संगीत शिक्षिका वर्षा दांदळे…
रंगभूमी, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रांत स्वतःचा वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे.
मुंबई महापालिकेत संगीत शिक्षिका म्हणून नोकरी करत असतानाच शाळेतल्या मुलांची नाटकं, गाणी बसवण्यात गुंग झालेल्या शिक्षिकेला मुलांचा उत्तम अभिनय पाहून एका परीक्षकानं तिचा स्वतःचा अभिनय देखील सुरेख असेल अशी पोचपावती दिली. याच शाबासकीच्या जोरावर पुढे प्रायोगिक रंगभूमीवर आपली कला सादर करण्याचा निर्धार या शिक्षिकेने केला आणि पुढे तब्बल दहा-बारा वर्षे नाट्य क्षेत्रात ही शिक्षिका चांगलीच रमली. याच अनुभवाच्या जोरावर व्यावसायिक रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर आपला कसदार अभिनय सादर करत मराठी इंडस्ट्रीत आपल वेगळं स्थान हिनं निर्माण केलं. ‘बोलते ती टुच्ची आणि करते ती वच्छी’ असं ठसक्यात बोलणारी ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतील ‘वच्छी आत्या’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहचलेली ही शिक्षकी पेशातील अभिनेत्री म्हणजे वर्षा दांदळे.
२०१३ साली एका नामांकित मराठी वृत्तपत्रासाठी वर्षा दांदळेचं फोटोशूट करण्यासाठी आम्ही भेटलो होतो. वर्षा तेव्हाही मुंबई महापालिकेच्या शाळेतच नोकरीला होती. दोन-तीन दिवस सतत आम्ही शूटसाठीची तारीख ठरवत होतो, परंतु वर्षाची शाळेतली नोकरी, व्यावसायिक कामं यामुळे आमची वेळ काही केल्या जुळत नव्हती. त्यातच नोकरी मुंबईत, तिची सुरू असलेली कामं मुंबईत, शूट ठाण्यात आणि तिचं घर डोंबवलीत असं सारं गाठण्यासाठी तिला तारेवरची कसरत करायला लागणार होती. ही कसरत तिनं एकदा जुळवून आणलीच आणि आम्ही २०१३ सालच्या ऑक्टोबर महिन्यात भेटलो. शाळा संपवून वर्षा दुपारी अडीच-तीन वाजता स्टुडिओत आली. वर्षाचा आजवरचा अभिनय, तिने साकारलेली पात्रं ही लक्षात घेऊन तिचं फोटोशूट करायचं आम्ही ठरवलं.
या शूटवेळी वर्षाशी बोलताना तिनं आजवर साकारलेल्या पात्रांबाबत मी तिला विचारलं. मराठी रंगभूमीचा अविभाज्य घटक असलेल्या ‘तो मी नव्हेच’ आणि ‘नटसम्राट’ या नाटकांत वर्षाने महत्त्वाची पात्रं रंगवल्याचं तिनं सांगितलं तर रुपेरी पडद्यावर ‘स्वराज्य’ आणि ‘धुडगूस’ या सिनेमांत आणि ‘भैया हातपाय पसरी’, ‘अनधिकृत’, ‘ग्रँडफादर’ अशा अनेक नाटकांत तिनं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. यातील अनेक नाटकांचे तर शेकडो प्रयोग झाले होते. छोटय़ा पडद्यावर ‘भाग्यलक्ष्मी’, ‘कृपासिंधू’, ‘शुभंकरोति’, ‘मालवणी डेज’, ‘कादंबरी’, ‘लक्ष्मणरेषा’ आदी मालिकांत वर्षाने विविध पात्रं लीलया रंगवली होती. त्यावेळच्या गमतीजमतीवर बोलत असतानाच आम्ही फोटोशूटला सुरुवात केली.
२०१३ सालापर्यंतचा वर्षाचा अभिनय क्षेत्रातला प्रवास, तिने रंगवलेली विविध पात्रं ही लक्षात घेऊन आम्ही फोटोशूट करत होतो. एखाद्या पात्राविषयीचा ती अभ्यास कसा करते याविषयी बोलताना वर्षाने अनेक बाबी उलगडून सांगितल्या. व्यक्तिरेखेतले बारकावे, व्यक्तिरेखेतील गमती, तिच्यातल्या खाचाखोचा बघणं, चालणं-बोलणं, वयानुसार तिच्यातले बदल लक्षात घेऊन अभिनय साकारणं हे सार अभ्यासावं लागतं आणि तरच शेवटी त्या पात्राला न्याय देता येतो असं वर्षा सांगते. वर्षाची हीच अभ्यासू वृत्ती हेरून आम्ही तिला अभिनय साकारता येतील असे पात्र कॅमेऱयात बंदिस्त करत होतो. यावेळी वर्षाच्या चेहऱयावरचे क्षणार्धात बदलणारे हावभाव, त्यानुसार तिच्या हाताच्या हालचाली, डोळ्यांचा आकार, कपाळावरील आटय़ा या साऱया काही मिनिटांतच मला पाहायला मिळाल्या आणि त्या कॅमेऱयात बंदिस्तदेखील करता आल्या. अवघ्या काही मिनिटांत वर्षाने साकारलेली ही पात्रां म्हणजे तिच्यातल्या हाडाच्या कलाकाराचं त्यावेळी झालेलं दर्शनच होतं.
वर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. काही साच्यातले स्टुडिओत काढलेले तर काही नाटक, सिनेमे, मालिका यांच्यावेळचे कॅण्डीड होते. या फोटोंपेक्षा वेगळा फोटो मला हवा होता आणि म्हणूनच वर्षाचं एक शूट झाल्यानंतर दुसरं शूट हे वेगळं कसं करता येईल यासाठीची माझी धडपड सुरू होती. तिच्या पेशाला अनुसरून हे शूट कसं करता येईल या विचारात मी होतो. शिक्षकी पेशा असलेल्या वर्षाचं वेगळं शूट करण्यासाठी मग तिच्या बाजूला एक पांढरा बोर्ड आणून ठेवला. शिवाय या बोर्डावर दोनाचा पाढा लिहिला होता. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी हा फोटो महत्त्वाचा ठरणार होता. फोटो काढताना वर्षाला मी पूर्वकल्पना न देता केवळ या बोर्डाच्या बाजूला शिक्षिकेच्या पात्रात तुम्ही असाल तर कसे हावभाव असतील असं विचारून मी त्यांचे हे भाव टिपत होतो. शूट झाल्यानंतर वर्षाला त्यामागची कल्पना मी सांगितली. आधी काढलेले फोटो पाहून वर्षाला आनंद तर झालाच शिवाय नंतरच्या फोटोंत तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू चांगल्या पद्धतीने प्रतिबिंबित केल्याने तिच्या चेहऱयावरचं स्मितहास्य पाहण्याजोगं होतं.
— धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
Leave a Reply