
साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला…
मनोहर पर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी झाला. त्यांनी आय आय टी मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. गोव्यात भाजपची संघटनात्मक पातळीवर बांधणी करून पक्षाला सत्तेपर्यंत पोहचवण्यात पर्रीकर यांचा सिंहाचा वाटा राहिला.
जून २००२ मध्ये गोवा विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली. छोटे पक्ष आणि एका अपक्ष आमदाराच्या पाठिंब्याने पर्रीकर पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पर्रीकर यांनी घट्ट पाय रोवले. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीआधी पर्रीकर यांनी जनसंपर्क यात्रा काढत जनतेशी संवाद साधला. या यात्रेचं फळ पर्रीकर आणि भाजपला मिळालं व २१ आमदारांसह पूर्ण बहुमतातलं भाजपचं सरकार गोव्यात विराजमान झालं.
पर्रीकर यांच्याच कार्यकाळात उरी हल्ल्याचा बदला म्हणून सप्टेंबर २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक देऊन भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक घडवला.
मार्च २०१७ मध्ये पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. फेब्रुवारी २०१८ मध्ये पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले आणि या आजाराशी चाललेली त्यांची झुंज थांबली.
मनोहर पर्रीकर यांचा मृत्यू १७ मार्च २०१९ रोजी झाला.
Leave a Reply