उन्हाळी असो वा हिवाळी; सर्दी ही सर्दी असते. असा विचार स्वाभाविकपणे आपल्यापैकी काहींच्या मनात येईल. आयुर्वेदानुसार मात्र तसे नसते. विविध ऋतूंत होणारी सर्दीदेखील विविध कारणांमुळे होत असते आणि या कारणांनुसारच तिचे उपचारदेखील बदलत असतात. उन्हाळा आला की अंगाची काहिली सुरु होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण घटू लागते. साहजिकच जास्त पाणी पिण्याकडे आपला कल असतो. इथपर्यंत सारे काही ठीक असते. मात्र थेट पाणी न पिता पाण्यासारखे अन्य द्रवपदार्थ; त्यातही अयोग्य प्रमाण आणि पद्धतीने घेतले तर सर्दी झालीच म्हणून समजा!
ताक, लस्सी, फळांचे रस आणि आईसक्रीम हे पदार्थ साधारणपणे ‘उन्हाळ्यातील प्रिय’ पदार्थांच्या यादीत मोडतात. अनेकदा रस्त्याच्या कडेला असलेल्या एखाद्या गाडीवरून हे पदार्थ खाल्ले/ प्यायले जातात. क्वचित कधीतरी यातच नारींगी- जांभळ्या बर्फाच्या गोळ्याचीही भर पडत असते. हे सारे पदार्थ अतिशय थंड आणि कफ वाढवणारे आहेत. (यात अपवाद फक्त ताकाचा; ताक उष्ण आहे मात्र आंबट असल्याने कफ वाढवते) या पदार्थांचं सेवन करून लगेच उन्हातान्हातून फिरणेदेखील होते. या पदार्थांमुळे शरीरात वाढलेला कफ उन्हाच्या उष्णतेने वितळून द्रवस्वरुपात निर्माण होतो आणि सर्दी, अपचन आणि प्रसंगी ताप अशी लक्षणे दाखवू लागतो. उन्हातून आल्या-आल्या पाणी पिऊ नये असे सांगतात त्यामागे हे एक प्रमुख कारण आहे.
आता ही सर्दी कशामुळे झाली आहे हे लक्षात आल्यावर केवळ Antibiotics वा Antihistamines सारख्या आधुनिक औषधांचा मारा करून सर्दी दाबून चालणार नाही हे आपल्या लक्षात आले असलेच. उपाययोजना करायचीच तर ती मूळ कारणावर करायला हवी. याकरता वरील पदार्थ जास्त प्रमाणात; विशेषतः जेवण झाल्यावर खाणे टाळावे. तसेच या पदार्थांच्या सेवनानंतर उन्हातून चालणे टाळावे. वरील कोणत्याही कारणाशिवाय ज्यांना उन्हाळ्यात सर्दी होण्याचा त्रास असेल त्यांची प्रकृती, दिनचर्या वा व्याधीक्षमत्व यांपैकी एक गोष्ट यास कारणीभूत असू शकते. वरीलपैकी कोणत्याही कारणास्तव सर्दी झाली तरी आपल्या वैद्यांचा सल्ला आवर्जून घ्या. ‘सर्दी औषधे घेतल्यास सात दिवसांनी बरी होते आणि न घेतल्यास आठवड्याभरात बरी होते’ अशी मखलाशी आयुर्वेदाकडे नाही. सततच्या सर्दीकडे दुर्लक्ष हे भविष्यात गंभीर आजारांना निमंत्रण ठरते हे कायम लक्षात असू द्या.
त्यामुळे या उन्हाळ्यात ‘आक्छू- आक्छी’ सुरु झालं की आपला वैद्य गाठा!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
12 March 2017
Leave a Reply