डॉ. गोविंद स्वरूप यांचा जन्म २३ मार्च १९२९ रोजी ठाकूरद्वार, उत्तर प्रदेश येथे झाला.
डॉ. गोविंद स्वरूप यांचे काम एवढं मोठं आहे की, ते केवळ व्यक्ती किंवा शास्रज्ञ नव्हते, तर ते एक संस्था होते. त्यांचे खगोलशास्र आणि खगोलभौतिकीमधील काम जगमान्य होतं.
अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी १९५० मध्ये भौतिकशास्त्रात एमएस्सी पूर्ण केले. त्यानंतर त्या काळी नवीन असणाऱ्या रेडिओ खगोलशास्त्रामध्ये ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. के. एस. कृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीमध्ये त्यांनी संशोधन केले. त्यानंतर त्यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियातील सी.एस.आय.आर.ओ. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. सिडनी जवळील पोट्स हिल येथे सहा फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (पॅराबोलीक) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. १९६१ मध्ये अमेरिकेतील स्टँनफर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली.
जगभरात अनेक संधी खुणावत असतानाही डॉ. होमी भाभा यांच्या सूचनेनुसार त्यांनी भारतात येऊन टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या अंतर्गत (टीआयएफआर) स्वदेशी रेडिओ खगोलशास्त्राचा पाया रचला. खगोलशास्राच्या बाबतीत भारताची परिस्थिती अत्यंत वाईट अवस्थेत असतानाही डॉ. गोविंद स्वरूप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण कल्याण परिसरात उभारण्यात आली होती. तसेच उटी येथील रेडिओ दुर्बिणीच्या यशानंतर नारायणगाव जवळील खोडद येथे जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण अर्थात जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) डॉ. स्वरूप यांच्या मार्गदर्शनात उभारण्यात आली आहे.
सलग सहा दशके त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे भारताला रेडिओ खगोलशास्त्रात स्वतंत्र स्थान निर्माण करता आले. रेडिओ खगोलशास्त्राचा विकास करणाऱ्या जगातील मोजक्या प्रमुख शास्त्रज्ञांमध्ये प्रा. स्वरूप यांची गणना होते. प्रा. स्वरूप यांना पद्मश्री, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, होमी भाभा पुरस्कार, ग्रोट रेबर पारितोषिक एच. के. फिरोदिया पुरस्कार आदी देशविदेशातील प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. लंडन येथील रॉयल सोसायटीचे ते मानद फेलो होते.’आयसर’ सारख्या संस्थेची संकल्पना विकसित करण्यात डॉ. गोविंद स्वरूप यांचा मोठा वाटा होता. डॉ.
गोविंद स्वरूप यांचे ७ सप्टेंबर २०२० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply