नवीन लेखन...

महाकपीचा शेवट

जायगँटो या कपीचा शोध १९३५ साली लागला. चीनमध्ये प्राण्यांची हाडं, शिंग, दात अशा अवयवांपासून तयार केलेली पारंपरिक औषधं अतिशय लोकप्रिय आहेत. हाँगकाँगमधील एका औषधाच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेला एक मोठ्या आकाराचा दात, ड्रॅगन या चिनी संस्कृतीशी निगडित प्राण्याचा असल्याचं समजलं गेलं होतं. हा दात म्हणजे सुमारे दोन सेंटिमीटर लांबी-रुंदी असणारी एक दाढ होती. कालांतरानं दक्षिण चीनमधील इतर प्रदेशांतही असेच आणखी दात आणि काही जबडे सापडले. या अवशेषांच्या अभ्यासावरून, हे अवशेष तोपर्यंत अज्ञात असणाऱ्या, प्राचीन काळातील एखाद्या कपीच्या प्रजातीचे असल्याचं नक्की झालं. ही प्रजाती आकारानं अतिशय मोठी असल्याचंही या अवशेषांच्या आकारावरून दिसून येत होतं.. या ‘महाकपी’ला त्यानंतर, त्याच्या अवाढव्य आकारावरून आणि डेव्हिडसन ब्लॅक या ज्येष्ठ मानववंशशास्त्रज्ञाच्या नावावरून जायगँटोपिथेकस ब्लॅकी हे शास्त्रीय नाव दिलं गेलं. हा कपी त्यानंतर जायगँटो या लघुनावानं ओळखला जाऊ लागला. या कपीचा शोध लागून आतापर्यंत जरी अनेक दशकं लोटली असली तरी, त्याचा पूर्ण सांगाडा अजून काही सापडलेला नाही. या जायगँटोवर आतापर्यंत जे काही संशोधन झालं आहे, ते त्याच्या जबड्याच्या व दातांच्या जीवाश्मांवर आधारलेलं आहे. यिंगकी झांग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधन हेसुद्धा मुख्यतः जायगँटोच्या दातांवरून केलं गेलं आहे.

यिंगकी झांग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनासाठी, दक्षिण चीनमधील ज्या परिसरात या जायगँटोंचा वावर असल्याचं माहीत होतं, त्या प्रदेशातील एकूण २२ गुहांत उत्खनन केलं. या गुहांची निवड ही स्थानिक लोकांकडून मिळालेली माहिती, तसंच प्रत्यक्ष सर्वेक्षण यांद्वारे केली गेली. या गुहा शोधण्यासाठी, ड्रोनचाही वापर केला गेला. निवडलेल्या या सर्व गुहा यांगत्से नदी आणि दक्षिण चिनी समुद्रादरम्यानच्या डोंगराळ प्रदेशात वसल्या आहेत. संशोधकांनी या गुहांतून, जायगँटोच्या अवशेषांचा तसंच ओरांगउटानच्या पूर्वजांच्या अवशेषांचा शोध घेऊन त्यांचा अभ्यास केला. या संशोधकांनी या गुहांतून जायगँटो आणि ओरांगउटानच्या दातांचे जीवाश्म, तसंच आजूबाजूच्या मातीचे नमुने गोळा केले. या २२ गुहांपैकी ११ गुहांत या संशोधकांना, जायगँटोच्या वास्तव्याचे पुरावे मिळाले.

या संशोधकांनी प्रथम या सर्व जीवाश्मांची व मातीच्या नमुन्यांची, सहा वेगवेगळ्या पद्धतींनी वयं मोजली. त्यानंतर या संशोधकांनी सूक्ष्मदर्शकाखाली या दातांच्या जीवाश्मांवरील खुणांचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं. या खुणांवरून या संशोधकांना जायगँटोच्या आहारात कालानुरूप झालेला बदल समजणार होता. त्यानंतर या संशोधकांनी तिथल्या मातीच्या नमुन्यांचा तपशीलवार अभ्यास केला. त्यांतील विविध वनस्पतींचे परागकण वेगळे केले आणि ते कोणत्या प्रकारच्या वनस्पतींचे आहेत, हे शोधून काढलं. यावरून तो मातीचा नमुना ज्या काळातला होता, त्या काळात त्या-त्या प्रदेशात कोणत्या स्वरूपाची झाडं-झुडुपं अस्तित्वात होती, ते समजू शकलं. त्यानंतर या विविध काळातल्या कपींच्या दातांवरच्या खुणा आणि त्या काळात अस्तित्वात असलेल्या वनस्पतींची एकमेकांशी सांगड घातली. याद्वारे, या कपींचा वेगवेगळ्या काळातला आहार कोणता होता, याची माहिती मिळाली. या माहितीवरून या संशोधकांना, हे जायगँटो कपी नामशेष का झाले, ते समजू शकलं. या संशोधनातून, जायगँटोच्या अस्तित्वाच्या कालावधीतली अनिश्चितताही कमी झाली. या गुहांत सापडलेल्या कपींच्या दातांच्या जिवाश्मांची संख्या व त्यांचा काळ, यावरून हे कपी तेवीस लाख वर्षांपूर्वी निर्माण होऊन, अलीकडच्या तीन ते दोन लाख वर्षांपूर्वीच्या काळात नामशेष झाले असल्याचं स्पष्ट झालं.

जंगलांत राहणाऱ्या या अवाढव्य कपींचं वास्तव्य मुख्यतः जमिनीवरच असावं. हे कपी मऊ स्वरूपाची फळं, फूलं खाऊन जगणारे प्राणी असल्याचं, या संशोधनावरून दिसून येतं. सात लाख वर्षांपूर्वीच्या काळात दक्षिण चीनमधला हा भाग, दाट अशा उष्णकटिबंधीय जंगलांनी व्यापला होता. या सर्व काळात या जायगँटोना, या प्रदेशात मुबलक प्रमाणात हवा तो आहार मिळत होता. सुमारे सात लाख वर्षांपूर्वी इथलं हवामान हळूहळू बदलून, इथल्या वनस्पतींचं स्वरूप बदलू लागलं. पूर्वी दाट स्वरूपात पसरलेल्या इथल्या जंगलांतला काही भाग आता विरळ होऊ लागला. इतकंच नव्हे तर, इथल्या जंगलांतल्या अधल्यामधल्या काही भागांचं तर गवताळ प्रदेशात रूपांतरही झालं. मात्र परिस्थितीत असा बदल होत असला, तरी इथली सगळी जंगलं नष्ट झाली नव्हती. त्यांचं स्वरूप बदललं असलं, तरी अजूनही इथे पुरेसं अन्न उपलब्ध होतं. मात्र त्यासाठी या कपींना आपल्या आहारात योग्य तो बदल करण्याची गरज होती. परंतु आहाराच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ असणारे हे कपी, या बदलत्या परिस्थितीला तोंड देऊ शकले नाहीत.

शरीराच्या अवाढव्य आकारामुळे या जायगँटोंचा आहार प्रचंड होता. प्रचंड शरीरामुळे, त्यांना अन्नाच्या शोधात फार दूरपर्यंत जाणंही शक्य होत नव्हतं आणि उंच झाडांवर चढणंही जमत नव्हतं. मुळातच मुख्यतः जमिनीवरच राहणारे हे कपी आता, पूर्णवेळ जमिनीवरच वावरू लागले. याच काळात ओरांगउटानच्या पूर्वजांनी मात्र, या बदलत्या परिस्थितीत आपल्या आहारात योग्य तो बदल केल्याचं दिसून येतं. त्यामुळेच हे ओरांगउटान बदलत्या परिस्थितीला व्यवस्थितपणे तोंड देऊ शकले. वजनानं शंभर किलोग्रॅमच्या आत असलेले हे ओरांगउटान, अन्न मिळवण्यासाठी झाडावरही चढू शकत होते. जायगँटो कपींची मात्र या परिस्थितीत आहाराच्या बाबतीत आबाळ झाली. परिणामी त्यांना झाडांची सालं, तसंच छोट्या फांद्या खाऊन जगावं लागल्याचं, या काळातल्या त्यांच्या दातांवरील ओरखड्यांवरून आणि छोट्या खड्ड्यांवरून दिसून येतं. या बदलेल्या सक्तीच्या आहारामुळे त्यांच्या दातांवर ताण येत असावा व त्यामुळे त्यांच्या दातांचा आकारही या काळात बदलला. त्यांच्या नव्या आहारात पोषणमूल्यांचाही अभाव होता. याचा परिणाम त्यांच्या शरीराच्या आकारावर होऊन त्यांचं शरीर तर लहान होऊ लागलंच, परंतु त्याचबरोबर त्यांची प्रजोत्पादनाची क्षमताही कमी झाली असावी. कारण या काळात कपींची संख्या हळूहळू घटू लागली होती. ही संख्या पुढील काळात आणखी कमी होत जाऊन अखेर, अलीकडच्या तीन लाख ते दोन लाख वर्षांदरम्यानच्या काळात ही प्रजाती पूर्णपणे नामशेष झाली!

यिंगकी झांग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं जायगँटोवरचं हे संशोधन अतिशय लक्षवेधी आहे. ज्या काळात ओरांगउटानसारखे कपी व्यवस्थित तग धरून होते, त्याच काळात जायगँटो नष्ट व्हावेत, ही घटना अभ्यासकांसाठी महत्त्वाची आहे. कारण हा अभ्यास फक्त एका प्रजातीच्या नामशेष होण्यापुरता मर्यादित नाही. एखाद्या कुळातील काही प्रजाती प्रतिकूल परिस्थितीपुढे हतबल होतात, तर त्याच कुळातील काही प्रजाती योग्य ते अनुकूलन करून, या परिस्थितीला तोंड देऊ शकतात, हा एक विरोधाभास आहे. या विरोधाभासामागचं मूळ कारण शोधून काढणं, हे संशोधकांसाठी एक आव्हान आहे. हे मूळ कारण एकच नसून, प्रजाती-प्रजातीनुसार वेगवेगळं असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही!

(छायाचित्र सौजन्य – Garcia/Joannes-Boyau – Southern Cross University / Prof. Wei Wang and Theis Jensen / Mettiina / Wikimedia)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..