नवीन लेखन...

मन कि बात – तज्ज्ञ

‘तज्ज्ञ’ या कुळाबद्दल मला नितांत आदर वाटतो. मलाही त्यांच्याप्रमाणे तज्ज्ञ होता यावं यासाठी मी नेहेमी प्रयत्नशील असतो. तज्ज्ञ कसं होता येतं, हे मला फारसं कळत नसलं तरी त्यासाठी खुप म्हणजे खुपच अभ्यास करावा लागतो हे ऐकीव माहित होत. अभ्यास, तो ही साधासुधा नव्हे, तर जाड जाड ग्रंथातून, हे ही ऐकुनच माहित होतं. असं काहीबाही ऐकून माझी छाती (फक्त ३५ इंचं असलेली) दडपून जाते.

लहानपणी कोणाकोणाची काय काय महत्वाकांक्षा असते, मोठेपणी काय काय व्हाव अस वाटत असत, तसं मला लोकांनी तज्ज्ञ म्हणून ओळखावं, असं खूप वाटायचं. तज्ज्ञ होण्यासाठी काही अटी शर्ती असतील तर मला माहित नव्हतं परंतु माझा त्या दिशेने प्रयत्नही सुरु असायचा. मी तज्ज्ञ होण्यासाठी काय करायला हवं, याची माहिती घेण्याचा माझ्या परिचयातल्या लोकांकडे खुप प्रयत्न केला, परंतु माझ्या बौद्धिक पातळीवरच्या कोणालाही तज्ज्ञ होण्यासाठी काय करायला हवं हे सांगता येईना. कित्येकांना तर असं काही असतं हेच माहित नव्हतं. मग थोड्या वरच्या पातळीवर चवकशी केली. त्यांचं म्हणणं तर हल्ली कोणीही तज्ज्ञ होऊ शकतो/शकते असं पडलं. गुगल आणि विकीपेडीया मुळे कोणीही तज्ज्ञ होऊ शकतो आणि नियम असेल, तर तो गुगल/विकिपेडीया नियमित वाचणं आणि त्यात आपली स्वतःची मत घुसडणं हाच असतो, असं त्यांनी ठासून सांगीतलं. मला हे तितकसं पटलं नाही, कारण मी ही कारणपरत्वे गुगलमावशी आणि विकीकाकांचा आधार घेत असतो, पण मला अद्याप कोणी तज्ज्ञ वैगेरे म्हटलेलं आठवलं नाही. उलट मी काहीतरी वेड्यासारखा विचार करतो, हेच आडून आडून आणि थेटही ऐकायला मिळालं.

मग मी ठरवलं, की आता थेट अशा तज्ज्ञ म्हणून ओळख असलेल्या व्यक्तींनाच विचारायचं. बरोबर ना, अधे मधे चवकशी करून स्वत:चाच गोंधळ वाढवण्यात काय हशील? म्हणून थेट एका तज्ज्ञ अशी ओळख असलेल्या महानुभावानाच गाठायचं ठरवलं. माझी काही थेट ओळख नव्हती त्यांच्याशी, पण माझ्या एका मित्राचा त्यांच्याशी परिचय होता. त्याला गाठलं आणि म्हटलं, “अरे यार माझी पाच मिनिटांसाठी गाठ घालून दे की त्यांची”. मित्राने आश्चर्याने विचारलं, की “ तुझं काय काम त्याच्या कडे आणि पाच मिन्टच कशाला, दोन तास बोल, देतो गाठ घालून. आम्ही नेहेमी ‘बसतो’, तिथं ये उद्या”. आता मला माझ्या त्या मित्राबद्दल आदर वाटू लागला. तज्ज्ञाबरोबर नेहेमी बसणारा मित्रही महानच असला पाहीजे. पण ते दुसरं मन असतं ना, ते काही मानेना. कारण ह्या माझ्या मित्राशी माझी मैत्री गेली ४० वर्षांची आहे. शाळा कॉलेजात जेमतेम पास होत होत आलाय इथपर्यंत. शिक्षण नसलं तरी स्वभावाने लटपट्या असल्याने पैसाही बऱ्यापैकी कमावतोय. रम-रमीचा शौकीन असलेल्या या मित्राच्या नेहेमीच्या बैठकीत ‘तज्ञ’ असतात हे ऐकून माझा मित्राबद्दलचा आदर वाढला ना राव. चाळीसएक वर्ष सोबत असून आपण याला ओळखू शकलो नाही, म्हणून मी स्वत:चाच मनातल्या मनात निषेध केला. असंच होतं, जवळच्या व्यक्तीच्या अतिपरिचयामुळे, तिच्यातले गुण लक्षात येत नाहीत.

मग विचार केला की आपण मित्रालाच विचारू, की तज्ज्ञ म्हणजे काय ते. कारण तो नेहेमी त्या तज्ज्ञ साहेबांसोबत ‘बसत’ असल्याने, त्यालाही त्यांचा परिसस्पर्श झालेला असणारच. त्या तज्ज्ञ  साहेबांच्या ज्ञानाचे दोन-चार ‘थेंब’ मित्रावर उडाले असणारच हे गृहीत धरून मग त्यालाच विचारलं, की त्यांच्यासारखं तज्ज्ञ मला व्हायचं असेल, तर मला काय करावं लागेल म्हणून. मित्रानं लांब चेहेरा केला, माझ्याकडे तुच्छतेने बघीतलं. मला वाटलं, की माझं काहीतरी चुकलं म्हणून. मी कावरा बावरा होऊन सॉरी म्हणणार, इतक्यात तो म्हणाला, “तुला असा चेहेरा करता आला पाहीजे आणि अशी नजर मारता आली पाहीजे ही पहीली अट”. मी लगेच भानावर आलो. हे थोडं अवघड वाटलं मला कारण माझ्या मनातल्या गोष्टीतलं थेट प्रक्षेपण चेहेऱ्यावर आणि डोळ्यांतही एकदम लाईव्ह दिसतं. माझं तज्ज्ञ होण्याच्या स्वप्नाच्या दिशेची पहिली पायरी जरा जास्तच कठीण वाटली. दुसरी पायरी कशी असेल म्हणून त्याला विचारलं, “आणखी काय करावं लागतं?”. मित्र, “इंग्लीशमधे बोलायचं. समोर ठार अडाणी किंवा बहिरा असला तरी इंग्लीशमधेच बोलायचं. समोरच्याला कळायलाच हवं असा आग्रह धरायचा नाही. रादर, त्याला कळणार नाही याची काळजी घ्यायची. समोरच्याला कळलं की त्याच्या नजरेत तज्ज्ञाची किंमत कमी झालीच म्हणून समज”. आयला हे ही अवघडच होतं. माझं स्वप्न धुसर होताना दिसू लागलं.

मित्र पुढे म्हणाला, “समोरचा जे मत मांडेल, त्याच्या विरोधी मत एकदम ठासून मांडायचं. कोणत्याही गोष्टीत मतभेद असणं ही तज्ज्ञ  म्हणून ओळखलं जाण्यासाठी सर्वात मुलभूत अट आहे. किंबहूना ज्यांच्यात जाहीर मतभेद असतात, त्यांनाच तज्ज्ञ म्हणून अज्ञ लोक जाणतात. खुपसे जड इंग्रजी शब्द, मोठमोठ्या देशी, परदेशी पुस्तकांची नांवं बोलताना पेरावीत. मोठमोठे संत, फारीनचे लेखक यांची खरीखोटी नांवं घेऊन, त्यांची खरी खोटी वचनं समोरच्याच्या तोंडावर फेकावीत (‘फेकणे’ म्हणजे आपण थापा मारतो ते नव्हे, तर बोलणे. आपण बोलतो ते फेकतो, तज्ञ फेकतात, ते बोलतात. हा अज्ञ आणि तज्ञ मधला ठळक फरक आहे-इती मित्र.). एवढं झालं की मग तू तज्ज्ञ  झालाच असं समज”. मित्राने ठामपणे सांगीतलं.

मला एकूण प्रकरण हाताबाहेर जाताना दिसू लागलं. तज्ज्ञ बनण्याचं माझं स्वप्न, स्वप्नच राहाणार याची खात्री पटत चालली. तरी धीर करून शेवटचा प्रश्न विचारला, “ते तर एवढे मोठे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात, तरी तू त्यांच्याबद्दल असं का म्हणतोस?”. मित्र, “यार, इतके दिवस त्यांच्यासोबत बसून बसून मलाही आता काहीतरी कळायला लागलं. कालचं मत आज नाही आणि आजचं उद्या नाही अशी सर्व गोष्ट. नविन माणसावर इंप्रेशन पडतं, माझ्यावरही पडलं, पण आता माहित पडली अंदर की बात.” मित्राने किंचित पाॅज घेऊन पुढे सांगीतलं, “एक शेवटचं, दुसरा कुणीतरी बिल भरणार असलेल्या पार्टीत, हाॅटेलात जाऊन तोच कसा चुकतोय हे त्याचंच खाऊन बोलता आलं पाहिजे. मग तू तज्ज्ञ म्हणून मान्यता पावलाच म्हणून समज.” मी पुढे काही काही विचारायच्या आत मित्रच पुढे म्हणाला, “हा माझा अनुभव, मी कसा चुकीचं आहे हे माझ्याबरोबर बसून मलाच सांगतात ते. पहिल्यांदा मी सिरीयसली घेतलं, पण आता ते तज्ज्ञ म्हणून मान्यता पावलेत सगळीकडे, तेंव्हापासून मी त्यांना सिरीयसली घेण्याचं सोडून दिलंय.”

मित्राचा शेवटचा डायलाॅग ऐकून, हे तज्ज्ञ बनण्याचं प्रकरण आपल्याला झेपण्यातलं नसल्याची माझी खातरी पटली आणि मी आहे तसा अज्ञ राहाण्याचंच ठरवलं.

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..