१६६१ सालात मुंबईत आलेल्या ब्रिटिशाना सार्वजनिक जीवनात करमणुकीची सोय नव्हती. त्यांना अशा सोयी करण्याची फुरसतही मिळाली नव्हती. इस्ट इंडिया कंपनी व्यापारी कंपनी असल्याने त्यांची व्यापाराची घडी बसवण्याची प्राथमिकता होती आणि करमणूक ही दुय्यम स्थानी होती. ब्रिटीश लोक हे पक्के व्यापारी आणि एकांतप्रिय म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत मात्र समान पातळीवरच्या लोकांनी विचार विनिमय करावा आणि त्यातून व्यापार वुद्धी व्हावी यासाठी एकत्र यावे या मताचे असल्याने त्यांच्या देशात त्यांना एकत्र येण्यासाठी क्लब, जिमखाना आदि सुविधा त्यांनी निर्माण केल्या होत्या. व्यापार आणि त्यातून आपल्या देशावर त्यांची पकड व्यवस्थित बसल्याची खात्री होतच आता त्यांना अश्या करमणुकीची निकड भासू लागली. आणि यातून मुंबईतल्या पहिल्या क्लबची निर्मिती झाली आणि हा क्लब होता ‘द भायखळा क्लब, बॉम्बे’
सन १७८४ साली गव्हर्नर जॉन हॉर्नबी याने महालक्ष्मी आणि वरळी यामधील खाडीचे खिंडार बुजवले आणि या दरम्यानचा ‘हॉर्नबी वेलॉर्ड म्हणजे आताचा लाल लजपतराय रोड, रस्ता तयार केला याची कथा आपण याच लेखमालेतल्या मागील भागात वाचली होती. हे खिंडार बुजवण्यापूर्वी आताच्या हाजी अली नजीकच्या समुद्राचे पाणी भरतीच्या वेळेस पार डोंगरी-उमरखाडी पर्यंत जायचे. त्याकाळी हाजी अली ते भायखळा हा भाग सर्वच खाजण होता. जी काही वस्ती होती ती माझगावात. भायखळा हा त्याकाळी माझगावचाच भाग समजला जायचा. मुंबईच्या किल्ल्यात आता जागा पुरेनाशी झाल्यामुळे युरोपियानांची वस्ती माझगाव भागात वाढू लागली होती..आजही मुंबईच्या तत्कालीन पोर्तुगीज आणि बिटीश वसाहतीच्या खुणा पाहता येतात त्या त्यामुळेच. जॉन हॉर्नबी याने वरळीचा बांध घातल्यामुळे मुंबईत समुद्राचे पाणी येणे बंद झाले आणि मुंबईत मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध झाली..आताची बहुतेक मध्य मुंबई वसली आहे ती या भागात सन १७८४ नंतर भरणी केल्यानंतरची आहे.सन १७८४ नंतर लगेचच सन १७९३ मध्ये हॉर्नबी वेलॉर्ड पासून पूर्वेकडे म्हणजे आताच्या ताडदेव पासून भायखळ्याच्या ‘खडा पारसी’पर्यंत जाणाऱ्या ‘बेलासिस रोड’ची, म्हणजे आताच्या ‘जहांगीर बोमन बेहराम मार्गा’ची आखणी करण्यात आली. ह्या बेलासिस रोडला दक्षिणोत्तर छेदणाऱ्या, मुंबई सेन्ट्रल स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या लॅमिंग्टन रोडची उभारणी ही खूप नंतरची आहे.
बेलासिस रोड आणि नंतरचा लॅमिंग्टन रोड यामधील काटकोनात जी जागा उपलब्ध झाली त्याच ठिकाणी हा भायखळा क्लब होता. नेमकं सांगायचं म्हणजे, आताच्या नायर हॉस्पिटल समोरची रिझर्व बँक वसाहत, त्याच्या शेजारचं ‘मराठा मंदिर’ थिएटर, मराठा मंदिरच्या मागे असलेला एस.टी. डेपो, त्याच्या मागे लागून असलेलं बीईएसटीचं मुंबई सेन्ट्रल आगर ते साधारणतः दक्षिण दिशेचा सात रस्ता (जेकब सर्कल) पर्यंतचा भाग ‘द भायखळा क्लब’ने व्यापलेला होता. थोडक्यात जहांगिर बोमन बेहराम मार्ग (बेलासिस रोड), आनंदराव नायर मार्ग (जुना लॅमिंग्टन रोड), मोहम्मद शहीद मार्ग (जुना मोरलॅंड रोड) आणि मराठा मंदिर मार्ग (जुना क्लब रोड) अशा चौकोनामध्ये सध्या मराठा मंदिर सिनेमा, रिजर्व बॅंक कॉलनी, एसटी आणि बेस्टचे बसडेपो आहेत ती चौकोनी जागा पूर्वी क्लबच्या विविध वास्तूंनी व्यापलेली होती व बाकीच्या विस्तृत मोकळ्या परिसरात रेसकोर्स आणि क्रिकेटचे मैदान होते..ही मोकळी जागा दक्षिणेस पार ‘सात रस्त्यापर्यंत (जेकब सर्कल)’ पसरलेली होती. क्लबच्या सभोवतालच्या मोकळ्या जागेत रेसकोर्स सुरु करण्याचा ठराव सन १८०२ मध्ये केला गेला आणि सन १८३३ सालापासून येथे रीतसर घोड्यांच्या शर्यती घेण्यास सुरुवात झाली ती सन १८८३ पर्यंत म्हणजे रेसकोर्स महालक्ष्मी येथे स्थलांतरित होईपर्यंत सुमारे ५० वर्षे येथे घोड्यांच्या शर्यती होत होत्या. ह्याच क्लबच्या जागेत ब्रिटीश काळातील पहिले क्रिकेटचे मैदान होते असे त्याकाळचा नकाशा दर्शवतो.
‘द भायखळा क्लब’ हा मुंबईतला सर्वात पहिला क्लब. मुंबईतील क्लब जीवनाची सुरुवात या क्लब पासून झाली. अत्यंत प्रतिष्ठित आणि केवळ अतिवरिष्ठ वर्तुळातील लोकांनाच याचे सदस्यत्व मिळायचे. सर्वसामान्य युरोपियनानाही या क्लबचे सदस्यत्व मिळणे अत्यंत अवघड असायचे आणि त्यासाठीही वशिला लावायला लागाचा. ह्या क्लबचे वैशिष्ट्य म्हणजे हा क्लब रेसिडेन्शियल होता. इंग्लंडहून भारतात नेमणूक झालेल्या वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची ह्या क्लबात काही दिवस राहण्याची सोय केली जायची.
भायखळा रेल्वे स्थानक
सन १८३३ साली सुरु झालेला ‘द भायखळा क्लब’ ही ह्या भागातली सार्वजनिक वापराची सर्वात प्रथम वास्तू. क्लबच्या स्थापनेनंतर लगेचच काही वर्षांनी याच परिसरात काही वर्षांनी सन १८५७ साली भायखळा रेल्वे स्थानक बांधण्यात आले. भायखळ्याचे रेल्वे स्थानक झाले आणि आणि या भागातील वस्ती हळू हळू वाढू लागली. भायखळा रेल्वे स्टेशनमुळे माझगावचा एक दुर्लक्षित भाग म्हणून गणला जाणारा भायखळा स्वतःची अशी वागली ओळख निर्माण करू शकला. मुंबईतील सतत धगधगता असलेला आणि त्यामुळे संवेदनशील असलेला दाट लोकवस्तीचा ‘मध्य मुंबई’ विभाग आकाराला येऊ लागला. याच भायखळा स्टेशन परिसरात असलेल्या सध्याच्या मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलच्या इमारतीत मुंबईतील प्रसिद्ध ‘एल्फिन्स्टन कॉलेज’ची स्थापना होऊन सुरुवातीची काही वर्ष कॉलेजचे वर्ग या सध्याच्या हॉस्पिटल इमारतीमध्ये भरायचे. तसेच सुप्रसिद्ध व्हीजेटीआयची स्थापनाही भायखळा स्टेशन इमारतीच्या साक्षीने झालेली नोंद इतिहासात सापडते.
अश्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हे भायखळा रेल्वे स्टेशन, मध्य रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी आता इतिहासजमा होणार असल्याची बातमी आज पेपर मध्ये वाचली आणि हळहळ वाटली. मुंबईच्या इतिहासाचे आणि जडण घडणीचे साक्षीदार असलेल्या आणि मुंबईतील सर्वात जुन्या असलेल्या (सीएसटी स्टेशन १८८८ साली बांधले गेले आहे) ह्या स्टेशनाची देखणी वास्तू येत्या काळात काळाच्या ही बातमी स्वीकारायला मन अजूनही तयार नाही.
— गणेश साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com
मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा लेखमाला- लेख २१ वा
संदर्भ –
स्थल-काल, अरुण टिकेकर,
मुंबईचा वृत्तांत, मोरो शिंगणे
जगन्मित्र इंटरनेट
Leave a Reply