एका जर्मन कंपनीच्या कृषी विभागातर्फे आठ वर्षे कोकणात भटकंती करत असताना इंग्रजांच्या काळातील असा एकही पूल शिल्लक राहिला नाही जिथे थांबून पुलावर लावलेल्या दगडावरील (प्लेक्) माहिती मी वाचली नाही. ३४ वर्षांपूर्वी कोकण रेल्वे अस्तित्वात आली नसल्यामुळे रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत असे. मोबाईल अस्तित्वात आला नव्हता व चांगल्या कॅमेऱ्यांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे फोटो काढणे शक्य नव्हते. पूल जिथे सुरु होतो तिथे त्या पुलाबद्दल माहिती लिहिलेला एक दगड बसविलेला असतो. त्या दगडावर ज्यांच्या देखरेखीखाली पुलाचे काम झाले त्यांची नावे, वर्ष, बांधकाम पूर्ण होण्यास लागलेला काळ, खर्चाचा अंदाज व झालेला प्रत्यक्ष खर्च असा तपशील लिहिलेला (खोदलेला) असतो. इंग्रजांच्या काळातील कोणत्याही बांधकामावर लावलेल्या दगडावरील मजकूर पराकोटीच्या भ्रष्टाचाराने सडलेल्या आपल्या देशातील कोणीही वाचला तर त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणे केवळ अशक्य आहे.
२०१५ च्या दिवाळीत तब्बल २५ वर्षांनंतर कोकणातील रस्त्यांवरून पुन्हा एकदा भटकंती केली. रत्नागिरीच्या काळ्या समुद्रावरील ‘द गेटवे ऑफ रत्नागिरी’ या कमानीवरील लावलेल्या दगडावरील लाल चौकटीतील मजकूर काळजीपूर्वक वाचा. कुठे ते अनुमानित खर्चापेक्षा कमी खर्चात कमीतकमी शंभर वर्षे टिकणारे बांधकाम करणारे इंग्रज आणि कुठे कोट्यावधींचा भ्रष्टाचार करूनही काम न करणारे आम्ही भारतीय. रत्नागिरीच्या काळ्या समुद्रावरील धक्क्याचे किंवा कोकणातील कोणत्याही पुलाचे काम करणारे भारतीय असले तरी त्याच्यावर देखरेख (सुपरविजन) करणारे पराकोटीचे शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष इंग्रजच होते याची आवर्जून नोंद घ्यावी.
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Leave a Reply