नवीन लेखन...

हृदयविकाराची प्राचीन कहाणी

ज्ञात मानवी इतिहासात डोकावले असता असे दिसून येते की हृदय-रोग हा जवळपास सर्वत्र आढळून येतो.

जवळपास ३५०० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये मानवी संकृती होती व ती अत्यंत प्रगत होती. तेव्हा देखील हृदय-रोगाने मृत्यू ओढवत होते असा पुरावा संशोधकांना सापडला आहे. तेव्हादेखील अयोग्य आहार-पद्धती हेच हृदय-रोगाने मृत्यू ओढवण्याचे कारण होते. इसविसनपूर्व १२०३ मध्ये इजिप्तचा एक राजा फॅरो मेरेन्प्ता याला हृदय-रोगाने ग्रासल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या रक्तवाहिन्या कोलेस्टेरॉल-प्लाक गोळा झाल्यामुळे अरुंद झाल्या होत्या ज्याला वैद्यकीय परिभाषेत ‘अथेरोस्क्लेरोसीस’ म्हणतात. पुरातन इजिप्तमध्ये राजघराण्यातील व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ मोठे पिरॅमिड बांधून तेथे त्या मृत व्यक्तीचे दफन करण्याची प्रथा होती. आज इतक्या वर्षानंतरही त्यातील मानवी शरीरांचे अवशेष सुस्थितीत आहेत त्यामुळे संशोधकांना पूर्वीच्या काळातील वैद्यकीय घटनाक्रम उलगडता येतो. जेव्हा काही संशोधकांनी एका पिरॅमिड मधील जवळपास १६ मृत अवशेषांचा (त्यांना ‘ममी’ म्हणतात) अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की त्या सोळापैकी ९ ममीना ‘अथेरोस्क्लेरोसीस’ किंवा रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे हृदयरोग जडला होता. अधिक संशोधन करता असे लक्षात आले की त्यावेळी श्रीमंत वर्गात रोजच्या आहारात  पाळीव प्राण्यांचे मांस, बदकाच्या मांसापासून केलेले पदार्थ व इतरही असे पदार्थ असत त्यामुळे हृदय-रोगाला निमंत्रण मिळत असे.

एबर्स पॅपिरस हा पुरातन इजिप्त मधील वैद्यकीय दस्तऐवज आहे. अदमासे इसवीसन पूर्व १५५०च्या सुमाराचा हा कालावधी आहे. इ.स. १८७३-७४ ला जॉर्ज एबर्स यांनी ल्क्झोर येथे तो खरेदी केल्याची नोंद आहे. सध्या जर्मनीतील लीपझीग विद्यापीठाच्या ग्रंथालयात तो ठेवण्यात आला आहे. २० फूट लांब व ११० पानांचे हा दस्तऐवज  पुरातन इजिप्तमधील  हिरोग्लीफ लिपीत आहे. त्यामध्ये हृदयक्रिया बंद पडणे, त्यावरील उपचार, विविध हृदय-विकार आणि त्यावरील उपचार यांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये हृदय-विकारावर एक प्रबंध आहे. हृदय हा रक्तपुरवठ्याचा केंद्रबिंदू असून  शरीराच्या सर्व भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या त्याला जोडलेल्या असतात असे म्हटले आहे. एबर्स पॅपिरस हे पाश्चिमात्य जगातील सर्वात प्राचीन वैद्यकीय दस्तावेज मानले जाते.

अतिशय प्राचीन कालापासून हृदयाचे विकार व त्यांची विविध लक्षणे यावर केलेल्या नोंदी सापडतात. प्राचीन ग्रीसमध्ये हिपोक्रेटस नावाचा p-45493-heart-disease-02विख्यात वैद्यराज होऊन गेला. साधारणपणे इसवीसन पूर्व ४६० ते इसविसनपूर्व ३७० हा त्यांचा कालावधी मानला जातो. आधुनिक वैद्यकशास्त्र आजही त्यांचे ऋण मानते. हिपोक्रेटसने मानवी शरीरशास्त्रावर खूप काम केले. पाश्चात्य वैद्यकाचे ते जनक समजले जातात. अगदी हिपोक्रेटसने  देखील छातीतील दुखणे व आकस्मिक मृत्यू यावर लिहिलेले आहे.

पंधराव्या शतकात लिओनार्डो दा व्हिन्ची (१४५२-१५१९) या प्रख्यात विद्वानाने हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवर बरेच काम केले. मोनालिसा या लावण्यवतीने तिच्या अस्फुट व गूढ स्मिताने सगळ्या जगावर मोहिनी टाकली, त्या कालातीत चित्राचा चित्रकार ही लिओनार्डो दा व्हिन्ची यांची अधिक परिणामकारक ओळख आहे. शास्त्रीय संशोधन करणे हा त्यांचा आवडता छंद होता. मानवी शरीर-विज्ञानाची अचूक ओळख होण्यासाठी त्यांनी बरेच प्रयास केले. मानवी हृदयाचे काम समजून घेण्यासाठी त्यांनी हृदयाच्या झडपांचे काचेत प्रारूप (मॉडेल) तयार केले. त्यात पाण्यात तरंगणारी तृण बीजे सोडली. त्यांचा अभ्यास करून ‘एओर्टीक व्हॉल्व्ह’चे (महारोहिणीच्या झडपेचे) कार्य जाणून घेतले. साधारणपणे इ.स. १५१५ च्या सुमारास लिओनार्डो दा व्हिन्ची यांनी मांडलेले हे गृहीतक २०साव्या शतकात आधुनिक वैद्यकाने परत एकदा दृग्गोचर केले.

परंतु हा रक्तपुरवठा नक्की कसा होतो त्याचा शोध लावण्याचे श्रेय विल्यम हार्वे (१५७८-१६५७) यांच्याकडे जाते. ते इंग्लंडचे राजे पहिले चार्ल्स यांचे डॉक्टर होते. त्यानंतर हॅल विद्यापीठात हृदय-वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक फ्रिडरिच हॉफमन (१६६०-१७४२) यांनी असे निरीक्षण नोंदविले की रक्ताभिसरणासाठी रक्तवाहिन्यांमधील जागा कमी किंवा अरुंद झाल्यामुळे हृदय-रोगाला सुरुवात होते.

— डॉ. हेमंत  पाठारे, डॉ अनुराधा मालशे

लिओनार्डो दा व्हिन्ची यांनी चित्रित केलेले हृदय व रक्तवाहिन्यांचे रेखाटन.
आरशामध्ये जसे उलट दिसते तसे लिहिणे ही त्यांची खासियत होती. त्या पद्धतीने केलेल्या नोंदी येथे दिसत आहेत.

Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..