नवीन लेखन...

औषधीयुक्त हळदीचे अर्थशास्त्र !

“पितिकाची शेती विकासाला गती!”

भारतीय उपचार पद्धतीला हजारों वर्षांची परंपरा लाभली आहे. तसेच हजारो वनस्पतींचा वापरही होत आलेला आहे. कितीतरी वनस्पती घराघरांत सहजतेने वापरण्यात येत आहेत. शेकडो वनस्पती आमच्या दैनंदिन आहाराचा भाग झालेल्या आहेत, आमच्या पूर्वजांनी सांगितलेले औषधी तत्व विसरलो असलो तरी मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर सुरूच आहे. आयुर्वेदाची निसर्गदत्त अमूल्य देणगी म्हणजे हळद होय. हळद हे कंदवर्गीय पिक भारतीय जीवनशैलीतील एक अविभाज्य घटक, प्रत्येक घराघरांत तयार होणाऱ्या पक्वानांचा स्वाद, लज्जत आणि रंग वाढविणारा घटक होय. भारतीयांच्या घराघरांत हजारों वर्षांपासून वैदिक संस्कृतीच्या (दहा हजार वर्षापूर्वीपासून) काळापासून हळदीचा वापर करणे सुरु आहे. जगभरातील अन्य संस्कृतीच्या लोकांना अन्न शिजविणे माहीतही नव्हते तसेच पाश्चात्यांचे पूर्वज रानटी अवस्थेत रानावनात फिरत होते, त्यापूर्वीपासून हळदीचा भारतात वापर सुरु आहे.

भारतीयांच्या सण उत्सवात, मंगलकार्यात हळदीला अनन्यसाधारण महत्व आहे, लग्नसमारंभ तर हळदीशिवाय पूर्ण होतच नाहीत. औषधी गुणधर्मांनी युक्त असलेल्या हळदीला सामाजिक, आर्थिक व धार्मिक महत्व आहे. हळदीचे उत्पादन स्पर्धात्मक युगाच्या संदर्भाने आर्थिक उन्नतीचा मार्ग आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विक्रमी उत्पादन घेऊन शेतकऱ्यांची उन्नती साधने सहजशक्य आहे. हळदीच्या औषधीय वापरासंदर्भात आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये विविध उल्लेख आढळतात ते पुढीलप्रमाणे :-

अ) “दार्विक्वाथ समं क्षीरं पादंपक्त्वा यथा धनम् | तदा रसात्र्जनांख्यं तन्नेत्रयोः परं हितम् || (भाव प्रकाश निघंटु)

ब) स्नुक्क्षीरं रजनीयुक्तं लेपाद् दुर्नामनाशनम् | कोषातकीरजोघर्षन्निपतन्ति गुदोद्भवः || (भैषज्य रत्नावली)

क) अजमोदां निशां धात्रीं क्षारं वहि विचुर्णयेत् | मधुसर्पियुतं लीढवा स्वरभेदमपोहति || (भैषज्य रत्नावली)

असे विविध उल्लेख असलेल्या हळदीचे वेगवेगळ्या भाषांमध्ये भिन्न भिन्न नावे आहेत –
संस्कृत- हरिद्रा, पीतिका, गैरी, दिर्घरागा, निशा, पीता, कृमिघ्ना, योषित्प्रियां
हिन्दी- हल्दी
मराठी- हळद,
कुळनाव- Zingiberaceae
लैटीन नाव- Curcuma Longa Linn.
इंग्रजी नाव- Turmeric

अशा वेगवेगळया नावाने ओळखल्या जाणाऱ्या हळदीचे मुख्यतः चार प्रकार पहावयास मिळतात. १) हळद,हल्दी (Turmeric) २) आंबीहळद, आमाहल्दी (Curcuma Aromatica-Mango Ginger) ३) रानहळद, वनहरिद्रा (Curcuma Zedoaria) ४) दारूहळद, दारुहरिद्रा (Berberis Aristata). परंतु दररोजच्या उपयोगात पहिल्या प्रकाराचा वापर होतो.

लागवड- या कंदवर्गीय पिकाची, गादीवाफे बनवून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जुलै च्या मध्यापर्यंत लागवड करतात. उष्ण आणि समशीतोष्ण हवामान या पिकाला मानवते. यासाठी वाळूमिश्रीत, मध्यम, पाण्याचा निचरा होणारी जमीन पिकास उपयुक्त आहे. ८ ते ९ महिन्यात, पाने पिवळी पडून वाळायला लागल्यावर हे पिक काढणीस तयार होते. सुधारित वाण वापरल्यास एकरी ३० ते ३५ क्विंटल ओल्या हळदीच्या कंदाचे उत्पादन मिळू शकते. वाळलेल्या हळदीचा बाजारभाव १०० ते १५० रुपये प्रती किलो मिळतो.

बियाणे/वाण- क्रिष्णा, कडप्पा, सेलम, वायगाव, राजापुरी, प्रभा (केरळ), प्रतिभा (केरळ), पी.टी.सी.-१९ (ओरिसा), पी.टी.सी-१०, पी.टी.सी.-१३, पी.टी.सी.-१४, ए.सी.सी.-३६० (तामिळनाडू), ए.सी.सी.-३६१ (तामिळनाडू).

रासायनिक घटक- २ ते ३ फुट उंच वाढणाऱ्या या औषधी वनस्पतीमध्ये विविध तत्व आढळतात. एक उडनशील तेल ५ ते ८ टक्के आढळतो, ज्यामुळे हळदीला रंग, स्वाद आणि सुगंध प्राप्त होतो. हळदीमध्ये १३.५ % ओलावा, ६३ % प्रथिन, ३.१ % स्निग्ध पदार्थ, २.६ % तंतुमय पदार्थ, ६९.४ % कर्बोदके, कुर्कुमीन, टर्पीनाईड पदार्थ, टर्मेरिक तेल, जीवनसत्व ‘अ’, खनिज द्रव्य ३.६ %, व अन्य घटक.

उपयोग- या आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा विविध आजारांमध्ये उपयोग होतो. पोटाचे विकार, स्वरविकार, स्तनरोग, सर्दी-पडसे, कान, नाक, घसा आदीविकार, वातविकार, मोच, पांढरे डाग, मुळव्याध, क्षय, दमा, अंतस्त्राव, रक्तविकार, व्रण, ज्वर, त्वचाविकार, मधुमेह, कर्करोग, गळू, खरुज, गजकर्ण, नायटा, कृमिविकार, सुजन आदी आजारांवर हळदीचा वापर होतो. आजारांमध्ये वापर करतांना मात्र तज्ञ मार्गदर्शकाच्या सल्ल्यानेच वापर करणे आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त सुगंधी वस्तू उत्पादनाचे उधोगांमध्ये, सौंदर्य प्रसाधनाच्या उत्पादनात हळदीचा उपयोग होतो. हळदीच्या पानांपासून मिळणाऱ्या तेलाचा वापर डास मारण्यासाठी तसेच दुचाकीत इंधन म्हणूनही वापर होतो. हळदीच्या तेलाचा जैवकीटकनाशक म्हणूनही वापर होतो.

आयुर्वेदामध्ये हळदीचे अनेकविध औषधी उपयोग आहेत, औधोगिक उत्पादनांमध्ये वाढणारे महत्व तसेच दैनंदिन वापरामुळे वाढणारी मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांनी हळद उत्पादनाकडे अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. शेतीमध्ये पारंपारिक उत्पादने घेण्यापेक्षा स्पर्धात्मक बाजारपेठेचा आणि मुक्त आर्थिक धोरणांचा विचार करून पिकांची लागवड करणे आवश्यक आहे.

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश 78 Articles
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..