नवीन लेखन...

पालखीचा बदलता प्रवास

प्राचीन काळापासून आजतागायत आणि पालखी प्रचलित आहे. माणसाला वाहून नेणारे वाहन म्हणजे पालखी ! पूर्वी राजा, राणी श्रीमंत व्यक्ती पालखीतूनच जात असत. आजही उच्च पर्वतावरील देव दर्शनासाठी वृद्ध लोक पालखीचाच वापर करतात. पालखीचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. देवदेवतांमध्ये अत्यंत ऐषारामाचे वाहन अशा पालखीमध्ये बसून राजा सुग्रीव हिंडत असे. त्याची पालखी अनेक वानर-सेवक वाहून नेत.

राक्षसांच्या स्त्रियासुद्धा पालखीतून जात येत असत. रामायणात बिभीषण सीतेला पालखीतून मोठ्या सन्मानाने आणत असल्याचा उल्लेख आहे. महाभारतात शस्त्र व्यवस्थेसाठी अनेक पालख्यांची बांधणी करण्यात आली होती. जंगलात जाताना दमयंतीला पालखीतून नेले होते.

वास्तविक शर्मिष्ठा देवयानीची दासी बनली होती. पण ती राजकुमारी होती. पायी कशी जाणार? देव यानीकडे जाताना ती पालखीतून गेली. बरोबर हजारो स्त्रिया होत्या.

एकदा नहुषाला अमरावती राज्याचा औट घटकेचा राजा करण्यात आले. नहुष राजा लोभी होता. राज्य मिळावे. त्या बरोबर त्याला सुंदर स्त्रियाही हव्या होत्या. इंद्राणीला ते समजताच इंद्राणी म्हणाली, ‘माझ्याकडे यायचे असेल तर एखाद्या राजासारखे सुखाने पालखीतून ये. पण वाहकांच्या जागी ऋषी असले पाहिजेत.’

ऋषींनी वाहून नेलेल्या पालखीतून कामांध राजा येऊ लागला. ऋषी हळूहळू चालत होते. राजाला धीर नव्हता. तो क्रोधाने म्हणाला, ‘सर्प, सर्प!’ (लवकर, लवकर चला) आणि एका ऋषीच्या कमरेत जोराने लाथ मारली.

बसं! ऋषी संतापले. त्यांनी शाप दिला, ‘तू सर्प होशील.’

राज स्त्रिया पालखीचा वापर करीत. वनविहार करायला जाणाऱ्या स्त्रिया पालखीतून जात असतं. उत्सव प्रसंगी, स्वागत प्रसंगी, देवळात जाताना, बाजारात जातांना पूर्वी श्रीमंत स्त्रिया पालखीतून जात असत. स्त्रियांच्या किंवा राजाच्या पालख्या एकट्याच निघत नसत. त्यांच्याबरोबर फार मोठा लवाजमा असे. सरदार आहे, दासदासी इत्यादि. पालखीची खरी शोभा यातच असे. स्वयंवराच्या वेळी वर राजासारखा पालखीतूनच यायचा. वधू सासरी जाताना पालखीतूनच जायची. आजही काही जमातीतून पालखीची (डोली’ची) प्रथा आहे.

‘अग्निपुराणा’त विष्णूची शोभायात्रा पालखीतून काढल्याची नोंद आहे. आजही पालखीतूनच देवांची मिरवणूक काढतात, भजने म्हणतात, वाद्य वाजवतात.. प्राचीन काळात पालख्यांची नावे ठेवली जात. महावीराची चंद्र-धवल पालखी ‘चंद्रप्रभा’ या नावाने संबोधिली जाई आणि अश्वसेनाची पालखी तिच्या आकारावरून ‘विशाल’ म्हटली जाई.

पालख्या अनेक प्रकार असत. पण ‘मानसोल्लास’ या ग्रंथात पालख्यांचे दोन प्रकार सांगितले आहेत. ‘दोला’ व ‘सुखासन.’ दोला म्हणजे एक दंडाची पालखी. यात दोनच व्यक्ती बसू शकतात. सुखासन म्हणजे सोने, रत्ने, हिरे यांनी मढविलेली पालखी. आत गादीतक्के बसायला. हिला दोन दांडे. ही हस्तिदंतांनी बनविलेली व वाद्याच्या कातड्याने झाकलेली असे. या पालखीत चार व्यक्ती बसू शकत. ‘राजा प्रश्नीय टीका’ नावाच्या जैन ग्रंथात ‘जपान’ पालखीचा उल्लेख आहे. जपान पालखी चारी बाजूंनी झाकलेली. एक पुरुष उंचीची असा ‘कामे सूत्रा’त उल्लेख आहे, ही पालखी श्रीमंत वापरत असत. चौकोनी, दोन हात लांबीची पालखी ‘युग्म’ नावाने ओळखली जात असे. हिचा वापर काही भागात खूप होता. दोन सेवकांकडून वाहून नेणाऱ्या पालखीला ‘गिल्ली’ म्हणत.

मोगलांच्या काळातील पालखी बहुरूपी होती. ‘आइने-अकबरी’मध्ये ‘सिंहासन, डोली, चौडोल’ इत्यादि नावांनी ती अमर झाली आहे. मोगल बादशहासुद्धा पालखीवर फिदा होते. हजारो प्रकारच्या पालख्या बादशहाच्या सेवेसाठी तयार असत. अनेक बादशहांनी पालखी सेवकांची चित्रे काढून घेतली होती. असी, इब्राहिम, केशव इत्यादि पालखी वाहक होते. त्यांच्यात दशवंत प्रसिद्ध होता. अकबराने आपली पालखी वाहून नेणाऱ्या कलाकारांचे भितिचित्र पाहिले. तो एवढा खूष झाला की, त्याने त्या सेवकांचा चित्रकारां मध्ये समावेश करून घेतला व त्यांचा गौरव केला.

शाही परिवारातील व सरदारांच्या स्त्रिया पालखीतून हिंडत असत. पालखी निघताना पुढे खोजे व रक्षक रस्ता स्वच्छ करीत पुढे जात. पालखी मोत्यांच्या झालरी असत.

पालखी कन्येचे प्रतीक बनले. पालखीची मागणी करणे म्हणजे कन्येची मागणी असे मानले जाई. लग्नांत मुलीला पालखीतून भेट दिली जात असे. वधूला सासरी जाताना तिच्या पालखीतूनच रवाना करण्याची प्रथा सुरू झाली.

बंगालमध्येही पालखीला फार मोठा मान होता. पालखी वाहून नेणारा सेवक रस्त्यातच थकला व बसला तर त्याला शिक्षा होत असे. तात्काळ त्या जागी दुसरा सेवक येई किंवा ती पालखी अशुभ समजून दुसऱ्या पालखीत बसण्याची व्यवस्था होई.

छत्रपती शिवाज महाराजांच्या काळात आबाजी सोनदेवांनी कल्याणच्या सुभेदाराची सुंदर सून पालखीतूनच आणली होती. रजपूत स्त्रिया पालखीचा उपयोग करीत. पदमिनीच्या प्राप्तीसाठी कामांध झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीची रग चांगली जिरविली ती पालखीनेच.

पंधराव्या शतकात चार पायांची झुलणारी पालखी होती. मोठ्या शहरांतून खुर्ची पालखी असत. दूरच्या प्रवासात मोठी पालखी वापरीत. इंग्रजांनाही ही पालखी फार आवडली. इंग्रज अधिकाऱ्यांनी गादी ठेवलेल्या मोठ्या पालखीला ‘हवाई पालखी’ असे नामाभिधान केले. त्या काळची पालखी सहा फूट लांब व दोन फूट रुंद ती. नंतर तिची लांबी साडेचार फूट झाली. अठराव्या शतकाच्या सुरूवातीस बंगालमध्ये पालख्यांची संख्या वाढली. नबाबांची पालखी आवडती बनली. छोटे मोठे इंग्रज अधिकारी सुद्धा पालखी ठेवू लागले. ते फुलांनी पालखी सजवू लागले. दंड्याच्या दर्शनी भागावर वाघाची आकृती असे. रोजची व उत्सवाची पालखी वेगळी असायची. ३०० ते ३००० रुपये पर्यंत पालखीची किंमत असे. महिना २५ रुपये भाड्याने पालखी मिळत असे. ही पालखी पाच ते सहा सेवक वाहून नेत.

१८ व्या शतकाच्या शेवटी ‘महन्ने’ पालखीचा वापर फार होता. हिला चार पाय असत. साडेतीन फूट उंच, दीड फूट लांब, अडीच फूट रुंद असा तिचा आकार असायचा. वजनाने फार कमी असायची. आतमध्ये गादीतक्के असत. शृंगारासाठी प्रसाधन साहित्य असे.

कंपनी सरकारने कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी पालखी वापरू नये असा नियम केला. त्यांच्या दृष्टीने पालखी म्हणजे विलासी व आळशी जीवनाचे प्रतीक होते. १८५० साली पालखीचा खर्च बंद करण्याचा हुकूम कंपनीच्या संचालकाकडून आला. पण तो कोणी मानला नाही. १८५८ साली मात्र हुकूम न मानणाऱ्याला नोकरीवरून कमी करण्यात आले. तरीही काही इंग्रज पालखी वापरीत. घोडागाडीचा जन्म होईपर्यंत पालखीचे अखंड साम्राज्य होते.

१९ व्या शतकात नवरदेवाची ओळख पालखी वरून होई. पण तो घोड्यावर बसू लागला नि पालखी राहिली फक्त वधूसाठी.

(आधारित)

– शेखर आगासकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..