द चेंज… (कथा) भाग २
नऊ नंबर मशिन ठिक करुन वेद ड्रॉइंग करण्याच्या लाकडी चौकटीजवळ उभा होता. त्याची नजर सभोवार दहाही मशिन्सवर फिरत होती. व्हिवर तत्परतेने तुटलेले धागे जोडत होते. धागे जोडताना क्षणभर थांबलेल्या मशिन्स, धाडधाड आवाज करीत पुन्हा चालू होत होत्या.
अचानक एका अस्पष्ट आवाजाने वेद चपापला! वॉरपिंग रुमचं शटर पूर्णतः बंद होतं,पण आतुन एक अस्पष्ट आवाज वेदला जाणवला. तिन व्हिवरस,एक जॉबर,दोन हेल्परस,स्वतः वेद आणि रात्रपाळीचा वॉचमन! असे जेमतेम आठजण रात्रपाळीला होते. वॉरपिंग,ड्रॉइंग, वाइंडींग,चेकिंग व मेंडींग रात्री बंद असे! वेगात वेद वॉरपिंग रुमच्या शटरकडे झेपावला,त्याचे कान शटरला लागले,आणि वेद पुरता हादरला!
वॉरपिंग रुममधून वॉरपिंग मशिन चालू झाल्याचा स्पष्ट आवाज येत होता. वेद जोरात ओरडला,“बलराम! वॉचमन कडून वॉरपिंगच्या चाव्या आण!”
बलराम गेटकडे धावला. जॉबर भोसले वेदच्या दिशेने येत होता. वेदचा घाबरलेला चेहरा पाहून तो गुढ हसला! तंबाखूची चिमूट तोंडात भरुन वेदजवळ येऊन उभा राहिला. जाडजूड शरीराचा आणि गोंडस चेहर्याचा तिवारी वॉचमन चाव्यांचा जुडगा सांभाळत लगबगीने आला.
कुणीही काहीही बोलत नव्हतं. वेदचा चेहरा थंडीतही घामाने डबडबला. सगळे जमलेले पाहून वेद परत ओरडला!
“मशिन्स सोडून इथे कशाला जमला आहात? जा मशिन्स सांभाळा!”
सगळेजण पुन्हा पांगले.
भोसले जॉबर मात्र तिथेच उभा होता,खांबासारखा!
वॉचमनने शटर वर लोटलं. वेद व भोसले काळोखात आत घुसले. वेदने स्विच ऑन केला. वॉरपिंग रुम प्रकाशली, पण सर्व शांत होतं. वेदने सिगारेट पेटवली, भोसले संपूर्ण रुमभर फिरला, पण एक शब्दही बोलला नाही. चौहुवार धूर सोडत वेद रूम बाहेर पडला.
“तिवारी रुम बंद कर दो!”
वेदचा खणखणीत आवाज साफ नरमला होता.
भोसले चेहर्यावर गूढ हावभाव आणत बाहेर पडला व तिवारीने शटर खाली ओढलं!
बुलेटचा स्पीड,इंडीकेटरवर ऐंशीच्या पुढे गेला होता. सकाळचे सात वाजून गेले होते. थंडगार बोचर्या वार्याने वेदचं अंग शहारलं! कानावर मफलर व हातात मोजे घातल्यामुळे थंडीपासून थोडाफार बचाव होत होता. अर्धा तासाचं अंतर जेमतेम पंधरा मिनिटात कापून वेदची बुलेट बिल्डींगच्या आवारात शिरली.
वेदने बाल्कनीकडे पाहीलं! हसतमुखाने वैदेही उभी होती. काही क्षणातच लिफ्टने वेद दुसर्या मजल्यावर पोहचला. फ्लॅटमध्ये शिरताच वैदेहीचे शांत चेहरा पाहून वेदला बरं वाटलं! क्षणभर तिला हग करावसं वाटलं,पण तो तसाच कोचावर बसला.
“साहेबांचा चेहरा आज असा काय दिसतोय? काही घडलं का?” वैदेही किचनमध्ये जाताजाता म्हणाली.
काही न बोलता वेद बाथरूममध्ये शिरला.
काही वेळातच वैदेही कामावर जायला निघाली. हिरव्या रंगाच्या अमेरिकन जॉर्जेट साडीवर काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला होता. आणि हिरव्या रंगाची छोटीशी बिंदी लावली होती. मागे पाठीवर मोकळे सोडलेले केस तिच्या सौंदर्यात अधिकच भर टाकत होते!
“वैदेही तू आज कामावर नाही गेलीस तर,नाही का चालणार?” सँडविच खाता-खाता वेद म्हणाला.
“हे बघ वेद, आजतरी मला शक्य होणार नाही. तुला काही प्रॉब्लेम आहे का?”
“काही नाही थोडं अस्वस्थ वाटतयं, बट इट्स ओकेऽ, यू मे गो!”
“शनिवार, रविवार मला सुट्टी आहेच, राहीला आजचा दिवस. मी गेल्यावर फक्त आराम कर, उद्या-परवा मी आहेच!”
“ओके डीअर,बाय!”
“बाय,टेक केअर!”
रात्रीच्या घटनेने वेदला खूप शरमल्यासारखं झालं होतं. आपण असं वेड्यासारखा का वागलो, याचं त्याला आश्चर्य वाटलं! बंद वॉरपिंग रुममध्ये मशिन चालू होणे कसं शक्य आहे?
बेडवर पडून वेद लग्नाचे फोटो पाहत होता. फोटोंबरोबर आठवणीही जमा होत होत्या. वैदेहीचा हसरा गोरापान चेहरा खूपच सुंदर दिसत होता!
इतक्यात दारावरची बेल वाजली. अल्बम बंद करून वेद उठला.
दारात जॉबर भोसले व बलराम उभे होते.
“तुम्ही!”
“हो मास्तर,आत येऊ का?”
“हो,पण काय झालं तरी काय असं?”
“कारणच तसं आहे!” भोसले जॉबर कोचावर विस्तारत म्हणाला.
बलराम चेहरा गंभीर करुन उभा होता. वेदने त्याला कोचावर बसण्यास सुचवलं. तोपर्यंत जॉबर भोसलेने मुख्य विषयाला हात घातला.
“काल घडलेली गोष्ट पटते ना तुम्हाला?”
“कसली?”
“वॉरपिंग मशिन चालू होण्याची!”
“नाही, नाही पटतं!”- वेद
“मग ऐका! कालची अष्टमी! याचं दिवशी,तिन वर्षापूर्वी पंढरी वॉरपरचा मशिनमध्ये गरगरा फिरुन मृत्यू झाला होता. त्यानंतर काही महीन्यानींच अष्टमीच्याच दिवशी असा अनुभव यायला सुरुवात झाली, जो काल तुम्ही घेतलात!
“व्हॉट नॉन्सेन्स!” वेद बेफिकीरपणे बोलला.
“इंग्रजी बोललं म्हणजे सत्य असत्य होत नाही मास्तर! जे आहे ते मान्य करा,आपण उद्याचं प्रोडक्शन मॅनेजर विनोद साहेबांच्या कानावर घालू,मी आहे तुमच्या पाठीशी!”
“मग या आधी का नाही घातलं?”-वेद
“या आधी प्रोडक्शन मॅनेजर विनोद साहेबांच्या कानावर आम्ही वेळोवेळी ही गोष्ट घातलेय. तसेच अजय व अनिल शेट यांना पण सांगितलेय. पण कोणीही विश्वास ठेवायला तयार नाहीत.म्हणून म्हणतो तुम्ही स्वतः त्यांच्या कानावर घातलतं तर फरक पडेल! आमच्या आणि तुमच्या सांगण्यात फरक आहे, तुमचं मानतील ते! या आधीच्या मास्तरांनी ज्या चूका केल्या, त्या तुम्ही नका करु, म्हणून कळकळीने सांगायला आलो. लवकरच काहीतरी शांतीचा उपाय करावा लागेल! जॉबर भोसले हात जोडत म्हणाला.
जॉबर भोसले बोलायला लागला तर पट्टयासारखा,नाहीतर दिवस नी दिवस मौन व्रत घेतल्यासारखा असायचा! थोडा विक्षिप्त व रांगड्या स्वभावाचा! लिडर असुनही कामाची टंगळमंगळ न करणारा! किती इंजीनियर आले नी किती गेले,पण जॉबर भोसले फॅक्टरी उभी राहिली,तेंव्हा पासून कंपनीत काम करीत होता.
बराच वेळ निःशब्द शांतता निर्माण झाली. वेद किचनमध्ये गेला व दोन चिवड्याच्या प्लेट घेऊन आला.
“मग आतापर्यंत तुम्ही मला याबद्दल का नव्हता बोललात?” वेदची शंका.
“तुम्हाला येऊन सहा महिने पण झाले नाहीत,म्हंटलं आधीच कशाला घाबरवा. सांगू योग्यवेळी!”
“मला वाटतं पंढरीचा मृत्यू, हा केवळ एक अपघात होता. त्यातुन असे विविध अर्थ काढणे योग्य नाही. आणि कालचा अनुभव म्हणालं तर,तो निव्वळ एक भास होता.”
“म्हणजे आतापर्यंत सगळ्यांना जे झाले,ते भास म्हणायचे का? आणि भास झाल्यावर कुणी नोकर्या सोडतं का?”
“दुसर्यांचं मला माहीत नाही,मी माझं सांगतो! आणि मी सोडतोय का नोकरी?” वेदही हार मानायला तयार नव्हता.
“बरं, पण आम्हाला काल जे झाले ते विनोद साहेबांच्या कानावर घालावेच लागेल!” भोसले उठता-उठता म्हणाला.
“अजिबात नाही,हा माझा वैयक्तिक भास होता. तोही माझी मनःस्थिती ठिक नसल्याने झालेला! त्यादिवशी मी नको त्या गोष्टींचा अधिक विचार केला, म्हणून असं झालं असावं? अशी भूत-बितं असती तर लोकांच जगणं मुश्किल झालं असतं!”
“म्हणजे आम्ही इथे आलो ही चूकच झाली म्हणायची?”
“आलात त्याबद्दल काही नाही,पण जी गोष्ट घेऊन आलात ती गोष्ट मला न पटणारी आहे”
“ठिक आहे,चलतो आम्ही! नंतर म्हणू नका आम्ही सांगितले नाही म्हणून!”
बलराम मात्र एक शब्दही बोलला नाही. भोसले बरोबर जसा आला तसा निघून गेला.
ते दोघे निघून गेल्यावर,वेद कितीतरी वेळ बाल्कनीत उभा राहून विचार करीत होता.
(क्रमशः)
(वरील कथा ही संपूर्णतः काल्पनिक आहे.)
लेखक : श्री.सुनील देसाई
२९/०३/२२
९९६७९६४५४२
Leave a Reply