राज्य नाट्यस्पर्धेमध्ये नेहमी चाकोरीबाहेरची नाटके करून जाणकारांची दाद मिळवणारी ठाण्यातली संस्था म्हणजे ‘नाट्यछंदी.’ 11 जून 1982 रोजी अच्युत भोसेकर, आशिष मेढेकर, सविता इनामदार, साधना लेले, मीरा लेले यांनी ही संस्था स्थापन केली. ‘रूपमहालातील राजकन्या’, ‘गाणारी मैना’, रॉबिन हूड, अदृश्य माणूस, गोट्याची कमाल दे धमाल ही बालनाट्ये आणि ‘ही का ती, ती का ही’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘आपलं बुवा असं आहे’, ‘वरचा मजला रिकामा’ अशी नाटके आरंभीच्या टप्प्यात सादर करणाऱया ‘नाट्यछंदी’ने एकांकिका स्पर्धांमध्ये ‘कॉकी पॉपीची गोष्ट’, ‘टेम्पल एम्प्लॉयमेंट’, ‘स्वप्न परी माझे’, ‘ऋणानुबंध’, ‘नावात काय आहे?’ या एकांकिका सादर करून पारितोषिके पटकावली. त्यानंतर ‘नाट्यछंदी’चा राज्य नाट्यप्रवास सुरू झाला. 1989 साली सतीश आळेकरांचे ‘महानिर्वाण’ सादर करून या संस्थेने जाणकारांचे लक्ष वेधून घेतलं. गजेंद्र अहिरे लिखित ‘कॉकी पॉपीची गोष्ट’, उदय निरगुडकर लिखित ‘महायात्रा’, श्रीहरी जोशी लिखित ‘थिएटर’, ‘काजळ डोह’, ‘दर्शन दिग्दर्शन’, ‘सावल्या हरवलेल्या बाहुल्या’, ‘असा हा खेळ’ अशी नाटके 1997 पर्यंत सातत्याने सादर करून ‘नाट्यछंदी’ ठाण्याची नाट्य-पताका राज्य नाट्यस्पर्धेत डौलाने फडकत ठेवली. प्राथमिक फेरीपासून ते अंतिम फेरीपर्यंत सर्वोत्कृष्ट नाटक, अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना अशी चौफेर पारितोषिके मिळवून ‘नाट्यछंदी’ने नाट्यवर्तुळात आपला दबदबा निर्माण केला.
नव्वदच्या दशकात मात्र ठाण्यातील हौशी नाट्यचळवळीला काहीशी मरगळ आली. कारण या सगळ्या हौशी नाट्यसंस्थांचे उपक्रम ज्या राज्य नाट्यस्पर्धेभोवती केंद्रिभूत झालेले होते, ती राज्य नाट्यस्पर्धा ठाणे शहराबाहेर गेली. गडकरी रंगायतनसारखे हक्काचे थिएटर असतानाही ठाणे शहरात होणारी राज्य नाट्यस्पर्धा विविध कारणास्तव बाहेर गेली आणि याच काळात टीव्ही चॅनल्सचा उगम झाला. त्यामुळे रंगकर्मींना नवे माध्यम उपलब्ध झाले आणि रंगमंचाकडे येणारी पावले स्टुडिओकडे वळू लागली. मात्र या संक्रमणाच्या काळातही ठाण्यातली हौशी नाट्यचळवळ पूर्णपणे थंडावली नव्हती. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, कल्पना एक आविष्कार अनेक, सवाई एकांकिका स्पर्धा यातून ठाण्यातील नाटकवाले आपले अस्तित्व जाणवून देत होतेच.
साभार: ठाणे रंगयात्रा २०१६ मासिक.
Leave a Reply