यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म १७ एप्रिल १८९१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील किन्हळ येथे झाला.
यशवंत रामकृष्ण दाते यांचे शिक्षण धुळे, पुणे आणि नागपूर येथे झाले. बी. ए., एल्एल्. बी. झाल्यानंतर १९१९ मध्ये डॉ. केतकर यांच्या ‘ज्ञानकोशमंडळा’त काम करण्यासाठी ते पुण्यात आले. त्यानंतर काही काळ ह्याच मंडळाच्याविद्यासेवक ह्या मासिकाचे ते संपादक होते. ज्ञानकोशमंडळातील काम चालू असतानाच पुणे येथील सरस्वतीमंदिर या शिक्षणसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. १९२८ मध्ये ज्ञानकोशमंडळातून निवृत्त झाल्यावर महाराष्ट्र कोशमंडळाची त्यांनी स्थापना केली.
डॉ. केतकरांसारख्या महापंडितांबरोबर अनेक वर्षे काम केल्यामुळे दाते यांना कोशरचनेच्या पद्धतशीर कामाचा अनुभव लाभला. त्याला त्यांनी अखंड परिश्रमाची जोड दिल्यामुळे आणि चिं. ग. कर्वे यांच्यासारखे समानशील जोडीदार लाभल्यामुळे दाते यांच्या हातून अनेक प्रकारचे कोश तयार होऊन मराठी भाषेचे हे दालन समृद्ध झाले. मराठीतील बहुतेक शब्दांचा समावेश असल्यामुळे समाधानकारक ठरलेला दाते–कर्वे यांचा महाराष्ट्र शब्दकोश एकूण सात खंडांत प्रसिद्ध झाला (१९३२–३८). त्याचा पुरवणी खंड १९५० मध्ये प्रसिद्ध झाला. या कोशाला त्यांनी ज्या विद्वत्ताप्रचुर प्रस्तावना लिहिल्या, त्या महाराष्ट्र भाषाभ्यास (१९३८) यात दात्यांनी संगृहीत केल्या. कर्वे यांच्या साहाय्याने तयार केलेला सुलभ विश्वकोश (१९४९–५१) सहा भागांत प्रसिद्ध झाला. महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (२ खंड, १९४२, १९४७) आणि शास्त्रीय परिभाषा कोश (१९४८) ही याच द्वयीने निर्माण केलेली कोशसंपदा होय. दाते यांनी रा. त्र्यं. देशमुख ह्यांच्या सहकार्याने, १८१० ते १९१७ ह्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी मासिकांची, त्यांतील लेखांची, तसेच मराठी ग्रंथांची आणि ग्रंथकारनामांची सूची महाराष्ट्रीय वाङ्मयसूची (१९१९) ह्या नावाने तयार केली. शंकर गणेश दाते ह्यांनी तयार केलेल्या प्रसिद्ध ग्रंथसूचीच्या पूर्वी तशा दिशेने झालेला एक उल्लेखनीय प्रयत्न म्हणून ही सूची महत्वाची. चिं. ग. कर्वे ह्यांच्या सहकार्याने डॉ. केतकरांचे सानिध्य (१९४६) हे केतकरांचे गुणदोषविवेचक अल्पचरित्रही त्यांनी लिहिले आहे. याखेरीज पिता–पुत्र संबंध (१९४३) हे एक सामाजिक स्वरूपाचे लेखन दाते यांनी केलेले आहे आयुष्याच्या अखेरीस त्यांनी संक्षिप्त शब्दकोशाचे काम हाती घेतले होते; पण ते अपुरेच राहिले. कोशरचनेसारखे चिकाटीचे व अभ्यासकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे कार्य सातत्याने करीत राहून दाते यांनी मराठी भाषेची बहुमोल सेवा केली आहे. सोलापूर येथे भरलेल्या मुद्रकसंमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९४१). भाषाशास्त्रातील विद्वत्तेमुळे भारतीय राज्यघटनेचे हिंदी व मराठी अनुवाद करण्यासाठी नेमलेल्या समित्यांचे सभासद म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळाचे ते अध्यक्ष होते.
यशवंत रामकृष्ण दाते यांचे २१ मार्च १९७३ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे यशवंत रामकृष्ण दाते यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply