ह. ना. आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६४ रोजी झाला.
भारतातील कंपनी सरकारचे राज्य खालसा होऊन ब्रिटिश सरकारची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर प्रतिभावंतांची जी पहिली पिढी जन्माला आली, त्यात ह. ना. आपटे यांचा समावेश होता. मा,हरी नारायण आपटेंनी कथा, स्फूट लेखन, कविता, कादंबरी, नाटक व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत मर्दमुकी गाजवत आपले नाव प्रतिभेच्या सर्व दालनांवर सुवर्णाक्षरांनी कोरले. ‘करमणूक’ या त्या काळात वाचकप्रिय झालेल्या मासिकाची स्थापना त्यांनी केली व त्याचे ते काही काळ संपादकही होते. ज्ञान प्रकाश या मासिकाचेही त्यांनी काही काळ संपादन केले व आनंदाश्रम ही प्रकाशनसंस्था चालवली.
प्रख्यात महिलांची माहिती देणारे ‘स्त्रीरत्ने’ हे सदर त्यांनी बराच काळ लिहिले. त्यात त्यांनी लीलावती, राणी दुर्गावती अशा कर्तृत्ववान महिलांची ओळख वाचकांना करून दिली. कै. गोविंद बल्लाळ देवल यांचे सुप्रसिद्ध `संगीत शारदा’ हे नाटक ह. ना. आपटेंनीच प्रकाशात आणले व केशवसुतांची कविताही त्यांनीच प्रयत्नपूर्वक लोकप्रिय केली. अकोल्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना लाभले. त्यावेळी अध्यक्षपदावरुन त्यांनी केलेले भाषण बरेच गाजले. या भाषणात त्यांनी नवमराठी साहित्याचा पुरस्कार करून मराठी वाङमय जीवनस्पर्शी असलेच पाहिजे या भूमिकेचा पुरसकार केला.
ह. ना. आपटेंनी अनेक पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या. ह. ना. आपटेंनी साहित्याच्या अनेक प्रांतांत मुशाफिरी केली असली, तरी ते गाजले त्यांच्या कादंबरी लेखनामुळेच. बारा सामाजिक व अकरा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्या सर्वच लोकप्रियही झाल्या. पण त्यांचे नाव आजतागायत गाजत राहिले, ते त्यांच्या ‘पण लक्षात कोण घेते?’ या कादंबरीमुळे. ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीतील मैलाचा दगड बनून राहिली. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे व गोपाळ कृष्ण गोखले या सुधारणावादी नेत्यांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा गाभाही समाजाला शहाणे करून सोडण्याचाच होता.
ह. ना. आपटेंचा इंग्रजी भाषेचा अभ्यास दांडगा होता. त्यामुळेच त्यांनी शेक्सपियर व्हिक्टर ह्युगो, कॉग्रेव्ह, फ्रेंच नाटककार मोलियर यांच्या नाटकांची रुपांतरे मराठीत आणली. मेडोज टेलर याच्या दोन गाजलेल्या कादंबऱ्यांची ‘तारा’ व ‘पांडुरंग हरी’ ही रुपांतरे त्यांनी प्रकाशित केली. निबंधकार विष्णूशास्त्री चिपळूणकर हे ह. ना. आपटेंचे लेखनातील आदर्श. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर त्यांनी ‘शिष्यजनविलाप’ ही ऐंशी श्लोकांची विलापिका लिहिली. त्यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ‘केसरी’मध्ये त्यांनी भवभूती व कालिदास यांच्यासंदभांत टीकात्मक लेखन केले. हे लेखन त्यांनी ‘बिचारा’ या टोपण नावाने केले होते.
ह.ना.आपटे यांचे ३ मार्च १९१९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply