संस्थेचा रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर करण्यात आला.
1972 साली संस्थेने शशी जोशी लिखित आणि दत्तोपंत काणे दिग्दर्शित ‘सुराविण तार सोनियाची’ या नाटकाद्वारे राज्य नाट्यस्पर्धेत प्रवेश केला. पुढे 1981 पर्यंत ‘खरी माती खोटा कुंभार’, ‘यांनी घडविला शिवराया’, ‘मृगजळावर एक सावली’, ‘बायको उडाली भुर्रर्र’, ‘प्रथम पुरुषी एकवचनी’, ‘पत्यात पत्ता’, ‘कलिकवच’ अशी वेगवेगळ्या प्रकृतीची नाटके सादर करून राज्य नाट्य महोत्सवाप्रमाणेच, कामगार कल्याण केंद्र, आळतेकर स्पर्धा, यांतही पारितोषिके मिळवली. नाट्याभिमानीमधून सुभाष सावरकर, श्रीराम देव, मंजिरी देव, श्रीकर जोशी, प्रकाश टिपणीस, बाबा खानविलकर, मेघना मेहंदळे, वत्सला जोगळेकर, प्रविण जोशी, अरविन्द सहस्रबुध्दे, धनंजय कुलकर्णी इत्यादी कलाकारांनी आपली रंगयात्रा सुरू केली.
नाट्यप्रयोगांप्रमाणेच ‘गुटेनबर्गवरील आयोग’, ‘सावरकरांची काव्यसरिता’, ‘शताब्दी ध्येयभक्ताची’ असे नावीन्यपूर्ण आशयघन कार्यक्रमही संस्थेने वेळोवेळी सादर केले. ‘नाट्याभिमानी’च्या मागच्या पिढीने 1978 साली श्याम फडके लिखित ‘का? असंच का?’ या समस्याप्रधान नाटकाचे अभिवाचन केले होते, तर 2003 मध्ये नव्या पिढीने मंगला गोडबोले लिखित ‘झुळूक’ या खुमासदार लेखमालेचे अभिवाचन केले. शशी जोशींनी गाजवलेल्या शशिकांत कोनकर लिखित ‘उचक्या’ या एकपात्री कार्यक्रमाचा बहुपात्री आविष्कार 1994 मध्ये 35 कलाकारांच्या संचात सादर करण्यात आला. ‘नाट्याभिमानी’ चे संस्थापक शंकर कृष्ण तथा नाना जोशी यांच्या स्मरणार्थ अभिनय, लेखन, गायन, वादन, वाद्यवादन, अशा विविध स्पर्धा भरविल्या होत्या. गेली 18 वर्षे शशी जोशी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी अभिनय स्पर्धा भरविण्यात येते.
साभार: ठाणे रंगयात्रा २०१६ मासिक.
Leave a Reply