मुघलांच्या काळात 9 रुपयांची 5 मोहोर व 5 मोहरांचे एक नाणेसुद्धा होते. अकबराच्या काळात नाण्यांमध्ये भरपूर वैविध्य होते. त्यावर राजाचे नाव टांकसाळीचे नाव, हिजरीसन, चार खलिफांची नावे, कलिमा, ईश्वराकडे मागितलेले आशीर्वाद आणि काही नाण्यांवर हिंदू देवदेवता इतके वैविध्य होते. नंतर जहांगीरने 12 राशींची 12 नाणी काढली. 1000 मोहरांपासून 12 किलो वजनाचे सर्वात मोठे नाणे काढले.
पूर्वी जेव्हा एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यास भेटला असावा. तेव्हा समोरच्या जवळ जे आहे ते आपल्यालाही हवं – आपल्या जवळही असावं! ही भावना जागली असावी व यातून विनिमयाची कल्पना जन्माला आली असावी. मग विनिमय सुरू झाला असावा. पैशाशिवाय! नाणी नोटांशिवाय. पैशाचा शोध लागण्यापूर्वी व्यापाराचे स्वरूप वस्तुविनिमयाचेच होते. आजही जगाच्या अनेक भागात/देशांमध्ये अप्रगत, अशिक्षित समाजांमध्ये विनिमय हा वस्तू स्वरूपातच होतो.
वस्तुविनिमयाचे ठळक उदाहरण स्तब्ध व्यापार/निःशब्द व्यापार (सायलेंट ट्रेड) हे होय. निःशब्द व्यापाराची उदाहरणे हीरॉडोटस, इब्नबनूना यासारख्या प्राचीन/मध्ययुगीन इतिहासकारांनी नोंदवल्याचे आढळते व तसे विचारवंतही सांगतात. कॅलिफोर्निया-इंडियन जमाती, कांगोमधले बांटू व पिग्मी समूह, न्यू गिनीमधील स्थानिक समूह यात अशाप्रकारचा व्यापार आजही चालत असावा, असे वित्त तत्त्वज्ञ सांगतात.
मग ऑनर जगात साखळी व्यापार सुरू झाला. असा साखळी व्यापार हा शेकडो किलोमीटर अंतरावर पसरत गेला. अशाप्रकारच्या साखळी व्यापार विनिमयाची उदाहरणे ऑस्ट्रेलियन जमातीत आढळतात. पुरातत्त्वीय उत्खननात मेक्सिकोच्या आखाताचाही संदर्भ मिळतो.
आजही स्वॅपिंग हा वस्तुविनिमयाचा विशुद्ध प्रकार अमेरिकेतील संयुक्त संस्थानात आढळतो. वृत्तपत्र स्तंभातून तेथे विनिमय व्यापार/व्यवहार केले जातात. अशा व्यवहारात वस्तूचे मूल्य पैशात ठरवून वस्तू विनिमय व्यापार केला जातो.
आपल्या जवळ असणाऱ्या वस्तू, समोरच्याची गरज, त्या गरजेचे महत्त्व, वस्तूंचे असणारे मूल्य (निकड स्वरूपात वा जरुरीचे स्वरूपात) ते न्याय्य मूल्य वा योग्य मूल्य (फेअर व्हॅल्यू) असावे व मग समान मूल्य जुळवून विनिमय वा व्यापार व्हावा ही यथायोग्य संकल्पना या मागे पूर्वीपासूनच निर्माण झाली, विकसित झाली व तसा व्यापार सुरू झाला. पण पुढे आपल्याजवळ असणाऱ्या वस्तूची किंमत व आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूची किंमत यात जर खूप फरक असेल वा आपल्या जवळच्या वस्तूच्या किमती येवढ्या समोरच्या जवळ वस्तू नसतील तर दोघे जण आपल्या जवळच्या वस्तूंची देवाण-घेवाण करू शकणार नाहीत! मग अशा वेळेस काय करावे? यातूनच पुढे रुप्यकाचा जन्म झाला. थोडक्यात वस्तूंची मूल्ये ठरविणे. आपल्याला हवी असलेली वस्तू आपल्या जवळील वस्तूचे मोबदल्यासाठी शोधणे या गोष्टी खूप कठीण जात असल्याने वस्तुविनिमय व्यापार वा अर्थव्यवस्थेतील व्यवहारांना फार मोठी मर्यादा असते. ही मर्यादा नाहीशी करण्याच्या प्रयत्नातून मुद्रा-पैसा-नाणी-नोटा यांचा उगम झाला. तो उत्कर्ष आजमितीस बिटकॉईनपर्यंत येऊन थांबला आहे.
पूर्वी मुद्रेच्या प्रादुर्भावामुळे सारी देवाण-घेवाण (विनिमय) ही वस्तुविनिमयात (Batering) होत होती. पण आजही जिथे मुद्रासंकट असते तिथे (जेव्हा मुद्रा खूप परिवर्तशील असते वा अति महागाईमुळे मुद्रेचे खूपच अवमूल्यन झालेले असते तिथे) वस्तुविनिमयाचा आधार घेतला जातो. काही आंतर्जालीय स्थळांवर (जसे क्रेग्लिस्ट आदि) ही वस्तुविनियम आजही सुरू आहे.
वर्तमानकाळात मुद्रेचे खूपच महत्त्व आहे. त्याच्या गुणदोषांचे अध्ययन हा अर्थशास्त्राचा मूलभूत अभ्यास विषय होऊन बसला आहे. त्याचे –
1) आर्थिक क्षेत्रातील मुद्रेचे महत्त्व प्रत्यक्ष महत्त्व- उपभोग क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, विनिमय क्षेत्र, व्यापार क्षेत्र, वितरण क्षेत्र व पुंजी निर्माण.
2) आर्थिक क्षेत्रातील मुद्रेचे अप्रत्यक्ष महत्त्व – विनिमयातील असुविधांपासून सुटका, खात्रीलायकता, आर्थिक विकासाचा सूचकांक, पुंजीच्या गतिशीलतेतील वृद्धी, सामाजिक कल्याणाचे मापदंड.
3) अनार्थिक क्षेत्रातील मुद्रा महत्त्व – सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, कला क्षेत्र असे तीन मुख्य व इतर उपविभाग करून त्यांचा अभ्यास केला जातो.
असो. आपण आता उगमाकडे वळू.
वस्तुविनिमय – वस्तुमुद्रा – धातुमुद्रा – शिक्के धातुमुद्रा – पत्रमुद्रा – साख्र मुद्रा (चेक वा हुडी) – प्लास्टिक मुद्रा असा विकास मुद्रेचा झालेला आपणास आढळतो.
युगानुसार हंटिंग एजमधील मुद्रा, जास्टोरल एजमधील मुद्रा, इंडस्ट्रीअल एजमधील मुद्रा आणि मॉडर्न एजमधील मुद्रा असे वर्गीकरण केलेले आढळते.
धातूंची उपलब्धी, धातूंचे व्यवहारातील/मानवी जीवनातील महत्त्व, धातूंचा टिकाऊपणा या सर्व गोष्टींचा विचार करून प्राचीन काळी सोने व चांदी या धातूंचा वापर मुद्रा वा नाणी (पैसा) म्हणून सुरू झाला. काही ठिकाणी शुद्ध सोने, काही ठिकाणी शुद्ध रूपे (चांदी) व काही ठिकाणी इलेक्ट्रम म्हणजे सोने व चांदी यांचे मिश्रण अशा स्वरूपात सुरू झाला. काही ठिकाणी चांदी व तांबे एकत्र करून नाणी तयार झाली. जगात नाणी वापरण्याची सुरुवात भारत, चीन व मध्य पूर्वेतील लिडियन समुदाय यांनी केली. नाण्यांची निर्मिती इ.स.पूर्व सहाव्या शतकात गांधार, कुंतल, कुरू, पांचाल, शाक्य, सुरसेना आणि सौराष्ट्र येथील महाजनपदांनी केली होती. पूर्वीच्या काळी जी सोन्याची नाणी होती त्यावर वातावरणाचा कुठलाही परिणाम झाला नाही, हे संशोधनात दिसून येते. ब्रिटिश काळात सोने व तांब्याचे मिश्रण वापरले गेले. गेल्या काही वर्षात इलेक्ट्रोप्लेटेड लोखंड व इस्पातपासून बनवलेली नाणी अनेक देशांच्या चलनात आली, कारण अशी नाणी बनवण्यासाठी येणारा कमी खर्च. 1992 पासून ब्रिटिश कांस्य नाणी कॉपर प्लेटेड स्टीलपासून बनविण्यात आली. नाणे सुरू होण्याचा सर्वात जुना उल्लेख इ.स.पूर्व चौथ्या व तिसऱ्या शतकातील मौर्यांच्या सत्तेत (चांदी आणि तांब्याच्या ओतीव नाण्यांचा) सुरू झाल्याचा सापडतो वा आढळतो. तद्नंतर सम्राट अशोक, पांचाल, गांधार, इंडोग्रीक, कुशाण, गुप्त घराणे, चंद्रगुप्त (राणी कुमारदेवीचे चिन्हांकित नाणे), समद्रगुप्त (कुर्हाड, वीणा, अश्वमेघ अशी मुद्रांकित नाणी), क्षत्रप, सातवाहन (चांदी, तांबा याचबरोबर शिशाचेही नाणे) नंतर दिल्लीची सुलतान घराणी यांनी सर्वांनी नाणी काढली. दिल्लीतील सुलतानांच्या काळात देव-देवता, पशु, पक्षी यांची चिन्हे नाहीशी होऊन नवीन चिन्हे व लिपी झाली. महंमद गझनीच्या काळात एका बाजूस अरेबिक, तर दुसऱ्या बाजूस देवनागरी लिपी होती. खलिफा व सुलतानांची नावे होती. त्यावेळेस सर्वात प्रसिद्ध नाणे म्हणजे टांका. हा इल्तुमिशने काढला. त्या वेळेस जीताल हे छोटे नाणे. 47 जीताल म्हणजे एक टांका. मग आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने जुनी सर्वांची नावे काढून नाण्यावर स्वतःचा उल्लेख दुसरा अलेक्झांडर म्हणून सुरू केला. नंतर महंमद बिन तुघलकने सोन्याच्या ऐवजी तांब्याचा वापर नाण्यांसाठी केला. त्याने उत्तम व कलात्मक नाणी चलनात आणली. यात विजयनगरचा सुवर्णहोन, तसेच यादव, फारुखी व बहामनी राज्यांची ही नाणी होतीच. मुघलांच्या काळात नाण्यांचा दर्जा सांभाळला गेला व नाण्यांमध्ये विविधता आणली गेली. शेरशहा सुरीने नाण्यांमध्ये बदल केले. त्याने नाण्यांची वजने वाढवून नाण्याचे अर्धा, एकचतुर्थांश, एकअष्टमांश व एकसोळांश असे भाग केले. इथूनच चांदीचे नाण्यास ‘रुपया’ नावानेच ओळखले जाते. मुघलांच्या काळात 9 रुपयांची 5 मोहोर व 5 मोहरांचे एक नाणेसुद्धा होते. अकबराच्या काळात नाण्यांमध्ये भरपूर वैविध्य होते. त्यावर राजाचे नाव टांकसाळीचे नाव, हिजरीसन, चार खलिफांची नावे, कलिमा, ईश्वराकडे मागितलेले आशीर्वाद आणि काही नाण्यांवर हिंदू देवदेवता इतके वैविध्य होते. नंतर जहांगीरने 12 राशींची 12 नाणी काढली. 1000 मोहरांपासून 12 किलो वजनाचे सर्वात मोठे नाणे काढले. जे जगातले सर्वात मोठे नाणे आजही गणले जाते. त्यानेच 500, 200, 100 मोहरांची नाणी काढली. नाण्यांवर काव्यात्मक लिखाण होते. तद्नंतर औरंगजेबाने नाण्यांवरील धार्मिक गोष्टी काढून टाकल्या. आदिलशहाचे स्त्रियांचे केसात अडकवायच्या पिनेसारखे नाणे पर्शियाच्या लार येथे बनवले जायचे. म्हणून हे चांदीचे नाणे ‘लारी’ नावाने पुढे आले. पुढे शिवाजी महाराजांच्या काळात सोन्याचा ‘होन’, चांदीची ‘लारी’ व तांब्याची ‘शिवराई’ पुढे आली. नाणे पाडण्याचे वतनदारास ‘पोतदार’ म्हणत. त्या काळातही खोटी नाणी पाडणारे होते. अशा खोट्या रुपयास त्या काळात ‘करडा रुपया’ म्हणत. पेशव्यांच्या काळात शुद्ध धातूंची नाणी बाजारात आली. ब्रिटिशांनी मराठी राज्य जिंकल्यावर पैसा, रुपया व आणा ही नाणी चलनात आली.
1835 पर्यंत विविध राज्यातील विविध नाणी, विविध वजने, कमीअधिक असणारी छिद्रे आणि कमीजास्त होणारे मूल्य या अडचणींवर मात करण्याची ईस्ट इंडिया कंपनीकडून एक छत्री चलनाचा कायदा करण्यात आला. त्याअगोदर नाणी सुलभपणे चलनात रहावी म्हणून एक जाहीरनामा काढून कंपनीच्या कायद्यानुसार चौथ्या विल्यमचा रुपया आणि रुपयाचे भाग मूल्यांक हे ब्रिटिशांचे भारतातील कायदेशीर चलन म्हणून जाहीर झाले. रौप्यमान पद्धती लागू झाली. 1862 सालापासून नाण्यांवरून ईस्ट इंडिया कंपनीचे नाव काढले गेले. तोपर्यंत तांब्याचा अर्धा आणा, एकचतुर्थांश आणा व एकबारांश आणा ही नाणी बाजारात आलेलीच होती. 1862 ते 1876 नाण्यांवर ‘व्हिक्टोरिया क्वीन’ असा उल्लेख सापडतो. 1877 ते 1901 ‘व्हिक्टोरिया एम्प्रेस’ असा उल्लेख सापडतो. पण त्यावेळेस भारतात 600 च्या वर संस्थाने होती. त्यातील 125 संस्थानांची स्वतःची नाणी होती. काहींनी ‘लंडनज्ञ मैत्री’ तर काहींनी ‘श्री माताजी’ असे नाण्यांवर मुद्रांकित केले होते.
अवध हैदराबादचा तांब्याता फलूस व सोन्याची अश्रफी, म्हैसूरचा पागोडा, भावनगर, कच्छ व पोरबंदर यांची चांदीची कोरी, तांब्याचा ढिगलो, डोकडो, तांबियो अशी नाणी होती.
1901 ते 1910 मध्ये सातव्या एडवर्डच्या नावाने मुकुट विहरित ‘बोडक्या राजाचा रुपया’ या उपहासात्मक नावाने रुपया गणला जायचा. 1910 साली रुपया व आण्यावर मुकुटधारी एडवर्ड आला. 1910 ते 1936 पंचम जॉर्जचे नावाने नाणी पाडली गेली. 1936 ते 1947 सहाव्या जॉर्जच्या नावाने नाणी होती. 1947 ते 1950 या दरम्यान भारतातील टांकसाळीतून गोठवलेल्या सालाची नाणी (Frozen Water) होती. 1950 साली भारतीय प्रजासत्ताकाची रुपया, आणा व पैसा ही नाणी चलनात आली. तोवर 4 पैशांचा 1 आणा व 16 आण्यांचा (64 पैशांचा) एक रुपया असा विनिमय होता. 1957 साली दशमान पद्धतीचा अवलंब होवून 100 पैशांचा रुपया झाला.1964 साली ‘नवे पैसे’ शब्दातील ‘नवे’ जाऊन फक्त ‘पैसे’ हा शब्द राहिला.
एक पैसा, अर्धा आणा (चौरस), एक आणा (12 कोनी नागमोडी कडा), दोन आणे (चवली – एकअष्टमांश) (चौरस), पाव रुपया (पावली), अर्धा रुपया (अधेली – अर्धा रुपया – आठ आणे – वर्तुळाकार) आणि एक रुपया (वर्तुळाकार) अशी नाणी 1947 पर्यंत होती. 1957 -63 दरम्यान एक नया पैसा, दोन नवे पैसे, पाच नवे पैसे, दहा नवे पैसे, पंचवीस नवे पैसे, पन्नास नवे पैसे व रुपया अशी नाणी, निकेल+पितळ-कांसे-तांबे+निकेल. निकेल अशा धातूंची 50 पैसे, एक रुपया, दोन रुपये, दहा रुपये अशी नाणी आली व इतर धातूंच्याबरोबर स्टेनलेस स्टील धातूही वापरला गेला.
केवळ ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळेस 1) सोन्याची दुंडी मोहोर, मोहोर, अर्धी मोहोर, पाव मोहोर, तीन स्वामी पॅगोडा (होन), पोर्टोनोनो पॅगोडा (होन), जुना तारा पॅगोडा (होन), नवा तारा पॅगोडा (होन), नीम, अश्रफी, टुंडा (होन), पाच व एक रुपयाचे नाणे, 2) रुप्याची – पाच रुपये, रुपया, टुंडा रुपया, अर्धा रुपया, पाव रुपया, दुणेली, आणेली, अर्धा होन, पाव होन, पाच फलम्, टुंडा फलम्, फलम्, पहिला जॉर्ज तीन फलम् व दोन फलम्, 3) तांब्याची – आणा, अर्धा आणा, पाव आणा, एकबारांश आणा, चाळीस कास, तीन-पंधरा-दहा या पाच-अडीच व एक कास, टुंडा ढब्बू, तीन ढब्बू, अर्धा ढब्बू, चार पै, दोन पै, एक पै, अर्धा पै, पाव पैसा (पै = पैसा), एक अठ्ठेचाळीसांश रुपया, एक शहाण्णवांश रुपया, शिशाचा टुंडा पैसा, त्रिशुळी पैसा इत्यादी अनेक नाणी होती.
भारतेतर नाण्यात आशिया मायनरमध्ये लिडियात इ.स.पूर्व सातव्या शतकात इलेक्ट्रमचे नाणे एका व्यापाऱ्याने आणले. नंतर ते अधिकार तेथील राजाने घेतले. नंतर इराणमध्ये चांदी व सोन्याची नाणी पाडली गेली. ग्रीसची नाणी चांदीची होती. द्राक्या व ओबोल अशा दोन प्रकारची होती. रोममध्ये ब्राँझच्या गोळ्याचा उपयोग होत असे. गोळा 1 पौंड वजनाचा असे. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात रोममध्ये ब्राँझ व चांदीचा वापर नाण्यांसाठी झाला. चीनमध्ये कवड्यांचा वापर शतकानुशतके झाला. नंतर चांदी, तांबे व लोखंडाचा वापर झाला. शकांची नाणी वेगळी होती. इंडो-पर्शियनांची तांबे व चांदीची नाणी होती. कुशाणांची नाणी सोने, चांदी व तांब्याची होती. गुप्त राजांची नाणी सोन्याची होती. भारतातील पल्लवांची नाणी चांदी, तांबे व सोन्याची होती. चोल सम्राटांची नाणी सोने, चांदी व पितळेची होती. याशिवाय पांडय राजे, विजयनगरचे सम्राट, मुसलमानी राजवटी (खास करून हैदर व टिपू सुलतान यांची नाणी विशिष्ट), फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांच्याही नाण्यांचा उल्लेख जाणून घेण्यासारखाच आहे.
काहींच्या मते भारतात वैदिक काळातही नाणी प्रचलित होती. कृष्णल, सुवर्ण, शतमान, निष्क व पाद अशी त्यांची नावे असल्याचा दावा काही करतात तर काहींचे ‘ते सोन्याचे तुकडे असावेत’ हे मत आहे. शतमान हे 12 ग्रॅमचे होते. अर्ध शतमान, पाव शतमान, अर्धपाव शतमानही असावे असे मानतात. पाणिनीच्या अष्टाध्यायीतही नाण्याचे उल्लेख आहेत.
पूर्वीच्या भारतातील नाण्यांच्या किमतीचे कोष्टक
1) 3 फुटी कवडी = 1 कवडी
2) 10 कवडी = 1 दमडी
3) 2 दमडी = 1 घेला
4) 1.5 पाई = 1 घेला
5) 3 पाई = 1 पैसा (जुना)
6) 4 पैसे = 1 आणा
7) 16 आणे = 1 रुपया
8) 100 पैसे = 1 रुपया
* 256 दमडी = 192 पै = 128 घेला = 64 पैसे = 16 आणे = 1 रुपये
* कवडीपासून दमडी, दमडीपासून घेला, घेल्यापासून पाई (पै), पैपासून पैसा, पैशापासून आणा, आण्यापासून रुपया आणि आज क्रेडिट कार्ड व बिटकॉईनचे जग झाले आहे.
ही सर्व कथा मुद्रा वा नाणी विकासाची! आजही काहींचे उदरभरणम पैशानेच होत! म्हणून शेवटी एवढेच ‘आमची कथा सरो, तुमचे पोट भरो!’
इत्यलम्।
-–डॉ. भूपाल देशमुख
(अर्थ, साहित्य, वैद्यक विषयाचे अभ्यासक)
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply