नवीन लेखन...

बांगलादेशातील हिंदूंची अवस्था आणि त्यांना भारताचे नागरिकत्व देण्याची गरज

पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, बारामती तालुक्यात कारवाई करून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ३६ बांगलादेशींना पकडले २४ मे ला पकडले. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एबीटी या दहशतवादी संघटनेच्या संपर्कातील तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती.

मानवतेच्या नात्याने आम्ही रोहिंग्या निर्वासितांना आमच्या देशात आश्रय दिला पण आता त्यांना मायदेशी परत पाठवण्यासाठी भारताने आमची मदत करावी असं आवाहन बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांनी कोलकत्यामध्ये एका कार्यक्रमात २४ मे ला पंतप्रधान मोदींना केले. यासाठी मोदींनी म्यानमारशी बोलावं अशी विनंतीही त्यांनी केली.अर्थातच ही मदत केल्यानंतर बांग्लादेशने भारताने प्रत्येक वर्षी पकडलेल्या हजारो अवैध बंगलादेशींना परत घेतले पाहिजे.

भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे स्थलांतरित
नागरिकत्व कायद्यातील सुधारणांच्या प्रस्तावाने आसाममध्ये खदखद सुरू आहे. बांगलादेशातून येत असलेल्या निर्वासितांमुळे, घुसखोरांमुळे आसाममधील लोकसंख्येचे समीकरणच बिघडत चालले होते. राज्याचा सामाजिक आणि आर्थिक चेहरा विरूप होऊ लागला होता. त्याविरोधात पहिल्यांदा तेथे आवाज उठवला ऑल आसाम स्टुडंट युनियनने. पुढे त्यांना तेथील विविध राजकीय गटांनीही पाठिंबा दिला. १९८५च्या आसाम कराराने ते आंदोलन शमले. त्यावेळचा तो संघर्ष केवळ आतले भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे स्थलांतरित असा होता. आज नागरिकत्व कायद्यातील प्रस्तावित सुधारणांमुळे संघर्षां पुन्हा सुरु झाला आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून येणाऱ्या अल्पसंख्याकांना म्हणजे हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना अनधिकृत स्थलांतरित म्हणता येणार नाही, अशी ही सुधारणा आहे.

२४ मार्च १९७१च्या मध्यरात्रीनंतर भारतात आलेल्या स्थलांतरितांना आसामातून परतावे लागेल असे आसाम करारात ठरले होते. आता त्यात बदल करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून, त्यानंतर आलेल्या बांगलादेशी हिंदूंना सामावून घेणार आहे. याला आसाममधील बराक खोऱ्यातील बंगालीभाषक हिंदूंचा पाठिंबा आहे. १९७१ पासून भारतात आलेल्या बांगलादेशी हिंदूंची संख्या १५ ते २० लाख आहे. नागरिकत्व कायद्यातील ही सुधारणा मंजूर झाली, तर बांगलादेशातील किमान १ कोटी अजुन हिंदू भारतात घुसतील आणि तसे झाल्यास पुन्हा आसामी विरुद्ध बंगाली आणि त्या आधारावर ब्रह्मपुत्र खोरे विरुद्ध बराक खोरे असा संघर्ष उफाळून येऊ शकतो.

पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंची अवस्था
फाळणीनंतर अनेक वर्षांनी सुध्दा, पाकिस्तानातील हिंदूंची कत्तल केली गेली किंवा त्यांची धर्मांतरणेही घडवून आणली गेली. परिणामी पाकिस्तानातील त्यांची संख्या जी १९५० मध्ये ८ ते ९% होती, ती आज १० लाखांवर म्हणजे २ ते ३ %हुन कमी झालेली आहे. पुर्व पाकिस्तानात(आताच्या बांगला देशात) फाळणीच्यानंतर १९५० मध्ये २४ ते २५ % हिंदू होते, २०११च्या जनगणनेनुसार बांगलादेशात आज केवळ ८.६ टक्के हिंदूच शिल्लक उरले आहेत.त्यांची संख्या आता एक कोटी आहे.संयुक्त राष्ट्रसंघाचेही बांगलादेशातील हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येकडे दुर्लक्ष आहे. असाच प्रकार सुरू राहिला, तर या देशात हिंदूंची लोकसंख्या हळूहळू,शून्याच्या दिशेने गेल्याशिवाय राहाणार नाही.
मूळचे बांगलादेशचे आणि सध्या अमेरिकेत शास्त्रज्ञ म्हणून वास्तव्यास असलेले दीपेन भट्टाचार्य ‘स्टॅटिस्टिकल फ्युचर ऑफ़ बांगलादेशी हिंदूज’ या आपल्या लेखात सांगतात की, ‘‘२०२०पर्यंत बांगलादेशात केवळ १.५ टक्के हिंदू उरतील. सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले बांगलादेशातील राजकीय अभ्यासक प्रोफ़ेसर अली रियाझ, त्यांनी त्यांच्या ‘गॉड विलिंग:द पॉलिटिक्स ऑफ़ इस्लामिझम’ या पुस्तकात असा निष्कर्ष काढला की, ‘गेल्या २५ वर्षांत बांगलादेशातून ५३ लाख हिंदूंनी पलायन केलेले आहे.’

१९७० मध्ये पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांत मुजीबूर रहमानच्या आवामी लीगचा विजय झाला. त्यांच्या हातात सत्ता जाऊ नये आणि पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) फुटून निघू नये म्हणून याह्याखाननी फार मोठय़ा प्रमाणावर दडपशाही चालू केली. तीस लाखांवर नागरिकांची कत्तल केली आणि एक कोटी निर्वासित भारतात आले. हा इतिहास ‘ गॅरी बास यांच्या पुस्तकात दिला आहे.अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक ,पत्रकार गैरी बास यांच्या २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द ब्लड टेलिग्राम : निक्सन, किसिंजर ऍण्ड ए फॉरगॉटन जेनोसाईड’ या पुस्तकाने जगात खळबळ उडवून दिली. विदेशी लेखकाने बांगलादेश निर्मितीच्या वेळी हिंदूंवर झालेल्या भयानक अत्याचाराला जगापुढे मांडले आहे, तरी त्यावर त्यावेळेच्या भारत सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही, भारतातील वर्तमानपत्रे, संघटना आणि मानवाधिकारवादी नेत्यांनीही या मुद्यावर तिखट आणि प्रभावी प्रतिक्रिया द्यायला पाहीजे होती.पण, असे काही घडले नाही.१९७१ साली हिंदूंच्या नरसंहाराची बाब उजेडात आली असतानाही, भारताने या नरसंहाराचे वर्णन, बांगलादेशातील नागरिकांवर झालेले ते अत्याचार आहेत, अशा शब्दांत केली आणि हिंदू शब्दाचा उल्लेख टाळला.

आमची नैतिक जबाबदारी नाही का?.
बांगलादेशातील संघटनांच्या माहितीनुसार सुमारे ३० लाख बांगलादेशी हिंदू या नरसंहारात मारले गेले. दुर्दैवाने भारतात सरकारने बांगलादेशात मारल्या गेलेल्या हिंदूंच्या बाबतीत दु:ख प्रकट करणारा शब्दही काढला नाही. भारतीय नागरिक जगाच्या कोणत्याही कोपर्यात हिंदू, शीख, जैन, बौद्ध यांच्यावर होणार्या आघातांबाबत गप्प कसा काय बसू शकतो? त्यांची दु:ख, वेदना, अन्यायाबाबत आमची नैतिक जबाबदारी नाही का?. इंदिरा गांधीनी एक माहिती भारतीय जनतेपासून काळजीपूर्वक लपवून ठेवली. ती म्हणजे १९७१ मध्ये भारतात आलेले ९० टक्के निर्वासित हिंदू होते.

अशांत बांगलादेश आणी बांगलादेशीं हिंदूवर वाढते अत्याचार
हिंदू हे बांगलादेशाचे अनावश्यक नागरिक आहेत आणि ज्या सहजतेने हिंदूंना त्रास दिला जात आहे त्यावरून आणखीही अत्याचारांची अपेक्षा करता येते. आपण हिंदूंना समान वागवतो ह्या, खोट्या कल्पनेने बांगलादेश त्रस्त आहे. “राष्ट्रीय देशभक्ती”च्या नावावर जेव्हा हिंदूंच्या संपदा लुटल्या जातात, घरे जाळली जातात, आणि त्यांना हाकलून दिले जाते तेव्हा संदेश मिळतो की, बांगलादेशात हिंदुना स्थान नाही.१९७१ चा इतिहास अभ्यासत असतांना हे स्पष्ट होते की, मुस्लिम आणि हिंदू ह्यांना पाकीस्तानी लष्कर निरनिराळ्याप्रकारे वागवत असे. अनेक बंगाल्यांनी त्याचा लाभही घेतला. पाकीस्तानी छळाला भिऊन हिंदू पळून भारतात आले तेव्हा, बंगाली मुस्लिमांच्या एका गटाने त्यांची संपत्ती गिळंकृत केली, एवढेच नव्हे तर त्यांच्या जमिनींवर सोयीस्कररीत्या कब्जाही केला. त्यामुळे परत आलेले व बळकावलेल्या जमिनी परत मागणारे हिंदुच हेच अनेक बांगलादेशी मुस्लिमांच्या हिंदूद्वेषाचे मुख्य कारण झाले.ती एक सामुदायिक चोरी होती. वर्तमान सरकारने हिंदूच्या संपदा परत करण्याकरता एक कायदा पारीत केला, मात्र ते एक नाटकच ठरले, कारण बांगलादेशीं हिंदूंनी ह्या कायद्याच्या मागे पळण्यातच अधिक पैसा गमावला.

बांगलादेशातील ४०% हिंदू कुटुंबे शत्रू-संपदा-कायद्याने (Enemy Property Act) प्रभावित झाली. त्यात जवळपास ७,५०,००० शेतीवंचित कुटुंबे समाविष्ट होती. परिणामी हिंदू कुटुंबांनी गमावलेल्या एकूण जमिनींचा अंदाज १६.४ लाख एकर इतका आहे, जी हिंदू समाजाच्या मालकीतील एकूण जमिनींच्या ५३% आहे. हिंदू हे बांगलादेश लोकसंख्येच्या ८% असले तरी सत्तेमध्ये त्यांचे प्रमाण शून्यच आहे जरी ते सर्वात मोठे अल्पसंख्यांक असले तरी, त्यांचा कुणी प्रवक्ता नाही आणि त्यांची कुठलीही संघटना नाही.अवामी लीग आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी ह्यांच्या सुंदोपसुंदीत असे दिसते की, बहुसंख्यांकांत सहजीवन शक्य नसले तर, अल्पसंख्यांकांसोबत जगणे तर अशक्य आहे. हे केवळ हिंदूंकरताच आहे असे नाही, तर प्रत्येकच अल्पसंख्यांकास हे लागू आहे. आदिवासी आणि बौद्धांनाही ते काही वेगळे वागवत नाहीत. त्यामुळे हिंदूंचे दमन सुरूच राहील आणि बांगलादेशात हिंदूंना नागरिक म्हणून असलेले हक्क नाकारले जातच राहतील.
बांगलादेशमध्ये शांतता नांदावी तसेच तिथे सामाजिक स्थिरता निर्माण व्हावी, अशी चांगला शेजारी म्हणून भारताची अपेक्षा आहे.नाही तर उरलेले १ कोटी बांगला देशी हिंदू भारतात पळुन येतिल.

काय करावे
बंगलादेश व पाकिस्तानमध्ये अत्याचार झाल्यामुळे हे हिंदु भारतात परत येत आहेत.त्यांना अर्थातच आपण भारताचे नागरिकत्व दिले पाहिजे. आसाममध्ये आसामी विरुद्ध बंगाली असा संघर्ष होऊ नये म्हणुन त्यांना आसाम सोडुन बाकी भारत बांगलादेश सिमेवर वसवले पाहिजे.जरुर पडल्यास त्यांना भारताच्या इतर प्रांतात वसवले जावे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..