नवीन लेखन...

सोशल मीडियाचा काळा ‘फेस’!

सोशल मीडिया हा आता माणसाचा श्वास बनला आहे. केवळ तरुण पिढीच नव्हे, तर विविध वयोगटांतील सर्वच जण या मीडियाच्या मोहात कळत-नकळतपणे अलगद अडकले आहेत. सर्वात वेगवान प्रसिद्धीसाठी आणि दिलखुलास अभिव्यक्त होण्यासाठी सोशल मीडियासारखं दुसरं कोणतंच व्यासपीठ नाही. त्यामुळे साहजिकच कोट्यवधी लोक या समाजमाध्यमांकडे आकृष्ट झाले. अर्थात आजच्या माहिती तंत्रज्ञाच्या युगात सोशल मीडियाचा वापर अपरिहार्य बनला असल्याने यात काहीचं गैर नाही. परंतु, तंत्रज्ञानाचा जसा सदुपयोग होतो, तसा दुरुपयोगही होत असतो. सोशल मीडियाच्या बाबतीत ही बाब सुरवातीपासून समोर येत आहे. सोशल मीडियाच्या गैरवापराची समश्या डोके वर काढू लागली असतानाच या मीडियावरील युजर्सची खासगी माहितीही सुरक्षित नसल्यची बाब समोर आली असल्याने सोशल माध्यमांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फेसबुकसारख्या लोकप्रिय माध्यमांवरून तब्बल ५ कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला असून त्याचा निवडणुकीत गैरवापर करण्यात आल्याचा खुलासा झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. खुद्द फेसबुक सीईओ मार्क झुकेरबर्गने याबाबतचा खुलासा करत झालेल्या प्रकाराबद्दल क्षमायाचना करून प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. अर्थात, माफीनाम्यावर किंव्हा सुधारणा करण्याच्या आश्वासनावर दुर्लक्षित करावा असा हा मुद्दा निश्चितच नाही. लोकांच्या विश्वासाचा भंग करून त्यांच्या खासगी माहितीचा बाजार मांडला जात असेल, आणि एकाद्या देशाच्या इतिहासावर दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय या चोरलेल्या माहितीच्या आधारे होणार असतील, तर याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव समोर येत असल्याने भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे.

फेसबुकच्या ग्राहकांची खासगी माहिती चोरून ब्रिटनमधील केंब्रिज अॅनालिटिका या डेटा कंपनीने त्याचा वापर ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुका जिंकण्यात व ब्रिटनचे ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने मत वळवण्यात केला असल्याचे उघड झाल्याने जगभर हलकल्लोळ उडाला असून डेटालिकचे हे लोन भारतापर्यंतही येऊन पोहचले आहे. ज्या कंपनीवर डेटालिक केल्याचा आरोप केल्या जातोय त्या कंपनीची सेवा घेण्यासाठी काँग्रेस तयारी करत असल्याचा आरोप भाजपाने केला. तर खुद्द भाजपानेच बिहार निवडणुकीत ‘केंब्रिज’ ची मदत घेतल्याचा पलटवार काँग्रेसने केला. केंद्रीय माहिती या तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तर थेट झुकेरबर्गलाच समन्स पाठविण्याची धमकी दिली. सरकारच्या नाकावर टिच्चून माल्या, मोदी सारखे लुटारू देशाबाहेर पळून जात असताना झुकेरबर्गला भारतात येण्यास भाग पाडण्याची भाषा करणे हास्यस्पदच म्हणावी लागेल. आणि तसेही ज्या आधार कार्डचा केंद्र सरकारने एवढा गवगवा केला त्याचीही गुप्त माहिती फुटल्याचा आरोप मध्यंतरी झाला होता. त्यामुळे डाटालिकवरून केल्या जाणाऱ्या घोषणा आणि धमक्या ह्या निव्वळ वलग्ना समजायला हरकत नाही. तसेही विज्ञान आणि तंत्रज्ञानाला खीळ घालणे किंव्हा त्यावर नियंत्रण ठेवणे आता सहजशक्य राहिले नाही. त्यामुळे उपरोक्त राजकीय आरोप- प्रत्यारोप तूर्त बाजूला ठेवले तरी निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी समाजमाध्यमांमधील माहितीचा गैरवापर केला जातोय, ही बाब आता लपून राहिलेली नाही. सोशल मीडियावरून काही विशिष्ट मते लोकांच्या मनावर बिंबविण्याचे षडयंत्र रचल्या जात असल्याचे समोर येऊ लागल्याने, आता विश्वास ठेवावा तरी कुणावर ? असा प्रश्न निर्माण होतो.

सर्वात वेगवान प्रसिद्दीसाठी सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम म्हणून सिद्ध झाल्याने आजच्या काळात सोशल मीडियाचा प्रस्फोट झालायं..जनमत घडविण्याची आणि प्रसंगी सत्तापालट करण्याचीही क्षमता या माध्यमात असल्याची प्रचिती जगाने घेतली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाने बजावलेली भूमिका फार महत्वपूर्ण होती. त्यामुळेच तर आपणही हे तंत्र आत्मसात केलं पाहिजे, असा सूर प्रत्येक पक्षाच्या मंथन बैठकीत उमटला होता. अर्थात यात चुकीचं काहीच नाही. जनसंपर्कासाठी आणि आपले विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी या माध्यमांचा उपयोग केला जात असेल तर तो स्तुत्यचं. मात्र तंत्रज्ञान हे दुधारी तलवारी सारखं असतं. त्याचा उपयोग माणसाच्या फायद्यासाठी जसा केला जातो तसाच त्याच्या विनाशासाठीही त्याचा वापर केला जाऊ शकतो. सोशल मीडियाच्या संदर्भातही असे अनुभव अनेकदा आले आहेत. समतोल विचारांच्या भानगडीत न पडता माणसं उथळ प्रचारानं प्रभावित होत असल्याचे लक्षात आल्याने काही समाजकंटकांनी या माध्यमांचा वापर विविध गैरप्रकारसाठी केला. आत तर या माध्यमांवरील माहिती चोरून जनमत बनविण्याचा आणि बिघडविण्याचा घाट घातल्या जात आहे. त्यामुळे निश्चितच याप्रकाराकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कुठल्याही सोशल माध्यमाचा उपयोग करताना आपली व्यक्तिगत माहिती विचारली जाते. सदर माहिती गुप्त ठेवण्याची हमीही दिलेली असते. मात्र त्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे, याची माहिती वापरकर्त्याला मिळत नाही. तरीही विश्वास ठेवून यूजर आपली संपूर्ण खासगी माहिती अशा माध्यमांना देतो. कारण सोशल मीडियावरील आचार-विचार सत्य आहेत, अशी त्याची समजूत असते. मात्र फेसबुक प्रकरणाने या समजुतीवरच घाला घातला असून सोशल मीडियाचा कावेबाजपणा उघड झाला आहे.

आजच्या माहिती आणि तंत्रज्ञांच्या युगात ‘माहिती’ सोन्याचांदीसारखीच मौल्यवान बनली असल्याने अर्थातच या डेटालिक प्रकरणामागे एक मोठं अर्थकारण आहे. आजचे नेते राजकीय पक्ष आपला प्रभाव मतदारांवर पाडण्यासाठी असा डिजिटल प्रचार करणाऱ्या कंपन्यांच्या आहारी गेलेले दिसतात. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालणे श्यक्य होईलच याची शास्वती नाही. म्हणून आपल्यालाच अधिक सावध व्हावे लागणार आहे. मुळात समतोल, सर्व बाजूंनी विचार करण्याची आपली क्षमता क्षीण होत असल्याने अशा प्रकारांचे पेव फुटले आहेत. आपल्यापर्यंत पोचणारी कुठली माहिती ही गंभीरपणे घेण्याच्या लायकीची आहे आणि कुठली नाही याचा सारासार विचार न करता आपण उथळ माहितीने प्रभावित होतो म्हणूनच आपल्या भावभावनांचा बाजार मांडला जातो, हे आता लक्षात घ्यायला हवे. “डिलिट फेसबुक’ सारखी मोहीम राबवून काहीही साध्य होणार नाही. कारण सोशल मीडिया ही आता काळाची गरज बनली असल्याने, फेसबुक डिलीट केले तरी दुसऱ्या एकाद्या माध्यमातून आपली माहिती चोरी होऊ शकते. त्यामुळे विवेकी सावधानता आणि सारासार विचारचं आपल्याला या संकटातून तारू शकेल.!!!

अँँड.हरिदास बाबुराव उंबरकर
बुलडाणा

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..