सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं पृथ्वीचा कायापालट झाला. जवळजवळ पंधरा किलोमीटर आकाराचा एक प्रचंड अशनी पृथ्वीवर आदळला. मेक्सिकोच्या आखातात युकाटन द्वीपकल्पाजवळ झालेल्या या आघातामुळे, आजच्या मेक्सिकोतील चिक्क्षुलूब शहराजवळ सुमारे दीडशे किलोमीटर व्यासाचं एक मोठं विवर निर्माण झालं. लघुग्रहाच्या या आघातामुळे प्रचंड त्सुनामी लाट उफाळली, दूर उडालेल्या तप्त खडकांमुळे ठिकठिकाणी आगी लागल्या आणि उडालेल्या धूळीनं अवघ्या पृथ्वीवरचं आकाश झाकोळून टाकलं. या सर्वांचं पर्यावसान पृथ्वीवरची पंचाहत्तर टक्क्यांहून अधिक जीवसृष्टी नष्ट होण्यात झालं. यावेळी आलेली त्सुनामी ही अतिप्रचंड त्सुनामी होती. या महात्सुनामीचा पृथ्वीवरच्या सर्वच महासागरांत शिरकाव झाला असावा. अनेक ठिकाणी ही महात्सुनामी समुद्रकिनाऱ्यापासून शंभराहून अधिक किलोमीटर आतपर्यंत घुसली. या महाविनाशी त्सुनामीचं स्वरूप नक्की कसं होतं, याचा तपशीलवार अंदाज बांधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ गेली अनेक वर्षं करीत आहेत. इ.स. २०१८ साली अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या मॉली रेंज आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी वॉशिंग्टन येथील एका परिषदेत ही त्सुनामी कशी असावी, याचं संगणकीय प्रारूपही सादर केलं.
मॉली रेंज आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी तयार केलेल्या या प्रारूपावरून या महात्सुनामीचं अक्राळविक्राळ स्वरूप स्पष्ट झालं. मेक्सिकोच्या आखातात निर्माण झालेली ही महात्सुनामी चोवीस तासांच्या आतच अटलांटिक महासागरात दूरवर तर पोचलीच, पण ती थेट अमेरिकेच्या पश्चिमेला असणाऱ्या पॅसिफिक महासागरातही शिरली. (त्याकाळी उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे खंड जोडलेले नव्हते.) या महात्सुनामीची उंची सुरुवातीला तब्बल दीड किलोमीटर इतकी होती. त्यानंतर मेक्सिकोच्या आखातातून बाहेर पडेपर्यंत ती कमी झाली असली तरी, उत्तर अटलांटिक महासागरात किंवा दक्षिण पॅसिफिक महासागरात पोचल्यानंतरही तिची उंची चौदा मीटर इतकी म्हणजे जवळजवळ इमारतीच्या तीन मजल्यांइतकी होती. त्सुनामी जशी किनाऱ्याजवळ जाऊ लागते, तशी तिची उंची मोठ्या प्रमाणात वाढत जाते. त्यामुळे किनाऱ्यावर पोचताना या महात्सुनामीची उंची यापेक्षा कितीतरी वाढली असावी. मेक्सिकोच्या आखातातून प्रवास करताना या त्सुनामीचा वेग ताशी सुमारे १४० किलोमीटर इतका मोठा होता. किनाऱ्याशी पोचतानाही तो ताशी ७० किलोमीटरच्या आसपास होता. या महात्सुनामीनं आघाताच्या ठिकाणापासून सुमारे सहा हजार किलोमीटर अंतरापर्यंतच्या समुद्रतळावर आपली चुणूक दाखवली असावी. अमेरिकेतील पेन्सिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटी या विद्यापीठातील सागरी भूशास्त्र आणि जीवाश्मशास्त्र या विषयांत संशोधन करणाऱ्या टिमोथी ब्रॅलोवर यांनी यावर केलेलं भाष्य महत्त्वाचं होतं. ते म्हणाले, ‘या त्सुनामीच्या खुणा भूशास्त्रज्ञांना दूरपर्यंतच्या समुद्रतळावरही सापडू शकतील!’.
लघुग्रहाच्या आदळण्यामुळे निर्माण झालेल्या या महात्सुनामीवरच्या संशोधनाचा पुढचा टप्पा अलीकडेच गाठला गेला आहे. हे संशोधन आधारलं आहे ते डेव्हन एनर्जी या तेल उत्पादन करणाऱ्या कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणावर. जमिनीची भूपृष्ठाखालची रचना ध्वनीलहरींच्या साहाय्यानं कळू शकते. या तंत्रात एखाद्या स्फोटाच्या साहाय्यानं जमिनीच्या पृष्ठभागाजवळ ध्वनीलहरी निर्माण केल्या जातात. या ध्वनीलहरी जमिनीतून प्रवास करताना जमिनीतील विविध थरांवरून परावर्तित होतात. या परावर्तित ध्वनीलहरींची जमिनीच्या पृष्ठभागावर बसवलेल्या संवेदकांद्वारे नोंद केली जाते. परावर्तित ध्वनीलहरींच्या स्वरूपावरून तिथल्या भूपृष्ठाखालील भूरचनेचे त्रिमितीय नकाशे तयार करता येतात. डेव्हन एनर्जी या कंपनीनं जमिनीखालच्या तेलसाठ्याच्या शोधासाठी हे तंत्र वापरून जमिनीचे नकाशे तयार केले होते. अमेरीकेतील ल्युइझिआना विद्यापीठातले संशोधक गॅरी किन्सलँड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यापैकी, ल्युइझिआना या राज्यातल्या सर्वेक्षणाचे नकाशे आपल्या संशोधनासाठी वापरले. आज ल्युइझिआनाच्या दक्षिणेला असलेला समुद्र किनारा, साडेसहा कोटी वर्षांपूर्वी आजच्या ल्युइझिआनाच्या मध्यभागी होता. त्यामुळे ल्युझिआनाच्या मध्यभागात या महात्सुनामीचे पुरावे सापडण्याची शक्यता या संशोधकांना वाटत होती.
ल्युइझियानाच्या मध्यभागातील जमिनीच्या नकाशांचं किन्सलँड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सविस्तर विश्लेषण केलं. या विश्लेषणातून त्यांना या नकाशांत, जमिनीत सुमारे दीड किलोमीटर खोलीवर लाटांसारख्या दिसणाऱ्या रचना आढळल्या. या ‘लाटां‘ची उंची सुमारे सोळा मीटर होती, तर लाटांचं एकमेकांमधलं अंतर सरासरी सहाशे मीटर इतकं होतं. खोलवरच्या मातीच्या थरांत आढळलेल्या या ‘लाटा’, एखाद्या महात्सुनामीतील पाण्याच्या प्रचंड लोटामुळे निर्माण झाल्याचं दिसून येत होतं. या ‘लाटां’ची मांडणी, त्यांच्या उताराचं स्वरूप, उताराची दिशा, इत्यादी गोष्टी, ही महात्सुनामी चिक्क्षुलूबच्या विवराकडून आल्याचं सुचवत होत्या. हा मातीचा थरही सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी जमा झाला होता – ज्या काळात लघुग्रह चिक्क्षुलूबजवळ धडकला त्याच काळात! या ‘लाटा’ म्हणजे साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या महात्सुनामीच्याच खुणा होत्या. टिमोथी ब्रॅलोवर यांचे बोल खरे ठरले होते!
या ‘लाटा’ जिथे सापडल्या तो भाग साडेसहा कोटी वर्षांपूर्वी समुद्राच्या पाण्याखाली होता. समुद्राची इथली खोली सुमारे साठ मीटर इतकी होती. म्हणूनच नेहमीच्या वाऱ्या-वादळांमुळे समुद्राच्या पृष्ठभागावर होणाऱ्या हालचालींचा इथल्या समुद्रतळावर परिणाम झाला नव्हता. समुद्रतळावरच्या या ‘लांटां’वरच कालांतराने मातीचे थर जमा होत गेले व या ‘लाटा’ व्यवस्थितरीत्या गाडल्या जाऊन सुरक्षित राहिल्या. भूपृष्ठातील बदल, जमा होणारी माती, इत्यादींमुळे आज हे थर, आजच्या भूपृष्ठाच्या दीड किलोमीटर खाली गेले आहेत.
पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचं स्वरूप साफ बदलण्यास कारणीभूत ठरलेला हा आघात खगोलशास्त्र, भूशास्त्र, हवामानशास्त्र, जीवशास्त्र, अशा विविध शास्त्रांच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरला आहे. या विविध क्षेत्रांतील संशोधनातून या आघाताचं व त्याच्या परिणामांचं स्पष्ट चित्र हळूहळू उभं राहात आहे. स्पेनमधील विगो विद्यापीठात जीवाश्मशास्त्रज्ञ असणाऱ्या अल्फिओ चिआरेंझा यांच्या मते, ‘हे सर्व एका कोड्यासारखं आहे. या कोड्यातल्या एकेक भागाचं उत्तर आता मिळत आहे.’ किन्सलँड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सापडलेले महात्सुनामीचे हे ‘पडसाद’, अर्थातच या कोड्याचा सोडवला गेलेला एक भाग आहे. किन्सलँड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन लवकरच ‘अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स लेटर्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध होणार आहे.
चित्रवाणीः https://www.youtube.com/embed/bjbN_nOMDJs?rel=0
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: NASA, Kaare Egedahl
Leave a Reply