नवीन लेखन...

कोकणात विमान भरारी

१२ सप्टेंबर रोजी कोकणामध्ये चिपी विमानतळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिले विमान उतरले. यशस्वी चाचणी झाली. आता लवकरच नियमित विमानसेवा सुरु होईल.

आमच्या लहानपणचा कोकण म्हणजे गरीब, संथ, शांत आणि दुर्गम असा छोट्या छोट्या खेड्यानी बनलेला भाग. जुने लोकं त्या वेळच्या प्रवासाच्या आठवणी सांगायचे – म्हणायचे पूर्वी सर्व्हिस मोटारी होत्या. त्यांनी तुटक तुटक प्रवास करत एक -दोन दिवसांनी लोकं गावी जात. पुढे बोटी सुरु झाल्या. भाऊच्या धक्क्यावरून सुटायच्या. तो पण प्रवास मोठा जिकीरीचा असायचा. मोठमोठी बोचकी, पत्र्याच्या पेट्या घेऊन गावाजवळच्या बंदरात पडावाने उतरायचे आणि मग बंदरावरून सर्व्हिस मोटार किंवा बैंलगाडी ने आपल्या गावी पोचायचे; काहीच साधन नसेल तर पायी पायी जायचे. रेल्वे ची सोय होती पण कोल्हापूर पर्यंत – पुढे पुन्हा सर्व्हिस मोटार अथवा बैलगाडी ने गावी जायचे. किमान दोन दिवसाचा कालावधी लागायचाच. नंतर एस टी चालू झाल्या – सुरवातीला “गाव तेथे एस टी” असा प्रकार नसल्याने एस टी मुख्य ठिकाणी थांबायच्या आणि तेथून पुढे बैलगाडी अथवा सर्व्हिस मोटार अथवा दुसरी एस टी पकडायला लागायची. रिक्षा नावाचा प्रकार अजून अस्तित्वात यायचा होता. रातराणी चालू करून एस टी महामंडळाने चाकरमान्यांची चांगली सोय केली. त्या प्रवासाला पण १२-१८ तास लागायचे. कोकणचा प्रवास सोपा नसायचा.

अशा परिस्थितीत आम्ही लहानपणी कोकणात गावी जायचो त्यावेळी ह्या दुर्गम भागात दळण-वळणाची आधुनिक साधने येतील असे आम्हाला स्वप्नात पण वाटायचे नाही. कार फार कमी लोकांकडे होत्या. मुंबई वरून गावी जायचे आणि सुट्टी संपल्यावर परत यायचे म्हणजे भयंकर यातायात असायची. तिकीट मिळवण्यासाठी खूप उपदव्याप करायला लागायचे. गावात मळ्यात शेतात गेल्यावर ठिकठिकाणी पडलेले रेल्वे चे दगड आजी दाखवायची आणि म्हणायची “मधू दंडवते (बॅ. नाथ पै ह्यांनी कोकण रेल्वे चे स्वप्न पाहिले आणि मधू दंडवते ह्यांनी त्याचा पाठपुरावा केला. मधू दंडवते ना कोकणातल्या लोकांनी राजापूर मतदार संघातून त्यांना सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून पाठवले होते आणि त्यांनी कोकणी माणसांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला) म्हणता हा – येयत कोकण रेल्वे येयत पण माझया हयातीत तरी हयसर रेल्वे यायची नाय – मी काय ती रेल्वे बघणार नाय” – आजीचं काय, गावात त्याकाळी वीज पण न्हवती – अशा वेळी मला पण वाटायचे की हे गावाच्या वाटेत असणारे दरी डोंगर, घनदाट झाडी, कातळ वगैरे पोखरून रेल्वे येणार तरी कशी आणि कधी? कदाचित मला पण माझया हयातीत कोकणात रेल्वे आलेली बघता येणार नाही – कदाचित माझ्या मुलांच्या नशिबी ते भाग्य असेल.

पुढे कोकणात रेल्वे आल्याचे स्वप्न पूर्ण झाले. लहानपणी सातवी आठवीत असताना पाहिलेले रेल्वे चे दगड वर्षानु वर्षे पडून होते; त्यांच्या ठिकाणी रूळ पडले, स्टेशनांचे बांधकाम सुरु झाले आणि पूर्ण हि झाले. कोकणामध्ये मुंबईवरन येणारी रेल्वे आली आणि चालू झाली. मात्र जुन्या जमान्यातली एक पिढी हि रेल्वे पाहू शकली नाही ती काळा आड गेली. आम्ही उतारवयाकडे झुकलो. पण रेल्वे सुरु झाली ह्याचेच आम्हाला खूप अप्रूप होते आणि आहे ही. अजूनही रेल्वे मध्ये सुधारणा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. दोन रूळ पाडावेत, गाड्या सायडिंग ला टाकल्या जाऊ नयेत, वेळेवर चालाव्यात आणि मुख्य म्हणजे गाड्याची संख्या वाढवावी अशा अपेक्षा आहेत. ह्यापुढे कोल्हापूर वैभववाडी अशी रेल्वे चालू होणार असल्याचे कळले- त्यामुळे देशावरचा भाग कोकणाशी जोडला जाईल आणि जाणे येणे आणखी सुलभ होईल. निदान कोल्हापूर वैभववाडी लाईन आमच्या हयातीत सुरु होईल अशी मोठी आशा मनात निर्माण झाली आहे. पॉझिटिव्हिटी आली आहे.कोकणात धावणारी रेल्वे फक्त आपल्या मुलांचीच पिढी पाहू शकेल असे (निराशावादी) चित्र मनात होते ते पुसले गेले आणि आमच्या हयातीत कोकणात रेल्वे धावताना पाहू शकलो.

कोकणाच्या प्रवासाचे हे असे टप्पे – जलमार्ग, खुष्कीचा मार्ग (रस्ते), रेल्वे मार्ग आम्ही पाहिले आणू अनुभवले. पण विमानतळ तयार होऊन येथे हवाई वाहतूक सुरु होईल असे वाटले न्हवते. अजून वाशी – नवी मुंबई येथे विमानतळ व्हायचा आहे, त्यापुढे कोकणाला विमान उड्डाणाला प्रायोरिटी असेल असे वाटले न्हवते. चिपी येथील विमानतळाचे काम सुरु झाले होते आणि ते स्वत: प्रत्यक्ष पाहिले हि होते पण तरीही आमच्या अपेक्षेप्रमाणे कोकण आणि विमान अजून दूर होते. पण आज दुपारी बारा वाजता चेन्नई वरून आलेले विमान दुपारी बारा च्या दरम्यान चिपी विमानतळावर हवाई चाचणी साठी उतरल्याची बातमी ऐकली आणि त्याचा व्हिडीओ सुद्धा पाहिला. गणपतीची मूर्ती घेऊन आलेले ते विमान उतरताच लोकांनी “गणपती बाप्पा मोरया” चा जल्लोष केला आणि सनई चौघडे वाजवले. तो नेमका क्षण व्हिडीओ मध्ये बंदिस्त झाला आणि आमच्या कोकणवासीयांच्या मनात कायमचा बंदिस्त झाला. पुढे हे विमान मुंबई ला रवाना झाले. हवाई चाचणी यशस्वी झाली. ह्या विमानोड्डाणावरून बराच राजकीय धुरळा उडाला पण कोकणवासीयांसाठी ही गोष्ट मात्र महत्त्वाची ठरली. आता पुढे दोन चार महिन्यात विमान सेवा नियमित सुरु होईल. चाकरमानी आता विमानाने गावी येतील. बोटीचा एके काळाचा २४ तासांचा प्रवास एस टी ने १६ तासांवर आणला, रेल्वे ने तो आणखी कमी केला आणि आता विमानाने तो एका तासावर आणून ठेवला आहे. रेल्वे ची तिकिटे आजही सहजा सहजी मिळत नाहीत, उद्या विमानाची पण मिळणार नाहीत. कोकणात कधी काळी दळणवळण असे वाढेल ह्याची आधीच्या पिढ्यानी कल्पनाच केली न्हवती पण आता गोष्टी बदलतायत . आज मोबाईल – इंटरनेट ह्या गोष्टी पण त्याच कोकणात सहज उपलब्ध आहेत ज्या कोकणात एके काळी विद्युत (लाईट) न्हवती. कोकण बदलतेय. आज विमान कोकणांत उतरताना मला आठवतेय ती “रेल्वे काही कोकणात धावचि नाय आणि धावली तर माका बाघोक मिळायची नाय” असे म्हणणारी माझी आजी, वैद्य आणि दवाखान्यात जाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करणारे आबालवृद्ध गावकरी, चिरे – लाद्या – लाकडे आणण्यासाठी बैलगाडी महिनाभर आधी “बुक” करणारे गावकरी, बंदरावर किंवा तिठ्यावर उतरल्यावर चालत चालत अथवा बैलगाडी करून आपापले गाव घालणारे चाकरमानी…

बदल हा चांगला असतो. पण बदल हा सहजी स्वीकारला जात नाही. पण कोकणी माणसाने हे बदल स्वीकारले आहेत. मागची पिढी आणि नवी पिढी ह्यांच्यातला हा नेहमीचा संघर्ष असाच पुढे पण होत राहील. बर्याच गोष्टी काळाच्या ओघात हळूहळू नष्ट होतील – जसे पालख्या, बैलगाड्या वगैरे. ५०-६० वर्षांपूर्वी कोकणात राहाणार्या माणसाने ह्या सर्व गोष्टींची त्या काळात कल्पना सुद्धा केली नसेल. आजची पिढी त्या मानाने फार नशीबवान आहे. नवी पिढी ह्या नव्या ट्रेंड बरोबर जुळवून घेईलच. पण ह्या होणाऱ्या सर्व नवीन घडामोडींचा आणि प्रगतीचा फायदा येथील “नेटिव्ह” माणसाला (आणि त्याच्या उत्कर्षाला) कसा आणि किती होईल ह्याचे उत्तर येणारा काळच देईल.

— प्रकाश दिगंबर सावंत

प्रकाश दिगंबर सावंत
About प्रकाश दिगंबर सावंत 11 Articles
विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. जन्म मुंबई चा. प्रवासाची आवड. विक्री विभागात अधिकारी असल्याने देश विदेशात प्रवासाची संधी प्राप्त. प्रवासादरम्यान लोकांचा स्वभाव आणि लोक परंपरा जवळून पाहण्याची संधी. सध्या मुक्काम पुण्यात. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. इतिहास, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..