१८४३ साल उजाडलं. जगातली पहिली रेल्वे धावली त्याला अठरा वर्ष झाली होती. एव्हाना ब्रिटिश सरकारच्या गाठीशी युरोपियन रेल्वे बांधणीचा बराच अनुभव जमा झाला होता. तो अनुभव हाताशी घेऊन १८४३ मध्ये भारतीय रेल्वे बांधणीच्या दृष्टीने प्रत्यक्ष हालचाली सुरु झाल्या. जॉर्ज क्लार्क या ब्रिटिश इंजिनीअरने मुंबईजवळील भांडूप या खेड्यात काही प्रतिष्ठित व्यक्तींची सभा घेतली आणि त्या सभेत रेल्वेची स्थापना केली. त्यानंतर ७ वर्षांनी ऑक्टोबर १८५० मध्ये रेल्वेकरिता पहिला जमिनीचा तुकडा देण्याचा समारंभ सायन (शीव) या खेड्यात पार पाडला. प्रथम मुंबई ते कल्याण असा रेल्वेमार्ग आखण्याची योजना हाती घेण्यात आली आणि या कामासाठी १०,००० भारतीय कामगारांची नेमणूक करण्यात आली. भारतीय रेल्वेबांधणीच्या या अवाढव्य प्रकल्पात त्याकाळी ब्रिटिशराजने केलेली गुंतवणूक १५० लाख पौंड इतकी भलीमोठी होती.
भारतातलं रेल्वे बांधणीचं हे काम सुरुवातीच्या काळात अत्यंत कष्टप्रद होतं. लाखो – हजारोंच्या संख्येनं योग्य कामगारांची भरती करणं, त्यांची कुशलता – अकुशलता – उपयुक्तता लक्षात घेऊन काम पुढे नेणं हे अतिशयच जिकीरीचं होतं. योग्य कामगार मिळवणं हे या संपूर्ण प्रकल्पात मुख्य ठेकेदार आणि उपठेकेदारांचं महत्त्वाचं काम होतं, आणि १९ व्या शतकाचा तो मध्यातला काळ पाहता हे काम खूपच अवघड होतं. प्रारंभापासूनच्या या सर्व व्यापांमधून तावूनसुलाखून बाहेर पडत, रेल्वेचा प्रकल्प सातत्यानं रुळांवर राखणारा भारतीय रेल्वेचा खरा शिल्पकार होता – लॉर्ड डलहौसी. १८५६ सालापर्यंत डलहौसी दिवसरात्र रेल्वेबांधणीत मग्न होता. अनेक दौरे, कामाचा अखंड व्याप, अमाप जबाबदारी यांमुळे तो अखेर आजारानं त्रस्त झाला आणि भारतातला प्रकल्प सोडून १८५८ साली त्याला मायदेशी इंग्लडला परतावं लागलं.
तत्पूर्वी, डलहौसीच्या नेतृत्वाखाली कुर्ल्याजवळील टेकडीखालून भारतातील पहिला रेल्वेचा बोगदा बांधला गेला. रेल्वेचे रूळ बनवले गेले. तेव्हा जे रेल्वेचे रूळ तयार केले गेले त्या रूळांकडे लोखंडी सडकांचा चमत्कार म्हणून पाहिलं जात होतं. एक एक टप्पा पादाक्रांत करीत, जय्यत तयारीनिशी भारताची पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईपासून ठाण्यापर्यंत धावली आणि भारतीय रेल्वेच्या सुवर्णयुग आला सुवर्णयुगाला सुरुवात झाली. त्यादिवशी त्या काळातील बोरीबंदर स्टेशनवर मोठा शामियाना उभारण्यात आला होता. मुंबई शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. २१ तोफांची सलामी घेत, चारशे मान्यवरांना डब्यात सामावत दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी गाडीनं बोरीबंदर स्टेशन झोकात सोडलं आणि ४ वाजून ४५ मिनिटांनी ती ठाण्यात पोहोचली. ही गाडी जात असताना संपूर्ण मार्गावर दुतर्फा उभे राहून असंख्य लोक धावणाऱ्या इंजिनाकडे आणि डब्यांकडे अचंबित होऊन पाहत होते. वाफेचे धूर सोडणारे अजस्त्र इंजिन पुढेमागे चालताना पाहून अनेकांना तर हा जादूटोण्याचा प्रकार आहे असं वाटत होतं. त्यानंतरही रेल्वेचे ते भलंथोरलं धूड लोखंडी सडकांवरुन चालताना बघण्यासाठी सडकेच्या दोन्ही बाजूंना मोठा जनसमुदाय जमा होत असे.त्याकाळी गाडीला लावण्यात येणाऱ्या इंजिनाची चाचणी भायखळा रेल्वे स्टेशन जवळ केली जात असे.
१८५३ साली भारतातली पहिली रेल्वे सुरू झाली , पण युरोप प्रमाणेच पुढची अनेक वर्ष इथल्या प्रतिक्रियादेखील रेल्वे बांधणीच्या विरुद्ध आणि फारच तिखटही होत्या . हा प्रयोग धोकेबाज आणि संकटांनी घेरलेला आहे . असा धोकादायक प्रवास करण्यास कोणी प्रवासीच मिळणार नाहीत . ज्या गरीब जनतेच्या खिशात एक आण्याचे नाणे सुद्धा नाही , ती जनता तिकिटे काय खरेदी करणार ? बैलगाडी हे सामान्य माणसाचे वाहन कधीच नाकारले जाणार नाही . कावेरी , गोदावरी या नद्यांवर धरणे बांधून सामान्य जनतेची पाण्याची गरज भागविणे हे जास्त निकडीचे आहे. रेल्वे बांधणी वरील खर्चाच्या ओझ्याखाली सर्वचजण चिरडले जाणार आहेत. या देशातील विषम हवामान बांधणीला मारक ठरेल. चार चार महिने सतत कोसळणारा पाऊस, वादळी वारे, तीव्र उन्हाळा, सूर्याचे तळपते किरण स्वल्पविराम किडे व वाळवी यामुळे रूळांमधील लोखंडी पट्ट्या पोखरल्या जाऊन या सर्वांचा लोखंडी सडकेवर गंभीर परिणाम होईल असा हा एकूण मतप्रवाह होता.
लॉर्ड डलहौसी सुद्धा मनातून या प्रकल्पाबाबत साशंक होता. हा सर्व प्रयोग फसणार या काळजीतूनच त्याची पुढची पावलं अतिशय सावधगिरीने टाकली जात होती, पण सुदैवानं काही वर्षातच रेल्वे बांधणीची मुळे भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचू लागली. भारत एकसंध होण्यात आणि भारतात सुवर्णयुग आणण्यात रेल्वेनं मोलाची कामगिरी बजावली. दुर्दैवानं, भारतीय रेल्वे बांधणीचा प्रत्यक्षकर्ता, द्रष्टा – लॉर्ड डलहौसी मात्र भारतीय रेल्वेचे हे पसरतं जाणारं जाळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकला नाही; कारण, आजारपणानं ग्रासलेल्या व मायदेशी परतलेल्या डलहौसीला १८६० सालीच मृत्यूने गाठलं होतं.
— डॉ. अविनाश केशव वैद्य
अतिशय चांगली माहिती – धन्यवाद