१५ मार्च १८७७ रोजी पहिल्या कसोटी क्रिकेटची सुरुवात झाली. मेलबर्नमध्ये पहिला कसोटी सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघात १५ मार्च १८७७ ते १९ मार्च १८७७ दरम्यान खेळवण्यात आला.
ह्या सामन्यासाठी निकाल लागेपर्यंत खेळवला जाणार होता व ४ चेंडूचे एक षटक टाकले गेले. पहिला चेंडू टाकणारे होते इंग्लंडचे आल्फ्रेड शॉ. त्यांच्यासमोर होते ऑस्ट्रेलियन फलंदाज चार्ल्स बॅनरमन. त्यांनी त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कसोटी क्रिकेटमधली पहिली धाव घेतली. त्यांनीच दुसऱ्या दिवशी पहिले शतक पूर्ण करताना १६५ धावा केल्या. या सामन्याला कसोटी दर्जा नंतर बहाल करण्यात आला. सुरुवातीला या सामन्याचे स्वरूप ऑल इंग्लंड वि. कम्बाइन्ड न्यू साउथ वेल्स अँड व्हिक्टोरिया इलेव्हन असे होते. दोन्ही संघ पूर्ण ताकदीनिशी उतरले नव्हते. ऑस्ट्रेलियाने हा सामना ४५ धावांनी जिंकला.
योगायोगाची गोष्ट अशी की, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातच पहिला आणि शतकमहोत्सवी कसोटी सामना खेळला गेला होता. या शतकमहोत्सवी सामन्याच्या तारखा १२, १३, १४, १५ (विश्रांती), १६ आणि १७ मार्च १९७७ अशा होत्या. या दोन्ही कसोटी सामन्यांचा निकालही सारखाच लागला होता. ऑस्ट्रेलिया- ४५ धावांनी विजयी. फरक एवढाच, की पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते ई. जे. ग्रेगरीने, तर शतकमहोत्सवी कसोटीत ग्रेग चॅपेलने. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या ई. बॅनरमनने पहिल्या डावात (निवृत्त- जखमी) शतक (१६५ धावा) झळकावलं होतं. शतकमहोत्सवी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्याच रॉडनी मार्शनं दुसऱ्या डावात शतक (नाबाद ११०) केलं होतं. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या मिडिवटरनं पहिल्या डावात पाच व दुसऱ्या डावात एक असे एकूण सहा बळी, तर त्याचा सहकारी केंडाल याने पहिल्या डावात एक व दुसऱ्या डावात पाच बळी मिळवले होते. शतकमहोत्सवी कसोटीचा मानकरी होता डेनिस लिली. त्यानं पहिल्या डावात सहा, तर दुसऱ्या डावात पाच असे एकूण अकरा बळी मिळवले.
— विनोद शिवाजी गोरे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
छायाचित्र सौजन्य: espncricinfo.com
पुणे.
Leave a Reply