
संकटे एकामागून एक पाठोपाठ देशावर चालून येत आहेत. करोनापासून ते लडाखचा चिघळलेला प्रश्न, व आर्थिक मंदी या सर्वांवर मात करण्याची वेळ आज भारताकडे चालून आलेली आहे. देशापुढे आव्हानं तर आहेतच पण आपला इतिहासही तितकाच उज्वल आहे.
त्यातीलच घडलेली ही एक सत्य घटना.
१८ नोव्हेंबर १९६२. पहाटेचे साडेतीन वाजलेले. हाडे फोडून टाकणार्या लडाखमधील थंडीत मेजर शैतान सिंग ( रजपूत राजस्थान ) आपल्या एकशेवीस जवानांना बरोबर घेऊन चुशुल येथील एकमेव विमानाच्या धावपट्टी चे संरक्षण करण्याकरिता सज्ज होते. एकाएकी हजारोंनी चिनी सैनिकांनी सर्व बाजूंनी घळीत उतरून शैतान सिंगांच्या फौजेवर जबरदस्त हल्ला चढविला. दोन तास तुंबळ युद्ध चालू होते. भारतीय उच्च अधिकाऱ्यांनी ठाणे सोडून परत येण्याची परवानगी दिली. मेजर शैतान सिंग यांनी सहकाऱ्यांना विचारून ठाणे न सोडता अखेरपर्यंत लढण्याचा निर्णय घेतला. दारुगोळा संपला. हातानी युद्ध खेळले गेले. १२० पैकी ११४ जवान मेजर शैतान सिंगसह बळी पडले.
त्यांचा एकमेव सहाय्यक वाचला व तो बर्फ तुडवत काही दिवसांनी मुख्य तळावर पोहोचला. त्याने दिलेल्या माहितीवर प्रथम कोणाचा विश्वास बसला नाही. पाच जवान जबरदस्त जखमी अवस्थेत त्या ठिकाणी निपचित पडले होते, त्यांना चिनी सैनिकांनी युद्धकैदी म्हणून आपल्या तळावर नेले. चिनी सैन्याची प्रचंड हानी झाली होती. अंदाजे सातशे ते अकराशे चिनी सैनिकांचा ११५ भारतीय जवानांनी खात्मा केला होता. चिनी तळावर झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन पाच भारतीय युद्धकैदी पळाले. बर्फातून परत जाताना चार जण मृत्युमुखी पडले. शेवटचा एक जण तळावर पोहोचला. त्यानेही आपल्या परतलेल्या सहकार्याप्रमाणे तंतोतंत तीच बातमी दिली.
२० नोव्हेंबरला चीनने शस्त्रसंधी करून माघार घेतली. चुशुल त्यांच्या हाती लागले नाही.
पुढे सहा महिने सर्व प्रदेश बर्फात गाडला गेला. पुढील वर्षी उन्हाळ्यात एक मेंढपाळ त्या भागात फिरत असताना त्याला शेकडोंनी सैनिकांची प्रेते दिसली. त्याने तळावर माहिती दिली.
वाचलेल्या दोन सैनिकांना घेऊन भारतीय सैन्याचे अधिकारी व आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस अधिकारी त्या जागी पोहोचले. त्यातील एका जवानाने मेजर शैतान सिंग या आपल्या बहाद्दर अधिकार्याचे प्रेत एका घळीत जपून ठेवले होते. ती जागा बरोबर दाखविण्यात त्याला यश आले. त्यामुळे त्या दोन जवानांनी प्रत्यक्ष भाग घेतलेल्या लढाईचा तपशील जगापुढे आला. त्याला मान्यता मिळाली. मेजर शैतान सिंग यांचा पार्थिव देह विमानाने जोधपूरला नेण्यात आला. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले. बाकी सर्व जवानांना त्या युद्धभूमीवर अग्निसंस्कार केले गेले.
ही सर्व प्रेते काढताना एक भयानक दृश्य दिसत होते. सैनिक आपल्या हातातील बंदुका घेऊन जसेच्या तसे राहिले होते. एका सैनिकाच्या हातात सिरींज दिसत होती. सर्व जण जणू परत युद्धाला उभे राहणार अशा स्थितीत होते.
हे सर्व जवान १३ कुमाव रेजिमेंटच्या चार्ली कंपनीचे होते. हे सर्वजण हरियाणामधील रेवारी गावाकडील होते. बरेचसे एकमेकांचे भाऊ व मेहुणे होते. या लढाईच्या पूर्ण तपशील हाती आल्यानंतर युनेस्कोने जगातील दहा महत्त्वाच्या लढायामध्ये त्याची नोंद केली. जोधपूर येथे भव्य स्मारक उभारण्यात आले. रेवारी येथे भव्य युद्ध स्मारक व पार्क बांधले आहे. सर्व जवानांची तेथे नावे आहेत. दरवर्षी येथे १८ नोव्हेंबरला आर्मीतर्फे श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो. भारत-चीन युद्धाला पन्नास वर्ष २०१२ साली झाली. तेव्हा यामधील ते जिवंत राहिलेले दोन जवान समारंभाला हजर होते. काय भावना असतील त्यावेळी त्यांच्या ?
कॅप्टन अमरिंदरसिंग, सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री यांच्या ‘Lest We Forget’ ( भय आपल्याला विसर पाडते) या पुस्तकातील चौथे प्रकरण या लढाईवर आहे. त्यामध्ये जीवाचा थरकाप उडविणारे फोटो आहेत. चेतन आनंद यांनी काढलेला ‘ हकीकत ‘ सिनेमा काहीसा या युद्धावर आधारित होता. आज ५८ वर्षे झाली. तीच युद्धभूमी, तोच शत्रू, तसेच लढवय्ये प्राणाची आहुती देणारे जवान आहेत.
या सर्व जवानांना मानाचा मुजरा!!
— डॉ. अविनाश वैद्य
मो. 9167272654
The Battle of REzangla Pass, Ladakh
Leave a Reply