स्टीव्ह आयर्विन यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९६२ रोजी मेलबर्नजवळील एसिडोन या उपनगरामध्ये झाला.
१९९५ ते २००५ या काळामध्ये जंगली प्राण्यांना सहज हाताळण्याच्या आपल्या कौशल्यामुळे स्टीव्ह घराघरात ओळखीचा चेहरा झाला होता. अक्राळ-विक्राळ मगरी, विषारी साप यांना एकीकडे लीलया हाताळताना प्रेक्षकांशी हसतखेळत संवाद साधणाऱ्या स्टीव्हचे खरे नाव स्टीफन रॉबर्ट आयर्विन असे होते. त्याचे वडील आयरिश होते. ते वन्यजीव तज्ज्ञ होते आणि त्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांशी संबंधित हर्पेटोलॉजी विषयात विशेष स्वारस्य होते. तर आई वन्यजीव पुनर्वसन तज्ज्ञ असल्याने प्राणी प्रेमाचा वरसा त्याला घरातूनच मिळाला होता. स्टीव्हला सहाव्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी एक अजगर भेट दिला होता. तर वयाच्या नवव्या वर्षापासून तो मगरींना हाताळणे शिकला होता.
आयर्विन कुटुंब एसिडोनमधून क्विन्सलॅण्ड शहरामध्ये राहण्यास आले तेव्हा आयर्विन दांम्पत्याने क्विन्सलॅण्ड रेप्टाइल ॲण्ड फॉना पार्क नावाने एक छोटे प्राणीसंग्रहालय सुरु केले. स्टीव्हचे बालपण या प्राणीसंग्रहालयामध्ये मगरी आणि सापांच्या सानिध्यात गेले. १९९१ साली स्टीव्ह आपली पत्नी टेरी रेयन्सला पाहिल्यांदा भेटला. पाहता क्षणी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलेय. टेरी ही अमेरिकन निसर्ग संवर्धन तज्ज्ञ होती.१९९२ रोजी स्टीव्ह आणि टेरी यांनी लग्न केले. लग्नानंतर हनिमूनला गेलेले हे दोघे प्राणी प्रेमी मगरींचा पाठलाग करुन त्यांची नोंद करत होते. याच वेळेस शूट करण्यात आलेला व्हिडीओ नंतर ‘द क्रोकोडाइल हंटर’ या जगप्रसिद्ध कार्यक्रमाचा पहिला भाग ठरला. ‘द क्रोकोडाइल हंटर’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. अमेरिका, ब्रिटन आणि जगभरातील एकूण १३० देशांमध्ये स्टीव्हला ‘क्रोकोडाइल हंटर’ म्हणून याच कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख मिळाली. ‘द क्रोकोडाइल हंटर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या काळात ५० कोटी लोकांपर्यंत स्टीव्ह आणि त्याच्या कुटुंबाचे कार्य पोहचले.
स्टीव्हच्या नावाने काही कासवांच्या प्रजातींचे नामकरण करण्यात आले आहे. यापैकी पहिली प्रजाती ठरली ती एसलिया आयर्विन. मॅक्सिकोमध्ये दोन स्कुबा डायव्हर्सबरोबर स्टीव्ह एका माहितीपटावर काम करत असताना एक अपघात झाला ज्यामध्ये एका स्कुबा डायव्हरचा मृत्यू झाला होता. ४ सप्टेंबर २००६ रोजी ओशन्स डेडलीएस्ट’ या माहितीपटाच्या चित्रिकरणादरम्यान झालेल्या अपघातात स्टीव्हचे निधन झाले. चित्रिकरणासाठी समुद्रात उतरलेल्या स्टीव्हच्या छातीवर स्टिंगरे माशाच्या शेपटीचा तडाखा बसल्याने त्याचा मृत्यू झाला.
गुगलने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा ‘क्रॉकडाइल हंटर’ स्टीव्ह आयर्विन याच्या जयंतीनिमित्त डुडलच्या माध्यमातून त्याला सलाम केला होता.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply