भारतात पहिल्यांदा रेल्वे सुरू झाली तेव्हा त्याचे डबे एखाद्या बग्गीप्रमाणे होते. डबे उघडे असायचे, त्यावर छत नसायचे. जनरल क्लासमध्ये तर बसायला बाकही नसायचे. डब्यात पाणी असणे किंवा संडासाची सोय असणे हे तर फारच दूरचे होते. अशा कामासाठी आणि चहा-पाणी-जेवण यासाठी ठराविक स्टेशनांवर गाडी भरपूर वेळ उभी करीत.
नंतर त्यात हळूहळू सुधारणा होत गेल्या. प्रथम वरच्या वर्गांना छत आले. मग संडास आले आणि जनरल क्लासला बाकडी आली. पुढे फ्रंटियर मेलसारख्या गाड्या सैनिकांची वाहतूक करण्यासाठी सुरू झाल्या. ही गाडी पूर्वी मुंबई बंदरातील धक्क्यापर्यंत जात असे. त्यात बोटीतून उतरलेले गोरे सैनिक बसल्यावर ती त्यांना अफगाणिस्तान सीमेपर्यंत घेऊन जात असे. साहजिकच त्यात जेवणासाठी वेगळे डबे जोडले जाऊ लागले. सीटवर गाद्या आल्या, झोपण्यासाठी वेगळी व्यवस्था झाली.
पण स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने सर्व वर्गांच्या डब्यांमध्ये सोयी-सुविधा वाढीस लागल्या. तृतीय श्रेणी शयनयान ही त्यातली मोठी झेप होती. नंतर जुना सेकंड क्लास बंद झाला व वातानुकूलित डब्यांची सुरुवात झाली. पुढे सर्व डब्यांतील बाकांवर झोपण्यासाठी गाद्या आल्या. खान-पान सेवेत खूप वाढ झाली. सर्व शयनयान डब्यात पिण्याच्या पाण्यासाठी हंडे ठेवण्याचाही प्रयोग झाला, पण पुढे तो बारगळला.
जसजशी मागणी वाढत गेली तसतसे प्रवासी गाड्यांचे विविध प्रकार झाले. पॅसेंजर, मेल, एक्स्प्रेस या तर अगोदरपासून असलेल्या गाड्या. जयंती जनता एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी, जनशताब्दी, संपर्क क्रांती, दूरंतो, गरीब रथसारखी गरिबांसाठी स्वस्तातील वातानुकूलित गाड्या आल्या.
वातानुकूलित गाड्यांमध्ये एसी-थ्री टायर, टू टायर, एसी चेअर कार व एसी प्रथम वर्ग असे डबे आले. वातानुकूलित डब्यात बेड रोल दिला जातो. फलाटांचेही खूप आधुनिकीकरण झाले. पण या सर्वांचा जबाबदारीने वापर करण्याची वृत्ती अजूनही जनतेत अभावानेच आढळते. त्यामुळे यातील अनेक
सेवा योग्य स्थितीत राहात नाहीत.
Leave a Reply