द चेंज… (कथा) भाग-३
वैदेहीने ब्लॅन्केट मधून डोळे किलकिले करीत बाहेर पाहीले. सकाळचे सहा वाजले होते. वेद हातात रुईच्या पानांची माळ, ताटात नारळ व इतर पुजा साहित्य घेऊन, हनुमान मंदिरात जाण्याच्या तयारीत होता. वैदेहीला वेदची गंमत वाटली. भूत पिशाच्च मानणार्या लोकांना अंधश्रध्दाळू व अडाणी समजणारा वेद, देवावर मात्र प्रचंड श्रध्दा ठेवायचा! प्रत्येक शनिवारी त्याचा हा कार्यक्रम ठरलेला! अष्टविनायक तसेच महाराष्ट्रातील बहुतेक देवस्थानं त्याने पालथी घातली होती. वेदचं हे श्रध्दाळू रुप वैदेहीला आवडायचेही,पण त्याचं पॉझिटिव्ह शक्तिवरचं विश्र्वास ठेवणं व निगेटिव्ह शक्ति मानणार्यांना हास्यास्पद ठरवणं,वैदेहीला कधीही आवडायचे नाही. ती त्याला नेहमी म्हणायची,“देवाची एवढी भक्ति करतोस,पण देव तुला कधी दिसला का?”
त्यावर वेदचं उत्तर ठरलेलं असायचं,“तुझ्यासकट आज माझ्याकडे जे जे काही चांगलं आहे,त्यातच देवाचं दर्शन आहे!”
त्यावर वैदेही म्हणायची “बस्स! तुझी ही बाजू मी मानते! आता मला सांग तुझ्याकडे ज्या ज्या गोष्टी नाही आहेत,उदाहरणार्थ तू या देशाचा पंतप्रधान नाहीस,एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू नाहीस,मोठा गायक नाहीस! जे आहे त्याचं उत्तर तुझ्याकडे आहे मग जे नाही त्याचं काय उत्तर आहे तुझ्याकडे? या जगात काय केवळ चांगल्याचं गोष्टी आहेत? कितीतरी भयानक घटना रोज घडत असतात. कित्येक लोकं आपण कल्पना करणार नाही इतकं नरकमय जीवन जगतात. आणि या सगळ्यामागे असते एक विनाशकाली शक्ति! मग लोकं त्याला भूत-पिशाच्च म्हणोत, वाईट ग्रहमान म्हणोत किंवा मागिल जन्मीचं पाप म्हणोत,पण अशी एक विनाशकाली अदृश्य शक्ति आहे एवढं नक्की!”
लैचचा आवाज आला. दरवाजा उघडून वेद आत येत होता. कपाळावर त्याने हलकासा शेंदूर लावला होता. वैदेही आपल्याकडे पाहतेय असं पाहून तो म्हणाला,“तुझ्यासाठी प्रसाद आणलाय,स्नान झालं की खा!”
“का,आत्ता खाल्ला तर नाही का चालणार?”
“नाहीऽ!” वेद निर्धाराने बोलला.
“सॉरी बाबा,भडकतोयस काय येवढा? मी तुझी चेष्टा केली!”
“देवा-धर्माच्या बाबतीत चेष्टा केलेली मला आवडणार नाही!”
“मग भूता-खेतांबद्दल करु का?”
“वैदेह स्टॉप इट प्लीज,कंपनीत झालेली गोष्ट मी तुला सांगायला नको होती!”
“का,सत्य कटू असतं म्हणून? ती घटना एक भास नसून विनाशकाली शक्तिने आपलं दाखवलेलं अस्तित्व आहे. कंपनीतील इतरांचा अनुभव तू चेष्टेवरी नेतो आहेस,पण त्यातही तथ्य आहे! मेलेल्या पंढरीचं भूत झालयं असं मला म्हणायचं नाही, पण ती जागा घातक झालेय!”
“मग मी काय करावं असं तुला वाटतं?”
“एकतर तुम्हाला जॉबर भोसले म्हणत आहेत तस्सं,त्या जागेची चांगल्या गुरुजींकडुन शास्त्रशुद्ध शांती करुन घ्यावी लागेल! किंवा दुसरं म्हणजे तुला दुसरा एखादा जॉब बघावा लागेल!”
“तुझ्यासारखी उच्चशिक्षीत असा विचार करते याचं मला आश्चर्य वाटतं! पहिला उपाय तर मला पटतं नाही आणि दुसरा पळपुटेपणा मी करणार नाही!”
“थोडक्यात तुझा हट्टीपणा तू सोडणार नाहीस!”
“यात हट्टीपणा काय आहे? मला माझी तत्व आहेत!”
“तत्वांचचं दुसरं नाव हट्टीपणा असतं!”
“बरं बरं पुरे आता! तुझा सुट्टीचा मुड मला खराब नाही करायचायं!”
“आता काय खराब व्हायचा राहीला आहे?”
“सुरुवात कुणी केली होती आधी?”
“बरं माझ्या राजाऽ,मी हारले तू जिंकलास!”
“ठिक आहे, ठिक आहे, माफ कर दिया चलं!” असं म्हणत वेदने छानपैकी कॉफी करुन आणली. त्यानंतर दोघे कितीतरी वेळ हासत होते!
☕☕
जॉबर भोसलेच्या मनात वेद बद्दल कमालीचा द्वेष निर्माण झाला होता. आत्तापर्यंत गुरुवारी रात्रपाळीला घडलेली घटना सर्वोतोमुखी झाली होती. ताग्याचा एक खराब तुकडा गळ्यात अडकवून जॉबर भोसले इकडून तिकडे येरझारा घालत होता.
ऑफिसमधून खात्यामध्ये जाणारा दरवाजा उघडत,वेदने आत प्रवेश केला. जॉबर भोसलेची आणि त्याची क्षणभर नजरानजर झाली आणि दोघांनीही नजरा फिरवल्या. वेद चेकिंग रुमकडे चालू लागला!
क्वालिटी कंट्रोलर देसाई चेकिंग ग्लासवरुन हळुहळू कापड खाली घेचत होते. मध्येच थांबून पिक ग्लासमधून बारीक निरीक्षण करीत होते. कधी नव्हते असे डिफेक्टस आज त्यांना दिसत होते.
वेदला येताना पाहून ते डोळ्यांवरचा चष्मा काढत बोलले,“या वेद या!”
“बोला देसाई!” वेद उत्तरादाखल बोलला.
“काय सांगू वेद,तुमच्या शिफ्टमधला कपडा कधी एवढा खराब निघाला नव्हता! गुरुवारी रात्रपाळीला आपणच होतात ना?”
“का,काय झालं एवढं?”
“तागेच्या तागे माल खराब आलाय! सगळा आपल्या कंपनीचा माल असता तर गोष्ट वेगळी होती,पण नऊ नंबर व सात नंबरवर रेमंडचा माल आहे. वीविंग मास्तर कपूर तुमच्यावर खूप नाराज आहेत. सोमवारी विनोद साहेब येतील,तेंव्हा खूप हंगामा होईल! कारण रेमंडवाले विनोद साहेबांचा गळा पकडतील!”
वेदचा चेहरा साफ पालटला. पुढे येऊन त्याने चेकिंग ग्लासवरुन कापड खाली घेचायला सुरुवात केली. त्याचे तेजस्वी टपोरे डोळे निस्तेज वाटत होते. गेले कित्येक वर्ष रेमंडसारखी कंपनी विनोदसाहेबांच्या भरोशावर जॉबवर्क देत होती. आणि आज प्रथमच कापड इतकं खराबं निघालं,तेही वेदच्या शिफ्टमध्ये!
कपाळावरून हात फिरवत,वेदने देसाईंकडे पाहीलं.
“रीलॅक्स वेद,होतं असं कधी कधी!” क्वालिटी कंट्रोलर देसाई,धीर देत बोलले.
“बीलिव्ह मी देसाई,आय वॉज क्वाइट ओके दॅट नाइट! यू कॅन स्टडी माय लॉग रीपोर्ट!
“ते सगळं ठीक आहे,पण नाइटला शेवटच्या काही तासात क्वालिटी खराब निघालेय. काहींनी तर असं सांगितलं की,दोन नंतर तुम्ही खात्यामध्ये फिरकलाही नाहीत!”
“पावणेदोन वाजता मी नऊ नंबर मशिन ठिक केली त्यानंतर सातही मशिन्स ठिक चालत होत्या. एका मशिनचं गेटींग चालू होतं,एका मशिनचा बीम फिनिश झालेला, तर एक मशिन पार्टमुळे बंद होती. या व्यतिरिक्त जर का मशिन्समध्ये काही प्रॉब्लेम होता तर,वीवर लोकांनी तो मला सांगायला हवा होता!” वेद स्वतःची सफाई देत म्हणाला.
“सर्व कबूल वेद,तुमच्या कामाची पद्धत सर्वांना परिचित झालेय. तेंव्हा तो वाद नाही,पण जे घडलं आहे,तेही सत्य आहे.. !”-देसाई
चहावाला पोरगा, चहा घेऊन आला होता. वेदने उभ्याउभ्याच चहा घेतला आणि तो ऑफिसकडे निघाला. अचानक वॉरपिंगमध्ये जाऊन यावं असा विचार त्याच्या मनात आला. वीविंग मास्तर कपूरही तिथेच होते. जॉबकार्डवरचं कॅल्क्युलेशन सुरेश वॉरपरला समजावून देत होते. वॉरपिंग मशिन वेगात चालू होती. सहाय्यक वॉरपर, पायाच्या खटक्याने मशिनचा वेग कमीजास्त करीत होता. मशिनच्या लांबलचक लोखंडी रोलरभोवती रंगीबेरंगी धागे गुंडाळले जात होते. व मागे बीम तयार होत होता. हाच तयार बीम नंतर ड्राइंग होऊन,मशिनला लागणार होता.
“यार वेद,बहुत गडबड हुआ हैं परसो तेरे शिफ्टमें!” वीविंग मास्तर कपूर,चेहरा खराब करत बोलले.
“हां,देसाईने बताया मुझे। आपने विनोद साबको बताया क्या?” – वेद
“बताना पडा,माय डीअर! कल वह आ रहें हैं देखने!”
“देन वुई विल डिस्कस एव्हरीथिंग टुमारो,नाऊ आय अॅम गोईंग होम!”– वेद
“अभी क्या हुआ,मेरे दोस्त?”
“कुछ नहीं,मेरा तबियत ठीक नहीं!” असं म्हणत वॉरपिंगमधून वेद तडक बाहेर पडला!
(क्रमशः)
(वरील कथा ही संपूर्णतः काल्पनिक आहे)
लेखक: श्री.सुनील देसाई
३०/०३/२०२२
मो.९९६७९६४५४२
Leave a Reply